मान्सून सेलचा धमाका खरोखरच मोठा असतो. मान्सून वेळेवर सुरू होवो अगर न होवो, हल्ली मान्सूस सेल मात्र नेमेचि येतात. सगळीकडे बंपर डिस्काउंट, सेल, सवलत असे बोर्ड दिसायला लागतात. पण बऱ्याचदा हे सेलमधले डिस्काउंट फसवेच असतात. त्या भुलभुलय्यात न शिरता थोडा रिसर्च, थोडं विंडो शॉपिंग आणि थोडं तारतम्य बाळगलं तर तुम्हीसुद्धा या सेलच्या वर्षांवात हात धुवून घेऊ शकता.
शाळेत पावसाळा या विषयावर निबंध लिहिताना आपण सगळ्यांनीच या ऋतूतला हिरवा निसर्ग, मुसळधार सरी, उत्फुल्ल वातावरण याचं भरभरून वर्णन केलं असेल. ..आणि म्हणून मला पावसाळा हा ऋतू आवडतो, असं शेवटचं वाक्य ठरलेलं असायचं. आता आपल्यातल्या खऱ्या शॉपिंग फ्रिक जनतेला हा ऋतू आवडण्याचं खरं कारण विचारलं तर नक्की उत्तर येईल – पावसाळ्यात सगळीकडे भरपूर सेल लागतात आणि म्हणून मला हा ऋतू आवडतो. ही अतिशयोक्ती नक्कीच नाही. कारण मान्सून सेलचा धमाका खरोखरच मोठा असतो.
मान्सून वेळेवर सुरू होवो की न होवो, हल्ली मान्सूस सेल मात्र नेमेचि येतात आणि अगदी वेळेवर येतात. सगळीकडे बंपर डिस्काउंट, सेल, सवलत असे बोर्ड दिसायला लागतात.
खरं सांगायचं तर अशा बहुतेक सेलमधून मिळणाऱ्या सवलती फसव्याच असतात. म्हणजे आधीच त्या वस्तूची किंमत वाढवून लिहायची आणि मग अमूक टक्के डिस्काउंट असं लेबल लावून ती खऱ्या किमतीत विकायची. मला ३००० चा ड्रेस पंधराशेत मिळाला हे मानसिक समाधान याखेरीज यातून काहीच फायदा होत नाही. खऱ्या शॉपिंग लव्हरला मात्र कुठून काय घ्यायचं, ते चांगलं माहिती असतं. हे सेल आणि डिस्काउंटचं गणित त्याच्या चांगलं डोक्यात असतं.
सेलच्या भुलभुलय्यात न शिरता खरा फायदा हवा असेल तर ते तुम्हालाही सहज शक्य आहे. थोडा रिसर्च, थोडं विंडो शॉपिंग आणि थोडं तारतम्य बाळगलं तर तुम्हीसुद्धा या सेलच्या वर्षांवाता हात धुवून घेऊ शकता. या सेलमागचं लॉजिक समजून घेतलं तर हे सोपं जाईल.
सेलमागचं लॉजिक
दुकानातून जुना माल लवकरात लवकर विकून संपवायचा आणि नव्या फ्रेश स्टॉकला जागा करून द्यायची. हा सेलमागचा खरा उद्देश असतो. म्हणून तर क्लिअरन्स सेल हे या डिस्काउंट मार्केटमागचं खरं लॉजिक आहे. एंड ऑफ द सीझन सेल ही संकल्पना परदेशात खूप पूर्वीपासून प्रचलित आहे. फेस्टिव्ह सेलबरोबरच एंड ऑफ द सीझन सेलला युरोप- अमेरिकेत तुफान गर्दी असते. या देशांमध्ये ऋतूमानातले बदल तसे मोठे असतात. त्यामुळे स्प्रिंग संपून समर सुरू होतो न होतो तोच तिथे एंड ऑफ द सीझन सेल लावून टाकतात आणि उन्हाळी कपडे निकाली काढतात. पुढे येणाऱ्या थंडीच्या सीझनसाठी दुकानातले रॅक खाली करणं आवश्यक असतं. कारण फरचे कोट, जॅकेट, मफलर, टोप्या असा खाशा जमानिमा तिथल्या विंटरला लागतो. उलट समर म्हणजे रंगीबेरंगी कपडे, केप्रीज, स्लीव्हलेस, शॉर्टस हे वापरण्याचा ऋतू. हा सीझन संपला की याला कोणी विचारणार नाही. आपल्याकडे एवढा सीझनल इफेक्ट उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात जाणवत नाही. खरा फरक जाणवतो तो पावसाळ्यातच. कारण पावसाळा संपता संपता आपल्याकडे फेस्टिव्ह सीझन सुरू होतो. मग त्यासाठी नवीन फॅशनचा, नवीन मागणीप्रमाणे स्टॉक भरायला हा एंड ऑफ द सीझन सेल लावतात.
जिथं पिकतं तिथं विकत नाही, असं म्हणतात त्याच धर्तीवर जेव्हा हवं असतं तेव्हा ते मिळत नाही, असाही सर्वसाधारण नियम आहे. म्हणजे काय तर आता पावसाळा आहे म्हटल्यावर छत्री, रेनकोट, पावसाळी शूज, रेक्झीन बॅग्ज या गोष्टींना जबरदस्त मागणी असते. त्यावर या सीझनमध्ये डिस्काउंट मिळणं अवघड आहे. मिळाला तरी त्यातून किती चांगला माल विकला जाईल, तो घेणं खरंच फायदेशीर ठरेल का हा प्रश्नच आहे. उलट लेदर शूज, हॅट, कॅप किंवा कॉटन अपारेल याला सध्या कुणी वाली नाही. त्यामुळे सर्वाधिक डिस्काउंट या मालावर मिळेल. ब्रँडेड लेदर शूज, कॉटन रिच आउटफिट्स, ट्रॅडिशनल वेअर, लेदर बॅग्ज हे सेलमधून घेण्यात खरा फायदा आहे. कारण याच्या किमती आता खरच पडल्या आहेत. लेदर पावसात खराब होतं आणि आता पावसाळा संपेपर्यंत कुणी जुना स्टॉक मुद्दाम घ्यायला येणार नाही, हे माहिती असतं.
दुसरी सेलमधून चांगली मिळणारी गोष्ट म्हणजे एथनिक वेअर आणि ज्वेलरीची. पावसाळा संपता संपता आपल्याकडे सण-वार आणि लग्नसराई सुरू होते. त्यासाठी दर वर्षीनवीन ट्रेंडचे आणि नवीन फॅशनचे कपडे येत असतात. मग दुकानात असलेला स्टॉक कमी दरात मान्सून सेलमध्ये उपलब्ध असतो.
मोठय़ा स्टोअरमध्ये, चेन शॉप्समध्ये, ब्रँडेड शॉप्समध्ये सेल सुरू आहे, तसा छोटय़ा दुकानात, लोकल स्टोअर्समध्येही सुरू आहे. अनेक लोकल ब्रँड आणि छोटी आऊटलेट्सही नव्या स्टॉकला जागा करण्यासाठी मान्सूनमध्येच क्लिअरन्स सेल लावतात. छोटय़ा दुकानांची लिस्ट देणं तर अवघडच आहे. पण काही मोठय़ा मॉलची आणि ब्रँडची नावं देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला काय घ्यायचंय आणि ते कुठे चांगलं मिळेल यासाठी थोडा रिसर्च गरजेचा आहे. शेवटी सेलच्या नावाखाली त्या गौडबंगालात न अडकता थोडय़ा चलाखीनं शॉपिंग करण्याची आवश्यकता आहे. सो.. हॅपी मान्सून शॉपिंग!
मान्सून सेलमधून काय घ्यावं
लेदर शूज, लेदर बॅग्ज, पर्स, एथनिक वेअर, ब्रँडेड अपारेल, कॉटन आउटफिट्स
कुठे आहेत सेल?
हायपर सिटी : मालाड, वाशी, ठाणे, पुणे
सेंट्रल : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक
वेस्टसाईड : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे
बिग बझार : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे
रिलायन्स ट्रेंड्स : मुंबई, नवी मुंबई, ठाणे
लाईफस्टाईल : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे
मार्कस अँड स्पन्सर्स : मुंबई, पुणे
कुठल्या ब्रँडवर ऑफर सुरू?
फूटवेअर : वुडलँड, क्लर्क्स, मेट्रो, क्रॉक्स, आदिदास, रिलायन्स फूटप्रिंट्स
अॅपारेल : एएनडी, अॅरो, एथनिसिटी, जश्न आणि अनेक स्थानिक ब्रँड
ज्वेलरी : अस्मी, सिया आर्ट ज्वेलरी