बहुरूपी गुंडांनाच फक्त राजू ऊर्फ पनामा आलियास कार्तिक बाम अशी विविध नावं असतात असं नाही. आपणही त्याच माळेतले मणी असतो.
हो. हो. अगदी मान्य आहे मला. मागच्या लेखानंतर काही प्रतिक्रियांनी आवाज उठवला होता- की हे काय बरं? टोपणनावांचा लेख- आणि त्यात पंजाबी नावांचा उल्लेखसुद्धा नसावा? बरोबर आहे. टोनी, पप्पी, डॉली, मिका, पोनी, गुड्डू इत्यादी व्यक्तिमत्त्वांना ओळखत असलेले अनेक जण फुरंगटून बसले. पण खरं सांगू का? बिल्लू सिंग, हॅरी प्राजी, डिंपी आंटी हे सगळे मला फार ओरिजनल वाटतात. त्यांचं खरं नाव तेच असत असेल कदाचित. नाहीतर हरपाल सिंग, मनमीत शेरगील, जसविंदर कपूर अशा माणसांना पाळीव प्राण्यांसारखं कशाला संबोधेल कोणी.
का कोण जाणे पण मला मात्र कुणाला टोपणनावानं हाक मारणं जमतच नाही. फार संकोच वाटतो. खरंच. पक्या, पश्या, उप्या, अंडय़ा, सम्या, निख्या. छे छे. अगदी जवळचे असले, तरी मी पूर्ण नावच घेते. इतकी चांगली नावं असताना अपभ्रंश कशाला करायचा? अनेकदा नसलेली सलगी दाखवायला काही जण चतुराईनी टोपणनावाचा वापर करतात. कशात काही नाही- आणि उगाच ए अनु. किंवा चल बाय रे संजा. असं म्हणत काही जण जे लाडात येतात- ते कमालच वाटतात. मला हाताच्या बोटावर मोजण्याइतकी उपनावं निर्विवाद वाटतात. सगळ्यात पहिला म्हणजे आमचा जगन् मित्र असा ‘नाल्टय़ा’ – उद्या बराक ओबामा जरी- हेलो नाल्टय़ा-हाऊ आर यू म्हणाले तरी आम्हाला काही आश्चर्य वाटणार नाही. कारण त्याला स.ग.ळे.जण ओळखतात आणि ‘नाल्टय़ा’ ह्य़ा अद्वितीय नावानीच ओळखतात. आणि दुसरा म्हणजे प्र. ना. संतांचा लंपू. इतकं गोड टोपणनाव कसं असू शकतं? वनवास, पंखा, शारदा संगीत वाचलंय ना? तुम्हीही प्रेमात पडाल.
माझ्या एका मैत्रिणीला घरचे मिटी म्हणतात. आम्ही रसिका म्हणून ओळखतो तिला आणि आता सासरी तिचं नाव ‘रोशनी’ ठेवलंय. आपलीच किती नावं लक्षात ठेवायची. आपण! कुणीतरी तिला मिंटीताई म्हणणार, कॉलेजमध्ये नाटकात रसिका भाग घेणार. सासरी सत्यनारायणाच्या पूजेला रोशनी नवऱ्याबरोबर दांपत्य म्हणून बसणार. लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलणं ही एक अजबच पद्धत होती नाही? फक्त आडनाव बदलून नवं कुटुंब सुरू करण्याची पद्धत- सोय म्हणून आपण एक वेळ समजून घेऊ. पण ज्या नावानी जन्मापासून वीस-पंचवीस-तीस र्वष आपण खरेखुरे नावारूपाला आलो. ती आयडेण्टिटी अशी अचानक सोडून द्यायची? एकेकाळी हे फार सहज आणि स्वाभाविक वाटायचं. लहान असताना मी सुद्धा नव्या येणाऱ्या काही वहिन्यांची नावं निवडण्याच्या खेळात उत्साहानी भाग घेतला आहे. पण मोठं होईल तसं ते विचित्र वाटायला लागलं. ओळख झाल्यावर, साखरपुडय़ाला-अगदी अक्षता पडेपर्यंत आपण त्या मुलीला तिच्या माहेरच्या नावानी हाक मारायची आणि लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशीपासून अचानक नवं नाव. किती विलक्षण आहे हे. अगदी ठरवून नवी भूमिका करत असल्यासारखं. सिनेमा-नाटकासारखं. आम्हाला कसं प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी वेगळं नाव असतं. ‘सिंघम’ मध्ये ‘मेघना’ होतं. पुणे ५२ मध्ये ‘प्राची आपटे’ होतं. आणि प्रत्यक्षात सोनाली. तसा खराखुरा ‘मेक बिलीव्ह’चा खेळ. वैवाहिक आयुष्यात वेगळी भूमिका. पूर्वायुष्याचा वेगळा सिनेमा.
तरीपण लहानपणी आईबाबा लाडानी काहीतरी म्हणतच असतात. घरातल्या माणसानी आपल्या नावाचा जो शॉर्टकट पाडलेला असतो तो किती गोड आणि आपलासा वाटतो ना. श्रीधर नावाच्या माझ्या मावसभावाला कर्नाटकात राहणारे माझे मावशी-काका ‘शिरपा’ म्हणून इतकं प्रेमानं संबोधायचे. श्रीकांत नावाच्या मावसभावाला घरी कान्तु म्हणायचे आणि आम्ही कान्तुदादा. रेवती हे नक्षत्राचं नाव असूनसुद्धा माझ्या चुलत बहिणीला अजूनही आम्ही सगळे राणी म्हणतो. कधी बोबडय़ा बोलांमुळे काही गमतीशीर नावं पडतात. आत्ता लिहिताना आठवलं- ‘संदीप’ म्हणता यायचं नाही त्यामुळे कितीतरी दिवस मी बंचीदादा म्हणायचे संदीपला. माझ्या मावसबहिणीची मुलगी रीना छोटी असताना, मला छान ठसक्यात सोन्नुमौशी म्हणायची. अजूनही काही मित्रमैत्रिणी मला चिडवताना सोन्नुमौशी म्हणतात.
मोठमोठी माणसंसुद्धा तुम्हाला घरी काय म्हणतात- असा विषय निघाला की विरघळून जातात भूतकाळात. आपल्याला नुसतं नाव नाही तर ती हाक मारणाऱ्या त्या त्या माणसाची स्टाइल आठवते. मला आजतागायत कुणी माझ्या आडनावानी हाक मारलेली नाही. अपवाद आठवीत असताना ऑफ तासाला आलेल्या झानपुरेबाईंचा. कुलकर्णी जेव्हा त्या म्हणाल्या तेव्हा वर्गातल्या सात-आठ जणांनी चमकून वर पाहिलं- मग कळलं त्या माझ्याकडे बघत होत्या. मी आश्चर्यानी मी? म्हणतही पुढे गेले होते. पुढे आणखी एकदा त्यांनीच जिन्यात ‘ए हिरवा स्वेटर’ अशी हाक मारली होती मला.
सगळ्यात मस्त म्हणजे चैत्र सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर पुण्यात आमचा सत्कार होता- फिल्म अर्काइव्हज्मध्ये. तिथे स्टेजवर बोलवताना अशा वेळी करतात तशी दोन-तीन विशेषणं लावून सोना ऽऽ ली कुलकर्णी ऽऽऽ अशी झोकात माझ्या नावाची घोषणा केली गेली. बाहेर आल्यावर माझी चिमुकली भाची हसत हसत म्हणाली, ‘‘अशं काय म्हनाले ते? नुत्तं शोनी आत्त्या अशं म्हनायचं’’ आता कुठल्याही स्टेजवर जाताना मला कानात तेच ऐकू येतं आणि सगळं हलकं, सोप्पं वाटतं. खरंच आपण कोण असतो नक्की? हाक मारली जाते ते, शाळेतल्या नावाचे, पासपोर्टवरचे की प्रसिद्धीच्या नावाचे? म्हणजे एखादी व्यक्ती सीमावहिनी / सीमाताई / सीमाआंटी / सीमु / सीमा फडके आठवी ब/ फडके मॅडम किंवा जोशीकाका / जोशीसाहेब / श्रीयुत रवी जोशी / रवीमामा / रव्या / रोहनचे बाबा, राधिका जोशींचे मिस्टर.. नक्की कोण असतो? की सगळेच असतो? त्यातला एखादा ‘मी’ आपल्याला नकोसासुद्धा असत असेल. त्या भित्र्या किंवा बुटक्या- म्हणून हिणवल्या गेलेल्या ‘मी’ला आपण कधीच ओलांडून आलेले असतो. पण ओळखीचं कुणीतरी त्याच ‘मी’च्या आठवणी-किस्से सांगायला लागलं- तर शब्दश: नामानिराळं वाटतं ना अशा वेळी?
मोठय़ा माणसांबद्दलही असंच वाटतं मला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांची घरची माणसं काय म्हणत असतील? मिस्टर प्राइम मिनिस्टरना घरचं असायला कितीसा वेळ मिळत असेल? कॉर्पोरेट जगातल्या उच्चपदस्थ- बॉस लोकांना कामाच्या रगाडय़ात ती घरची हाक कानी पडण्यासाठी किती ताटकळावं लागत असेल. अमिताभ बच्चनना हरिवंशरायसाहेब आणि तेजी आंटी काय म्हणत असतील? अमितजी ती हाक मिस् करत असतील का आता?
मला मात्र आयुष्यात पहिल्यांदा एक वेगळी हाक कानावर पडते आहे. माझी मुलगी ‘आई’ म्हणायला शिकली आहे. गेले दोन महिने त्या हाकेला ‘ओ’ देण्यात मी इतकी इतकी रममाण झाली आहे की बाकीचं काहीच ऐकू येईनासं झालं आहे.
सो कुल : ऊर्फ
बहुरूपी गुंडांनाच फक्त राजू ऊर्फ पनामा आलियास कार्तिक बाम अशी विविध नावं असतात असं नाही. आपणही त्याच माळेतले मणी असतो. हो. हो. अगदी मान्य आहे मला. मागच्या लेखानंतर काही प्रतिक्रियांनी आवाज उठवला होता- की हे काय बरं? टोपणनावांचा लेख- आणि त्यात पंजाबी नावांचा उल्लेखसुद्धा नसावा?
आणखी वाचा
First published on: 08-02-2013 at 06:43 IST
मराठीतील सर्व Show Cool बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nicknames