|| वैशाली शडांगुळे

‘न्यू यॉर्क फॅशन वीक’ हा सीझनमध्ये सगळ्यात पहिले येतो. यंदा ८ ते १६ फेब्रुवारी २०१९ दरम्यान हा ‘न्यू यॉर्क फॅशन वीक’पार पडला. या वर्षीही या शोमध्ये प्रत्येक डिझायनरचे आपापल्या देशाचे राहणीमान, जीवनशैलीप्रमाणे झालेले सकारात्मक बदल फॅशनमध्येही प्रतिबिंबित झालेले दिसले. यानिमित्ताने ‘न्यू यॉर्क फॅशन वीक’ची थोडक्यात ओळख..

जगभरात फॅशन वीकच्या मंचावरूनच फॅशनचा प्रसार होतो. काही निवडक शोज असे आहेत ज्यांना फॅशन विश्वात एक वेगळं स्थान आहे. सध्या सोशल मीडियावरून फॅशन शोज् लाइव्ह जातात. त्यामुळे लोक घरबसल्या अगदी मोबाइलवरही न्यू यॉर्क फॅशन वीकच काय अन्य कोणतेही फॅशन शो सहज फॉलो करू शकतात. त्यामुळे नवनवीन येणारे फॅशन वीक आणि पूर्वापार चालत आलेले फॅशन वीक आज प्रत्येक देशातील रहिवाशांना ज्ञात आहेत. ‘न्यू यॉर्क फॅशन वीक’ तर प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध वयोगटांतील लोकांना माहिती आहे. वास्तवात ‘न्यू यॉर्क फॅशन वीक आणि पॅरिस फॅशनवीक’ हे जगभरातील लोकांना परिचित असलेले दोन मोठे फॅशनवीक्स आहेत. या मोठय़ा फॅशन शोजमधून कोणते ट्रेण्ड सेट होतायेत, कोणते डिझायनर्स आपलं कलेक्शन सादर करतायेत हे सोशल मीडियावरून सतत पाहिलं जातं, फॉलो के लं जातं आणि म्हणूनच ‘न्यू यॉर्क फॅशनवीकचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतं आहे.

फॅशन विश्वातला सर्वात मोठा मानला जाणारा हा न्यू यॉर्क फॅशनवीक गेली अनेक वर्षे सुरू आहे. जगातील टॉप मोस्ट आणि नंबर वन शो अशी या फॅशन वीकची ओळख आहे. मोठय़ा नामवंत व्यक्तींपासून, सुपर मॉडेल्स, बडे डिझायनर्स येथे येऊन गेले. फॅशनच्या बाबतीत संपूर्ण जगात सर्वप्रथम पाहिले जाते ते न्यू यॉर्क फॅशन वीककडे, कारण इथूनच फॅशन ट्रेण्ड्स हे सुरू होतात. इथे विविध देशांतील फॅशन डिझायनर्स आपलं कलेक्शन सादर करण्यासाठी येतात. प्रत्येक डिझायनर्सच्या कलेक्शनमध्ये क्रिएटिव्हिटी म्हणजेच नावीन्याला खूप महत्त्व असते. पण जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले फॅशन डिझायनर्स जेव्हा न्यू यॉर्क फॅशनवीकमध्ये आपलं कलेक्शन सादर करायला येतात तेव्हा त्या कलेक्शनमधून ते आपला असा एक वेगळा विचार घेऊन येतात. ज्या देशातून ते आले आहेत त्या देशाची प्रादेशिक स्थिती, संस्कृती, विचारसरणी, राहणीमान यांचे ठळक दर्शन त्यांनी सादर केलेल्या कलेक्शनमधून होते. आणि हेच त्याचे वैशिष्टय़ ठरते आहे. एक डिझायनर जेव्हा कपडे डिझाइन करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, सभोवतालचे जग, राहणीमान आणि एकूणच जगणं या सर्व बाबींचा खुद्द त्या फॅशन डिझायनरवर प्रभाव पडलेला असतो. तेच त्याच्या कलेक्शनमधून प्रतिबिंबित होतो. त्यामुळे न्यू यॉर्क  फॅशनवीकमधून ग्लोबली आपली लाइफस्टाइल कशी बदलते आहे याचा अंदाज दर वर्षी येतो.

इथे येणारे फॅशन डिझायनर्स हे नेहमी वेगवेगळया प्रांतातील असल्याने प्रत्येकाचे कलेक्शन हे अगदी वेगळं असतं. डिझायनरचा दृष्टिकोन हा यातला फार महत्त्वाचा टप्पा आहे. एखाद्या डिझायनरने डिझाइनच्या बाबतीत काय नवीन केले आहे हे पाहताना आणि ते फॉलो करतानाच आता पुढच्या वर्षी डिझाइनध्ये, कम्फर्टमध्ये आणि आणखी नवीन काय होऊ  शकतं? प्रिंट्स, डिझाइन्स, फॅब्रिक्स, रंगसंगती, पॅटर्न्‍स, डेकोरेशन, साइज, एम्बलिशमेंट, एम्ब्रॉयडरी, संकल्पना या गोष्टींची निवड कशी केली जाते, या गोष्टी अगदी सामान्य नागरिकांनाही सहज समजेल अशा पद्धतीने या शोमधून समोर येतात. या शोमधून होणारे ट्रेण्ड फोरकास्टिंग हे मोठे फॅशन डिझायनर्स फॉलो करतात. मुळात अगदी ट्रेण्ड फोरकास्टिंगमधूनही यापूर्वी काय होऊन गेलंय आणि येत्या काळात कसे ट्रेण्ड सेट होऊ  शकतील हे समजते. अशा पद्धतीने अभ्यास करून आलेले डिझायनर्स डिझायनर वेअर तयार करताना या दोन्ही बाबी लक्षात घेऊनच डिझाइन आणि त्याभोवतीच्या एकूणच फॅशनचा विचार करतात. अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण शोजमुळे जनमानसात फॅशनमध्ये काय नवीन येणार आहे याचे कुतूहल वाढत जाते.

यंदा न्यू यॉर्क फॅशन वीकमध्येकम्फर्टला जास्त प्राधान्य मिळाले. वेगवेगळ्या रंगांचा मिलाफ, बॉडी अ‍ॅस्पेक्टचा कपडे डिझाइन करताना केलेला वापर, अप्पर आणि लोअर गार्मेटमध्येही वैविध्य दिसले. त्यामुळे ही फॅशननक्कीच मोठय़ा प्रमाणावर फॉलो होईल. नवं काही तरी मिळेल अशी अपेक्षा नेहमीच न्यू यॉर्क  फॅशनवीककडून असते.  मी जेव्हा न्यू यॉर्क फॅशनवीकमध्ये माझं कलेक्शन शोकेस केलं तेव्हा माझा स्वत:चा अनुभव खूप वेगळा होता. मी मागच्या सीझनपर्यंत या शोमध्ये भारतीय फॅशनच सादर के ली. आपल्या देशातून आपलं स्वत:चं कलेक्शन दुसऱ्या देशात सादर करणं आणि तिथपर्यंत ते नेणं हे खूप कठीण असतं. आजकाल सगळंच ग्लोबल होतंय त्यामुळे नव्या गोष्टींचा स्वीकार लगेच होतो. फॅशनचा तर पटकन स्वीकार होतो. लोकांचा डिझायनर्सना खूप पाठिंबाही मिळतो. मलाही तसा पाठिंबा तिथे मिळाला.

दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपापल्या पातळीवर काही एक उपक्रम करत असतो मात्र तो या वीकच्या मंचावर आला तर लगेच इतर देशांतही फॉलो होतो. उदाहरणच द्यायचं तर परदेशात सस्टेनेबल फॅशनला खूप आधीपासून पाठिंबा आहे. न्यू यॉर्क फॅशनवीकमधून तर सस्टेनेबल आणि इकोफ्रेण्डली, इकोलॉजिकल फॅशनलाही वाव दिला गेला आहे. मुळात निसर्ग आणि पर्यावरण याबाबत अमेरिका आणि इतर देश नेहमीच सजग असतात. आजचं चित्र असं आहे की सस्टेनेबल फॅशनला तिथे खूप प्रमोट केलं जात असल्याने आता ग्लोबल मार्के टमध्येही त्याची गरज वाढते आहे. आता ही संकल्पनाच मुळात विदेशातून आपल्याकडे आली आहे आणि सगळीकडे पोहोचली आहे. सस्टेनेबल फॅशनसाजरी करणं, फॅशन वीकमध्ये एक दिवस सस्टेनेबल फॅशनचा असणं या सगळ्या संकल्पना न्यू यॉर्क फॅशन वीकसारख्या मंचावरूनच पुढे आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत.

भारतात तसं पाहायला गेलं तर सस्टेनेबल फॅशनआधीपासूनच होती. आता ग्लोबली सस्टेनेबल फॅशनला महत्त्व असल्याने त्याला आपल्याकडेही एक स्टेटस प्राप्त झाले आहे. याच फॅशनवीकमधूनच इकोफ्रेंडली फॅशनचा ट्रेण्ड सेट झाला. त्याला जगभरात महत्त्व मिळाले आणि आपल्या भारतीय संस्कृतीतील सस्टेनेबल फॅशनला यानिमित्ताने ग्लोबल करता आले. त्यामुळे आपण पूर्वी सस्टेनेबल फॅशन म्हणजे नक्की काय वापरत होतो हे नव्या पिढीला उमगले. एखादी संकल्पना अशापद्धतीने ग्लोबल होते आणि गल्लोगल्ली, देशोदेशी ती फॅशनमधून पोहोचते, याचे सर्व श्रेय हे डिझायनर्सना द्यायलाच हवे. यापूर्वीही आपण वापरलेल्या वस्तू परत वापरत होतोच. आता त्याला फॅशनचा चेहरा मिळाला. त्यामुळे फॅशन वीक आणि सस्टेनेबल फॅशन हे मोठं समीकरण बनलं आहे. खराब झालेले कपडे रियूज करणं, फाटलेले कपडे वेगळ्या पद्धतीने शिवणं, साडीचा ड्रेस करणं हे प्रकार रियूज, रिसायकलचे आहेत. आता ते सस्टेनेबल फॅशन म्हणून ओळखले जातात. भारतासारख्या देशात पाण्यासारख्या गोष्टीही रिसायकल होतात. त्यामुळे सस्टेनेबल फॅशनचा विचार करतानाही आपला पहिला विचार केला जातो कारण आपल्याकडे तसे कारागीर आहेत आणि म्हणूनच तर परदेशातील सस्टेनेबल फॅशन ही संकल्पना भारतात आली.

आता याचा पुढचा टप्पा हा कोलॅबरेशनचा असेल, ही संकल्पनादेखील परदेशातून आली आहे. न्यू यॉर्क फॅशनवीकमध्ये ब्रॅण्ड्सचे कोलॅबरेशन्स केले जातात. ब्रॅण्डचे कोलॅबरेशन डिझायनर्सबरोबर असतेच. एखाद्या ब्रॅण्डचे आणि एखाद्या डिझायनरचे वैचारिक स्तरावरचे संबंध आणि त्यांचे एकमेकांचे तत्त्वज्ञान मिळतेजुळते असेल तर ते एकमेकांबरोबर टाय-अप करून कलेक्शन सादर करतात. मला स्वत:ला त्यांनी खूप प्रोत्साहन दिले. मी फक्त हातमाग आणि हॅण्डमेड फॅब्रिक्सवर काम करते त्यामुळे तिथल्या लोकांना हे फार खरं आहे, ओरिजनल आणि फ्रेश आहे हे जाणवलं. जेव्हा आपण काही तरी ओरिजनल काम करतो किंवा काही तरी नवीन करतो तेव्हा जगभरातून तुम्हाला प्रोत्साहन मिळतं. मलाही ते मिळालं. मी सातत्याने वेगळं काही तरी शोके स करत राहिले म्हणून माझं कामं त्यांना आवडलं. मीही एका मोबाइल ब्रॅण्ड आणि नंतर स्टार ब्रॅण्डसोबत टाय-अप केलं होतं त्यामुळे मला न्यू यॉर्क फॅशन वीकनेआर्थिक पाठबळ आणि कोलॅबरेशन दोन्ही मिळवून दिलं हे आवर्जून सांगायला हवं. खरं तर या मोठमोठय़ा मंचावरून वावरत असताना खूप खुल्या मनाने आपण येतो. आपलं इतरांना देतो तसंच खूप काही आपण तिथून घेऊनही जातो. न्यू यॉर्क फॅशन वीकने जगाला खूप काही दिले आहे. यापुढेही फॅशनही नेहमी कम्फर्टेबल, इझी वेअरेबल आणि कलरफुल अशीच या वीकमधून पाहायला मिळेल आणि ग्लोबली फॅशन मार्केटमधून उतरेल यात शंका नाही!

(शब्दांकन: गायत्री हसबनीस)

viva@expressindia.com