मितेश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी तसेच हिंदी मालिकांबरोबरच नाटक, वेबमालिका, चित्रपटांमधून लक्षणीय भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता सुभाषने आतापर्यंत अनेक आव्हानात्मक भूमिका सहजी पेलल्या आहेत. प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या अमृताला साधं, सात्त्विक, घरचं जेवायला आवडतं.

अमृताला नेहमी ताजं खायला आवडतं. अमृताचा आणि तिच्या नवऱ्याचा संदेशचा नियम आहे की सकाळचा ब्रेकफास्ट ताजा गरमागरम बनवायचा आणि लगेच खायचा. सकाळी सकाळी नाश्त्यात अमृताला तिच्या नवऱ्याच्या म्हणजे अभिनेता संदेश कुलकर्णीच्या हातचे पोहे खायला आवडतात. तिला तिखट आणि तेलकट जेवण आवडत नाही. आहारात गहू आणि दुग्धजन्य पदार्थाना ती स्थान देत नाही. भाकरी, भाजी, कोशिंबीर असा सात्त्विक आहार ती दुपारच्या जेवणात घेते. संध्याकाळी भूक लागल्यावर नाचणीचं सत्त्व खायला तिला आवडतं. रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान जेवणाचा तिचा नियम आहे. आमटी भात खाऊन झोप छान लागते, असं तिचं मत आहे. जेवल्या जेवल्या झोपायचं नाही हा तिच्या जीवनशैलीचा नियम आहे. त्यामुळे रात्रीचं जेवण ते झोप यांच्यामध्ये तिला किमान दोन तासाची गॅप  आवश्यक वाटते. अमृता कोणतंही डाएट फॉलो करत नाही त्याऐवजी ती व्यायामावर जास्त भर देते. प्रयोगासाठी किंवा कामासाठी जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी ती व्यायामाला सुट्टी देत नाही. किमान दिवसातून एकदा वॉक तरी झालाच पाहिजे ही शिस्त तिने स्वत:ला लावून घेतली आहे.

नाटकाच्या प्रयोगाच्या वेळची अमृताची खाण्याची शिस्त आणि रोजच्या जेवणाची गोष्ट वेगळी आहे. प्रयोगाच्या किमान दोन तास आधी ती जेवून घेते. नाहीतर प्रयोगाच्या दरम्यान ढेकर येत राहतात असा तिचा अनुभव आहे. नाटकाच्या मध्यांतरात ती एक केळं खाऊन एनर्जी मिळवते. ‘माझ्या नाटकाचा दुसरा अंक माझ्या केळय़ावर तरतो’, असं अमृता सांगते. नाटक संपल्यावर एनर्जी खर्च झाल्याने खूप भूक लागते त्यामुळे लगेच चमचमीत खाण्यावर ती ताव मारते. वेगवेगळय़ा शहरात नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने झालेली भटकंती व खवय्येगिरी अविस्मरणीय असते, असं सांगणारी अमृता इंदौरच्या खाबूगिरीच्या आठवणी सांगण्यात रमते. ‘मी इंदौरच्या प्रयोगांची मनापासून वाट बघते. तिथे माझ्या दिवसाची सुरुवात पोहा-जलेबी या नाश्त्यावर ताव मारून होते. इंदौरमधील सराफा बाजारातील सोन्या-चांदीची दुकानं बंद झाली की रस्त्यारस्त्यांवर खाऊच्या गाडय़ा लागतात. तिथे माझ्यातला खवय्या  रमतो. आलू पॅटिस, कांदा कचोरी, गुळाचं गजग हे या खाऊगल्लीतले लोकप्रिय पदार्थ आहेत. शाकाहारी पदार्थाची चंगळ असणाऱ्या या खाऊगल्लीत मांसाहारी पदार्थ नसल्यातच जमा आहेत, पण या पदार्थाचं वैविध्य इतकं की मांसाहारी पदार्थाची उणीव भासत नाही हेसुद्धा तितकंच खरं..’ असं अमृता सांगते. चाट आणि चमचमीत मसालेदार पदार्थाप्रमाणेच गोडाच्या पदार्थाचीही चंगळ इथे आहे. गुलाबजाम, रबडी, लस्सी, कोकोनट क्रश, फालुदा, कुल्फी अशा एकापेक्षा एक सरस पदार्थाची लज्जत अनुभवायला मी आतुर असते.

इंदौरप्रमाणेच मी गोव्याच्या प्रयोगांसाठीसुद्धा उत्सुक असते, असं ती म्हणते. ‘गोव्यात गेल्यावर हे खाऊ की ते खाऊ अशी माझी अवस्था होते. बऱ्याचदा गोव्यात गेल्यावर खाण्यामध्ये नाटकाचे प्रयोग लुडबुड करतात की काय अशी माझी अवस्था होते. गोव्यातले मासे, तिथला पाहुणचार हा मला कायमच सुखावह असतो. मला बेबिंका हा गोड पदार्थ गोव्यातच पहिल्यांदाच खायला मिळाला. बेबिंका हे पुडिंग पारंपरिक इंडो-पोर्तुगीज गोडाचा प्रकार आहे. पारंपरिक बेबिंकामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर चक्क सात थर असतात. साहित्यामध्ये गव्हाचे पीठ, साखर, तूप, अंडयमचा बलक आणि नारळाचं दूध यांचा समावेश असतो. गोवा राज्याचा हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. फ्रीजमध्ये ठेवून बराच काळ चवीचवीने हे पुडिंग खाल्लं जातं. कमीत कमी चार तास बनवण्यासाठी लागणाऱ्या या बेबिंकाला ‘गोव्यातील मिठाईची राणी’ असं संबोधलं जातं. बेबिंका व्हॅनिला आइस्क्रीमबरोबर गरमही सव्‍‌र्ह केलं जातं’ अशा गोव्यातल्या तिच्या आवडत्या खाबूगिरीविषयी तिने भरभरून सांगितलं. 

प्रत्येक मुलीला तिची आई उत्तम सुगरण आहे असं कायम वाटत असतं. माझंही माझ्या आईविषयी तेच मत आहे, असं ती म्हणते. ‘आई लखनवी चिकन जगात भारी बनवते. मी तिच्याकडून तसं चिकन बनवण्यास शिकण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्या इतकं उत्तम काही ते जमत नाही. काही पदार्थ असे असतात की ते त्यांच्याच हातचे चविष्ट व कायम हवेहवेसे वाटतात. शेवटी त्यात त्यांचा हातखंडा असतो. लहानपणी मी माझ्या आईला भाकरी थापताना बघायचे व गुंग होऊन जायचे. आईने थापलेली ज्वारीची भाकरी त्यावर तुपाची धार व चिमटीत घेऊन भाकरीवरून भुरभुरवलेलं मीठ हे दृश्य आजही माझ्या डोळय़ासमोरून जात नाही. आई मायेने माझ्या पुढय़ात भाकरीचं ताट पेश करायची व म्हणायची ‘‘छान चाऊन चाऊन खा’’. जर मी नीट चावून खात नसेन तर ती पुन्हा म्हणायची, अगं चाऊन चाऊन खा भाकरी.. अजून गोड लागेल. आणि खरंच तिचं बोलणं ऐकल्यावर भाकरीचा एक एक घास मधुर आस्वाद देऊन जायचा’ असं ती सांगते. आईचा हा मोलाचा सल्ला लहानपणी धांदरटपणे खाताना उपयोगी होताच, मात्र आता मोठेपणीही तो तितकाच मोलाचा ठरतो, असं अमृता सांगते. कारण धावपळीच्या जीवनात शांतपणे जेवायला, घास चावून चावून खायला, त्या पदार्थात नेमकं काय घातलंय हे निरीक्षण करायला कोणाकडे वेळ असतो? पण आईचं हे ‘‘छान चाऊन चाऊन खा’’ ब्रह्मवाक्य मी काटेकोरपणे पाळते, असंही तिने नमूद केलं.

अमृताने पुण्यात एस. पी. कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. तेव्हाच्या खवय्येगिरीच्या आठवणी सांगताना ती म्हणते, मला पुण्यातली कल्पना भेळ प्रचंड आवडते. कॉलेजमध्ये असताना आम्ही तिथे आवर्जून जायचो. आजही माझी पावलं तिथेच वळतात. नाशिक – पुण्याचा मिसळीचा वाद हा समस्त खवय्यांसाठी राष्ट्रीय मुद्दा आहे. त्याचप्रमाणे पुण्याची आणि मुंबईची भेळ हा माझ्यासाठी वादाचा मुद्दा ठरू शकतो, असं सांगताना एकावेळेला पातेलंभर भेळ आपण खाऊ शकतो अशी कबुली तिने दिली. खरंतर भेळेची खासियत असते ते त्याचं पाणी..भेळ खायला सुरुवात केल्यानंतर आणखी थोडं पाणी भेळेवर हवं असं वाटलं की हमखास समजावं पाणी चटकदार बनलं आहे, त्यामुळे भेळेला स्वाद आला आहे’ असं ती म्हणाली. कॉलेजमधील खाबूगिरीचा आणखी एक किस्सा सांगताना अमृता म्हणाली, ‘एस.पीमध्ये माझी स्वरूपा भावे नावाची जिवाभावाची मैत्रीण होती.तिच्या कुटुंबाचा हॉटेलचा व्यवसाय होता.आमच्या कॉलेजजवळच तिचं मुक्ता नावाचं हॉटेल होतं. दररोज दोन लेक्चरमध्ये ती मला नाश्त्याला तिच्या हॉटेलमध्ये घेऊन जायची. तिथला डोसा आणि इडली म्हणजे निव्वळ कमाल.तिच्यामुळे मला कॉलेजमध्ये असताना रोजच्या रोज हॉटेलिंग घडलं. नाहीतर तेव्हा खिशात हॉटेलसाठी काही खूप पैसे नसायचे. त्याचबरोबर आम्ही गंधर्वचा उत्तप्पा खायला जायचो. बादशाहीत जेवायला जायचो. तिथली चाकवताची भाजी जगात भारी होती, असं तिने सांगितलं. 

मला तुपाची बेरी प्रचंड आवडते, असं म्हणणारी अमृता तिच्या घरच्या साध्या सात्त्विक खाण्याच्या सवयी सांगताना म्हणाली, ‘फोडणीची पोळी मला आणि माझ्या नवऱ्याला पक्वान्न वाटतं. मी एकदा शिळय़ा पोळीची फोडणीची पोळी केली होती. आणि तेवढय़ात एक मुलगा आम्हाला कामानिमित्ताने भेटायला आला. तर त्याने सुदाम्याचे पोहे खावेत तशी मी केलेली फोडणीची पोळी खाल्ली. त्याचबरोबरीने आम्हाला शिळय़ा भाकरीचा कालासुद्धा आवडतो.शिळी भाकरी बारीक करायची. त्यात मीठ, कच्चा कांदा, दही, साखर घालून हाताने कालवायचं आणि त्यावरून कोथिंबीर पेरायची. तूप गूळ पोळीचा लाडूसुद्धा मला आवडतो. पूर्वीच्या काळी मुलांना भूक लागली की आई पटकन पोळी चुरून गूळ पोळीचे लाडू करून द्यायची. गूळ तूप पोळीचा लाडू खूप हेल्दी व पौष्टिक असा आहे, कारण त्यात गव्हाची पोळी गूळ व तूप असं सर्व शक्तिवर्धक बलवर्धक आहे. पोळय़ा बारीक होईपर्यंत कुस्करून त्यात विळीवर चिरलेला गूळ आणि पातळ तूप घालून तयार मिश्रण हाताने कुस्करून झाल्यावर तयार होणारे लाडू म्हणजे माझ्यासाठी डेझर्टच आहे. त्याचबरोबर गुरगुटय़ा भातदेखील मला प्रचंड आवडतो’. 

पंकज त्रिपाठी यांचं एक वाक्य मला नेहमी लक्षात येतं असं ती सांगते. ‘खाना धीमी आंच पे बहुत अच्छा पकता है भाई !’ याचा अर्थ असा की गॅस मोठा करून भराभरा जेवण बनवणं म्हणजे घाईघाईने प्रसिद्ध होण्यासारखं आहे. तुम्ही गॅस मंद ठेवा. निगुतीने, कलाकुसरीने, शांतपणे जेवण बनवा ते स्वादिष्टच होईल. घाईघाईने मिळालेली प्रसिद्धी वाऱ्याच्या झुळकीबरोबर चटकन उडून जाते, असं ती त्यामागचा अर्थ उलगडून सांगते. अमृताला साठवून साठवून शिळं अन्न खायला आवडत नाही. फ्रीजमध्ये साठवून ओव्हनमध्ये अन्न गरम करून खाणाऱ्या लोकांचा तिला राग येतो. तसंच तिला शिळं अन्न घरातल्या कामवालीला किंवा वॉचमनला द्यायलाही आवडत नाही. त्यांनासुद्धा ती ताजं अन्नच देते. याविषयी अमृता सांगते, ‘आम्ही अन्न टाकत नाही याचा अर्थ आम्ही शिळं अन्न साठवून गरम करून खातो.. असं नाही. शिळं खाऊन मूड ऑफ राहतो. ताजं अन्न खाल्ल्यावर तुम्ही फ्रेश व आनंदी राहता. त्यामुळे हेल्दी खा, ताजं खा आणि महत्त्वाचं चाऊन चाऊन खा!’

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nice eat food drama along with hindi serials web series actress amrita subhash ysh
Show comments