२१ तारखेला पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन झोकात साजरा झाला. अनेकांनी या दिवसानिमित्ताने योगसाधनेला सुरुवात केली असेल. योगसाधना म्हटलं की डोळ्यापुढे येतात ती अवघड आसनं, प्राणायाम आणि ध्यानधारणा. पण पारंपरिक योगसाधनेपासून प्रेरणा घेऊन काही नवीन प्रकार सध्या रुळू लागले आहेत. योगासनं ही खरं तर भारतानं जगाला दिलेली देणगी. आज जगभरातल्या फिटनेस फ्रीकमध्ये योगाची मोठी क्रेझ आहे. पण पारंपरिक योगामध्ये बदल करत योगाचे अनेक नवीन प्रकार सध्या येत आहेत. पॉवर योगा, बिक्रम योगा, अ‍ॅक्वा योगा, अँटी ग्रॅव्हिटी योगा या नावांनी ते प्रसिद्ध होत आहेत. याच योगाच्या क्रेझमधले चार नवीन प्रकारांची ही माहिती आणि वेगवेगळ्या तज्श्वांशी बोलून घेतलेला आढावा.
हे सगळे योगोपचाराचे नवे ट्रेण्ड आपल्या देशातही आता फोफावू लागलाय. अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये टीम बिल्डिंग अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून वॉकिंग योगाचा आधार घेतला जातो. अनेक हेल्थ क्लब अ‍ॅक्वा योगाचे सेशन्स ठेवतात. पॉवर योगाला अनेक सेलेब्रिटींनी आपलंसं केलंय. तणावमुक्ती, रिलॅक्सेशन आणि फिटनेस यासाठी अनेक तरुण प्रोफेशनल्स याकडे वळत आहेत.

Untitled-1१. अ‍ॅक्वा योगा :
योगप्रकारांपैकी ‘अ‍ॅक्वा योगा’ हा प्रकार पाण्यात तरंगण्याच्या शक्तीबरोबर दीर्घ श्वसन, ताणून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि विश्रांतीसाठी उपयुक्त ठरतो. त्यासाठी वयाचं बंधन नाही किंवा यापूर्वी योग किंवा पोहण्याचा अनुभव असायला हवा असंही नाही. हा योग करताना पाण्याच्या सगळ्या गुणधर्माचा वापर करण्यासाठी खांदे आणि मानेपर्यंतचे शरीर पाण्यात बुडवले गेले पाहिजे. गर्भार स्त्रियांना यातील पर्वतासन, शलभासन, पवनमुक्तासन, ताडासन आणि वज्रासन उपयुक्त ठरते. योगसराव करण्यापूर्वी खोलीच्या तापमानापेक्षा थोडय़ा थंड पाण्याने स्नान करावे. योगसरावासाठी तुमच्या पेशी आकुंचन पावणे आणि पेशींच्या आतला भाग प्रसरण पावणे महत्त्वाचे असते. त्यामुळे पेशींना ऊर्जा मिळते. योगसराव करत असताना जर तुम्हाला घाम यायला सुरुवात झाली तर तो टॉवेलला पुसू नये. त्वचेच्या उघडय़ा पडणाऱ्या भागांवर तो घासावा. जर तुम्ही टॉवेलला घाम पुसलात तर जी ऊर्जा तुम्हाला मिळालेली आहे ती कमी होत जाते. सरावाच्या वेळी टॉवेलला घाम पुसणे, पाणी पिणे, लघवीला जाणे टाळावे. अ‍ॅक्वा योगमध्येदेखील सूर्यनमस्कार घातले जातात. एका नमस्कारात १२ स्थिती असतात. शवासन, ब्रेस्ट स्ट्रोक, पिरॅमिड पोझ या त्यातील काही महत्त्वाच्या स्थिती. अ‍ॅन्झायटी, डिप्रेशन, प्री-नेटल, पोस्ट-नेटल सर्जरी झालेल्यांना याचा बराच फायदा होतो.
( इंटिग्रेटेड मेडिसिनमधले तज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीवर आधारित)

Untitled-1  २. अ‍ॅन्टी ग्रॅव्हिटी योग :
जीवात्म्याने परमात्म्याशी एकरूप होणे हे पारंपरिक योगाचे महत्त्वाचे ध्येय असले तरी हल्ली येऊ  घातलेले योगप्रकार अध्यात्मापेक्षा शारीरिक क्रियांवर जास्त भर देतात. ‘अ‍ॅन्टी ग्रॅव्हिटी योग’ हा प्रकार शारीरिक क्रियांवर भर देणारा असून पाठीचा त्रास असणाऱ्यांना उपयुक्त ठरतो. यात टांगत्या बिछान्यासारख्या उपकरणाचा वापर केला जात असल्याने त्यासा अ‍ॅन्टी ग्रॅव्हिटी योग असे म्हटले जाते. झोळीच्या झोपाळ्यासारखं बांधलेलं हे कापड मऊ  पण  बळकट असते. त्यामुळे हालचाली करणे सोपे होते. जमिनीपासूनचे अंतर तसेच ठेवले जाते. सांध्यांना जास्त ताण न देता शरीर बळकट करण्यास या योगप्रकाराची मदत होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि तज्श्वांच्या दक्षतेखालीच हा योगप्रकार केला जावा. फिजिशियनची मान्यता असल्याखेरीज ब्लड प्रेशर, मायग्रेन, सांधेदुखी, हृदयविकार असलेल्यांनी हा योग करणे टाळावे.
(वेट मॅनेजमेंट एक्स्पर्ट आणि ‘ट्रिन एन टोन’च्या संस्थापिका डॉं. आम्रपाली पाटील यांनी दिलेल्या माहितीवर आधारित.)

Untitled-1३. वॉकिंग योग:
वॉकिंग योगा किंवा वॉकिंग मेडिटेशन म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून ठरावीक अंतर चालणं पण पूर्ण कॉन्सन्ट्रेशननं. चालताना एकाग्र होऊन आपल्या हालचाली, श् वासोच्छवास यावर लक्ष केंद्रित करणं यात अपेक्षित असतं. मन लावून चालणं असं याचं वर्णन करता येईल. स्केच क्लिनिकच्या डॉ. रिद्धेश जानी यांनी वॉकिंग मेडिटेशन कसं करावं याविषयी माहिती दिली. ‘वॉकिंग मेडिटेशनमध्ये एकाग्रता, रिलॅक्सेशन आणि श्वासोच्छवास याची लयबद्धता अपेक्षित असते. चालण्यासाठी आधी सुयोग्य जागा निवडा. घरात किंवा घराबाहेर मोकळ्यावर कुठेही हा योगोपचार करता येतो. चालण्याचा रस्ता शक्यतो सपाट असावा. लॉबी, व्हरांडा किंवा मोठी खोलीसुद्धा चालेल. मोकळा बगीचा किंवा ग्राउंड असेल तर उत्तम. श्वासाकडे लक्ष देत सावकाश चालायला सुरुवात करा. श्वास घेताना सहा पावलं चालायची आणि सोडताना सहा पावलं चालायची. हा ऱ्हिदम कायम ठेवावा. श्वासोच्छवासाकडे लक्ष ठेवतानाच पायाखालची जमीन लक्षात घ्यावी. अंगातल्या कपडय़ांचा स्पर्श काळजीपूर्वक जाणवून घ्यावा. श्वासोच्छवासाचा आवाज ऐकायचा प्रयत्न करावा. कधीकधी हे सगळं करणं अवघड वाटतं, कंटाळवाणं वाटतं. पण यातूनच एकाग्रता वाढते. मनातले नको असलेले विचार नाहीसे होतात. प्रॅक्टिस केली की हे सोपं वाटू लागतं.’
(स्केच क्लिनिकचे न्यूट्रिशनिस्ट डॉ. सिद्धेश जानी यांनी दिलेल्या माहितीवर आधारित. )

Untitled-1४. पॉवर योगा
पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक योगविद्या केवळ शारिरीक आणि मानसिक दोन्ही आरोग्यांशी जोडली गेली आहे. पूर्वी त्याची अनेक धार्मिक उद्दिष्टे होती. ध्यानधारणा आणि एकाग्रता हे घटक त्याच्याशी जोडले आहेत. पारंपरिक योगसाधनेचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे हा होता. ही खूप मोठी, अवघड आणि प्रदीर्घ काळ चालणारी प्रRिया होती. आधुनिक काळात योगाचं नवं रूप पुढे आलं. पारंपरिक योगविद्येमध्ये काळानुरूप बदल करून फिटनेसच्या उद्दिष्टासाठी पॉवर योगासारखा प्रकार अस्तित्वात आला. १९९० पासून पॉवर योगा प्रचलित आहे. पूर्वापार चालत आलेली योगासने आणि नवीन व्यायाम प्रकार याचं सुरेख फ्युजन म्हणजे पॉवर योगा. योगासनांमध्ये आसनाचा तंतोतंत सराव अपेक्षित असतो; तर पॉवर योगामध्ये आसन करते वेळी ताकद-स्नायूंचा योग्य वापर अपेक्षित असतो. पॉवर योगा शहरी जीवनाच्या धकाधकीच्या लाइफ स्टाईलमधले ताणतणाव दूर ठेवण्यासाठी खूप उपयोगी ठरतो.
पॉवर योगामध्येही शारिरीक आणि भावनिक कौशल्यं नक्कीच पणाला लागतात. मेंदू, शरीर आणि आत्मा यांचा सुरेख मेळ साधत अपेक्षित परिणाम साधण्यावर याचा भर आहे. पॉवर योगाचे बरेच फायदे आहेत पण प्रमुख उद्देश म्हणजे फिटनेस असल्याने यामध्ये घाम गाळणं अपेक्षित आहे. पॉवर योगामध्ये काही चपळ शारिरीक हालचाली जलदपणे करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे कॅलरी बर्न होतात आणि घाम येतो. घामाद्वारे शरीरातील टिक्झिन्स बाहेर पडतात. त्यामुळे पित्त आणि पचनाच्या समस्यांवर योगा परिणामकारक ठरू शकतो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि हायपरटेंशन, ब्लड प्रेशर, एक्सट्रा कॅलरीसारख्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीही पॉवर योगाची मदत होते.
(सेलेब्रिटी फिटनेस ट्रेनर मिकी मेहता यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे.)
viva.loksatta@gmail.com