लग्नसोहळ्यांमधले नवे ट्रेण्ड काय आहेत आणि ते फॉलो करताना सर्वोत्तम निवड कशी करावी? लग्नपत्रिकांपासून लग्नाच्या फोटो अल्बमपर्यंत ‘क्सासी चॉइस’साठी काही टिप्स..
गेल्या आठवडय़ात एका लग्नाळू मुलीच्या आईशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘माझ्या मुलीने स्काइपवर सांगितलंय, तिला तिच्या लग्नाचं संगीत मस्त इन्जॉय करायचंय! सर्व बालमित्र-मैत्रिणींचं त्यानिमित्ताने रियुनियन पण होईल म्हणतेय. फार मज्जा करायचीय.’ ही मुलगी आत्ता आहे अमेरिकेत. तिथूनच हे प्लॅनिंग सुरूय. कायमचा यादगार होईल, असा सोहळा तिला करायचाय.
आजची तरुणाई ही अशी आहे. ते स्वत कमावतात. त्यामुळे खिशात छन् छन् अन् डोक्यात ढँण, ढँँण विचारांचा कल्लोळ. पंजाबचे मेहंदी-संगीत, गुजराती ड्रेसकोड घागराचोली, कॅथलिक पद्धतीचं केककटिंग आणि आपल्या मराठी पद्धतीचं कन्यादान, लाजा होम, सप्तपदी सर्व काही एका एकाच लग्नात एकदाच मस्तपैकी सेलिब्रेट करायचं. अशा समारंभांचं आयोजन ऐन गर्दीत शहरात करण्यापेक्षा लांब कुठे तरी जाऊन-राहून एकदम ढिंगचॅक पद्धतीनंही हल्ली तरुणांना करायचं असतं.
लग्नासाठी पैसे खर्च करण्याची तयारी असते. पण नेमकं काय केलं पाहिजे हे कळत नाही. क्लासी चॉइस कसा असावा, याबाबत गोंधळ होतो. उत्साहावर पाणी पडू नये असं वाटत असेल तर त्यासाठीचा विचार पूर्वीपासूनच केलेला बरा. लग्नाच्या प्लॅनिंगची सुरुवात प्रत्यक्ष तारीख ठरून, हॉल बुक झाल्यावरच खऱ्या अर्थाने होते. मग सुरू होतात केळवणं, पत्रिका छपाई, शॉपिंग, डेकोरेट्स, कॅटर्स, रिटर्नगिफ्टस् या सगळ्याची धूम.
* शॉपिंग मग ते कपडय़ाचं असो वा दागिन्यांचं, एखादा त्या विषयातला एक्सपर्ट सोबत असेल तर आपोआपच रंगसंगती, स्टाईल, मॅचिंग याचे छान कॉम्बिनेशन करता येते. म्हणजे पैठणीवर टिपिकल, महाराष्ट्रीयन ज्वेलरीच हवी, लाछा असेल तर कुंदन ज्वेलरी वापरावी, त्यानुसार मग ब्युटिशियनला अ‍ॅसेसरीज वापरून हेअरस्टाईल व मेकअप् ठरवताना सोपं पडतं. आपण नवरी मुलगी म्हणून उठून दिसणं अत्यावश्यक असतं. मुलांनी कधी फेटा बांधावा व कधी पगडी चांगली दिसेल हे पेहरावानुसार ठरवावं. शेरवानी किंवा धोती-कुर्ता घालायचा असल्यास मोजडी किंवा कोल्हापुरी चप्पल असं कॉम्बोच ठरवावं लागतं. नाहीतर सायबाचे बूट घालून देसी भैया आलेले वाटतात. आपला चॉइस क्लासी हवा, असं वाटत असेल तर एखाद्या प्रोफेशनल स्टायलिस्टचा सल्ला घ्यावा.
* लग्नाच्या आदल्या रात्री हल्ली संगीत संध्या ठेवतात. त्यासाठी आजकाल एकतर कोरिओग्राफर बोलावून संपूर्ण कुटुंबच सर्व सखे-सोबत्यांसह डान्स शिकतात, रोज प्रॅक्टिस करून जोरदार तयारी ते सादर करण्याची तयारी असते किंवा एखादा गाण्याचा ऑर्केस्ट्रा आपल्या मनोरंजनास सज्ज असतो. शेवटी मस्तपैकी डिजे सुरू होतो आणि सर्वच एकदम ‘इट्स अ टाईम टू डिस्को’ म्हणत थिरकतात.
* पत्रिका छपाईमध्ये सध्या खूप वैविध्य आलंय. तसंच रिटर्न गिफ्टस् रॅपिंगमध्येही छान व्हरायटी आली आहे. आपापल्या बजेटप्रमाणे, आवडीप्रमाणे  ते ठरवा.
* केटर्सकडे ट्रायल फुडची मागणी न चुकता करावी, कारण चव समजणं गरजेचं असतं, मग ते मराठी जेवण असो की मेक्सिकन. गेस्टची आणि आपली टेस्ट मॅच झाली तरच ‘लग्नात जेवण छान होतं हं!’ असा शेरा मिळतो.
* डेकोरेटर्सकडे जाताना शक्यतो आपले वेडिंग फोटोग्राफर्स सोबत न्यावे, जेणेकरून तिथे आवश्यक असणारी प्रकाशयोजना, सुशोभन एकूण वातावरण, अ‍ॅम्बियन्स कसा असावा हे ठरवणं सोप्पं जातं.
* लास्ट बट नॉट द लिस्ट.. या सगळ्या सोहळ्यांचं चित्रीकरण कशा पद्धतीनं व्हावं, याचा विचार आधीच करावा. आई-बाबांना चार ठिकाणी पाहिलेलं, विधीवत, स्टँडर्ड तेच हवं असतं, पण मुलांना कँडिड शॉट्सच फक्त हवे असता. उपलब्ध लाईटमध्येच पण नॅचरल शॉट्स हवे असतात. पालक आणि मुलं यांची मतं वेगळी असली की मग, वाजलं का भांडय़ाला भाडं? तर याचा सुवर्णमध्य कसा साधायचा ते सर्वानी एकत्र बसून ठरवावं. आपले पाहुणे कुठ-कुठचे आहेत, त्यांच्या सवयी कशा आहेत, त्यांचा वावर कसा आणि कुठे असणार या गोष्टींचा विचार करून सर्वाचं सहकार्य मागावं. तरच हवे तसे फोटो मिळतील आणि जन्मभर लक्षात राहील, असे क्षण टिपता येतील.
* अल्बम बनवताना तो टिकाऊ असावा की डिझायनर? सॉफ्टवेअरमधून बनलेला की अ‍ॅन्टिक? काय आहेत नेमके हे प्रकार ते नीट समजून त्यातील फरक जाणून घ्यावा. वर्षांनुवर्षे आपला आठवणींचा खजिना कसा सुंदर व टिकाऊ होईल यावर भर द्यावा. मग ते छोटेसे कॉफीटेबल बुक असो. शॉर्टफिल्म, क्लिप असो किंवा स्टॅण्डर्ड रीतसर एक तासाचा व्हिडीओ, या सगळ्याचं आयोजन महत्त्वाचं असतं.
* लग्नाच्या सोहळ्यात सुंदरतेची कास सोडू नये. प्रत्येक गोष्ट उत्तमच असावी, जसं सर्वप्रथम सर्व पूजासाहित्य, आंब्याची डहाळी, तांदूळ, सुपाऱ्या, फुलं, होमकुंड, अमृतकलश, चांदीची भांडी, पाट, रांगोळी, दिवे, चौरंग स्वच्छ, कलात्मक असतील याकडे लक्ष द्यावं. त्याचप्रमाणे मुलामुलींच्या मुंडावळ्या, कपाळाच्या मापाप्रमाणे पट्टीच्या असाव्यात, फुलांच्या असल्यास चेहरेपट्टीला साजेशा हव्यात. वरमाला नेहमी वधुमालेपेक्षा थोडी लांब आणि कपडय़ांना मॅचिंग असावी. झेंडू-शेवंतीच्या फुलांपेक्षा गुलाब, निशिगंध अशी सुवासिक अथवा ऑर्किडसारखी आकर्षक फुलं वापरावीत.
* आता या सगळ्या व्यापात खर्चाचं गणित जुळवताना नेहमी अत्यावश्यक गोष्टींचा विचार आधी करावा, अनावश्यक खर्च टाळता येतो. ४-५ दिवसांच्या सोहळ्याचं चित्रीकरण करताना आपल्याला मिळणारी सव्‍‌र्हिस व क्वालिटी याला प्राधान्यक्रम द्यावा. लग्नापूर्वीच्या डाएटपासून रिसेप्शनच्या जेवणापर्यंत असं पॅकेज साधारण अडीच ते तीन लाखांपासून सुरू होतं आणि ८-१० लाखांपर्यंतही जातं.
(लेखिका लग्नसोहळ्यांचं कला दिग्दर्शन करणाऱ्या व्यावसायिक आहेत.)
    
‘प्री-वेडिंग’ शूटचा ट्रेंड
vv02प्री-वेडिंग फोटो शूटचा ट्रेंड सध्या भारतात रुजू पाहतोय. मराठमोळ्या घरांमध्येही तो पोचलाय. लग्नाच्या अल्बममध्ये ब्लॅक अॅण्ड व्हाइटची गंमत आणण्यासाठी प्रीवेडिंग शूट करण्याची पाश्चिमात्यांची पद्धत. आता इंटरनेटच्या किमयेने हे लोण आता आपल्यापर्यंत पोहोचलंय खरं; परंतु या गोष्टीचा आंधळेपणानं ट्रेण्ड फॉलो करण्यापेक्षा  आपली खरी कहाणी अस्थेटिकली मांडणं संयुक्तिक ठरतं.
फक्त लव्ह मॅरेज असणारं कपलच प्री वेडिंग शूट करू शकतं असं नाही. कांदेपोहे स्टाईल लग्न जमलं असेल, तरीही त्यात ‘स्टोरी’ असतेच. हीच आपल्या लग्नाची गोष्ट साधीच पण गमतीशीर.. खुमासदार पद्धतीने चित्रित केल्यास थोरा मोठय़ांसोबत त्याची मजा लुटता येते. नाहीतर गोष्ट वेगळीच आणि दिसतं काही वेगळंच.. उगाच पैसा, वेळ, श्रम फुकट जातात.

Story img Loader