दिल्लीतली निर्भया केस असो किंवा गोव्यातलं तेजपाल प्रकरण मोठय़ा घटनांची चर्चा होते. पण अनेक घटना उघडकीलासुद्धा येत नाहीत. ‘इव्ह टििझग’चे प्रकार होतच असतात. मुलींनी आता त्याची सवयच करून घेतली आहे. अशा वातवरणात खऱ्या अर्थाने निर्भया बनून कधी जगता येणार?
गेल्या वर्षीचं दिल्ली बलात्कार प्रकरण, आताचं तेजपाल प्रकरण, काही महिन्यांपूर्वीची शक्ती मिलची केस किंवा काही वर्षांपूर्वीची मरिन लाइन्स वरची ३१ डिसेंबरची ‘काळीरात्र’.. अशा कितीतरी उघडकीला न आलेल्या घटना असतील. या सगळ्यात साम्य एकच. अमानुष अत्याचार. पण प्रत्येक वेळेस यात बळी पडलेल्या मुलींची, स्त्रियांची गणती मात्र नाही. प्रत्येक वेळेस अशी कुठली तरी गोष्ट घडल्यावर एका ठरावीक काळासाठी सगळ्यांचं पेटून उठणं, न्यायव्यवस्थेविरुद्ध बोलणं, पुरुषांच्या राक्षसी वासनेबद्दल बोलणं हे ठरलेलंच आहे.. नव्हे.. आता तर तो एक पॅटर्न बनत चाललाय! आणि त्यामुळेच की काय, पण सिक्वेलसारख्याच अशा गोष्टी कानांवर पडताहेत, डोळ्यांसमोर दिसताहेत.. ही तर टोकाची उदाहरणं. पण संवेदनाशून्य माणसांकडून घडणाऱ्या ‘इव्ह टििझग’ प्रकारातून आजूबाजूची जवळपास प्रत्येक मुलगी जातेय.. कट्टय़ावर बिनधास्तपणे शिव्या फेकणाऱ्या मुलीसुद्धा या साऱ्याला अपवाद नाहीयेत! जागरूक राहून स्वतच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणाऱ्या मुलींनाही असुरक्षित वाटतेय आणि इथेच या साऱ्याची सुरुवात होतेय.
खरंतर आज या घडीला आपल्या देशात इव्ह टििझगबाबतचे कायदे अस्तित्वात आहेत. महिलांच्या सुरक्षिततेबाबत अनेक हेल्पलाइन्स आहेत. एवढंच काय, पण अ‍ॅन्ड्रॉइडवरचे अनेक अ‍ॅप्सदेखील खास त्यांच्या सुरक्षिततेसाठी बनवण्यात आले आहेत. पण एक मुलगी म्हणून या सगळ्यांकडे डोळसपणे पाहताना मात्र या साऱ्याची अपूर्णता प्रकर्षांने जाणवतेय. मुळातच इव्ह टििझग ही गोष्ट फक्त शारीरिक अत्याचार किंवा विनयभंगाशी जोडली गेलेली नाहीये. त्यात पुरुषांकडून किंवा मुलांकडून केली जाणारी टिंगल-टवाळी, अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट्स आणि अगदी एखाद्या पुरुषाचं हेतुपूर्वक बघणं याचाही समावेश आहे. याबद्दल बोलताना अस्मिता म्हणाली की, त्या नजरेला तर तुम्ही रोखूच शकत नाही आणि त्या विरुद्ध काही करूही शकत नाही. गर्दीतून प्रवास करणाऱ्या मुलींना तर विचारावे तितके अनुभव कमीच असतात. कामाला जायला निघालेलो असताना दादरसारख्या स्टेशनवर ‘पीक टाईम’ मध्ये गर्दीत अनेक प्रकार घडतात. नको तेवढे धक्के असतात, स्पर्श असतात. बरं मागे वळून कोण आहे ते बघावं तर तोपर्यंत ती व्यक्ती कोण, कुठे गेली सगळं सगळंच नष्ट झालेलं असतं. या साऱ्याला रोखणं तर शक्य नाहीच आहे, पण त्या विरुद्ध आवाज उठवणंही कधी कधी अशक्य होऊन जातं. काही काही वेळेस मात्र असा आवाज मुलींकडून उठवलाही जातो. असाच प्रसंग फेस केलेली अपूर्वा म्हणते की, बसमधून प्रवास करताना तर कित्येक अनुभव येतात. अगदी सीटवर बसलेलो असतानाही नको तेवढे प्रकार घडतात आणि या प्रकारातून सगळ्याच वयोगटाच्या मुली आणि स्त्रिया असतात. १४- १५ वर्षांच्या मुलीही यातून सुटत नाहीतच. कधी तरी आवाज उठवल्यावर त्या काळापुरतं सगळं थांबतं, पण त्यानंतर दुसऱ्या कुठल्या तरी मुलीबाबत यांचं पुन्हा ‘जैसे थे!’ चालूच असतं, असंही अपूर्वा म्हणाली.
मुळात रोखण्यासारख्या गोष्टींना विरोध करून काही काळापुरतं तरी त्यापासून वाचता येतं. पण अजाणत्या वयातल्या काही मुलींना तर आपल्यासोबत काय होतंय याचीदेखील कल्पना नसते आणि शिवाय काही बाबतीत असे प्रकार जवळच्या नातेवाईकांकडून घडत असल्यामुळे तर याबाबत ‘बोलणं’ म्हणजे त्यांच्यासाठी बंदच झालेलं असतं. या सगळ्याचा मानसिक पातळीवर होणारा त्रासही वेगळाच असतो.
बरं या गोष्टी एवढय़ावरच थांबत नाहीत. त्यात समावेश असतो तो आजकाल फेसबुक किंवा इतर सोशल नेटवìकग साईट्सवरून केल्या जाणाऱ्या कमेंट्सचा.
सोशल नेटवìकग साईट्सच्या याच प्रकाराला बळी पडल्याची उदाहरणंही आपल्याच आजूबाजूला दिसताहेत. एकटय़ानं रस्त्यावरून चालत असलेल्या किंवा एकटीच कशाला तिच्यासोबत तिची मत्रीण किंवा बहीणही असेल तरीसुद्धा अशा मुलींवर होणाऱ्या कमेंट्ससुद्धा ‘इव्ह टििझग’चाच भाग आहेत. कधी कधी कुठल्या मुलीला ते सारं इग्नोअर करणं जमतं; पण ते न जमणाऱ्या मुलीची मात्र मानसिक आणि भावनिक कुचंबणा होत राहते. सध्या भुवनेश्वरला राहणाऱ्या ऐश्वर्याने तिचा अनुभव सांगितला. एकदा संध्याकाळी ७ च्या सुमारास रिक्षाने प्रवास करताना शेजारी बसलेल्या पुरुषाकडून तिला वाईट अनुभव येत होता. त्यावेळी ती त्या पुरुषाविरुद्ध बोललीदेखील. पण त्या पुरुषाने इतरांना तिकडच्याच बोलीभाषेत ‘ती माझी मुलगी आहे’ असं खोटं सांगितलं. आणि तिकडची बोलीभाषा ज्ञात नसलेली ऐश्वर्या यावर काहीच करू शकली नाही. त्यानंतर दुसऱ्या एका बाईंनी तिला झाला प्रकार सांगितला तेव्हा तिला कळलं. पण थोडक्यात हे असे कितीतरी प्रकार सतत प्रत्येक मुलीच्या बाबतीत घडत असतातच.
रस्त्याने चालत असताना बाईकवरून रस्ता अडवण्याचे प्रकारही सर्रास घडत असतात. एका मत्रिणीला तर असंच एका गाडीने रस्ता अडवून सरळ गाडीत बसण्यासाठी जबरदस्ती केली होती. फक्त दैव बलवत्तर म्हणून ती मुलगी तिथून पळ काढू शकली. अजून एका मत्रिणीला आलेला अनुभव तर याहूनही वाईट होता. थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी अंधारात ७ च्या क्लासला जाताना, क्लासच्याच एका गल्लीत एक पुरुष नको तो भाग दाखवून जवळ येण्याची खूण करत होता. पण तिनेही त्यातून स्वतची सुटका करून घेतली.
स्त्री-पुरुषांमधल्या या नाजूक गोष्टीला मिळत असलेलं विकृतीकरण आम्हा मुलींना या सर्वाबाबत आणि मुळातच पुरुष जातीबद्दल नको असलेली घृणा निर्माण करतंय. या साऱ्यातून होणाऱ्या मानसिक त्रासातून आजूबाजूला नाते-संबंधात असणाऱ्या पुरुषांबद्दल, मुलांबद्दल आणि मित्रांसोबतसुद्धा कधी कधी एक प्रकारची कटुता निर्माण होते. या बाबतचे कायदेही अस्तित्वात आहेत, पण फार कमी मुली त्याबद्दल जागरूक आहेत. पण कित्येक मुलींच्या म्हणण्यानुसार यातले काही प्रकार तर रोखण्याच्या पलीकडचे असतात आणि ‘व्यक्तिस्वातंत्र्य’नामक घटकाच्या आड येणारे असतात. त्यामुळे त्याविरुद्ध काही बोलणं शक्यही नसतं. त्यामुळे सहन करण्यापलीकडे दुसरा मार्गही नसतो. निदान समस्त पुरुष जातीने त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या आई, बहीण, पत्नी, मुलगी या स्त्रियांचा विचार करून, समोरच्या मुलीचा किंवा स्त्रीचा आदर बाळगायला सुरुवात केली, तर काही अंशी तरी हे प्रकार थांबायला नक्कीच मदत होईल.इव्ह टीजिंगबाबात मुलींना बोलतं केलं, त्या वेळी त्यांच्याकडून अनेक अनुभव ऐकायला मिळाले. जवळपास प्रत्येक मुलीला गर्दीच्या ठिकाणी असे अनुभव आलेले असल्याचे समजले. असा वाईट अनुभव आल्यावर काय करतात, मोलेस्टेशन, इव्ह टीजिंग याबाबत त्यांना काय वाटतं, त्या कशा रिअ‍ॅक्ट होतात, हे त्यांनी मोकळेपणाने सांगितलं. त्यातील काही अनुभव त्यांच्याच शब्दांत.. शब्दांकन : अनुश्री फडणीस

डॉली पाटील
बऱ्याच वेळा गर्दीच्या ठिकाणी पुरुषांकडून वाईट वर्तवणुकीचे अनुभव येतात. रिक्षातून प्रवास करीत असताना जर शेअर रिक्षा असेल तर बाजूला मुलगी आहे पाहून काही माणसं त्याचा गरफायदा घेतात. स्टेशनवर गर्दीच्या वेळेस उगाच धक्का मारून पुढे जाणं, वाईट नजरेने पाहणं हे आता पुरुषांकडून येणारे रोजचेच अनुभव झाले आहेत. अशा वेळी मी नक्कीच त्यांच्या वागणुकीला प्रतिकार करायचा प्रयत्न करते. मला वाटतं हा प्रतिकार प्रत्येक मुलीने न डगमगता करायलाच पाहिजे.

सायली गुप्ते
निर्भया प्रकरण असो किंवा तरुण तेजपाल.. अशा या दिवसेंदिवस उघड होत जाणाऱ्या बातम्यांनी स्त्री आज किती सुरक्षित आहेत याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. दिवसभराच्या रुटीन लाइफमध्येही पुरुषांकडून अतिशय वाईट अनुभव येतात. एकदा मी मुलुंड स्टेशनवरून जात असताना एक माणूस फार असभ्यतेने स्टेशनवर मुलींकडे पाहत होता आणि वागत होता. तो सगळा प्रकार पाहून मला खूप चीड आली. मी क्षणाचाही विलंब न करता जाऊन त्याची कॉलर पकडली आणि त्याच्या थोबाडीत वाजवून त्याला चार शब्द सुनावून आले. काही दिवस मुलुंड स्टेशनला दिसणारा हा माणूस त्या प्रकारानंतर पुन्हा कधीच दिसला नाही.

सुकन्या चोबे
मला रोज ठाण्यावरून प्रवास करावा लागतो. केव्हाही गेले तरी ठाण्याला भयंकर गर्दी असते. एक गाडी आल्यावर सगळा ब्रिज भरून जातो. एकदा मी ब्रिज चढत असताना अशीच गर्दी झाली. त्या गर्दीचा गरफायदा घेत एका माणसाने मला मागून धक्का देण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या अंगाला स्पर्श करण्याचाही प्रयत्न तो करीत होता. एवढय़ात मी मागे वळून त्याला काही बोलणार त्या क्षणी तो पळून गेला.

प्रिया कदम
एकदा मी आणि माझ्या मत्रिणीने धावत धावत ट्रेन पकडली आणि आम्ही चुकून जेन्ट्स कम्पार्टमेंटमध्ये चढलो. त्या ट्रेनमधला जेमतेम अर्धा तास माझ्यासाठी जीवघेणा होता. मला सगळ्या पुरुषांनी इतकं घेरून टाकलं की, ट्रेनमध्ये नीट उभं राहायलाही मिळालं नाही. प्रत्येक जण त्या गर्दीचा नको तेवढा गरफायदा घेत होता. मी ओरडून ओरडून त्यांना विनंती करीत होते की मला आत जाऊ द्या; पण कोणीच माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि मी मधल्या मध्ये अडकून राहिले. त्या वेळेस एकाही पुरुषाने सभ्यपणा दाखवला नाही. मी ओरडून ओरडून थकून गेले. मला जितका प्रतिकार करणं शक्य होतं तेवढा मी केला; परंतु मी हेल्पलेस होते. ज्या वेळेस मी उतरले तेव्हा मी अक्षरश: रडायला लागले. तेव्हापासून मी ठरवलं की कधीच गप्प बसून राहायचं नाही. आता मला असा अनुभव आला तरीही मी यापेक्षा दुप्पट प्रतिकाराने समोरच्याला अद्दल घडवते. प्रत्येक मुलीने सक्षम होऊन आवाज उठवलाच पाहिजे.  

Story img Loader