वधू पाहिजे या कॉलमपासून ते टीव्हीवरच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीपर्यंत आजही सगळीकडे मुलींच्या गोरेपणाबद्दल अट्टहास पाहायला मिळतो. एकीकडे ‘डस्की ब्युटी’ म्हणून कौतुक असलं तरी आजही अनेक सावळ्या मुलींच्या मनात न्यूनगंड असतो. खरंच सुंदर दिसण्यासाठी गोरी असलंच पाहिजे का? आणि कर्तृत्वाचं काय, प्रतिभेचं काय? त्याचं तेज उजळ नसतं? कुठला रंग महत्त्वाचा.. तनाचा की मनाचा?
मागच्या आठडय़ातली गोष्ट, कामवाल्या मावशींची रोजची येण्याची वेळ निघून गेली तरी त्या आल्या नव्हत्या त्यामुळे आजीची चिडचिड सुरू झाली होती. तितक्यात दरवाजाची बेल वाजली आणि दोन मुली आल्या. आजीची सीआयडी एन्क्वायरी संपल्यानंतर कळलं की, त्या आमच्या मावशींच्या मुली आहेत. त्या दोघीही छानपकी पटापट कामाला लागल्या. त्यातली एक जरा सावळी होती तर दुसरी गोरी! आजीचं सार लक्ष त्या गोऱ्या मुलीकडे लागून राहिलं होतं. म्हणजे ती किती छान काम करतीये वगरे असं कौतुक सुरू झालं. त्या गेल्यानंतर मी आजीला म्हणाले, ‘काय गं आजी, तू पण ना! त्या दोघीही छान काम करत होत्या. आता एक सुंदर होती दिसायला म्हणून काय तिने छान काम केलं का?’ यावर आजी काही म्हणाली नाही पण मग मी विचार करायला लागले. आजीचं ठीक आहे, पण मग मी तरी वेगळं काय केलं? आजीने तरी तोंडावर स्तुती केली. मी तर गोऱ्या रंगाला सुंदर ठरवून मोकळी झाले! म्हणजे फक्त आजीच नाही तर कुठे तरी मी पण हाच विचार करते की!!
गोरा वर्ण.. अगदी पेपरमधल्या वधू पाहिजे या कॉलमपासून ते टीव्हीवरच्या सतराशे साठ जाहिरातींपर्यंत गोऱ्या रंगाचा अट्टहास सगळीकडे दिसत असतो. ‘छे! आम्ही काही वर्णभेद वगरे मानत नाही’, असं तोऱ्यात सांगणारे लोकसुद्धा मुलीचा फोटो पाहिल्यानंतर ‘फोटोत तर छान गोरी दिसतीये, एकदा प्रत्यक्ष पाहण्याचा कार्यक्रम होऊन जाऊ देत’ असं म्हणतात. मुलींच्या रंगाचं महत्त्व किंवा सौंदर्याची व्याख्या ठरवण्यात मुलांचा मोठा वाटा आहे. ज्या देशात भौगोलिक स्थितीमुळे किंवा हवामानामुळे लोकांचा मूळ रंग सावळा-काळा किंवा गव्हाळ आहे तिथल्याच लोकांना किंवा मुलांना गोऱ्या रंगाचं अवास्तव कौतुक का? या प्रश्नाचं उत्तर शोधायला काही मित्र-मैत्रिणींना बोलतं केलं. अनघाचं म्हणणं आहे की, काळ्या रंगाची किंवा वर्णाची अनास्था कुठे तरी आपल्या संस्कृतीतच खोल रुतून आहे, म्हणजे काळ्या रंगाबद्दल निगेटिव्हिटी आहे. सणावाराला काळे कपडे घालायचे नाहीत किंवा मग काळी मांजर अशुभ वगरे!! या सगळ्या गोष्टींमुळे काळा रंग म्हणजे वाईट असं काही तरी तयार होतं आपल्या डोक्यात आणि मग ते निरनिराळ्या रूपात आपल्या वागण्याबोलण्यातून प्रतििबबित होतं! हे सगळं इतकं भिनलंय ना आपल्यात की, आता त्यात काही चुकीचं पण वाटत नाही आपल्याला!
आपला माइंडसेट किंवा कल्चर ही कारणं जरी आपण मानली तरी या सगळ्यामुळे काळ्या-सावळ्या मुलींना स्वत:च्या रंगाबद्दल वैषम्य वाटायला लागतं हेही तितकंच खरं आहे. मग वयात यायला लागल्यावर फेअरनेस क्रीम आणि फेअरनेस ट्रीटमेंटचं महत्त्व वाढू लागतं. ‘मुलांना स्वत:चा रंग जितका मॅटर करत नाही तितका मुलींचा करतो. त्यांना गव्हाळ आणि गोऱ्या रंगाची मुलगीच जास्त इम्प्रेसीव्ह वाटते’, असं श्रुतीचं म्हणणं आहे.
हा गोरा रंग फक्त लग्नाच्या उठाठेवीतच नाही तर ऑफिसपासून ते कॉलेजपर्यंत सगळीकडे मॅटर करतो! धनश्रीच्या मते, ‘काळ्या-सावळ्या मुलीला कोणी अगदीच नाकारत नसेल तरी गोऱ्या रंगाला आजही अॅप्रिशिएट केलं जातं ही फॅक्ट आहे. दोन मुली जर इक्वल टॅलेंट आणि क्वालिफिकेशनच्या असतील तर त्यातल्या गोऱ्या मुलीचं प्रेझेन्टेशनसाठी सिलेक्शन होतं. अगदी छोटय़ा मुलांनासुद्धा गोष्टीतली राजकन्या गोरी आणि सुंदर असते असंच सांगितलं जातं. म्हणजे सुंदर राजकन्या सावळी असूच शकत नाही का??’ धनश्री विचारते.
आपला रंग इझिली अॅक्सेप्ट होत नाही हे खूप डिस्करेजिंग असू शकतं. पण हाच सगळा विचार करताना सावळा विठ्ठल, काळा कृष्ण यांना विसरून चालणार नाही! त्यांच्या वर्णाच्या पलीकडे जाऊन, त्यांच्या चतन्यमयी व्यक्तिमत्त्वाने त्यांनी लोकांना आपलंस केलंय. म्हणजेच रंग, वर्ण याही पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाने- वागण्याने लोकांना जिंकून घेऊ शकता. फार मागे जायचीही गरज नाहीये खरं तर! आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं आहेत. स्मिता पाटील, नंदिता दास, बिपाशा बसू आणि नुकतीच मिस अमेरिका झालेली नीना दावुलूरी!! या सगळ्यांनी स्वत:च्या असामान्य व्यक्तिमत्त्वांनी सौंदर्याच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत!
‘माझ्या रंगावर प्रश्न करणाऱ्यांना मी माझ्या अभिनयातून उत्तर देईन’, असं राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव म्हणते. आपल्या वर्णावरून आपल्याला नाकारण्यात आल्याच्या अनुभवाविषयी तिने काही महिन्यांपूर्वी ‘व्हिवा लाऊंज’मध्ये मन मोकळं केलं होतं. या वर्षीची मिस अमेरिका नीना दावुलूरीच्या मते, ‘रंग-वर्ण या गोष्टींवर विचार करायला आणि वाईट वाटून घ्यायला माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्याकडे करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आणि माझ्या टॅलेंटवर मी इथे टिकवून दाखवेन.’ या सगळ्यांनी आपल्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल वाईट वाटून घेण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या गोष्टींनी लोकांना जिंकलंय!
दुर्दैवाने आपल्याकडे ‘कास्ट-क्रिड-कल्चर’ या गोष्टींवर माणसाला जोखलं जातं आणि या तीनही गोष्टींत ‘कलर’ हादेखील महत्त्वाचा फॅक्टर राहिला आहे. पण हळूहळू गोष्टी बदलतील, भरपूर गोष्टी बदलायला सुरुवातही झाली आहे. गव्हाळ-काळा-सावळा-गोरा या पलीकडे पोहोचण्याचे प्रयत्न अनेकांनी सुरूही केलेत. आपली मानसिकता बदलते आहे. खास करून मुलींनी स्वत:ला आहे तसं बिनधास्त स्वीकारणं गरजेचं आहे. तनाने सुंदर होणं आपल्या हाती नसलं तरी मनाने मात्र आपण नक्कीच सुंदर होऊ शकतो ना!!
या सगळ्यातून हा रंग चांगला- तो रंग वाईट असं काही सुचवायचं नाहीये, पण अजून किती दिवस आपण या सगळ्यात अडकून पडणार आहोत ना?? कधी तरी तर नव्याने विचार करायला सुरुवात केलीच पाहिजे.
डार्क इज ब्यूटिफुल
* स्वत:च्या डस्की लूकचा अभिमान असलेली नंदिता दास, मेक-अपने स्किन टोन फेअर करायला नकार देते! सुशिक्षित आणि कार्पोरेट स्त्रीच्या रोलसाठी जेव्हा तिला स्किन टोन फेअर करूयात असं सुचविण्यात आलं, तेव्हा काळ्यासावळ्या मुली सुशिक्षित नसतात का?? असा सवाल तिनं केला होता. तसंच मुली आणि स्त्रिया यांना स्व:ताच्या काळ्यासावळया रंगाचा कॉम्प्लेक्स कमी करण्यासाठी तिने ‘डार्क इज ब्यूटिफुल’ नावाची मूव्हमेंट सुरू केली आहे. त्याद्वारे ती अनेकींचं कौन्सेिलग करून त्यांचा आत्मविश्वास वाढवतेय.
* ‘माझ्या रंगावर प्रश्न करणाऱ्यांना मी माझ्या अभिनयातून उत्तर देईन’, असं राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठी अभिनेत्री उषा जाधव म्हणते. आपल्या वर्णावरून आपल्याला नाकारण्यात आल्याच्या अनुभवाविषयी तिने काही महिन्यांपूर्वी ‘व्हिवा लाऊंज’मध्ये मन मोकळं केलं होतं.
* मिस अमेरिका नीना दावूलुरीनंही सौंदर्य रंगात नाही, तर व्यक्तिमत्त्वात असतं हेच सिद्ध केलं. तिच्या वर्णाविषयी टिप्पणी करणाऱ्यांना ‘या गोष्टींवर विचार करायला आणि वाईट वाटून घ्यायला माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्याकडे करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत’, असं बाणेदार उत्तर दिलं.
गोरे रंग पे ना इतना गुमान कर…
गोरं असणं म्हणजेच सुंदर दिसणं असतं का? हा प्रश्न मुलांनाही विचारला तेव्हा काही गमतीदार उत्तरं आमच्या हाती लागली. बायको कशी हवी, याबाबत टीनएजर्सच्या काही प्रतिक्रिया बोल्ड म्हणाव्या अशाच. पण त्यातही गोरी म्हणजे सुंदर असाच पारंपरिक दृष्टिकोन दिसला. गोरेपणाच्या अट्टहासामागे मुलांच्या अपेक्षा हेच कारण असतं की काय, असं वाटण्याजोग्या काही प्रतिक्रिया मिळाल्या. त्यातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया. संकलन : मानस बर्वे
सिद्धेश सुंदर म्हटल्यावर गोरीपान हवीच की. बायको कशी हवी, कुणी विचारलं तर सांगणारंच ना.. गोरी असावी. पण सकाळी उठल्यावर जेव्हा आरशात माझा चेहरा बघतो तेव्हा लक्षात येतं की, मला काही गोरी मुलगी पटणार नाही. सो उगाच गोरेपणाकडे न जाता प्रेमाकडे जाऊ असं म्हणावं लागतं. तेच खरं आहे झालं!
सिद्धांत मला बायको गोरी नसली तरी चालेल पण गर्लफ्रेंड गोरीच हवी. कारण गर्लफ्रेंडनी डंप केलं तरी चालेल पण बायको समजूतदारच हवी. माझ्या मते, गोरेपणा सोन्यासारखा असतो. प्रत्येकपिवळी गोष्ट सोनं नसते. त्याचप्रमाणे मुलींचंही असतं, एवढंच सांगायचंय.
रोहन गोरेपणा हा आपल्याकडे फार आधीपासून चांगला मानला जातो. त्याचा परिणाम आपल्यावर पण तेवढाच होतो. पण गोरी मुलगीच चांगली, असं काही मला वाटत नाही.
विक्रांत आजच्या काळात गर्लफ्रेंड दाखवायला असते. बायको कायमची असते. त्यामुळे गर्ल फ्रेंड गोरीच हवी. गोरी म्हणजेच सुंदर ना.. दाखवायला गोरीच हवी की!