जागतिक रंगभूमी गाजवणाऱ्या ‘निर्भया’ नावाच्या नाटकाचे नुकतेच मुंबईत काही प्रयोग झाले. ‘निर्भया’च्या निमित्ताने आत्मसन्मानासाठीचा लढा तरुणींनी रंगभूमीच्या माध्यमातून लढला. या प्रयोगाविषयी..
१६ डिसेंबरच्या त्या रात्री घडलेल्या निर्घृण घटनेमुळे सगळ्यांनाच हादरवून सोडलं होतं. दिल्लीच्या रस्त्यावर भरधाव धावणाऱ्या एका बसमध्ये एका तरुणीवर अतिशय घृणास्पदरीत्या सामूहिक बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकून देण्यात आलं. या घटनेतल्या ‘निर्भया’वर झालेल्या पाशवी अत्याचाऱ्यांनी सारा देश खवळला. प्रत्येक जण शक्य त्या मार्गाने आपला निषेध नोंदवत होतं. मग रंगभूमी कशी शांत राहणार होती?
या केसनंतर काहीशा अशाच प्रसंगातून गेलेल्या कित्येकांच्या मनात दडून बसलेल्या ‘निर्भया’ जाग्या होऊ लागल्या होत्या. त्यातलीच एक होती पूर्णा जगन्नाथन. लहानपणी शेजारच्या काकांच्या लंगिक अत्याचाराला बळी पडलेली पूर्णा आता मात्र चवताळून उठली होती. या विषयात आता काहीतरी केलंच पाहिजे, हा विचार मनात पक्का करून तिने दक्षिण आफ्रिकेतील रंगकर्मी येल फार्बरला भारतात बोलावलं. यातूनच ‘निर्भया’ या नाटकाचा जन्म झाला. लेखिका आणि दिग्दíशका येल फार्बर यांनी या नाटकातून अत्याचाराला बळी पडलेल्या काही महिलांच्या व्यथांना लोकांसमोर आणण्याचं ठरवलं होतं. एक अभिनव मार्ग यासाठी अवलंबला.. तो म्हणजे ‘त्यांच्या व्यथा त्यांच्याच तोंडून सांगण्याचा’.
लहानपणी लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या, हुंडा आणला नाही म्हणून नवऱ्याने पेटवून दिलेल्या, सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या ‘निर्भया’ नाटकात त्यांचे खरे अनुभव लोकांसमोर मांडतात. पूर्णा जगन्नाथन, प्रियांका बोस, रुक्साना कबीर, अपना भावनानी आणि स्नेहा जावळे या निर्भयांच्या कथा नाटकातून उलगडत जातात.
या नाटकाची एक मुख्य घटक असलेली स्नेहा जावळे म्हणाली, ‘‘सायलेन्स ब्रेकिंग’ ही आमच्या या नाटकाची मूळ संकल्पना आहे. वर्षांनुर्वष एक व्हिक्टिम या नजरेने लोक आम्हाला पाहायचे. ते दुर्दैवाचं ओझं आम्हाला अंगावरून काढून टाकायचं होतं. आम्हाला आज कुठल्याही फुकटच्या प्रसिद्धीची गरज नव्हती. आमच्यापकी प्रत्येक जण तिच्या क्षेत्रात एका चांगल्या पदी काम करतेय. तिला तिचं स्वतंत्र आयुष्य आहे. ती कमावती आहे. पण गरज होती ती त्या ओझ्याला दूर सारायची.’’
निर्भया नाटकानं आतापर्यंत एडिंबरा फ्रिंज फेस्टिव्हलमध्ये पदार्पणातच अॅम्नेस्टी इंटरनॅशनल फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन अॅवॉर्ड मिळवलं. याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरची इतरही काही पारितोषिकं मिळवली आहेत. १७ ते २८ मार्चदरम्यान भारतात ‘निर्भया’चे प्रयोग होताहेत. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूच्या या प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळाला.
‘आम्हाला या नाटकातून फक्त भारताचीच स्थिती अधोरेखित करायची नव्हती. कारण आज जगातील बहुतेक देशांची स्थिती हीच आहे. प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी एक सेशन ठेवतो. त्या वेळी अशाच काही अनुभवांतून गेलेली कित्येक मंडळी आमच्याकडे येऊन रडतात. त्यांच्या भावना मोकळ्या करतात. यात फक्त तरुणी, लहान मुलीचं असतात असं नाही, तर मुलंसुद्धा असतात’, स्नेहा म्हणाली. प्रयोगाच्या उद्देशाबद्दल ती म्हणाली, ‘आम्हाला झाशीची राणी हे बिरुद नकोय. आम्हाला गरीब बिचारीपण म्हणू नका. एक स्त्री, एक माणूस म्हणून समाजात सर्वाना मिळतो तो मान आम्हालाही हवाय.’
आपल्या आत जळत असलेल्या विस्तवाला वाट करून देण्यासाठी रंगभूमीसारखं साधन वापरून या स्त्रियांनी एक नवीन मार्ग उपलब्ध करून दिलाय.
‘निर्भया’चा रंगभूमीवरून लढा
जागतिक रंगभूमी गाजवणाऱ्या ‘निर्भया’ नावाच्या नाटकाचे नुकतेच मुंबईत काही प्रयोग झाले. ‘निर्भया’च्या निमित्ताने आत्मसन्मानासाठीचा लढा तरुणींनी रंगभूमीच्या माध्यमातून लढला.
First published on: 28-03-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirbhaya a drama