रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.
सध्या आपण पावसाळ्यात तयार करण्याच्या आणि उपलब्ध असलेल्या पालेभाज्या वेगळ्या पद्धतीने कशा करायच्या हे बघत आहोत. याभागातही पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या थोडय़ा वेगळ्या भाज्या आपण बघूया.
शेवळाची भाजी (नारळ रसातील)
शेवळं हा प्रकार सहसा सगळीकडे मिळत नाही, पण जिथे उपलब्ध असेल त्यांनी शेवळाची भाजी पावसाळ्यात खायलाच हवी. ही भाजी बनविण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. शेवळाचा कोवळा भाग तोडल्यानंतर खालची जी जून पानं असतात ती फेकून द्यावी. नंतर पिवळसर ठिपक्यांचा भाग तो पण खरवडून काढून टाका. कारण हा भाग थोडा खाजरा असतो. उरलेली सर्व भाजी चिरून काढावी.
साहित्य : कांदा १ नग, लसूण पाकळ्या ७-८, आल्याचा तुकडा अर्धा इंच, सुक्या खोबरे पाव वाटी (मसाल्याचे वाटण- हे सर्व जिन्नस निखाऱ्यावर भाजून याची पेस्ट करून घ्यावी.), शेवळाची भाजी बारीक चिरलेली २ वाटय़ा, आंबाडीचे फुल २-४ नग, नारळाचे दुध १ वाटी, तांदूळाची पीठी १ चमचा, हिरवी मिरची व कोथिंबीर पेस्ट पाव वाटी, मीठ, साखर चवीनुसार
कृती : फ्रायपॅनमधे तेल घेऊन गरम झाल्यावर वरील मसाल्याचे वाटण घालावे. हे मिश्रण चांगले परतल्यावर त्यात हिरवी मिरची व कोथिंबिरीची पेस्ट घालावी व थोडी हळद पण घालावी. त्यानंतर चिरलेली भाजी आणि दोन-चार आंबाडीची फुले घालावी. थोडे परतून सर्वात शेवटी नारळाचे दुध घालून शिजवावे. चवीनुसार मीठ, साखर घालावी. नारळाचे दुध फाटू नये म्हणून थोडी तांदूळाची पीठी लावावी. या भाजीबरोबर गरम तांदूळाची भाकर अप्रतिम लागते.
वऱ्हाडी प्रकारची पातळ भाजी डाळभाजी
यामध्ये मुख्यत्त्वे पालक वापरतात. पालकाच्या जोडीला मेथी, अळू, मुळा, अथवा आंबट चुका वापरतात. एक वेगळा प्रकार म्हणून करायला हरकत नाही.
साहित्य : बारीक चिरलेला पालक २ वाटय़ा, मेथी किंवा अळू अर्धा वाटी, मुळ्याच्या चकल्या अर्धा वाटी (याबरोबर मुळ्याची पाने सुद्धा बारीक चिरून घातली तर चांगली लागते), हिरवी मिरची चिरलेली २ चमचे, आलं, लसूण पेस्ट, हळद, तिखट चवीनुसार, मेथी दाणे अर्धा चमचा, खोबऱ्याचे काप २-३ चमचे, भिजलेले शेंगदाणे ४ चमचे, हिंग अर्धा चमचा, धणे, जिरे पावडर २ चमचे, तेल अर्धा वाटी, कढीपत्ता, मीठ, गुळ चवीनुसार, चिंचेचा कोळ ५ चमचे, मेथीदाणे अर्धा चमचा
कृती : प्रथम एका भांडय़ात दाणे, चणाडाळ एकत्र थोडी हळद घालून एकत्र शिजवून घ्या. अर्धा वाटी तेला पैकी थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, लसूण, शिजवलेले दाणे, चणाडाळ, कढीपत्ता, खोबऱ्याच्या चकत्या, मुळा, हळद, तिखट, धने-जिरे पावडर, मेथीदाणे घालून चांगले परतून घ्यावे. नंतर बारीक चिरलेली पालक, मेथी टाकून खरपूस भाजून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळल्यावर थोडी बेसनाची पेस्ट करून त्यानी घट्ट करावी. चवीनुसार मीठ, चिंच, गूळ घालून एक उकळी आणा. शेवटी अर्धा चमचा वैदर्भीय पद्धतीचा गरम मसाला घाला. उरलेल्या तेलात पुन्हा मोहरी, हिंग व बारीक चिरलेला लसूण घालून ती फोडणी वरून भाजीवर घालावी.
गरम मसाला वैदर्भीय पद्धतीचा
साहित्य : दालचिनी १० ग्रॅम, मोठी वेलची १० ग्रॅम, लाल मिरची २० ग्रॅम, धने ५० ग्रॅम, जीरे २५ ग्रॅम, दगडफूल १० ग्रॅम, तमालपत्र ४ ते ५, स्टारफूल ४ ते ५, काळीमिरी ५ ग्रॅम, लवंग १० ग्रॅम, सुकं खोबरं २० ग्रॅम, जयपत्री १० ग्रॅम, शहाजीरे १० ग्रॅम, खसखस १० ग्रॅम, मोहरी ५ ग्रॅम, मेथीदाणे ५ ग्रॅम, मीठ पाव चमचा, हळकुंड १ ते २, मोहरी १० ग्रॅम
कृती : सर्व साहित्य वेगवेगळं शेंगदाणे तेलावर काळपट भाजून मिक्सरवर बारीक करून ठेवणे.
टीप : पुष्कळ दिवस ठेवायचा असल्यास सुकं खोबरं घालू नये वास येईल.
पंढरपूरची बाजार आमटी
हा पंढरपूरमधे (जि. सोलापूर) तयार होणारा पारंपारिक भाजीचा/कालवणाचा प्रकार आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी बाजार संपल्यानंतर सगले भाजीवाले मिळून उरलेल्या पालेभाज्यांचा तिथल्याच एका हॉटेलमध्ये हा प्रकार करतात. यात मसूरीची डाळ, तुरीची डाळ, पालकाची व बाजाराच्या दिवशी उरलेल्या इतर पालेभाज्या (ज्या दुसऱ्या दिवशी खराब होतील अशा) एकत्र चिरून किंवा वाटून भरपूर लसणीची फोडणी देतात. वरून भरपूर साईचा (मलई) वापर करतात. ज्या रेस्टॉरेंटमधे ही भाजी तयार करतात तिथली दुधावरची साय व उर्वरित दूध हे सुद्धा यात घालतात. यामुळे वेगळीच चव या भाजीला येते.
साहित्य : मसुर आणि तुरीच्या डाळीचे वरण १ वाटी, बारीक चिरलेल्या पालेभाज्या ४ वाटय़ा, (उपलब्ध असतील त्या), अख्खा ठेचलेला लसूण ८-१० पाकळ्या, ठेचलेली हिरवी मिरची चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर ४ चमचे, ठेचलेलं आलं २ चमचे, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार, दुध १ वाटी, दुधाची साय पाव वाटी
कृती : फ्रायपॅनमधे तेल घेऊन मोहरी तडतडल्यावर यात लसूण, आलं, हिरवी मिरची घालून चांगले परतावे. यानंतर पालेभाज्या घालून त्याही परताव्यात. त्यातले पाणी सुकल्यावर त्यात शिजलेली डाळ घालावी. नंतर त्यात दुध, चवीनुसार मीठ, साखर घालून एक उकळी येऊ द्यावी. वरून दुधाची साय घालून सव्र्ह करा.
टीप : हा भाजीचा प्रकार पोळी, भात, भाकर याबरोबर चांगला लागतो.
शेवग्याच्या पानाची भाजी
शेवग्याच्या शेंगाबद्दल सर्वाना माहिती आहे. यामधे व्हिटामिन ए, बी-१, सी, कॅल्शीयम व लोह याचा साठा असतो. पण शेवग्याच्या पानातही व्हिटामिन ए, बी-१, सी, फॉस्फरस, काबरेहायड्रेट, लोह व प्रथिने यांचा भरपूर प्रमाणात साठा असतो. व याची भाजी पण चवदार होते.
साहित्य : शेवग्याची चिरलेली पाने ४ वाटय़ा, तीळ १ चमचा, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, हळद, तिखट, मीठ, साखर चवीनुसार, तेल, शेवग्याच्या शेंगा शिजवून काढलेला गर अर्धी वाटी
कृती : फ्रायपॅनमधे तेल घेऊन जिरे व तीळ फुटल्यावर त्यात बारीक चिरलेली मिरची, लसूण घालून परतून घ्या. त्यानंतर शेवग्याची पाने, गर व उर्वरीत जिन्नस घालून थोडय़ाशा पाण्याचा हबका मारून शिजवा. चवीनुसार मीठ, साखर घाला.
चिवळीची भाजी
ही भाजी विदर्भात जास्त करून पाहायला मिळते. जाडसर पण बारीक गोल-गोल पाने व त्याला लालसर दांडा असतो. ही भाजी मे, जून, जुलै या काळात जास्त असते व तशी ही भाजी थंड असते. या भाजीची पाने खुडण्यासाठी वेगळी पद्धत आहे. काथ्याच्या दोरीनं विणलेल्या खाटेवर ही भाजी घालतात. वरून पोत्याने चोळतात, म्हणजे आपोआप पाने खाली पडतात. या भाजीला मुळातच एवढी छान चव असते की हिला फक्त मीठ, मोहरी, हिंग, हळद, तिखट याची फोडणी द्यावी व दोन मिनिटे परतून लगेच खायला द्या. एक वाटी चिवळीची पाने असतील तर तयार झालेली भाजी पाव वाटीच होते.