मुंबईकरांना अगदी जवळ.. शहरातलीच तरीही जंगल नाइट अनुभवायला मिळणारी कॅम्प साइट गेल्या वर्षीपासून उपलब्ध झाली आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता पर्यटकांना रात्री राहता येतं. नॅशनल पार्कतर्फेच हल्ली नाइट कॅम्पचं आयोजन केलं जातं. महिन्यातल्या ठरावीक वीकएण्डला हे कॅम्प आयोजित केले जातात. शनिवारी संध्याकाळ ते रविवारी सकाळपर्यंत असे १८ तास पर्यटकांना जंगलाचा अनुभव घेता येतो. तिथे जाण्यापूर्वी अर्थातच नोंदणी आवश्यक आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी ठरावीक शुल्क आकारणी केली जाते. आपण एकटे, ग्रुपसोबत, कुटुंबासोबत हा नाइट कॅम्प करू शकतो. याची नोंदणी आणि माहिती https://sgnp.maharashtra.gov.in/1110/Events या वेबसाइटवरून मिळवता येईल. ३० एप्रिललाच त्यांचा एक आकाशदर्शन आणि कान्हेरी लेण्यांचा नाइट कॅम्प झाला.

नॅशनल पार्कमधल्या रात्रीच्या सफरीत ‘नाइट जार’चं दुर्मीळ दर्शनही घडू शकतं.
नॅशनल पार्कमधल्या रात्रीच्या सफरीत ‘नाइट जार’चं दुर्मीळ दर्शनही घडू शकतं.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे साहाय्यक वनसंरक्षण अधिकारी उदय ढगे म्हणाले, ‘‘नॅशनल पार्कमधले मिनी ट्रेल आणि बोट रायडिंग हे लोकांना माहीत आहे. याशिवाय नाइट कॅम्पमुळे पर्यटकांना या राष्ट्रीय उद्यानाबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळावी व तिथे असणाऱ्या वन्य संपत्तीबद्दल, कान्हेरी लेणीबद्दल जाणून घेण्यासारखं बरंच काही आहे, त्याविषयी जाणून घेण्याची संधी लोकांना मिळावी हा यामागचा उद्देश आहे.’’ यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातलीच कान्हेरी लेणी दाखवण्यात आली आणि अभ्यासकांकडून त्याबद्दल मार्गदर्शन केलं गेलं. नॅशनल पार्कमधला नाइट कॅम्प म्हणजे चांदण्याखाली एक रात्र व सोबत खगोलशास्त्राविषयी मिळणारी माहिती, पक्ष्यांच्या किलबिलाट उजाडणारी सकाळ आणि पक्षीदर्शन, ट्रेकिंग असं सगळंच साध्य होतं. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी तर ही पर्वणी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
नॅशनल पार्कमध्ये रात्रीच्या कॅम्पिंगसाठी सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वीकेण्डचा वेळ उत्तम घालवण्यासाठी एक नवं डेस्टिनेशन तरुण निसर्गप्रेमी पर्यटकांना मिळालंय.

Story img Loader