फॅशन वीकमधील नवोदित डिझायनर्सच्या कलेक्शनचा आढावा घेतला आहे मृणाल भगत हिने
आर्टस्टिला कॅनव्हासच्या मर्यादा नसतात
– रिक्षी भाटिया आणि जयेश सचदेव
पेशाने आणि मनाने चित्रकार असलेला जयेशच्या म्हणण्यानुसार, आर्टस्टिला कॅनव्हासच्या मर्यादा नसतात. या एका विचाराने तो आणि मार्केटिंगमधली रिक्षी एकत्र आले आणि ‘क्वर्क बॉक्स’ नावाच्या फॅशन आणि लाइफस्टाइल लेबलचा २ वर्षांपूर्वी जन्म झाला. त्यांचा हा भन्नाट ब्रँड या आधी स्ट्रीट फॅशनमध्ये धुमाकूळ घालतच होता पण ‘लॅक्मे फॅशन वीक’ने त्यांना पंख पसरायला मदत केली. लॅक्मेत त्यांच्या ‘शो’नी तर लोकांच्या नजरा खिळवून ठेवल्याच, पण त्यांच्या स्टॉलनेदेखील त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं. मग ती रंगीत विचित्र िपट्र असलेली खुर्ची असो किंवा शोकेसवर ठेवलेल्या मग्सवरील हसणारे बुटके बाहुले असोत. जाताजाता या कलेक्शनमागचा विचार स्पष्ट करताना जयेश बोलून गेला. ‘आजकाल पॉप कल्चरच्या नावाखाली खूपसे चोरलेले किंवा नक्कल केलेली उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत तेव्हा यातून वेगळा मार्ग काढत स्वत:तील कलाकाराला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही या कलेक्शनमधून केला आहे.’
स्त्रीसाठी कपडे असले पाहिजेत, कपडय़ांसाठी स्त्री नाही
– प्रणॉय कपूर
व्यवसायानं इंजिनीअर, कॉलेजमधला टॉपर असा मुलगा चांगली नोकरी सोडून फॅशनकडे वळेल असा विचार बापजन्मात कोणी करणार नाही. पण तो प्रणॉयने केला आणि दोन वर्ष डिझायनरच्या हाताखाली काम करून त्या अनुभवाच्या जोरावर त्याने या वेळी लॅक्मे फॅशन वीकमध्ये उडी घेतली. त्याचं यंदाचं कलेक्शन राजस्थानी बाटिक िपट्र्स आणि वेस्टर्न लुकवर आधारित होतंच, पण म्हणून त्याचा अंदाज वेस्टर्न होता असे मुळीच नाही. स्टॉलवर गेल्यावर कुर्ता आणि जॅकेट घातलेला प्रणॉय आपल्या समोर उभा राहतो तेव्हाच आपलं लक्ष जातं ते त्यांनी घातलेल्या पायघोळ स्कर्टवर आणि त्याचं बोलणं ऐकल्यावर आपल्याला लक्षात राहतं त्याचं शुद्ध िहदी. या वेळी त्याने सादर केलेल्या कलेक्शनमध्ये इंजिनीअरिंगमधली प्रमाणबद्धता तर होतीच पण ‘मला माझ्या बनवलेल्या ड्रेसमध्ये फिट बसणारी मुलगी शोधण्यापेक्षा प्रत्येक मुलीवर साजेल असा ड्रेस बनवायला आवडेल’- या त्याच्या विचारातून त्याच्या डिझाइन्स आणि स्वभावात असलेली लवचिकता पण दिसून आली.
प्रत्येक जातकुळीच्या पुरुषासाठी डिझाईन
– नितीन चावला
व्हिडीयो गेम्स सध्याच्या तरुणाईचा जीव की प्राण. त्यात निन्जा वॉरिअर्सची बातच न्यारी. नितीनने याच त्याच्या वेडाचा समावेश करून घेत निन्जाचा पुरातन काळ ते सध्याचं आधुनिक युग हा प्रवास त्याच्या कलेक्शनमध्ये करून घेतला. पूर्णपणे पुरुषांसाठी असलेल्या या कलेक्शनमध्ये जॅकेट्स, टीशर्टस, ट्राऊझर्स यांचं वैविध्य पाहायला मिळालं. ‘प्रत्येक जातकुळीच्या पुरुषाला सामावून घेण्याचा प्रयत्न मी केला आहे’ असं नितीनचं मत आहे, त्यामुळेच कॉलेजला जाणाऱ्या तरुणापासून ते ऑफिसला जाणाऱ्या पुरुषापर्यंत प्रत्येकाला त्याच्या कलेक्शनने सामावून घेतलं होतं.
भारतीय फॅशनमध्ये सणांना महत्त्व
– आयमन आघा आणि अरमान रंधवा
आयमन आघा आणि अरमान रंधवा यांनी ‘ऑउल इन द सिटी’ हे एक फ्युचरीस्टिक आणि स्टाइलिश कलेक्शन सादर केले. काळ्या आणि पांढऱ्या रंगसंगतीत डिझाइन केलेली प्रमाणबद्ध जॅकेट्स आणि त्यावरील बोल्ड नक्षीकामाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. भारतीय फॅशनमधील सणांना असलेलं महत्त्व त्यांच्या कलेक्शनमधून अधोरेखित केलं होतं. आयमनच्या म्हणण्यानुसार, ‘पाश्चात्त्य देशातील लोकांसारखं दर दिवशी अप टू डेट राहण्याचा सोस आणि वेळ आपल्याकडे नसतो त्यामुळे सणांदरम्यान आपण सजण्याची हौस पुरवून घेत असतो.’ म्हणून भारतीयांसाठी कलेक्शन बनवताना ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवायची असते. म्हणूनच त्यांच्या कलेक्शनमधला घुबडासारखा पक्षीदेखील एका शाही अंदाजात पेश केला होता.
आपल्यावर काय खुलून दिसेल याचा विचार महत्त्वाचा
– अदिती होलानी
‘वाभी साभी’ या कलेक्शनमधून वस्तूच्या मूळ स्वरूपाचे सौंदर्य कथन करणारे कपडे अदिती होलानी हिने सादर केले. तिच्या कलेक्शनमध्ये राखाडी, मातकट रंगांचा मिलाप फ्लोरोसंट हिरव्या, पिवळ्या रंगाबरोबर केला होता. ‘ट्रेंडच्या मागे फिरण्याऐवजी आपल्यावर काय खुलून दिसेल याचा विचार करणे महत्त्वाचे असते’, या मताचा पुरस्कार करणाऱ्या अदितीच्या म्हणण्यानुसार, सध्या चलतीत आहे म्हणून काहीही घालण्याऐवजी जे आपल्याला सूट होते आणि ज्यात आपण कम्फर्टेबल असतो असे कपडे घातल्यास आपण उठून दिसतो. म्हणूनच निसर्गात दिसणारी असमानता आणि त्यातील सौंदर्य तिच्या कलेक्शनमधून अधोरेखित झाले होते.