|| राधिका कुंटे
सध्या कुटुंबाची व्याख्या विस्तारते आहे. केवळ नातीगोती हे आणि एवढंच कुटुंब न राहता तरुणाईच्या दृष्टीने कुटुंब या संकल्पनेनेच कात टाकली आहे. १५ मेला येणाऱ्या ‘जागतिक कुटुंब दिना’च्या निमित्ताने या ‘एक्सटेण्डेड फॅमिली’चा घेतलेला हा कानोसा.
‘मी’, ‘तू’, ‘माझं’, ‘तुझं’, ‘आपलं’, ‘आपण’.. या म्हटलं तर शब्दांच्या बदलत्या छटा. त्यांचे अर्थ प्रवाही करणाऱ्या, किंबहुना ‘मी’पासून सुरू होणारा पसारा ‘आपण’मध्ये सामावण्याच्या विस्ताराच्या क्षणांपर्यंत पोहोचलेला! हा क्षण सुरू होतो, तिथेच कुटुंबाची व्याख्या सुरू होते. सध्या प्रत्येक गोष्ट शॉर्ट आणि स्वीट असण्याच्या काळात कुटुंबाचा नंबर कधी ना कधी लागणार होताच. तो काही जणांनी ‘मी’लाच कुटुंब मानण्यापासून सुरू झाला. हा ‘मी’ कधी तरी केंद्रस्थानी ठेवून पाहिला तर त्याच्याभोवती नातलग, मित्रमंडळी, सहकारी, शेजारी, ओळखीचे, परिचित वगैरे वगैरे असतातच. हे थेट त्या ‘मी’च्या कुटुंबातले सदस्य नसले तरी जणू त्याची ‘एक्सटेण्डेड फॅमिली’ असतात. त्यामुळे ही भोवतालची वर्तुळं कधी लहान-मोठी असतात. कधी स्वतंत्र असतात. कधी स्वयंभू असतात. कधी विलगच राहतात, तर कधी अगदी मिसळून जातात.
एक कुटुंब म्हटलं की, साधारणपणे त्यात आई-बाबा आणि एक-दोन मुलं असे सदस्य असतात. कधी कधी एकल पालक आणि त्यांचं मूल असतं. काही कुटुंबांत आजी-आजोबा असतात. (क्वचित कधी दोन्हीकडचे आजी-आजोबा एकाच घरात सगळ्यांसोबत राहतात.) आजच्या तरुणाईपैकी अनेक जण भावंडांना फक्त ‘कझिन’ म्हणून संबोधून मोकळी होतात. त्यांना आते-मामे, मावस-मामे, चुलत-चुलत अशा भावंडांच्या नात्यांचा पसारा माहिती नसतोच अनेकदा. तरी एक गोष्ट घडली आहे, समाजमाध्यमांवरच्या फॅमिली ग्रुपमुळे अनेक नातलग ‘ई-परिचित’ झाले आहेत. त्या ग्रुपमधल्या सदस्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या-वाईट घडामोडी इतरांना कळू लागल्या आहेत. मात्र ग्रुपवर भडाभडा बोलणाऱ्या सदस्यांपैकी काही जण मंगल कार्य किंवा स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले की, तितक्याच उत्साहात संवाद साधला जातोच असं नाही. अनेकदा मोठे धाकटय़ांना काही वेळा उपदेशाचं बोधामृत पाजत असल्याने किंवा ई-वादावादी झाल्यामुळे धाकटे सदस्य ग्रुप सोडून गेलेले दिसतात. त्यामुळे काही वेळा केवळ धाकटय़ांचाच ग्रुपही तयार होतो. काही वेळा सदस्यांमधलं वयाचं, नात्यांचं आणि भौगोलिक अंतरही यात महत्त्वाची भूमिका बजावतं. मग नकोच ते नातलग आणि नकोच ते वाद, असा काहीसा तरुणाईचा पवित्रा घेतला जात असावा. यातून मग कुटुंबाबाहेरचं कुटुंब शोधण्याकडे त्यांचा कल वाढत जातो. समविचारी किंवा किमान समान आवडी असलेले सदस्य शोधून ही एक्स्टेण्डेड फॅ मिली वाढवण्याकडे तरुणाईचा कल वाढतो आहे.
तरुणाई कितीही स्वमग्न, मोबाइलमग्न, कार्यमग्न दिसत असली तरीही तिला व्यक्त व्हायचं असतंच. मग ते समाजमाध्यम असो किंवा आपापल्या आवडीनिवडीची क्षेत्रं असोत. समाजमाध्यमावर आपापल्या आवडीच्या ग्रुप्समध्ये काही जण व्यक्त होतात, पोस्ट करतात. त्यांपैकी काही जण प्रत्यक्ष भेटतात. एकमेकांच्या संपर्कात राहतात. काहीदा मित्रही होतात. ही एक प्रकारे ‘एक्सटेंण्डेड फॅमिली’च झाली. उदाहरणार्थ – समाजमाध्यमांवर खवय्येगिरीच्या निमित्ताने एकत्र आलेले काही जण भेटतात. त्या संदर्भातल्या माहितीची देवाणघेवाण करतात आणि अर्थातच एकमेकांना चांगलंचुंगलं खिलवतातही. त्याउलट एखाद्या ट्रेकिंग ग्रुपमधल्या सीनिअरच्या खास वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या कुटुंबातले सदस्य कमी आणि ग्रुपमधले सदस्य अधिक असतात. त्या सेलिब्रेशननंतर त्याचे फोटो पोस्ट होणं हे अत्यंत स्वाभाविक असतं. हीदेखील ‘एक्सटेण्डेड फॅमिली’च. कधीकधी प्रवासाची आवड असलेल्या वेगवेगळ्या वयोगटांतल्या व्यक्ती टूर्सला जातात, कधी गाण्याच्या कार्यक्रमांचं आयोजन होतं. कधी ठरावीक लोकल, ठरलेला डबा आणि ठरावीक ग्रुप यांचीही ‘एक्सटेण्डेड फॅमिली’ होते. काही वेळा शाळा किंवा महाविद्यालयांमधल्या मित्रमंडळीचे ग्रुप्स एकेका सदस्याच्या घरी डोकावतात. पुढं ते त्या त्या कुटुंबांचा एक अविभाज्य भाग कधी होतात, ते त्या सदस्यांनाही कळत नाही. कारण ती असते ‘एक्सटेण्डेड फॅमिली’च. कधी कामाच्या निमित्ताने एकत्र आलेले सीनिअर्स आणि ज्युनिअर्सच्या गप्पांची मैफल एखाद्या निवांत ठिकाणी अगदी रंगात येते, तर कधी कुणावर अचानक आलेलं संकट किंवा अडीअडचणीला नातलगांच्या बरोबरीनं तितक्याच खमकेपणाने उभी राहते ती हीच ‘एक्सटेण्डेड फॅमिली’.
होतं काय की, कधी कुटुंब दिनाच्या निमित्ताने चांगल्या डझनभर नातलगांचे ग्रुप फोटो पोस्ट केले जातात, तर कधी एखादी एकटी राहणारी किंवा राहणारा म्हणतो की, ‘वेलकम टू माय फॅमिली’. खरं कुटुंब कोणतं? जाम कन्फ्युज व्हायला होतं. आजच्या तरुणाईसाठी नात्यांना लेबलं लावणं ही गोष्ट तितकीशी महत्त्वाची ठरत नाही. म्हणून दुसऱ्या खंडात राहणाऱ्यांशी संपर्कात असणारी तरुणाई इथल्या नातलगांच्या संपर्कात असतेच असं नाही. प्रश्न फक्त कॉन्टॅक्टचा नसतो. प्रश्न संवादाचा असतो. संवाद साधता आला की बरं असा विचार आजची पिढी करते. ज्यांच्याशी हा संवाद साधला जातो त्या नात्यांना तरुणाई ‘एक्सटेण्डेड फॅमिली’ म्हणते. त्यामुळे फॅमिली म्हणजे रक्ताची नाती की जोडलेली नाती असले सवाल करणं आता या घडीला योग्य नाही. त्यापेक्षा एका एक्सेलशीटवर आपल्या फॅमिली मेंबर्सची नावं लिहून झकास फॅमिली ट्री तयार करा. तेव्हानातलग असोत किंवा ‘एक्सटेण्डेड फॅमिली’ काही जण थोडा वेळ एकत्र भेटणं, त्यांनी संवाद साधणं, काही गोष्टींचं शेअरिंग करणं आणि कुटुंबाची व्याख्या विस्तारणं हे प्रत्यक्षात घडणं गरजेचं आहे. ते तसं घडतंही आहे. त्यामुळं विचारांच्या एअरटाइट कप्प्यांतून बाहेर पडून या बदलांना मोकळ्या मनानं सामोरं जाणं यातच शहाणपण आहे. जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
viva@expressindia.com