वयाच्या ३३ व्या वर्षी बहुतांश सगळ्यांचा आपल्या करिअरमध्ये जम बसलेला असतो, मात्र निलांजनाने वयाच्या ३३ व्या वर्षी मार्केटिंगचे क्षेत्र सोडून पूर्णवेळ स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षक असा प्रवास सुरू केला. हा निर्णय तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरल्याचे ती सांगते. निलांजना ही अंदमान बेटांमधील ‘शहीद द्वीप’ या बेटावर एकमेव महिला स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षक आहे. जाणून घेऊया मार्केटर ते स्कूबा प्रशिक्षक हा निलांजना बिस्वासचा प्रवास… निलांजनाने ‘वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’, वेल्लोर, तमिळनाडू येथून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर निलांजनाला एका मार्केटिंग कंपनीत नोकरी लागली. त्या वेळी आर्थिकदृष्ट्या समाधानी असले तरी भावनिकदृष्ट्या असमाधानी होते, असे निलांजना सांगते. तिचे सगळे दिवस डेटाचे विश्लेषण करण्यात, मार्केटिंग मॉडेल्सची रणनीती आखण्यात आणि बोर्डरूममध्ये बसण्यात गेले. हे यशस्वी जीवनाचे चित्र असले तरी या कामातून तिला कधीच समाधान मिळत नव्हते. निलांजनाचे आई- वडील आर्मीमध्ये असल्याने सुट्टीचा वापर तिचे पालक तिला प्रवास आणि साहसी खेळांचा अनुभव देण्यासाठी करत असत. निलांजनाला समुद्राचे आकर्षण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे समुद्र किनारी फिरणे, शंख शिंपले गोळा करणे, स्कूबा डायव्हिंग करणे ही तिची विशेष आवड. हीच आवड जपण्याचे ठरवून आवडीचे रूपांतर निलंजनाने करिअरमध्ये केले.
कॉर्पोरेटमध्ये तब्बल ८ वर्षे काम केल्यानंतर तिने पहिले स्कूबा डायव्हिंगचे दोन वर्षे धडे घेतले. त्यानंतर मात्र निलांजनाने मागे वळून पाहिले नाही. ओपन वॉटर डायव्हर कोर्स प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक डायव्हिंगने तिला नेमकं काय हवं होतं याची आठवण करून दिली असल्याचे निलांजना सांगते. या दरम्यान, सर्वकाही मागे सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. मी माझे शिक्षण वाया घालवते आहे का? मला स्थिर करिअर सोडल्याचा पश्चात्ताप होईल का? आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी खूप उशीर झाला आहे का? अशा अनेक शंका मनात पिंगा घालत होत्या. पण मी माझ्या आवडीकडे जितके दुर्लक्ष करत गेले तितकीच ती गोष्ट मला अस्वस्थ करत गेली, असे तिने सांगितले. अखेरीस तिचा निर्णय झाला आणि तिने मार्केटिंग क्षेत्रातून काढता पाय घेतला. यासाठी वडील कॅप्टन (निवृत्त) निलाभ बिस्वास आणि आई डॉ. (ग्रुप कॅप्टन निवृत्त) मोनिषा बिस्वास यांनी तिला प्रोत्साहन दिले. तिच्या प्रत्येक निर्णयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे ती सांगते. त्यानंतर सुरू झाला निलांजनाचा स्कूबा डायव्हिंगचा प्रवास.
अंदमान आणि निकोबार बेटांवर जाऊन व्यावसायिक स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून निलांजनाने प्रशिक्षण सुरू केले. ते भयानक होते, परंतु पाण्याखाली माझे दिवस घालवण्याचा, इतरांना माझ्याइतकेच समुद्रावर प्रेम करायला शिकवण्याचा विचार, यामुळे हे सर्व काही सार्थकी लागले ही भावना कायम असल्याचे निलांजना सांगते. एसएसआय इन्स्ट्रक्टर ट्रेनर जयदीप कुडाळकर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली ‘स्कूबा स्कूल इंटरनॅशनल सर्टिफाइड इन्स्ट्रक्टर’ बनण्याचे प्रशिक्षण समाधानकारक आणि तितकेच कठीण होते. शारीरिकदृष्ट्या कठीण, मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि प्रचंड शिस्त यासाठी आवश्यक होती. इन्स्ट्रक्टरच्या अथक पाठिंब्याने, मी पाण्यातून मार्गक्रमण करायला शिकले, पहिल्यांदाच घाबरलेल्या डायव्हर्सनाही तिने शिकवले असल्याचे ती सांगते. आज निलांजना समुद्रावर प्रवाळ खडकांमधून डायव्हर्सना मार्गदर्शन करण्यात तिचे दिवस घालवते. बहुतेक लोक फक्त माहितीपटांमध्ये पाहतात, असे सागरी जीवन मी खरोखर अनुभवत असल्याचे तिने सांगितले.
प्रशिक्षक बनणे म्हणजे लोकांना डायव्हिंग करायला शिकवणे इतकेच नव्हे तर, निलांजना त्यांना सागरी संवर्धनाचे महत्त्वदेखील पटवून देते. मी जितका जास्त वेळ पाण्याखाली घालवला तितकेच मला आपल्या महासागरांना भेडसावणारे धोके दिसले – कोरल रीफ्सचे ब्लीचिंग, प्लास्टिक प्रदूषण आणि नष्ट होणारे सागरी जीवन ही एक भयावह परिस्थिती असल्याचे ती सांगते.
बदल करण्याची सुरुवात आपल्यापासून करायची असते, म्हणूनच केवळ डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून आपली भूमिका मर्यादित न ठेवता तिने रीफ प्रोटेक्शन इनिशिएटिव्ह – रीफच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक संस्थांसोबत भागीदारी करणे आणि शाश्वत डायव्हिंग पद्धतींबद्दल योजना आखणे याचबरोबर तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच महासागर, समुद्रकिनारा स्वच्छता – किनाऱ्यांवरून प्लास्टिक कचरा काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणे अशा अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत शाश्वत मासेमारीला प्रोत्साहन देणे – सागरी जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक मासेमारी पद्धती स्वीकारण्यासाठी स्थानिक समुदायांना प्रोत्साहन देणे आदी गोष्टींसाठी निलांजना प्रामुख्याने प्रयत्न करते आहे.
‘पारंपरिक शिक्षण मागे टाकून सर्वात कठीण आव्हानात्मक काम मी करते आहे. समाज, शिक्षण, आर्थिक फायदा या गोष्टी बाजूला सारून मला स्वत:ला आनंद, समाधान कशात वाटतो याचा विचार मी करते आणि माझ्यासाठी खरं यश हेच आहे. मी वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करते, शिकवते आणि वाटेत भेटणाऱ्या विविध क्षेत्रांतील लोकांना समुद्राबद्दलचे माझे नाते सांगते’ असे सांगणारी निलांजना कॉर्पोरेट शिडी चढण्याऐवजी, समुद्राच्या तळाशी शिरून त्याचा शोध घेण्यात रमली आहे. जर तुम्हाला कधी काहीतरी वेगळे करण्याची ओढ वाटली असेल, तर त्याबद्दल तुमचे मन काय सांगते आहे ते नीट ऐका. कधी कधी, सर्वात मोठे साहस म्हणजे तुम्ही स्वत:साठी घेतलेला एक निर्णय असू शकतो. विश्वासाची झेप घेणे हेच तुमच्यासाठी सर्वात गरजेचे आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे निलांजना सांगते.
viva@expressindia.com