मोबाइल ही खरं तर पर्सनल गोष्ट. पण ट्रेनमध्ये बसल्यावर शेजारणीच्या मोबाइलमध्ये डोकावून बघण्याची सवय अनेकींना लागलीय. दुसऱ्याच्या मोबाइलमध्ये असं डोकावणं म्हणजे त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये नाक खुपसण्यासारखं नाही का?
प्लॅटफॉर्मवर नेहमीसारखीच गर्दी.. वर, खाली, बाजूला कुठेही पाहिलं तरी माणसं, माणसं आणि फक्त माणसंच.. ८.४५ची लोकल. इंडिकेटरवर लावलेलं तर दिसतंय पण त्याच बाजूला ‘एक्स्पेक्टेड इन मिनिट्स’ हा अंक एखाद्या जाळावर तुपाची धार सोडल्यानंतर त्याने अधिकच पेट घ्यावा तसा आधीच घामेजलेल्या अवस्थेत अजूनच राग देतोय. सतत होणाऱ्या अनाउन्समेंट्स ‘८ वाजून ४५ मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी..’ जर लेट होणारच आहे तर अशा अनाउन्समेंट्स तरी का करताहेत असे ‘ज्वलंत’ शब्द प्रत्येक सुस्काऱ्यासरशी अनेकांच्या तोंडून निघताहेत. मग कुठे तिचं ९ वाजता येणं, म्हणजे तसं वेळेतच म्हणा..असं म्हणेपर्यंत ट्रेन थांबायच्या आतच आणि लेडीज डब्यापर्यंत आपण पोचायच्या आतच अनेकांनी तिच्यात उडय़ा टाकलेल्या. आणि मग ‘कुठे उतरणार? कहाँ उतरना है ?’चा अखंड जप सुरू झालेला. सीट मिळाली तर नशीब, पण नाही मिळाली तरी कमीत कमी टेकायला जागा मिळाली तरी बस.. प्रवास सुखकर होणार..
हे नेहमीचंच चित्र. मग त्यातूनच निर्माण होणारी नाती, त्यांच्याबरोबरच्या गप्पा-गोष्टी, शेअरिंग, वाद-विवाद, भांडणं, दुखणी-खुपणी या सगळ्या कॉमन आणि प्रत्येकालाच अनुभवायला मिळणाऱ्या गोष्टी. पण या सगळ्यात हल्ली अजून एक बाब अविभाज्य भूमिका बजावतेय. ती म्हणजे मोबाइल! ट्रेनमध्ये चढल्या क्षणापासून हे साधन एक तर कानाला हेडफोन्सच्या रूपात तरी चिकटलेलं असतं, नाही तर हातात व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा मेसेजिंगच्या स्वरूपात असतं. पण ‘असतं’ हे महत्त्वाचं. मग ते कुणी कसंही वापरेनात, तो ज्याचा-त्याचा प्रश्न.. हो, कारण सेलफोन ‘तशी’ ती प्रायव्हेट गोष्टच. पण खरंच ट्रेनमधून प्रवास करताना मोबाइल ही ‘प्रायव्हेट’ गोष्ट राहिलीय का?
एक साधं उदाहरण : लेडीज कंपार्टमेंटमधून एकटय़ा प्रवास करीत असाल आणि त्या ट्रेनमध्ये गर्दी असो वा नसो, पण आजूबाजूला कुणी तरी असतंच. आपण मस्तपकी ‘आता शांतपणे मेसेजेस पाहता येतील, करता येतील..’ असं म्हणून मोबाइल काढतो, तो हातात घेतो. हातात घेतल्या क्षणीच आजूबाजूला असणाऱ्या दोन-तीन बायकांची नजर त्यावर पडते. तीही अशा रीतीने की आपण काही तरी गैरकृत्य करीत आहोत मोबाइलऐवजी एके-४७ हातात घेतलीये. हो! अगदी असेच त्यांचे एक्स्प्रेशन्स असते. तरीही मोठय़ा हिमतीने (!) ‘कशाला कुणाची फिकर’ या विचाराने आपण मोबाइलवर लक्ष केंद्रित करतो. तो अनलॉक करण्यासाठी कोड किंवा पॅटर्न टाकतो. त्यातही कोड असेल तर एक वेळ चालून जातं, पण पॅटर्न असेल तर, ‘कसला भारी पॅटर्न आहे’ किंवा ‘किती सोपा पॅटर्न आहे, लगेच समजला’ अशा अर्थाच्या नजरा, तुलना केलेले संवादही क्वचित कानांवर पडतात. तेही संवाद बाजूला सारून ‘आपल्याला जे करायचंय तेच आपण करणार’ या आविर्भावात आपण मोबाइलची अॅप्स लिस्ट ओपन करतो. वॉट्सअॅपवर क्लिक करून ते ओपन होणार इतक्यात बाजूच्या दोन-तीन बायकांनी आपल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसलेलं असतं. कुणी थेट तर कुणी तिरक्या नजरेने. अशा वेळी एक तर तो मोबाइल त्यांच्याच हातात तरी द्यावा नाही तर टाकूनच द्यावा इतकी भयंकर चीड येते.
कुठेही जा, कुठेही फिरा, फर्स्ट क्लासने किंवा सेकंड क्लासने तुमच्या मोबाइलमध्ये डोकावलं जाणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. मग ‘काय या पोरी.. सतत गेम खेळतात’, ‘ए. ते बघ तिला टेम्पल रनही नीट खेळता येत नाही,’ ‘बापरे! कॅण्डी क्रशमध्ये बरीच पुढे पोचलीये’, ‘अगं आई गं ! काय लिहिलंय हिने हे ? जानू ऽऽऽ’ किंवा मग ‘शी!! सक्काळी-सक्काळी कुणी अशी गाणी कशी ऐकू शकतं?’ अशा अर्थाच्या नजरा, एक्स्प्रेशन्स नजरेला दिसतात आणि संवाद कानांवर पडतातच किंवा काही तर काहीही न बोलता चुपचापपणे आपलं मोबाइलमध्ये बघण्याचं काम अगदी प्रामाणिकपणे करत असतात. म्हणजे सरळ सोप्या भाषेत सांगायचं तर ‘आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ या म्हणीचा शब्दश: प्रत्यय येतो. माझ्या एका मत्रिणीने तर जेव्हा तिच्यासोबत असं होत होतं तेव्हा सरळ मोबाइलच त्यांच्या तोंडासमोर धरला होता.
खरं तर मोबाइल हे प्रायव्हेट आणि पर्सनल गॅजेट आहे. त्यामुळे ते वापरताना प्रायव्हसी हवीच असते. असं म्हटल्यावरही मग वॉट्सअॅप किंवा फेसबुकवर स्टेटस तरी का अपडेट केले जातात, असं आग्र्युमेंट होण्याची शक्यता आहे. ते पब्लिकली ओपन होतंच ना. मग ते स्टेटस टाकताना कशाला लपवालपवी? पण ते स्टेटस हे स्वेच्छेने अपडेट केलेलं असतं. याउलट आपल्या मोबाइलमध्ये डोकावून पाहणाऱ्या बायकांना, मुलींना मात्र काही आपण असं कुठलंही आमंत्रण दिलेलं नसतं. तेव्हा सभ्य स्त्रियांनो, (लेडीजचं भाषांतर) कृपया, आपलं ‘डोकावणं’ आपल्याच मोबाइलपर्यंत राहू द्या. दुसऱ्यांच्या मोबाइलमध्ये डोकं घालून नाक खुपसू नका.
मोबाइल स्पेस
मोबाइल ही खरं तर पर्सनल गोष्ट. पण ट्रेनमध्ये बसल्यावर शेजारणीच्या मोबाइलमध्ये डोकावून बघण्याची सवय अनेकींना लागलीय. दुसऱ्याच्या मोबाइलमध्ये असं डोकावणं म्हणजे त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये नाक खुपसण्यासारखं नाही का?
First published on: 13-06-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile space