भारतातील लोकजीवन, लोकसंस्कृती, कृषिसंस्कृती ही फार वैशिष्ट्य़पूर्ण, वैविध्यपूर्ण श्रीमंत आणि विविधांगी आहे. भारताच्या विविध प्रांतात भौगोलिक विविधतेमुळे लोकसंस्कृती, कृषिसंस्कृती, लोकजीवनामध्ये वैविध्य आढळून येते. भारतातील कित्येक सण, उत्सव, परंपरा या आपले अनोखेपण आणि श्रीमंतीपणा राखून आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील नवरात्रोत्सवाचा व परंपरेचा हा लेखाजोखा खास व्हिवाच्या वाचकांसाठी!

कोल्हापूरचा शाही दसरा

ऐतिहासिक पाऊलखुणांवरून वाटचाल करणारा करवीरनगरीच्या शाही दसऱ्याचे महत्त्व, तेज अद्यापही कायम आहे. या दसऱ्याच्या परंपरेलाही एक भव्य इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकल्यानंतर पु:नश्च कोल्हापूर परिसर स्वराज्यात समाविष्ट झाला. महाराणी ताराबाईंच्या काळात कोल्हापूर शहरास राजधानीचे स्वरूप प्राप्त झाले. मराठेशाहीच्या काळात कोल्हापुरातील दसरा अधिक प्रभावीपणे साजरा केला जाऊ लागला. संस्थाने विलीन झाली असली, तरी आजही शाही दसऱ्याची परंपरा छत्रपती घराणे आणि ‘छत्रपती देवस्थान ट्रस्ट’कडून जपली जाते. शाही सीमोल्लंघन सोहळ्याचे महत्त्व कायम आहे. शाही दसरा आणि त्याची करवीरकरांशी आंतरिक जोडलेली नाळ आजही कायम आहे. याचे दर्शन दसरा चौकात जमलेली गर्दी दर्शवते. संध्याकाळी पाचच्या दरम्यान श्री महालक्ष्मी, तुळजाभवानी व गुरुमहाराज पालखी लवाजम्यासह दसरा चौकात वाद्याच्या गजरात पोहोचतात. छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते चौकात शमीच्या पानांचे पूजन होते. त्यानंतर सोने लुटण्याचा थरार दसरा चौक अनुभवतो. मावळत्या सूर्याच्या साक्षीने करवीरनगरीचा पारंपरिक शाही दसरा सोहळा मोठ्या उत्साहात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न होतो.

Kalyan-Dombivli Municipal corporation,
महाराष्ट्रातून कोठूनही पाहता येणार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
Mumbai , Green area, sea coast , greenery,
सागरी किनारा मार्गालगत तयार करणार हरित क्षेत्र, पालिकेचा पैसा खर्च न करता हिरवळ तयार करण्यासाठी कंपन्यांकडून अर्ज
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
Muralidhar Mohol
सहकारातील त्रिस्तरीय पतरचनेची साखळी मजबूत करण्याची गरज- मुरलीधर मोहोळ
blossoms of Cosmos flowers in Autumn season
निसर्गलिपी – शरद ऋतूतील बहर…

हेही वाचा : चोगडा तारा…!

म्हैसूरचा नाडहब्ब

कर्नाटकातील म्हैसूर राज्यातील दसरा ‘नाडहब्ब’ या नावाने ओळखला जातो. म्हैसूरमधील दसरा उत्सवाला राजे कृष्णराज वडियार, राजे नलवाडी वडियार, राजे चामराज कृष्णदत्त अशी राज परंपरा लाभली आहे. पिढ्यान पिढ्या हा उत्सव राजेशाही इतमामाने साजरा केला जातो. पूर्वी राजांची हत्तीच्या अंबारीत बसून संपूर्ण शहरातून मिरवणूक निघत असे. राजे यदुवीर वडियार यांनी आजही ही वैभवशाली परंपरा कायम ठेवली आहे. अलीकडच्या काही वर्षांपासून हा उत्सव सरकारद्वारे केला जातो. याला ‘चामुंडेश्वरी’चा उत्सव म्हणूनही ओळखतात. चामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीची अंबारीत प्रतिष्ठापना करतात. याची नऊ दिवस राज्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रम स्थळापासून मिरवणूक काढली जाते. २५ ते ३० हत्ती या वेळी सजवतात. शहराच्या वेगवेगळ्या भागांत सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

बंगाल दुर्गा पूजा

बंगाली संस्कृतीत नवरात्रात ‘दुर्गा पूजे’ची विशेष परंपरा आहे. नवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना बंगाली संस्कृतीत केली जाते. बंगाली समाजात देवी दुर्गेला विशेष महत्त्व असून तिला ‘दुर्गा माँ’ असे संबोधले जाते. देवीच्या मूर्तीबरोबरच गणपती, कार्तिकेय, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मूर्तीचाही पूजेत समावेश असतो. यात एका भल्या मोठ्या आडव्या पाटावर या मूर्तीची मांडणी केली जाते. या प्रतिमा पारंपरिकरीत्या बनवण्यासाठी खोर, लाकूड, बांबू, सुतळ, गंगा नदीच्या खोऱ्यातली चिकण माती आणि वाळू ही सामग्री वापरली जाते. बंगालमधील दुर्गा पूजेच्या उत्पत्तीच्या अनेक कथा उपलब्ध आहेत. १७५७ साली प्लासीच्या लढाईनंतर दुर्गा पूजा अधिक लोकप्रिय झाल्याचे इतिहासकार मानतात. रॉबर्ट क्लाइव्ह या ब्रिटिश अधिकाऱ्याने नवाब सिराज उद्दौला याचा या लढाईत पराभव करून भारताच्या इतिहासाचा मार्ग बदलला. या युद्धातील विजयानंतर बंगालवरील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची पकड अधिक मजबूत झाली. या विजयाने क्लाइव्हलाही खूप श्रीमंत केले. अत्यंत धार्मिक असलेल्या क्लाइव्हने आपल्या अविश्वसनीय भाग्याचे श्रेय देवाला दिले. त्याला या यशासाठी आभार व्यक्त करण्याकरिता कोलकत्ता येथे एक भव्य समारंभ आयोजित करायचा होता. पूर्वीच्या नवाबाने शहरातील एकमेव चर्च उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे क्लाइव्हचे पर्शियन भाषांतरकार आणि जवळचे विश्वासू नबकिशन देब हे पुढे आले. देब यांनी क्लाइव्हला त्यांच्या हवेलीत येण्यास सांगितले आणि दुर्गादेवीला नैवेद्या दाखवला. अशा प्रकारे कोलकत्त्यातील पहिली दुर्गापूजा सुरू झाली, असे मानले जाते.

बेळगावचा दसरा

दसऱ्याच्या दिवशी बेळगावमधील मराठी विद्यानिकेतनच्या मैदानावर शहरातील विविध भागांतील मंदिरांतून सर्व देवांच्या पालख्या संध्याकाळी एकत्र येतात. प्रत्येक घरात कलशाभोवती पेरलेल्या धान्याची रोपे, ज्याला ‘रव’ म्हणतात, ती घेऊन घरातील स्त्रिया मैदानावर येतात. हा ‘रव’ पालखीला वाहतात. स्त्रिया तो डोक्यातही माळतात. त्यानंतर सोने लुटतात. पालखीला प्रथम सोने वाहतात. हा कार्यक्रम संपवून घरी परतल्यावर स्त्री पतीला आणि मुलांना त्यांच्या दीर्घकालीन आयुष्याची कामना करत ओवाळते. बेळगावमध्ये घरोघरी शस्त्रास्त्रांची पूजा ही विशिष्ट पद्धतीने केली जाते. शस्त्रांच्या बाजूने पाच ऊस उभे करतात. शस्त्रास्त्रांवर पाच उसाची टोके एकत्र बांधतात. घरातले पुरुष ही पाच उसाची खंडी (जुडी) उजव्या गुडघ्यावर वाकवून मोडतात. ‘आमच्या घरात कायम लक्ष्मी नांदू दे’ असे म्हणून त्याची पूजा करतात, अशी अनोखी प्रथा इथे पाहायला मिळते.

हेही वाचा : सफरनामा : दुर्गभ्रमंती

तमिळनाडूमधील गोलू

तमिळनाडूमधील नवरात्रोत्सव ‘गोलू’ या नावाने ओळखला जातो. इथे वेगवेगळ्या देवीदेवतांच्या मातीच्या मूर्तीची मांडणी एका स्टॅण्डवर ज्याला पायऱ्या आहेत अशांवर स्थापना केली जाते. सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी प्रथम गणपती नि पारंपरिक बाहुल्यांची स्थापना केली जाते. त्यानंतर इतर मूर्ती ठेवल्या जातात. विविध प्रकारची आरास केली जाते. कधी गोकुळ बनवतात, कधी कैलास पर्वत बनवतात. तर कधी वैकुंठाचे दृश्य तयार केले जाते. प्रत्येक ठिकाणी लक्ष्मीनारायण हा महत्त्वाचा. अष्टलक्ष्मी, दशावतार, दुर्गादेवी, सरस्वती, लग्नाच्या बाहुल्या, गणपती असे अनेक बाहुल्या तेथे ठेवतात. मुलीच्या लग्नामध्ये आई मुलीला चंदनाच्या लाकडाच्या लक्ष्मी नारायण किंवा व्यंकटेश पद्मावतीच्या मूर्ती देत असते. या मूर्ती उंचावर ठेवून इतर सर्व बाहुल्या या पायऱ्यांवर मांडल्या जातात. इथल्या परंपरेनुसार दरवर्षी एक नवीन मूर्ती प्रत्येकाला घ्यावीच लागते. या मूर्तींना देवता स्वरूप मानून त्या नृत्य करत आहेत असं समजतात. दहाव्या दिवशी त्या नृत्य करून दमल्या असतील, या भावनेनं त्यांना त्या पायऱ्यांवरच झोपवलं जातं. नंतर त्या सांभाळून ठेवल्या जातात. प्रसाद म्हणून मुख्यत्वे ‘शुंडल’ म्हणजे चण्याची उसळ दिली जाते. संध्याकाळी देवांसमोर भक्तिसंगीत आळवलं जातं.

गुजरातचा गरबा

वडोदरा असो वा अहमदाबाद. गरब्यात रंगलेला गुजरात पाहायला पर्यटक इथे हजेरी लावतात. भडक रंगांच्या चनिया-चोली, उठावदार दागिने, परिपूर्ण साजश्रृंगार केलेल्या शेकडो तरुणी त्याचबरोबर मुलेही त्यांच्याच तोडीचे केडियू, पगडी घालून सज्ज असतात. मोठी मैदाने, सभागृहे, सोसायट्य़ा, मंदिरांची प्रांगणे अगदी गल्लीबोळांतही गरबा रंगतो. हा गरबा पाहण्यासाठी देश-विदेशांतील पर्यटक अहमदाबाद, सुरत, वडोदरा येथे येतात.

लोकसंस्कृतीचा प्रवाह शतकानुशतकं सारे प्रवाह एकत्र घेऊन वाहतो आहे. त्यातील सकस व समाजासाठी आवश्यक तेवढं टिकतं, पुढे जातं. ते कुणा एकामुळे नाही तर संपूर्ण समाजामुळे होत असतं. यात अनेक आक्रमणं आली, गेली, पचलीदेखील, पण नवरात्रातल्या परंपरेची ही वीण संपूर्ण भारतभर अजूनही घट्ट आहे. भारताच्या लोकपरंपरेची श्रीमंती फार अनोखी आहे.

viva@expressindia.com

Story img Loader