माझी आई मी पाच वर्षांची असल्यापासून ऑस्ट्रेलियाला जॉबसाठी गेली. ती वर्षांतून फक्त तीन-चार दिवस इकडे येते आम्हाला भेटायला. माझ्या वडिलांना ती इथे नाही म्हणून फार वाईट वाटतं, मी त्यांना रडतानाही बघितलंय. मला शेफ व्हायचंय बारावीनंतर. मी माझ्या कॉलेजमध्ये एकदम जोकर म्हणून प्रसिद्ध आहे पण प्रत्यक्षात मात्र खूप सॅड आहे. माझी ही स्टोरी मी कुणाशीही शेअर केलेली नाही, कारण मैत्रिणींनी माझी कीव केली तर मला ते आवडणार नाही. घरी आले की मी एकदम बदलून जाते, गप्प-गप्प होते. माझ्या खोलीत जाऊन दार लावून घेऊन बसते आणि पुस्तक वाचत किंवा म्युझिक ऐकत बसते. एवढय़ातेवढय़ा गोष्टीवरून मला रडू येतं म्हणून माझे वडील मला खूप रागावतात. माझं घरात कुणाशीच पटत नाही. कामाशिवाय मी कुणाशी बोलतही नाही. मला अजूनही फार त्रास होतो, अशी कशी आई आम्हाला सोडून जाऊ शकली? आम्ही तिची वर्षभर वाट बघत असतो, पण जेव्हा ती इकडे येते तेव्हा घरात प्रचंड टेन्शन असतं. आम्ही टिपिकल आई-मुलीसारखं कधीच बोलत नाही. ती माझी चौकशीसुद्धा करीत नाही. आमचं एकदा तरी जोरात भांडण होतं. आजकाल तर मी तिला फोन करणंही सोडून दिलंय. ती नेहमी प्रॉमिस करते की ती एक-दोन वर्षांत परत येणार आहे, पण तसं होत नाही. ती परत यायला हवी असं मला वाटतं, निदान माझे वडील तरी सुखी होतील.- श्रद्धा

हॅलो श्रद्धा,
हे वाचून मला क्षणभर समजेना काय सांगावं तुला ते. किती मोठं दु:ख मनात घेऊन राहातेयस तू! आणि आता इतक्या वर्षांनंतरही ते कमी न होता उलट वाढलंच आहे. एक्सायटिंग लाइफ जगायच्या वयात तू मात्र आत एक, बाहेर एक असं डबल आयुष्य जगतेयस. मनातले ताणतणाव आणि परिस्थितीनं आणलेली असहायता, अशा दुप्पट टेन्शनला सामोरं जाताना तुझी चांगलीच दमछाक होत असणार.
‘कुटुंब’ या शब्दाची व्याख्या आजच्या जमान्यात बदलली आहे की काय असं वाटावं इतकं सगळं बदलंलय. जॉइंट फॅमिलीची आता न्यूक्लिअर फॅमिली झाली आहेच, पण इतरही अनेक कॉम्बिनेशन्स बघायला मिळताहेत. कधी एका पॅरेंटचं किंवा दोघांचंही री-मॅरेज झालेलं असतं. सिंगल पॅरेंट असलेली अनेक घरं आपण आजूबाजूला पाहतो. हे खरंय की नोकरीनिमित्त दूरगावी राहणारा पॅरेंट म्हणजे जनरली वडील असतात. पण तुमच्या घरासारखी अ‍ॅरेंजमेन्ट असणारी घरं दिसणं आता अशक्य राहिलेलं नाही. या घरात नसणाऱ्या व्यक्तीची घरं दिसणं आता अशक्य राहिलेलं नाही. या घरात नसणाऱ्या व्यक्तीची इतर फॅमिली मेंबर्सबरोबर कितपत अ‍ॅटॅचमेंट आहे हे मात्र प्रत्येक केसमध्ये बदलतं आणि मला वाटतं जवळिकीच्या या एका धाग्यानं हे दूरत्व सांधलं जात असतं. तुमच्या घरात हा ओलावा राहिला नसावा असं दिसतंय तुझ्या पत्रावरून.
आई परत आली तर तुला ते कितपत मानवेल याची तुला खात्री नाहीये, कारण तुमच्या नात्यात बरीच कटुता आली आहे. पण तरीही ती यावी असं तुझ्या वडिलांच्या सुखाच्या दृष्टीनं वाटतंय, हो ना? म्हणजे बाबांच्या सुखाची जबाबदारी तू आईवर सोपवली आहेस की काय? काही प्रश्न विचारून बघ बरं स्वत:ला. ‘आई परत येणं हे तुझ्या हातात आहे का? तुझ्या आईबाबांच्या एकमेकांबद्दलच्या भावना तुला वाटतंय तशाच आहेत का? बाबांना बरं वाटावं म्हणून तुझ्या वागण्यात तुला काय बदल करता येईल?’ एक लक्षात घे की तू तुझ्या बाबांच्या सुखाची सगळी जबाबदारी घे, असं मला यातून सुचवायचं नाहीये.
आईचं दूर जाणं ही खरंच खूप वेदनादायक घटना आहे, पण आता ती घडून गेली आहे. त्यातून बाहेर पडायचा तुला प्रयत्न करायला लागेल. तुझ्या आयुष्यात थोडा अधिक रस घे, कोण काय म्हणेल याची भीती बाळगणं सोडून दे. तू मॅटर ऑफ फॅक्टली आईविषयी मैत्रिणींना सांगितलंस तर त्या सहजपणे ते अ‍ॅक्सेप्ट करतील आणि मग तुला त्यांच्यासमोर सतत मुखवटा घालण्याचा जो ताण येतोय तो कमी होईल. तुझ्यासमोर एक खूप प्रॉमिसिंग आयुष्य आहे श्रद्धा. मनापासून प्रयत्न केलास तर तुझी स्वप्नं नक्की पुरी होतील. मग जेव्हा मागे वळून पाहशील, तेव्हा आपण या परिस्थितीला यशस्वीपणे तोंड दिल्याचा तुला अभिमान वाटेल.
Giving up doesn’t always mean you are weak, sometimes it means that you are strong enough to let go.
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com  या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.

Story img Loader