अमृता अरुण
मेकअप म्हणजे स्त्रियांचा जिव्हाळय़ाचा विषय. पावसाळय़ातला मेकअप म्हणजे एकूणच कंटाळा आणि चिडचिडीचा विषय होतो. पाऊस म्हणजे कंटाळा. तासनतास आरशासमोर उभं राहून सुंदर असा मेकअप करायचा आणि घराच्या बाहेर पडताच धो धो कोसळणाऱ्या पावसाने पाच मिनिटांत चेहऱ्यावरचा मेकअप होत्याचा नव्हता झाला की पुढचा अख्खा दिवस चिडचिडीत जातो. मेकअपच्या धुऊन निघण्याने होणारी ही चिडचिड टाळण्यासाठी खास मान्सून मेकअपच्या या काही टिप्स..
खरं तर पावसाळा म्हणजे मेकअप लव्हरचा सगळय़ात नावडता ऋतू. पावसाळी वातावरणामुळे तुमची त्वचा पॅची दिसू शकते. तसेच ह्युमिडिटी वाढल्यामुळे त्वचेवरील प्रॉडक्ट्स लवकर निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा काही गोष्टींची काळजी घ्या ज्याने मेकअप बेस पॅची दिसणार नाही किंवा आय लायनर ओघळणार नाही किंवा लिपस्टिक पसरणार नाही.
वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचेवरील मॉइश्चर लवकर निघून जाते. म्हणून पावसाळय़ात आपल्या बॅगमध्ये मॉइश्चरायझर नेहमी ठेवत जा. मुळात मॉइश्चरायझरची निवड करताना ते ऑइल बेस नसेल याची खात्री करून घ्या आणि त्यावर प्राइमर लावायला अजिबात विसरू नका. प्राइमरमुळे तुमचा मेकअप अधिक काळ टिकतो. जर तुम्हाला लग्नकार्यासारख्या कुठल्या खास कार्यक्रमाला जायचं असेल तरच फाऊंडेशनचा वापर करा. अन्यथा रोजच्या वापरासाठी निदान पावसाळय़ात तरी फाऊंडेशन न लावलेलेच उत्तम. शिवाय फाऊंडेशन निवडतानाही वॉटरप्रूफ फाऊंडेशन निवडण्यावर भर द्या.
पावसाळय़ात बहुधा कन्सिलर लावणे टाळा. त्याऐवजी लूज पावडरचा मेकअप बेस म्हणून वापर करा. अगदीच गरज वाटल्यास ८० टक्के पावडरमध्ये २० टक्के फाऊंडेशन मिसळून त्वचेवर लावा किंवा बाजारात सहज उपलब्ध असलेल्या पावडर बेस फाऊंडेशनचा तुम्ही खास मान्सून मेकअपसाठी उपयोग करू शकता.
डोळय़ांचा मेकअप हा सर्वात नाजूक आणि महत्त्वाचा विषय. पावसाळय़ात डोळय़ांना मेकअप करताना स्वस्तातले कामचलाऊ लायनर- काजळ वापरणे अगदीच टाळावे. कारण ते ओघळून खाली येण्याची दाट शक्यता असते आणि डोळय़ांचा मेकअप खराब झाल्याने संपूर्ण चेहऱ्याचा लुक खराब होतो. चेहरा आपसूकच डल दिसू लागतो. पावसाळय़ात डोळय़ांना मेकअप करायचा झाल्यास तुम्ही पापण्यांना वॉटरप्रूफ मस्कारा लावू शकता. फार फार तर चांगल्या ब्रँडच्या काजळाची हलकीशी रेषा डोळय़ांखाली लावू शकता. अगदी बटबटीत, गडद रेषा ओढणे पावसाळय़ात टाळावे. शिवाय काळय़ा रंगाऐवजी रंगीत पेन्सिल्सचा या ऋतूत वापर केल्यास चांगला लुक साधता येईल.
मान्सूनमध्ये लिपस्टिकची निवड करतानाही मॅट, न्यूड लिपस्टिकला प्राधान्य द्यावे. कुठल्याही गडद रंगाऐवजी, लाइट- सौम्य शेड्सचा वापर करावा. लिपस्टिक लावण्याच्या आधी मॅट लिप पेन्सिलची बॉर्डर लावली तर अधिक उत्तम. या ऋतूमध्ये ग्लॉसी लिपस्टिक्स वापरू नये. कारण आद्र्रतेमुळे त्या पसरण्याची शक्यता असते.
मेकअप हा आपला चेहरा अधिक सुंदर बनवण्याचे काम करतो; परंतु मान्सून मेकअप करताना कमीत कमी प्रॉडक्ट वापरले जातील याची काळजी घ्यावी. प्रॉडक्ट किती प्रमाणात घ्यावे आणि कोणत्या शेड्स वापराव्यात हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. जेणेकरून पावसाच्या पाण्याने आणि वातावरणातील आद्र्रतेने आपला मेकअप खराब होणार नाही. म्हणजेच प्रॉडक्ट्सची योग्य निवडच आपल्याला लॉंग लास्टिंग मान्सून लुक मिळवण्यासाठी मदत करू शकते.
viva@expressindia.com