लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाचा प्रभाव तितकासा दिसत नाही.
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अनेकांना सोशल मीडियाच्या प्रभावाची नव्याने प्रचीती आली. तरुणाई आणि सोशल मीडिया यांनीच लोकसभा निवडणूक गाजवली. पूर्वीची कार्यकर्त्यांची जागा सोशल मीडिया घेतोय का, इतपत त्याचे महत्त्व जाणवू लागले. त्या पाश्र्वभूमीवर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी सोशल मीडियाद्वारे प्रचार करण्याची जय्यत तयारी केली. स्वतंत्र आय.टी. सेल्स, पक्षांचे तसेच उमेदवारांचे फेसबुक पेज, ट्विटर अकाऊंट, विकासकामांचा लेखाजोखा देणारे व्हिडीओज इत्यादी आयुधे निवडणुका लढण्यासाठी अगदी सज्ज झाली होती; परंतु या सगळ्याला तरुणाईचा प्रतिसाद हा जेमतेम असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’चीच दखल घेतली गेली आणि तीदेखील टीकात्मक ढंगाने. त्यावरच्या जोक्सनी सोशल मीडियावर दोन-चार दिवस राज्य केले आणि लगेच राज्याची ‘बदनामी’ असल्याचे मेसेजही तितक्याच प्रमाणात गाजले.
खरे तर विधानसभा निवडणुका अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपल्या असताना महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित उलाढाली झाल्या. युती- आघाडी तुटली; परंतु या सगळ्यावर काही भाष्य करण्याच्या फंदात न पडता मोदींच्या अमेरिकाभेटीचे किस्से आणि जोक्स मात्र शेअर करण्यात तरुणाई रमली होती. जाहिरातींमधला तोचतोचपणा तसेच सोशल साइट्सवर केलेला तसाच साचेबद्ध प्रचार यामुळे या गोष्टींमधली अपूर्वाई हरवली, असे कारण एक तरुण मित्र नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगतो.
त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी, राहुल गांधी किंवा फॉर दॅट मॅटर अरिवद केजरीवाल अशा कॅरिझ्मॅटिक नेतृत्वाची कमतरता हेही यामागचे महत्त्वाचे कारण आहे. तसेच जाहिराती किंवा प्रचारांमधून डोकावणाऱ्या ‘समाजकारण’ या मुद्दय़ाने राजकीय सत्तासंघर्षांची जागा घेतल्याने तरुणांचा रस कमी झाल्याचे दिसून येते.
लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल साइट्सवर जाणवणारी परिवर्तनाच्या गरजेची हवा आता चांगलीच थंडावली आहे. सोशल मीडियाच्याच भाषेत सांगायचे तर हजारांच्या आकडय़ात लाइक्स खाणारे मुद्दे आता मोठय़ा मुश्किलीने शंभरीपर्यंत पोहोचतात हे वास्तव आहे. नवरात्रीला जोडून सुरू झालेला प्रचार आणि परीक्षादरम्यान आलेल्या निवडणुका हे तरुणाईच्या थंड असण्याचे कारण आहे असेही काही जणांना वाटते; परंतु सतत कोणत्या न कोणत्या नेटवìकग साइटवर व्यस्त असणाऱ्या तरुणाईवर खरेच या गोष्टींमुळे फरक पडतो का, हा प्रश्नच आहे!
सोशल मीडिया ही काही जादूची कांडी नाही, ही गोष्ट यानिमित्ताने प्रकर्षांने समोर येतेय. त्याचप्रमाणे सतत काही तरी हॅपिनग किंवा चमचमीत गोष्टींच्या शोधात असणाऱ्या तरुणाईला खूश ठेवायचे असेल, तर आता नवीन क्लृप्त्या शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. सोशल मीडिया हे ‘संवादाचे माध्यम’ आहे आणि त्याच्या मर्यादांची जाणीव नव्याने करून घेणे सगळ्यांच्याच फायद्याचे ठरेल. त्यामुळे प्रचाराचा वारेमाप पसा सोशल मीडियावर खर्च झाला असला तरी सद्य:स्थिती मात्र सांगतीये.. ‘होऊ द्या खर्च, पण चर्चा आहे व्यर्थ!!’

Story img Loader