शेफ प्रसाद कुलकर्णी
सध्या अन्नपुरवठा हे फक्त रेस्टॉरंट्स, लाऊंज, स्नॅक्स सेंटर, कॅन्टिन किंवा टिफिन सप्लायपर्यंतच सीमित राहिलेले नाही. तर त्यात आता भर पडली आहे ‘फूड ट्रक्स’ या संकल्पनेची. एखादी व्यक्ती किमान गुंतवणुकीतून अशा ट्रक्सवर आंतरराष्ट्रीय शैलीत विविध खाद्यपदार्थांचा व्यवसाय करू शकतो. या व्यवसायात बरेच नियम पाळावे लागतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या संदर्भातील सरकारी नियम समजून घेणे. तसेच त्यासह जाहीर केलेले मानदंड, कर व त्यासह व्यावसायिक वाहनावरील लोकांची सुरक्षा हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे विषय आहेत. यात बऱ्याच वेळी रस्त्यावरच्या ट्रॅफिक नियंत्रणामुळे व्यावसायिक वाहने सार्वजनिक रहदारी नसलेल्या ठिकाणी पार्क केली जातात. ज्यामुळे पार्किंगची परवानगी किंवा परवाना मिळवण्यासाठी अतिरिक्त भाडे किंवा शुल्क भरावे लागते. असे केल्याने सरकारी नियमांचे उल्लंघन होऊन संपूर्ण व्यवसायाच्या कार्यक्षमतेत अडथळा निर्माण होतो. ‘फूड ट्रक्स’ ही संकल्पना सध्या नवीन आणि विकासाच्या वाटेवर आहे. आणि म्हणूनच याचा सामना करण्यासाठी चाचणी आणि त्रुटी हाच एकमेव मार्ग आहे.
दुसरी संधी येते ती ‘लॉजिंग’ विश्वातून. हा व्यवसाय फक्त हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स पुरताच मर्यादित नाही. एखादी व्यक्ती दुसऱ्या राज्यातून स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी पीजी सेवा किंवा सर्व्हिस अपार्टमेंट सुरू करू शकते. कामानिमित्ताने स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी हा खिशाला परवडणारा व उत्तम पर्याय आहे. यामध्ये मूलभूत सुविधा पुरवल्या जाऊ शकतात. एखादी व्यक्ती संपूर्ण इमारत भाडय़ाने घेऊन तिथल्या खोल्यांचे रूपांतर पीजी किंवा सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये करू शकते. बाजारपेठेतील मागणी आणि प्रदान केलेल्या सेवेनुसर शुल्क आकारू शकते. ‘झालो’ रूम्स किंवा क्विकर रूम्स हे या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू व उत्तम रोल मॉडेल्स आहेत.
इव्हेंट मॅनेजमेंट हा व्यवसायही विवाह सोहळा किंवा पार्टी कॅटरिंगपुरता मर्यादित राहिलेला नाही. या सोहळ्यांना अनेक मर्यादा असतात, त्यामुळे त्यावरच फक्त अवलंबून न राहता एखादी व्यक्ती वर्षभर नियमितपणे आवश्यक असणाऱ्या कॉर्पोरेट मीटिंग कॅटरिंगमध्ये विशेष ज्ञान प्राप्त करू शकते. उत्तम दर्जाची मागणी करणाऱ्या कॉर्पोरेटच्या उच्च खर्च क्षमतेमुळे इव्हेंट मॅनेजमेंट किंवा कॅटरिंग सव्र्हिसेससाठी लोकांची मागणी असते. या प्रकारच्या व्यवसायामध्ये सेमिनार, पुरस्कार सोहळे, अधिवेशने, प्रदर्शने यांचा देखील समावेश असू शकतो.
करमणूक हीसुद्धा के वळ अम्युसमेंट पार्क, स्पोर्ट्स क्लब किंवा जिमपुरती सीमित राहिलेली नसून यामध्ये सीनिअर लिव्हिंग होम्स किंवा सेकंड इनिंग होम्स या नव्या संकल्पनेचाही नव्याने समावेश झाला आहे. निवृत्तीनंतर आपल्या जोडीदारासोबत चांगले निरोगी जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक उत्तम सुविधा आहे. तेसुद्धा उत्तम गुंतवणुकीच्या दरात. या सीनिअर लिव्हिंग होम्स किंवा सेकंड इनिंग होम्सची सुविधा शहरापासून थोडी दूर, निसर्गाच्या सान्निध्यात आणि रम्य वातावरणात प्रदान केली जाऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांना हाताळता येतील अशा आधुनिक सोयींनी सुसज्ज आश्रयस्थानांसह हॉस्पिटल किंवा आपत्कालीन उपचाराची सोय केली जाऊ शकते. तसेच स्वयंपाक, घरकाम, वैयक्तिक मदत, पिक अप अँड ड्रॉप सारख्या सामान्य पण मूलभूत सुविधासुद्धा प्रदान केल्या जाऊ शकतात.
एअरवेज, क्रुझ लाइन आणि रेल्वेमधील करिअर यातही स्टाफ, ग्राऊंड स्टाफ, फ्लाइट क्रू किंवा रेल्वे व्यवस्थापन यापलीकडे फ्लाइट सव्र्हिसेस, क्रुझ लाइन किंवा रेल्वे कॅन्टिन संबंधित प्रमाणित वैशिष्टय़ांसह विशिष्ट प्रादेशिक तसेच अस्सल पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या खाद्यपदार्थाचा पुरवठा करणाऱ्या आऊ टसोर्सिंग व्यवसायाचे उत्पादन हा एक व्यवसायाचा उत्तम पर्याय असू शकतो. यामुळे प्रवाशांना प्रादेशिक चव चाखायला मिळते आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. विमानतळावर किंवा रेल्वे स्थानकावर भाडेतत्त्वावर उपलब्ध असणाऱ्या फूड कोर्टवर खाद्यान्न सेवा पुरवल्या जाऊ शकतात आणि अशा ठिकाणी ग्राहक मोठय़ा संख्येत नेहमीच उपलब्ध असतात. त्यामुळे फायदा होणार हे नक्कीच. तसेच स्वच्छ आणि प्रमाणित पॅके ज जेवणाचा पुरवठा केला जाऊ शकतो.
आज आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील नवीन संधी पहिल्या. आपण या संधींचा योग्य उपयोग करून घेत भविष्यात नक्कीच यशस्वी उद्योजक होऊ शकतो. पण उद्योजकाला सुद्धा अनेक गोष्टी टाळाव्या लागतात. त्या कोणत्या हे पाहूयात पुढच्या आठवडय़ाच्या शेफखान्यात !
महाराष्ट्रीय गोडा मसाला
साहित्य : ४ कप धणे, १ कप सुकं खोबरं, १/२ कप पांढरे तीळ, १/२ कप काळे तीळ, १/४ कप जिरे, २ टी स्पून हिंग, १ टेबल स्पून दालचिनीचे बारीक तुकडे, ४ ते ५ टी स्पून काळे जिरे, ३ ते ४ लवंग, १ काळी/मसाला वेलची (दाणे फक्त), ३ सुक्या लाल मिरच्या, १ टी स्पून हळद, चवीनुसार मीठ, १ टेबल स्पून तेल
कृती : प्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करा व त्यात धणे व सुके खोबरे सोडून सगळे मसाले भाजून घ्या. नंतर धणे व सुके खोबरे एकेक करून तेल न टाकता भाजून घ्या. पुढे सगळे साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या व थंड झाल्यावर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा.
काश्मिरी गरम मसाला
साहित्य : १/४ कप काळे जिरे, २ मोठे तमालपत्र बारीक वाटलेले, २ टेबल्स्पून वेलचीचे दाणे, १/४ कप काळेमिरे, १/२ टी स्पून लवंग, १ टेबल स्पून बडीशेप, १ टी स्पून बारीक चिरलेली ताजी जायपत्री, ४ दालचिनीचे बारीक केलेले तुकडे, चिमूटभर जायफळ पूड.
कृती : एक भांडे मध्यम आचेवर गरम करा व त्यात जिरे, तमालपत्र, वेलची, काळे मिरे, लवंग, बडीशेप, जायपत्री, दालचिनी हे सगळे मसाले छान वास सुटेपर्यंत सुके भाजून घ्या. मग ते थंड करायला ठेवा. पुढे थंड झाल्यावर यात जायफळाची पूड टाका व सगळे मसाले बारीक वाटून त्याची पावडर करून घ्या. वाटलेला मसाला एअरटाईट कं टेनरमध्ये ठेवा.
कढाई गरम मसाला
साहित्य : अख्खे धणे १/२ कप, अख्खे जिरे १/४ कप, दालचिनीचे तुकडे ३ इंचाचे ९-१०, लवंग – २ टेबल स्पून, तमालपत्र -१०, मोठी वेलची १० – १२, बारीक वेलची २ टेबल स्पून, काळी मिरी दीड टेबल स्पून, सुंठ १ इंच तुकडा, जायफळ १.
कृती : प्रथम धणे व जिरे यातील खडे वेचून त्यांना साफ करून घ्या व सगळे मसाले एका ताटात पसरून दोन ते तीन दिवस उन्हात व्यवस्थित सुकवून घ्या. पुढे दालचिनीचे तुकडे व जायफळ बारीक वाटून त्याची पावडर करून बाजूला ठेवा. नंतर बाकीचे मसाले एकत्रित करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. मग दोन्ही पावडर व्यवस्थित एकत्र करा. वाटलेला मसाला एअर टाइट कं टेनरमध्ये ठेवा. हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.
चाट मसाला
साहित्य : आमचूर १५ ग्रॅम, काळे मीठ १० ग्रॅम, साधे मीठ ७ ग्रॅम, जिरे ७ ग्रॅम, काळे मिरे ७ ग्रॅम, धणे ३ ग्रॅम, मिरची ३ ग्रॅम, सुंठ पावडर २ ग्रॅम, अनारदाना २ ग्रॅम, चिंच २ ग्रॅम, ओवा १० ग्रॅम, हिंग १ ग्रॅम, लवंग १ ग्रॅम.
कृती : सगळे साहित्य बारीक वाटून त्याची पावडर तयार करा. चाट मसाला तयार आहे.
महाराष्ट्रीय खडा गरम मसाला पेस्ट
साहित्य : धणे ४० ग्रॅम, जिरे १५ ग्रॅम, दालचिनी ५, वेलची ३, लवंग ५, मसाला वेलची ५, चक्री फूल ५, बडीशेप १० ग्रॅम, तमालपत्रं ३, काळी मिरी ७, जवित्री २.
कृती : एका वाडग्यात सगळे मसाले एकत्रित करा. यात १:५:३ या प्रमाणात म्हणजे १ भाग मसाला: ५ भाग पाणी: ३ भाग व्हिनेगर घाला. हा मसाला एक रात्र म्हणजे कमीत कमी १२ तास भिजत ठेवा. नंतर अतिरिक्त पाणी काढून या मसाल्याची बारीक पेस्ट करून घ्या. वाटलेला मसाला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. फक्त मसाला घेताना तुम्ही ओला चमचा वापरणार नाही याची काळजी घ्या. बुरशी टाळण्यासाठी व मसाल्याला ओलावा लागणार नाही याची काळजी घ्या. फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवल्यास हा मसाला १ महिन्याकरिता वापरला जाऊ शकतो.
शब्दांकन: मितेश जोशी