|| नूपुर काळे

पदवीनंतरचं ऑप्शनल पीरिएड ट्रेनिंग सध्या मी घेते आहे. परवा सहकाऱ्यांशी बोलता बोलता माझ्या शिक्षणाचा विषय निघाला. त्यांना थोडक्यात माहिती सांगून मी माझ्या कामाकडे वळले. तरी डोळ्यांपुढे गेल्या काही वर्षांतील घटनांचा कॅलिडोस्कोप दिसू लागला. नाशिकच्या ‘संदीप फाऊंडेशन’मधून ‘बॅचलर्स ऑफ फार्मसी’ केलं. दुसऱ्या वर्षांला असताना मनाशी ठरवलं की, पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जावं. कारण आपली शिक्षणपद्धती आणि प्राध्यापकांच्या शिकवण्याचा अनुभव फारसा चांगला नव्हता. शिवाय शिकता शिकता परदेशातल्या कामाचा अनुभवही घ्यायची इच्छा होती.

परदेशी शिकायला जायचं म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या-सरळ असतात असं नाही. युरोपमध्ये जायचं तर भाषा, व्हिसासह आर्थिक गणितांचा प्रश्न होता. ऑस्ट्रेलियातील माझ्या विषयाचं शिक्षण क्षेत्र तितकंसं जोरकस नव्हतं. कॅनडामधली थंडी सहन झाली नसती, असं तेव्हा वाटलं होतं. अमेरिकेत गेल्यास तिथे काका मदतीला होता. त्यामुळे अमेरिकेत जायचा पर्याय निवडला. तिथे जाण्यासाठी आवश्यक त्या परीक्षांची माहिती काढून त्याचा अभ्यास करायला लागले. पुढचा टप्पा होता अभ्यासक्रम निवडीचा. तेव्हा लक्षात आलं की, पदवी महाविद्यालयातील चौथ्या वर्षांच्या अभ्यासक्रमात ‘रेग्युलेटरी अफेअर्स’ हा धडा होता. त्यात फार्मास्युटिकल कंपन्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा मुद्दा केवळ एका धडय़ात गुंडाळण्यात आला होता. भारतात या विषयाचे अभ्यासक्रम असणारी महाविद्यालये फारशी नव्हती. काही जणांशी बोलल्यावर भारतातील या क्षेत्राचं स्वरूप ढोबळमानाने लक्षात आलं आणि परदेशी शिकायला जाण्यावर शिक्कामोर्तब झालं.

अमेरिकेतील ‘नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी’ ही रेग्युलेटरी अफेअर्स या विषयासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिथेच अर्ज केला होता. यू.एस.ए. एफडीए ही जगभरातील सर्वात मोठी रेग्युलेटरी संस्था आहे. तिथल्या पेटंट आणि इंडस्ट्रीचे काही विभाग भारतातही आहेत. भारतात उऊरउड असूनही यू.एस.ए. एफडीएचं एक कार्यालय भारतात आहे. बहुतांशी वेळा यू.एस.ए. एफडीए नवीन नियम करते आणि त्याआधारे इतर देशांतील नियम तयार केले जातात. हा विषय शिकल्यावर मेडिकल डिव्हाइस फिल्ड आणि जेनेटिक्स हे पर्यायही माझ्याकडे असणार होते. ठरावीक चौकटीपलीकडे जाता येईल अशी एक शक्यता होती. त्यानंतर मुलाखत, व्हिसा प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता या गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या. मला ‘मास्टर ऑफ सायन्स इन रेग्युलेटरी अफेअर्स फॉर ड्रग्ज, बायॉलॉजिक्स अँड मेडिकल डिव्हाइसेस’ या अभ्यासक्रमासाठी नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला.

या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात क्लिनिकल रिसर्च रेग्युलेटरी अफेअर्स, जनरल आणि इंटरनॅशनल रेग्युलेटरी अफेअर्स, ऑपरेशनल आणि स्ट्रॅटेजिक रेग्युलेटरी अफेअर्स, मेडिकल डिव्हाइस रेग्युलेटरी अफेअर्स वगैरेंविषयी शिकवलं जातं. होमसिकनेसचा विचार न करता आपलं ध्येय गाठायचंच, असं मी मनाशी पक्कंकेलं. लेक्चर्स आठवडय़ातून दोन दिवस असतात. प्राध्यापक कधीच ‘अभ्यास करा’ असं विद्यार्थ्यांच्या मागे लागत नाहीत. विद्यार्थी पुरेसे जबाबदार आहेत, हे गृहीत धरलं जातं. ठरावीक साच्यात न शिकवता विद्यार्थ्यांना थिअरीएवढीच प्रॅक्टिकलचीही माहिती होण्यासाठी लेक्चर्सव्यतिरिक्तच्या वेळेचा सदुपयोग करणं अपेक्षित असतं. करिअरचे अनेक पर्याय दाखवले जातात. ते चाचपत विद्यार्थी आपापली दिशा शोधून काढू शकतात. तज्ज्ञांचे ब्लॉग- पेपर्स- लेख- संशोधन वाचणं आणि अभ्यासणं या गोष्टी कराव्या लागतात. त्यातून इंडस्ट्रीतील घडामोडी कळतात. हळूहळू हे करताना त्याची अधिकाधिक गोडी लागते. एक प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धाच असते.

आमचे प्राध्यापक हे इंडस्ट्रीत काम करणारे तज्ज्ञ असल्याने या क्षेत्रातील अपडेट्स आम्हाला मिळायचे. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या असाईनमेंट्समुळे आम्हाला अनेक विषयांचा गाभा कळायचा. इथे कॉपी-पेस्ट संस्कृतीला थारा नाही. असाईनमेंट करायला आठवडा लागायचाच. असाईनमेंट एका दिवसात पूर्ण होणं शक्य नव्हतं. काही ग्रुप प्रोजेक्ट आणि काही वैयक्तिक प्रोजेक्ट्सही असायचे. १२ आठवडय़ांचा एक कोर्स असायचा. वर्गात १५-२० विद्यार्थीच असायचे. प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष द्यायचे. एका प्रोजेक्टमध्ये माझे पाच गुण कापले होते. त्यांच्याशी बोलल्यावर कळलं की, आमच्या प्रोजेक्टमधला फॉर्म समान आहे म्हणून नव्हे तर माझं व्याकरण चुकलं आहे, म्हणून गुण कापले आहेत. असाईनमेंट किंवा प्रोजेक्टच्या कोणत्याही विषयाची माहितीपुस्तके नेटवर उपलब्ध असतात. त्यामुळे त्या माहितीला नव्हे तर गुण दिले जातात ते विद्यार्थ्यांनी केलेल्या विश्लेषणाला. युरोपमधल्या नियमांबद्दलच्या माझ्या विश्लेषणाला चांगले गुण मिळाले होते. ईमेलच्या माध्यमाद्वारे प्राध्यापकांशी संपर्क साधून संवाद कायम ठेवला तर त्यांचं यथायोग्य मार्गदर्शन लाभतं.

शिकागोमध्ये सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी कॅनबस कंपनीत मला नोकरी मिळाली होती. मी काम मिळालं म्हणून एक्साइट होते, तितकीच थोडी दुविधेत होते. कारण गांजा तयार करणाऱ्या कंपनीशी संबंधित काम केल्यामुळे व्हिसा किंवा करिअरच्या दृष्टीने विचार करता काही अडीअडचणी येणार नाहीत ना, हा प्रश्न मला पडला होता. माझ्या प्राध्यापकांना सल्ला विचारला. त्यांनी माझ्याशी चर्चा करून शास्त्रीय माहिती देणारे काही पेपर्स वाचायला दिले. त्या पेपर्समध्ये या विषयाच्या दोन्ही बाजू उलगडलेल्या होत्या. त्यावर मी सारासार विचार केला आणि ते काम स्वीकारलं. तिथे मी रेग्युलेटरी टेक्निकल रायटर होते. मला फूड रेग्युलेशनसह अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. नंतर ‘बॅक्स्टर हेल्थ केअर’मध्ये इंटर्नशिप केली. इंटर्नशिपसाठीच्या मुलाखतींची तयारी असो, रेझ्युमे लिहिणं असो किंवा नोकरी शोधणं असो आदी गोष्टींची तयारी विद्यापीठात आमच्याकडून वेळीवेळी होणाऱ्या इव्हेंटमधून करून घेतली गेली. इथे माझ्याआधी काम करणाऱ्या ज्या होत्या त्या सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट होत्या. या कामासाठी किमान पाच वर्षांचा अनुभव लागतो. त्या गरोदरपणाच्या रजेवर गेल्या होत्या. त्यांच्या गैरहजेरीत कंपनीच्या २३ देशांमधील उत्पादनांच्या रेग्युलेशनवर देखरेख करणं हे माझं काम होतं. हा सगळा डोलारा सांभाळण्याचा चांगला अनुभव माझ्या गाठीशी जमा झाला. कॅलिफोर्नियामध्ये गेले सहा महिने मी मेट्रॉनिक या मेडिकल डिव्हाइस कंपनीत न्युरो व्हस्युलर विभागात रेग्युलेटरी स्पेशालिस्ट असून त्यातही लेबलिंगची स्पेशालिस्ट आहे.

अभ्यासक्रमातलं साधारणपणे पहिलं वर्ष आम्ही सगळ्यांनी खूपच एन्जॉय केलं. नंतर आमची इंटर्नशिप सुरू झाली. माझे रूममेट्स भारतीय होते. वर्गात विविध देशांतले विद्यार्थी होते. त्यामुळे विविध संस्कृतींची आणि खाद्यजगताची तोंडओळख झाली. विद्यापीठात सतत मोठय़ा प्रमाणात त्या त्या देशांच्या सणावारांचे सेलिब्रेशन केले जाते. आम्ही सहा जणी रूममेट होतो. काही वेळा या मैत्रिणी असतात आणि कधी नसतातही. कधी रात्रभर गप्पा व्हायच्या तर कधी लुटुपुटुची भांडणं व्हायची. कधी प्रत्येकीच्या टाइमटेबलमधल्या फरकामुळे एकमेकींचे तोंडही बघायला मिळायचं नाही. खाद्यपदार्थ अनेकदा एकत्र मागवले जायचे. विद्यापीठाचं ग्रंथालय रात्रभर सुरू असायचं. आम्ही सकाळी जायचो ते थेट रात्री घरी परतायचो. शिवाय कॅम्पसवर सतत काही ना काही अ‍ॅक्टिव्हिटीज सुरू असायच्या. गेम्स खेळायचो. समरसेलमध्ये धमाल करायचो. मी वर्षभर ऑनकॅम्पस रेसिडेन्शिअल सेफ्टी ऑफिसर म्हणून नोकरी करत होते. विद्यापीठासाठी वेगळं पोलीस डिपार्टमेंट होतं. काहीही झालं तर मला थेट त्यांच्याशी संपर्क साधता यायचा. या कामाचा चांगला अनुभव मिळाला आणि पगारही मिळाला.

भारतात आईला स्वयंपाकात थोडीशीच मदत करायचे. इथे येऊ न चांगला स्वयंपाक यायला लागला. त्यासाठी आईला केलेले फोन आणि यूटय़ूब या दोन्ही गोष्टींची मदत झाली. इथल्या फिटनेसप्रेमी लोकांमुळे आरोग्याचं महत्त्व कळलं. मी विद्यापीठाच्या जिममध्ये झुम्बा क्लासला जायचे. वॉकला जायचे. आम्ही शहरात फेरफटका मारायचो. इथलं वातावरण खूपच सुरक्षित आहे. याआधी फारसा प्रवास केला नव्हता. आता एकटीने बिनधास्त प्रवास करते. प्रवास असो किंवा एकटीने घरं बदलणं असो, हा आत्मविश्वास इथे आल्यावर कमावला. आईचा पैसे वाचवण्याचा एक दृष्टिकोन इथे आल्यावर कळल्याने तो अमलात आणला. पदवीदान समारंभाच्या वेळी आलेल्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला भरून पावल्यासारखं वाटलं.. तिची काळजी कमी झाली होती. आता माझा ऑप्शनल पीरिएड ट्रेनिंगचा काळ पूर्ण करणार आहे. इथे किंवा भारतात कामाची चांगली संधी मिळाली तर तिचा स्वीकार करीन. मला पीएच.डी. करायची आहे. अमेरिकेत रेग्युलेटरी सायन्समध्ये पीएच.डी. पदवीचा अभ्यासक्रम असणारे ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ हे एकच विद्यापीठ आहे. पुढे स्वकमाईवर पीएच.डी. करायचा विचार आहे. हा ध्यास साध्य होण्यासाठी धडपड सुरू आहे. विश मी लक!

कानमंत्र

  • वाचाल तर वाचाल.
  • आपलं ध्येय गाठण्यासाठी घेतलेली जिवापाड मेहनत आणि प्रामाणिकपणा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com