– वेदवती चिपळूणकर viva@expressindia.com
ज्याच्यासाठी कला ही एक ‘स्व-शोधाची मालिका’ असते, अशा व्यक्तीला स्वत:मधली कला प्रत्येक वेळी नव्याने सापडते आणि प्रत्येक ‘क्लिक पॉइंट’ला त्या कलेची धार वेगळी असते. देहभान हरपून, स्थळकाळ विसरून एखादी गोष्ट करणं म्हणजे भक्ती! या भक्तीच्या स्थानी ज्या वेळी कला असते त्या वेळी तो कलाकार स्वत:ला संपूर्णपणे विसरून स्वत:च्याच कलाविष्कारात तल्लीन झालेला एक भक्तच असतो. आयुष्यात निवडलेली एखादी कला एखाद्याला समाधान देते, एखाद्याला सुबत्ता देते, तर एखाद्याला मनसोक्त आनंद देते. असाच केवळ आत्मानंदासाठी कलेची उपासना करणारा विचारी आणि बहुआयामी कलाकार म्हणजे ‘प्राजक्त देशमुख’! त्याची सुरुवात लहानशा गर्दीतल्या भूमिकेतून झाली आणि त्याच्या ‘संगीत देवबाभळी’ने थेट साहित्य अकादमीपर्यंत मजल मारली.
शाळेमध्ये शांत आणि फारसा न बोलणारा, कशात सहभागी न होणारा प्राजक्त शाळेच्या बाहेर मात्र द्वाड आणि मस्तीखोर मुलगा होता. एकदा शाळेच्या ‘फन फेअर’मध्ये त्याने जादूचे प्रयोग बघितले. तिथे जादू शिकवतही होते. प्राजक्त सांगतो, ‘तिथे मी जादूचे प्रयोग शिकलो. त्यानंतर एक दिवस बिल्डिंगमधल्या सगळय़ांना बोलावून, गळय़ाला टॉवेल बांधून मी जादूचे प्रयोग केले. त्या वेळी माझ्यासमोर बसलेले बिल्डिंगमधले लोक हे माझे पहिले प्रेक्षक! मला इतरांसमोर काही तरी करता येतं आणि इतर लोक ते शांतपणे बसून बघतात ही गोष्ट मला तेव्हा पहिल्यांदा जाणवली. शाळेत कदाचित अभ्यासातलं काही विचारतील म्हणून मी मागे राहत असेन, मात्र या छोटय़ाशा परफॉर्मन्सने मला तेव्हा खूपच छान वाटलं होतं.’
कॉलेजमध्ये असताना मित्रासोबत नाटकाची तालीम नुसतीच बघायला म्हणून जाणारा प्राजक्त एक दिवस मॉबमधल्या एका पात्राच्या भूमिकेत आणि तिथून मोठय़ा भूमिकेत अगदी सहज ‘फिट’ झाला. त्या वेळी त्याने नाटकाच्या संपूर्ण प्रक्रियेचं बारकाईने आणि त्रयस्थपणे निरीक्षण केलं. प्राजक्त म्हणतो, ‘विंगमध्ये गडबड सुरू असायची. सेट लावणं, बदलणं, कलाकारांना मदत करणं या सगळय़ांची लगबग असायची. नाटक सुरू व्हायच्या आधीपर्यंत वेगळा असणारा माणूस रंगमंचावर पाऊल ठेवल्यावर वेगळाच होऊन जातो, वेगळी व्यक्ती बनतो. पिटामध्ये संगीत देणारे लोक योग्य क्षणाची वाट बघत थांबलेले असतात. तालीम झालेली असली तरी त्यांना तो योग्य क्षण प्रत्येक प्रयोगाच्या वेळी अचूक कळतो, जाणवतो. या सगळय़ा बाबी मला जादूसारख्याच वाटतात. ही एक जादू आहे आणि प्रत्येक जण एक जादूगार! त्याच नाटकात मला एका मध्यवर्ती पात्राच्या मृत्यूनंतर सर्व गावकऱ्यांसोबत रडायला म्हणून बसवलं होतं. मला खरं तर काहीच विशेष काम नव्हतं; पण माझ्या मित्राने आणि मी मिळून मला एक नाव ठरवलं, तो कसं रडेल याचं वर्किंग केलं आणि प्रसंगामध्ये मला माझा मित्र हाक मारेल आणि मी रडेन, एवढंच ठरवलं. माझं रडणं त्या दिग्दर्शकांना खूप वास्तवदर्शी अर्थात रिअलिस्टिक वाटलं. आम्ही त्यावर इतका विचार केला आहे हे त्या नाटकाच्या दिग्दर्शकांच्या लक्षात आलं. पुढच्या प्रयोगाच्या वेळी त्यांनी मला त्या गावाच्या सरपंचाची भूमिका दिली. ते माझं रंगमंचावरचं पहिलं काम! त्या लहानशा प्रवेशानेही माझ्यात आत्मविश्वास आला होता.’ त्याच दिग्दर्शकांनी त्यांच्या पुढच्या नाटकात मला प्रमुख भूमिका दिली, असं प्राजक्तने सांगितलं. कोणतीही अपेक्षा नसताना आणि कल्पना नसताना ही संधी प्राजक्तच्या समोर आली. निमित्ताने आपल्याकडे स्वत:हून चालून आलेल्या कोणत्याही कामाला किंवा संधीला नकार द्यायचा नाही, अशा विचाराच्या प्राजक्तने आधी गर्दीतलं आणि नंतर मध्यवर्ती पात्राचंही काम मनापासून केलं.
त्यानंतरचा प्राजक्तचा मुख्य ‘क्लिक पॉइंट’ म्हणजे त्याने दिग्दर्शन आणि अभिनय केलेलं ‘पाणीपुरी’ हे नाटक. या नाटकाचं दिग्दर्शन हे प्राजक्तचं पहिलंच दिग्दर्शन. याबद्दल प्राजक्त सांगतो, ‘या नाटकाच्या तालमी सुरू असताना एकदा एक घटना घडली जिचा माझ्यावर खूप चांगला परिणाम झाला. एकदा तालमीच्या दरम्यान मी अचानक ब्लँक झालो, हँग झालो. पटकन काही सुचेना. मी तालमीतून मध्येच बाहेर पडलो आणि मला रडू यायला लागलं. तेव्हा मी भरपूर रडलो. नंतर याचा विचार करताना मला हे जाणवलं की, मी त्या वेळी त्या पात्राशी इतका एकरूप झालो होतो. मी स्वत:ला पूर्ण विसरून गेलो होतो आणि त्या पात्राच्या भूमिकेतून मी रडायला लागलो. त्या क्षणी मला माझं पात्र सापडलं होतं. मात्र त्याच वेळी हेही लक्षात आलं होतं की, आपल्याला भूमिका आणि वास्तव वेगळं ठेवता आलं पाहिजे. स्विच-ऑन आणि स्विच-ऑफ म्हणतात तसं करायला जमलं पाहिजे. या नाटकाने मला पहिल्यांदाच दिग्दर्शनाचा अनुभव दिला.’ अशाच दुसऱ्या नाटकाचा प्राजक्त आवर्जून उल्लेख करतो ते म्हणजे ‘हंडाभर चांदण्या’. त्यात त्याने पासष्ट ते सत्तर या वयाच्या आसपास असलेल्या म्हाताऱ्याची भूमिका केली होती. या दोन नाटकांनी प्राजक्तला ‘मला हे जमतंय आणि आवडतंय’ ही जाणीव करून दिली.
प्राजक्तला ओळख मिळवून दिली, मान-सन्मान मिळवून दिला तो ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने. मात्र ते नाटक ही खरं तर एका स्पर्धेसाठी प्राजक्तने केलेली एकांकिका होती. साधारणत: मुंबई-पुणे सोडून नाशिकच्या एकांकिकेला बक्षिसं मिळाल्याचं आश्चर्य अनेकांना वाटलं. एका चित्रपटाच्या रीसर्चसाठी गेलेला असताना प्राजक्तला सुचलेलं ते नाटक होतं. मात्र एकांकिकेचा वेळ कमी असल्याने त्याने ते एडिट केलं होतं. त्याच्या एकांकिकेच्या झालेल्या कौतुकामुळे त्याची प्रसाद कांबळी यांच्याशी भेट झाली. प्रसाद कांबळी यांनी त्याला ‘संगीत देवबाभळी’ व्यावसायिक स्वरूपात आणण्याचं सुचवलं आणि त्याचं दिग्दर्शनही प्राजक्तनेच करावं असा आग्रहही धरला. प्राजक्त म्हणतो, ‘व्यावसायिक नाटकाचं दिग्दर्शन करणं हे माझ्यासाठी खूपच धक्कादायक होतं. मी कधीही त्या दृष्टीने विचार केला नव्हता. व्यावसायिक नाटक म्हणजे मोठी जबाबदारी असते आणि त्यासाठी मी अगदीच नवीन होतो; पण मी स्वत:हून केल्या नसत्या अशा अनेक गोष्टी करत होतो आणि त्याला चांगलं अॅप्रिसिएशनही मिळत होतं. त्यामुळे मी यालाही नकार दिला नाही. ‘संगीत देवबाभळी’चं व्यावसायिक स्वरूपात दिग्दर्शन करण्याचा निर्णय इतका मोठा ठरेल याची मी कल्पनाच केली नव्हती. माझ्या कल्पनेपलीकडची मोठी लोकं नाटक बघायला आली, त्याबद्दल चार कौतुकाचे शब्द ऐकायला मिळाले आणि नंतर तर साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला.’ ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाच्या निमित्ताने प्राजक्त देशमुख हे नाव प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आलं. ‘आपलं एखादं स्वप्न असलं की एकदा ते पूर्ण झाल्यावर पुढे काय करायचं अशी नव्याने सुरुवात होते,’ असं प्राजक्त म्हणतो. कला क्षेत्रात करिअर करायचं असं त्याचं स्वप्न नव्हतं आणि कदाचित त्यामुळेच पूर्णविराम देण्याचा विचार न करता त्याच्याकडून कलानिर्मिती होत राहते. ‘काही क्षेत्र आपण निवडतो, तर काही क्षेत्रच आपल्याला निवडतात’ असं म्हणणाऱ्या प्राजक्तला कला क्षेत्राने हेतुपुरस्सर निवडलं आहे हेच खरं!