डिसेंबर महिना सुरू झाला की आपोआपच सुट्ट्या, थंडी, सेलिब्रेशन, नाताळ, नवीन वर्ष अशी सगळी धुमधाम सुरू होते. २०२५ हे नवीन वर्ष आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. सरते वर्ष वेगवेगळ्या अनुभवांचा, आठवणींचा साठा देऊन जाते. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर नवीन गोष्टींचे नियोजन, संकल्प मनातल्या मनात सुरू होतात आणि १ जानेवारीच्या मुहूर्तावर आपण ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. तरुणाईच्या भाषेत न्यू-इयर रेझोल्यूशन हा ट्रेंड फारच प्रचलित आहे.
खरंतर आपण संकल्प चांगल्या मानाने, चांगल्या हेतूने करतो, परंतु काळानुरूप त्याचे गांभीर्य कमी होते आणि पुन्हा आपण आपल्या जुन्या सवयींमध्ये अडकतो. अमेरिकेतल्या विविध संशोधनांमधून असे दिसून आले आहे की १८ ते ३५ वयोगटातले तरुण जास्तीत जास्त संकल्प ठरवतात. त्यातले बहुतांश संकल्प शारीरिक स्वास्थ्य, खाण्या—पिण्याच्या सवयी, वजन कमी करणे अशा गोष्टींचे असतात. संकल्प करणाऱ्या लोकांची संख्या साधारण ५० टक्के असेल तर ते खरोखर पूर्ण करणाऱ्यांची संख्या चक्क फक्त ४-५ टक्के एवढीच असते. यामागे नेमकी काय करणे असतात, कुठले संकल्प करावेत, कुठले करू नयेत, त्यामध्ये नियमितता कशी पाळावी, या सगळ्यांचीच उत्तरे आज शोधण्याचा प्रयत्न करूया.
यानिमित्ताने काही मुलांशी बोलताना खरोखरच विचारपूर्वक वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन संकल्प करण्याकडे त्यांचा कल अधिक असल्याचे लक्षात आले. पुण्याची चैत्राली खरे सांगते, ‘मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात, परंतु नोकरीचे रुटीन आणि धावत्या जीवनशैलीमुळे म्हणावा तसा वेळ त्यासाठी काढता येत नाही. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी कुठल्याही पुस्तकाची २ पाने तरी वाचावी असा संकल्प मी केला, जेणेकरून आवड पण जपली जाईल आणि संकल्प सुद्धा पाळला जाईल. पुस्तक वाचायची मोडलेली सवयही पुन्हा लागेल आणि आपोआपच वाचनाचा वेळ वाढेल’.
हेही वाचा >>> सफरनामा : मधु इथे अन्…
चांगल्या सवयी लावण्यासाठी जाणीवपूर्वक संकल्प करतो असे आदित्य सरदेसाई सांगतो. ‘मला नुकतीच नोकरी लागली असल्याने थोडी हौसमौज करणे, फिरणे असा सगळा प्रकार चालला आहे, तरीही जमेल तेवढे आर्थिक नियोजन आत्तापासूनच करायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी एसआयपी, म्युच्युअल फंड, पीपीएफ असा अभ्यास सुरू आहे, काही जेष्ठ मित्रांचे मार्गदर्शनही घेतो आहे. या सवयी जेवढ्या लवकर लागतील तेवढे फायद्याचे आहे म्हणून त्यानुसार संकल्प करणार आहे’, असे त्याने सांगितले.
नवीन वर्षाचा संकल्प करणे ही चांगली गोष्ट आहे, कारण त्या निमित्ताने आपण चांगली कृती, चांगल्या सवयी आत्मसात करतो. नवीन वर्ष म्हणजे एकप्रकारे रीसेटचे बटन दाबण्यासारखे आहे, म्हणजे मागचे सगळे पुसून तुमच्या कुठल्याही नवीन कामाला, नवीन विचाराला नवी सुरुवात करून देण्यासारखे आहे. आपण स्वत:शी ठरवलेली एखादी गोष्ट आपण मनापासून पूर्ण केली की होणारा आनंदानुभव आगळाच असतो. अमेरिकन लेखक जॉन क्लिअर यांचे ‘?टोमिक हॅबिट्स हे पुस्तक अशाच छोट्या गोष्टींनी आयुष्यात किती मोठे बदल होऊ शकतात यावर आधारित आहे. तुमच्या सवयी एका रात्रीत बदलणे अशक्य आहे, म्हणूनच प्रत्येक सवय १ ते १५ दिवस करत बदलली तर जड जाणार नाही आणि हळू हळू ती अगदी सहज सुटते, असे या लेखकाने नमूद केले आहे. हेच धोरण नववर्ष संकल्पांच्या बाबतीत राबवले तर कुठलाही संकल्प अगदी सहज पूर्ण करता येऊ शकतो.
नवीन वर्षाचा संकल्प पूर्ण करण्यासाठीच्या काही स्टेप्स :
छोट्या सवयीतून मोठा परिणाम
माणूस हा सवयींचाच गुलामी असतो, असे म्हणतात. त्यामुळे अगदी लगेच जुन्या सवयी जाणे किंवा नवीन सवयी लागणे हे अवघड असते. उदाहरणार्थ, वजन कमी करण्यासाठी गोड खाणे बंद करणे. अगदी लगेच गोड खाणे पूर्ण बंद करावं तर जास्त खावंसं वाटेल. त्याऐवजी सुरुवातीला सकाळच्या चहा-कॉफी मधली साखर सोडायची आणि मग हळूहळू इतर गोड पदार्थ खाणं कमी करत गेलो तर सवय सहज सुटेल. संकल्प निभावताना तुम्ही तो किती कमी वेळात पूर्ण केला यापेक्षा सातत्य राखून तो पूर्ण करत गेलो तर मानसिक समाधान आणि आनंद नक्की मिळेल. सुरवातीला छोट्या वाटणाऱ्या सवयी अंती फारच महत्वाचे बदल साधू शकतात, या विश्वासाने कृतीत सातत्य ठेवा.
रोजच्या जीवनशैलीत बदल आणण्यासाठी प्रयत्न गरजेचे
संकल्पपूर्ती हेच ध्येय ठेवल्यास त्याचे दडपणही येते आणि क्वचित रोजच्या व्यग्र दिनचर्येत ते पूर्ण करताना आपली ओढाताण होऊ शकते. म्हणूनच संकल्पपूर्तीच्या ध्येयापेक्षा त्यासाठी आवश्यक असे बदल आपल्या जीवनशैलीत करणे अधिक उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, पैसे बाजूला काढून ठेवण्यासाठी वा गुंतवणूकीचे विविध मार्ग उपलब्ध आहेत, पण ते चटकन आपल्याला जमत नाही. अशावेळी चक्क लहानपणी एक न उघडणारी पिगी बँक असायची तशी घेऊन त्यात रोज न चुकता काहीएक रक्कम टाकायचा प्रयत्न करायचा. आपल्या पाकिटात काहीएक रक्कम रोज सहज असते, त्यामुळे त्यातली थोडी रक्कम बाजूला काढण्याचं दडपणही येत नाही. या अशा छोट्या सवयी जर प्रेरणादायी बनवायच्या असतील तर त्यातून साध्य होणारा परिणाम किती मोठा असेल हे लक्षात घ्या. नियमितपणे बाजूला टाकलेल्या रक्कमेमुळे वर्षाखेरीस तुमच्याकडे काही हजार रुपये अगदी सहज साठतात.
संकल्पपूर्तीतले अडथळे नष्ट करा
आपल्याच काही सवयींमुळे संकल्पपूर्तीत अडथळे येऊ शकतात. वाईट सवयी घालवण्यासाठी सुद्धा एक सिस्टिम बनवा जेणेकरून या सवयी तुमच्या रोजच्या दिनचर्येतून हळूहळू कमी होतील. सकाळी लवकर उठायची सवय लावायची असेल, तर आधी लवकर झोपणे, लवकर जेवणे या सवयी लावण्याचा प्रयत्न करा. सलग आठवडाभर जरी लवकर उठलात तरी हळूहळू शरीराला त्या दिनचर्येची सवय लागेल. स्वत:शी एक वचनबद्धता पाळली पाहिजे. सोमवार ते शुक्त्रस्वार एवढे दिवस लवकर उठायचे असेल तर रात्री झोपायला उशीर होईल असे कोणतेही काम करू नका. (ऑफिस काम यामध्ये अर्थातच येत नाही, कारण ते टाळणे अशक्य असते). शिस्तबद्ध राहण्यासाठी छोट्या छोट्या गंमती करता येतील. उदाहरणार्थ, सलग ७ दिवस लवकर उठल्यावर स्वत:लाच काहीतरी बक्षीस द्या.
स्वत:ची एक नवीन ओळख निर्माण करणाऱ्या सवयी लावा
तुम्ही सध्या जी जीवनशैली जगत आहात, त्या पेक्षा चांगली जीवनशैली आत्मसात करण्यासाठी तुम्ही व्यक्ती म्हणूनही बदलणेही गरजेचे असते. म्हणजे आपले फिटनेस गोल्स सुधारायचे असतील, तर तुमचे वजन कमी झाल्यावर वा बेली फॅट कमी झाल्यावर तुमची शरीरयष्टी कशी दिसेल, तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे कपडे घालता येतील, हा विचार करा. म्हणजे त्यासाठीच्या सवयी लावून घेणे तुम्हाला कठीण जाणार नाही.
संकल्प करणे हा पॉप्युलर ट्रेंड जरी असला तरी आपण नियोजनबद्ध पद्धतीने करून तो अगदी शंभर टक्के अंमलात आणू शकतो. २०२५ मध्ये जे संकल्प आपण खरोखरच पूर्ण करू शकतो, त्याच संकल्पपूर्तीच्या मागे लागायचं हाच यंदाचा मोठा संकल्प म्हणता येईल. येणाऱ्या वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा.
● मानसिक आणि शारीरिक आयुष्य चांगले राहण्यासाठीचे संकल्प
● एक नवीन कौशल्य / कला शिका.
● आर्थिक सवयी, ज्ञान सुधारा.
● निरोगी खाण्यापिण्याच्या सवयी लावा.
● नातेसंबंध मजबूत करा.
● समुदायासाठी / समाजासाठी काहीतरी छोटे योगदान द्या.
● वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करा
viva@expressindia.com