वैष्णवी वैद्य मराठे
पावसाळय़ात जितकी ट्रेकिंग, पिकनिक आणि इतर वॉटर स्पोर्ट्सची लगबग सुरू होते तशीच घाईगडबड पावसाळी फॅशनच्या बाबतीतही सुरू होते. पावसाळी कपडय़ांचे फॅशन ट्रेण्ड साधारणपणे स्टाईलपेक्षाही पावसाळी हवामानाच्या परिस्थितीशी जुळवून घेणारे असावेत यावर अधिक भर देणारे असतात. मॉन्सून ड्रेसिंगची निवड करण्याची पहिली पायरी म्हणजे योग्य फॅब्रिक निवडणे. एरवी आपण जे स्किन टाईट कपडे घालतो ते पावसाळय़ात अजिबात कम्फर्टेबल नसतात. पावसाळय़ाच्या दमट हवेमुळे ते अंगाला प्रचंड चिकटून राहतात आणि त्याने अंगाला खाज येऊ शकते. मान्सून फॅशनसाठी काही फॅशन टिप्स लक्षात घ्यायला हव्यात.
वॉटरप्रूफ आणि वॉटर-रेझिस्टंट फॅब्रिक्स
वॉटरप्रूफ किंवा वॉटर-रेझिस्टंट मटेरियल जसं की नायलॉन, पॉलिस्टर कपडे निवडा. हे फॅब्रिक्स पाण्याला दूर ठेवण्यास आणि पावसाळय़ात कोरडे ठेवण्यास मदत करतात. लखनवी फॅशनचे कपडे सध्या ट्रेण्डमध्ये आहेत जे मान्सूनसाठी अत्युत्तम आहेत. कॉटनचे कपडे हे कुठल्याही मौसमात चालू शकतात, परंतु अगदी नवीन कॉटनचे कपडे घालणं टाळा कारण कपडय़ावरची पहिली खळ जाताना अंगाला रंग लागू शकतो. दमट पावसाळी वातावरणात आरामदायी राहण्यासाठी सूती किंवा तागाचे हलके कपडे निवडा. या फॅब्रिक्समुळे घाम टाळण्यास मदत होते. पावसाळी फॅब्रिकची फॅशन मुलींसह मुलांनाही उपयोगी आहे.
तेजस्वी रंग आणि प्रिंटस
सध्या मान्सून फॅशनमध्ये फ्लोरल किंवा अॅनिमल प्रिंट प्रचंड ट्रेण्डमध्ये आहे. पावसाळय़ात ब्राईट आणि उठावदार रंग तरुण मुलामुलींना घालायला आवडतात. पावसाळय़ाच्या पोशाखांमध्ये एक पॉप रंग जोडण्यासाठी पिवळा, गुलाबी, नीलमणी किंवा मल्टिकलर फ्लोरल प्रिंट यांसारख्या रंगछटांची निवड करा.
क्रॉप टॉप्स आणि शॉर्ट्स
पावसाळय़ात तापमानाचा नीट अंदाज येत नाही, त्यामुळे कॅज्युअल आणि आरामदायक पोशाखांसाठी क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स हे लोकप्रिय पर्याय आहेत. त्यासोबत सध्या रंगीबेरंगी गम बूट्स, क्रॉक्स हे तरुणांचे आवडते प्रकार झाले आहेत. क्रॉक्स कुठल्याही प्रकारच्या कपडय़ांवर अतिशय ट्रेण्डी दिसतात. रेनबो फॅशनचे क्रॉप टॉप्स आणि त्यावर निळय़ा शेड्सचे गॉगल आकर्षक दिसतायेत. हा संपूर्ण पोशाख पावसाळी पिकनिकसाठी फार ट्रेण्डी दिसतो.
मॅक्सी कपडे आणि स्कर्ट
अधिक फेमिनाईन आणि मोहक लूकसाठी मॅक्सी कपडे किंवा स्कर्ट निवडा. तुम्हाला जितके बोल्ड कपडे घालायला आवडतात तितके वेगवेगळे प्रकार मॅक्सीमध्ये उपलब्ध आहेत. मॅक्सी ड्रेसमध्ये स्लीव्हलेस, शॉर्ट स्लीव्हज, कॅप स्लीव्हज किंवा लाँग स्लीव्ह्ज असे विविध प्रकार येतात. हवामान आणि तुमची आवड यावर अवलंबून तुम्ही स्लीव्हसह मॅक्सी ड्रेस निवडू शकता. शिफॉन, रेयॉन, जॉर्जेट अशा फॅब्रिकचे मॅक्सी ड्रेस फार खुलून दिसतात. ए-लाईन फॅशनमध्येही अनेक उत्कृष्ट मॅक्सी ड्रेस आजकाल बघायला मिळतात.
लेयिरग आणि लाइट जॅकेट
जॅकेट हा अत्यंत आधुनिक, व्हर्सटाईल आणि ट्रेण्डी प्रकार आहे. त्यातलेच वेगवेगळे प्रकार श्रग्स, ब्लेझर्स हे तरुणांचे गो-टू चॉईस बनले आहेत. पावसाळय़ातील हवामानाचा अंदाज लावणे अवघड आहे म्हणून लेयिरग हा एक व्यावहारिक फॅशन पर्याय आहे. पाऊस थांबल्यास किंवा तापमान अचानक वाढल्यास हलके जॅकेट किंवा कार्डिगन्स घाला जे सहज काढता येतील. असे युनिसेक्स जॅकेट्स अगदी सहज मिळतात.
कपडय़ांबरोबर अॅक्सेसरीज, हेरस्टाइल, स्किनकेअर यामध्येही अनेक फॅशन आणि ट्रेण्ड्स तरुण मुलं-मुली फॉलो करत आहेत. वॉटरप्रूफ हॅन्डबॅग, फॅशनेबल छत्र्या, सनग्लासेस अशा विविध अॅक्सेसरीज तरुणांच्या आवडीच्या झाल्या आहेत.
स्टेटमेंट ज्वेलरी
ट्रेण्डी ज्वेलरी हा फॅशनमधला एक अविभाज्य भाग झाला आहे. इंडो-वेस्टर्न कपडय़ांसह अशा प्रकारची ज्वेलरीसुद्धा आता सहज उपलब्ध होते आणि ती सध्या कमालीची लोकप्रिय झाली आहे. अॅक्रेलिक, राळ, स्टेनलेस स्टील किंवा टिकाऊ मेटल यांसारख्या जलरोधक किंवा जल-प्रतिरोधक ज्वेलरीची निवड करा. पावसाळय़ात ढगाळ असले तरी शक्यतो लख्ख प्रकाश असतो, आपली स्किन पण बऱ्यापैकी तुकतुकीत असते. अशा वातावरणात ब्राईट रंग अंगावर छान दिसतात, त्याला साजेशीच आकर्षक रंगसंगतीची ज्वेलरी परिधान केली की तुम्ही अगदी ट्रेण्डी दिसाल. ऑक्सिडाज्ड ज्वेलरी सगळय़ांकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारे असतेच. या सगळय़ाच प्रकारच्या स्टेटमेंटच्या ज्वेलरीची काळजी घेण्यासाठी, वॉटरप्रूफ पाऊचेस मध्ये ज्वेलरी ठेवा.
वॉटरप्रूफ बॅग्स
स्टायलिश बॅग्स वापरायला सगळय़ांनाच आवडते. आता तरुण मुलंही याला अपवाद नाहीत. पावसाळय़ात सगळय़ात महत्त्वाचा मुद्दा असतो तो बॅग ओली होऊन आतले सामान खराब होणे. यातही पीव्हीसी, नायलॉन किंवा वॉटरप्रूफ लेदर बॅग्स हा पर्याय उत्तम आहे. बॅगच्या आत मोबाईल आणि इतर वस्तूंसाठी प्लास्टिक पिशवी ठेवणे वगैरे ही काळजी घ्यावीच, परंतु संपूर्ण बॅगच जर वॉटरप्रूफ असेल तर तुमची चिंता मिटेल. बॅगपॅक, टोट बॅग किवा स्टायलिश क्रॉस बॅग, कुठल्याही पद्धतीची बॅग असली तरी वॉटरप्रूफला प्राधान्य द्या.
सनग्लासेस
मुसळधार पावसांत डोळय़ांची काळजी घेणे आवश्यक आहे. मुख्यत: दुचाकी गाडय़ांवर पावसात डोळे उघडे ठेऊन रस्त्याकडे बघणे फार अवघड जाते. म्हणूनच सनग्लासेस वापरावेत. त्यातही आता तुमच्या चेहऱ्याला सूट होणारे, व्हिजन क्लीअर करणारे आणि तुमच्या आवडत्या आकाराचे ट्रेण्डी गॉगल तुम्ही घेऊ शकता. तुमचा वापर बघून ब्रॅण्डेड सनग्लासेसचा विचार करा, कारण ते बऱ्यापैकी महाग असतात.
पावसाळी चपला
मुलींच्या आवडत्या हिल्स आणि आजकाल विविध आकर्षक रंगामध्ये येणाऱ्या फ्लॅट चपला पावसाळय़ात अजिबातच उपयोगी नसतात. आजकाल क्रॉक्स प्रकार फार लोकप्रिय झाला आहे. अगदी लहानग्यांपासून ते मोठय़ापर्यंत सगळय़ा वयोगटासाठी क्रॉक्स सुंदर रंग आणि पॅटर्नमध्ये येतात. त्या शिवाय रबरसारख्या मटेरियलमध्ये मुलींच्या पावसाळी चपला, सँडल्स मिळतात, परंतु त्या पायाला चावण्याची ही शक्यता जास्त असते. आपल्या आवडीप्रमाणे आणि वापराप्रमाणे शक्यतो स्टायलिश पावसाळी चपलाच सध्या घ्याव्यात.
हेअर केअर
पावसाळय़ात केसांची काळजी घेणे सगळय़ात कठीण, परंतु फार महत्त्वाचे असते. ओलेपणामुळे केसांच्या अनेक समस्या येऊ शकतात. त्यासाठी बाहेर जाताना शक्यतो केस बांधलेले ठेवा. तेव्हाही वॉटरप्रूफ हेअरबॅन्ड, क्लिप्स, स्टिक्स, रबर्सचा वापर करा. वेळोवेळी केसांची चंपी करून केस धुवत राहा.
पावसाळय़ात फॅशनेबल राहताना ट्रेण्ड पलीकडे उपयुक्तता बघणे फार गरजेचे आहे. फॅशनचे विश्व आणि त्याची व्याख्या आता बदलली आहे. नैसर्गिक उपयुक्तता आणि आवड याची सांगड फॅशन क्षेत्रात होताना दिसते. साधे पण एलिगंट आणि कम्फर्टेबल काय करता येईल याचा विचार सतत तरुणाई करत असते. इतर ऋतूंमध्ये असणारी फॅशन आणि पावसाळय़ातली फॅशन यात बऱ्यापैकी फरक आहे. रंगसंगती आणि टिकाऊ अशीच ‘रेनिंग’ फॅशन तरुणाईला जवळची वाटते यात शंका नाही.
viva@expressindia.com