|| अश्विनी सूर्यवंशी
हाय फ्रेण्ड्स! म्हटलं तर प्रत्येकाच्या आयुष्याची एक गोष्ट असते. त्याच चालीवर माझ्या गोष्टीतले काही अनुभवरंग तुमच्याशी शेअर करते आहे. माझा दादा अमेरिकेत नोकरी करतो. महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षांपासून परदेशात जाऊन शिकण्यासाठी बाबा माझ्या मागे लागले होते. तेव्हा मला उच्चशिक्षण घेण्यात रस वाटत नव्हता. डोंबिवलीत आमच्या स्वयंसेवी संस्थेचं काम चांगलं सुरू होतं. या संस्थेच्या जन्माची गोष्ट माझ्या ब्लॉगवर वाचता येईल. संस्थेचं काम सोडून मला कुठंही जायचं नव्हतं. तसं बाबांना सांगितलंही. अंधेरीच्या ‘सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’मधून मी बी. टेक (इलेक्ट्रिकल इंजिनीअर) झाले. ही पदवी मिळाल्यानंतर वाटलं की, आपण पुढे शिकायला हवं. मग एक दिवस जीआरईचा अभ्यास सुरू केला. दुसरीकडे नाशिकच्या ‘योग विद्या धाम’मधून ‘बॅचलर्स इन योगा’चं शिक्षणही घेत होते. ती परीक्षा तेव्हा व्हायची होती. त्यामुळे त्या वर्षभरात तो अभ्यास आणि जीआरई वगैरे परीक्षांची तयारी करत होते.
दोन मित्र आणि दादामुळे बोस्टनच्या ‘नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी’ची माहिती मिळाली. शिवाय त्या त्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून मी माहिती काढत होते. अर्ज केलेल्या सहा विद्यापीठांमध्ये अर्ज मंजूर झाला. खरं तर ‘युनिव्हर्सिटी ऑफ सर्दन कॅलिफोर्निया’मध्ये जायची माझी इच्छा होती. पण त्यांचा होकार उशिरा आला. पुढच्या प्रक्रिया होऊन अभ्यासक्रम सुरू व्हायला सहा महिने लागणार होते. बाकीची विद्यापीठेही चांगली होती. त्यामुळे थोडीशी द्विधा मन:स्थिती झाली. विद्यापीठ निवडताना शहर, हवामान, परिचितांचं वर्तुळ, राहायची व्यवस्था, शिष्यवृत्ती आदी अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतात. त्या अभ्यासक्रमामुळे व्यावसायिक- वैयक्तिक विकास होणार आहे का, हेही तपासावं लागतं. इथलं राहणीमान अतिशय खर्चीक आहे. मात्र मला शिष्यवृत्ती मिळणार असल्याने फीचा खर्च कमी होणार होता. विद्यापीठाच्या ‘हेल्थकेअर सिस्टीम’मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून इंटर्नशिपचा अनुभव मिळणार होता. त्यामुळे ‘नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी’मध्ये ‘मास्टर्स इन इंजिनीअरिंग मॅनेजमेंट’च्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.
अभ्यासक्रम सुरू व्हायच्या जवळपास पंचवीस दिवस आधी इथे पोहोचले. हा माझा पहिलाच परदेशप्रवास. सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. माझी कायमची राहायची व्यवस्था दुसरीकडे होणार असल्याने काही दिवस दुसऱ्या ठिकाणी राहिले. मी राहते तो विद्यापीठांचा आणि विद्यार्थीबहुल भाग आहे. सुरुवातीच्या काळात थोडी एक्साईटमेंट होती. खूप गोष्टी एक्स्प्लोर करायच्या होत्या. स्थिरावणं थोडं कठीण गेलं. काही गोष्टी मिस करत होते- उदाहरणार्थ नाक्यावरच्या वडापावपासून ते मित्रमंडळींसोबतच्या मनसोक्त गप्पांपर्यंत. अनेकांना अगदीच हास्यास्पद वाटेल, पण आपल्याकडच्या रिक्षावाल्यांनाही मिस केलं. इथे उबर बुक करावी लागते. असो. काही काळ सतत डॉलर्स-रुपयांचा हिशोब आणि मग होणारी काटकसर या गोष्टीही होत्याच. योगवर्ग सुरू व्हायला महिन्याभराचा अवधी होता. आम्हाला ठरावीक तास काम करायला मुभा असते. म्हणून मी ऑनकॅम्पस ग्रोसरी स्टोअरमध्ये कॅशिअर म्हणून नोकरी केली.
थोडीशी स्थिरावते तोच पुन्हा घर बदललं होतं. घर लावण्यात थोडा काळ गेलाच. माझ्या बऱ्याच अॅक्टिव्हिटीज एकाच वेळी सुरू होत्या. इन्स्टावर योगक्लासची माहिती अपडेट केली. लगेच सुरू झालेल्या इथल्या गणेशोत्सवाच्या महाआरतीत झकास साडी नेसून सहभागी झाले होते. तो महिना अगदी धावपळीचाच गेला. मी महाविद्यालयातील फ्लॅशमॉबमध्ये भाग घेतला होता. भारतीय विद्यार्थ्यांच्या ‘एनयू संस्कृती’तर्फे या फ्लॅशमॉबचं आयोजन करण्यात आलं होतं. नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी असणाऱ्या या कार्यक्रमात मी सहभागी होणं, खरं तर अपेक्षित नव्हतं. पण त्यांच्याही लक्षात आलं नाही की, मी नवीन आहे. त्यांना मी सीनिअर बॅचमधली वाटले होते. ही सगळी धावपळ संपल्यावर लक्षात आलं की, आपण वर्गात बसलो आहोत खरे, पण अभ्यास करण्याची आपली मानसिक तयारीच झालेली नाही. वर्गातील अनेकांनी किमान काही वाचन- अभ्यास केलेला जाणवत होता. त्या दीड तासाच्या व्याख्यानात प्राध्यापकांचं शिकवणं डोक्यावरून जात होतं. हा ‘जोर का धक्का’ नीट धिरानं पचवून मी नेटाने अभ्यासाला लागायचं ठरवलं. नंतरचे चार महिने जोमानं अभ्यास केला. ढेरसाऱ्या असाईनमेंट वगैरे. चांगल्या अभ्यासामुळे अर्थात ‘ए’ श्रेणी मिळाली. दर वीकएण्डला कुठे ना कुठे फिरस्तीला बाहेर पडत होते आणि आता दोन वर्षांनंतरही ते कायम आहे.
हा अभ्यासक्रम आम्ही आमच्या आवडीने निवडला आहे. त्यामुळे शिकण्याच्या मानसिकतेत नक्कीच फरक पडतो. उच्च दर्जाचं शिक्षण मिळतं आहे म्हटल्यावर तितकाच तगडा अभ्यास करणं अपेक्षित असतं. अभ्यासात सातत्य ठेवावं लागतं, अशीच या अभ्यासक्रमाची पद्धत आहे. प्रत्येकाला आपापल्या असाईनमेंटवर विचार करावा लागतो. शिवाय काही ग्रुप असाईनमेंट- प्रेझेंटेशन असतात. काही वेळा परीक्षाही नसते एखाद्या कोर्समध्ये. एक कोर्स पूर्णपणे ऑनलाइनच होता. प्राध्यापक आमच्या शंका- प्रश्नांना त्वरित उत्तरं देतात. आमचे प्राध्यापक भारत, इराण, नेपाळ आदी देशांमधले असून त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींतही बदल आहेत. काही प्राध्यापक गेम्सच्या साहाय्याने हसतखेळत शिकवतात तर एखादे फक्त पुस्तक वाचूनच शिकवतात. मात्र केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष व्यवहारात या ज्ञानाचा कसा उपयोग करता येईल, ते शिकवलं जातं. या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींच्या व्याख्यानांचा आम्हाला लाभ घेता येतो. मी जवळपास २६३ योगासनांचे वर्ग घेतले. त्याचा अंदाजे अडीच हजार लोकांनी लाभ घेतला. त्यातले पाच जण योग प्रशिक्षक झाले. यंदा आम्ही योग दिवसाच्या निमित्ताने मोठा इव्हेंट आयोजित केला होता. मी सहा तास आमच्या बॅचना योगासनं शिकवली. योगविषयक चर्चासत्र आणि प्रश्नोत्तरांचा तासही झाला.
पहिल्या सेमिस्टरमधल्या दोन कोर्सेसना बहुसंख्य भारतीय विद्यार्थी होते. त्यांच्याशी चटकन कनेक्ट झाले. दुसऱ्या सेमिस्टरच्या कोर्सना जपान, चीन, थायलंड आदी देशांसह भारतीय विद्यार्थीही होते. आमचं बरंच काम- अभ्यास ऑनलाइन चालतो. दर आठवडय़ाला मीटिंग्ज असतात. त्यादरम्यान जाणवलेली गोष्ट म्हणजे एखाद्या संस्कृतीत एखादी गोष्ट खूप अनौपचारिक असेल तर दुसऱ्या संस्कृतीत ती खूप उद्धटपणाची वाटू शकते. हे आतापर्यंत वाचलं- ऐकलं होतं. पण इथे तो अनुभवही घेतला. काही वेळा मला ते जाणवल्यावर मी प्राध्यापकांना तसा ईमेल करायचे. त्यावर त्या मला दोन संस्कृतींमधला फरक नीट समजावून सांगायच्या. आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. पण कधी तरी थोडंसं नैराश्य जाणवतं. घरी जावंसं वाटतं. भारतात मी खूपच अॅक्टिव्ह होते. दोन पदव्या मिळवल्या. पण या सगळ्यात खंबीरपणे माझी आई माझ्या पाठीशी उभी होती. घरात मी काडीचंही काम करायचे नाही. पण इथे आल्यावर स्वावलंबनाचे धडे गिरवले. काही वेळा अभ्यासात इतकं गढून जायला होतं की स्वयंपाक करायला, घरकामाला वेळच उरत नाही. बौद्धिक थकवा जाणवतो. गेली दोन वर्ष ऑन कॅम्पस दोन मैत्रिणींसोबत रूम शेअर करते आहे. आम्ही सगळ्या जणी तारेवरची कसरत करत आहोत. इथल्या संस्कृतीत स्वत:ला स्थिरावताना आणि त्याच वेळी आपली संस्कृती जपायची हे तत्त्व लक्षात ठेवायला हवं. मी एकटी बिनधास्तपणे फिरायला जाते. न्यूहॅम्पशायरमधल्या डोंगररांगा, निसर्गसौंदर्य मस्त आहे. गिर्यारोहणासाठी ही भारी जागा आहे. तसे तिथे माहितीफलक, दिशादर्शक वगैरे असतात, तरीही गिर्यारोहण करताना गुलाबी रिबिनी झाडांना बांधत चढाई करायची माझी सवय आहे. हा तुलनेने अवघड चढ होता. अंधार पडत होता. डोक्यात नाना विचार येऊ न त्याचा पार भुगा झाला होता. फोनची बॅटरी लो होती. तशात फोनला बिलकुलच रेंज नसल्याने संपर्काची शक्यता दूरवर नव्हती. मी व्यवस्थित घाबरले होते. चालता चालता पहिली गुलाबी रिबीन पाहिल्यावर हुश्श वाटलं. आपण रस्ता चुकलेलो नाही, हे कळल्याने आनंदातिरेकानं किंचाळलेच जवळपास. मेनट्रेलला आल्यावर पुण्याचा माझा खूप जुना मित्र भेटला अचानक. त्याने गाडीने मला घरी सोडलं.
व्यावसायिकदृष्टय़ा पाहिल्यास माझी चांगली प्रगती झाली आहे. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. वैयक्तिकदृष्टय़ा विचार केल्यास सुदैवाने माझा स्वभाव अद्यापही तसाच राहिला आहे. गेल्या वर्षी आईबाबा इथे येऊ न गेले. मी भारतात एकदा येऊ न गेले. घरची आठवण अधूनमधून येतच असते. मात्र समाजमाध्यमांमुळे गोष्टी सुकर झाल्या आहेत. इथे आले तेव्हा आपलं ध्येय साध्य करायचं आहे, स्वत:ला सिद्ध करायचं आहे, हेच डोक्यात होतं. त्यामुळे त्या नादात फारसं काही जाणवलं नाही. इथे प्रत्येकाचा अवकाश (स्पेस) जपली जाते. एक गोष्ट मी प्रकर्षांने मिस करते ती म्हणजे डोंबिवलीत असताना दर आठवडय़ाला आम्ही वृद्धाश्रम/ अनाथाश्रम/ गरिबांना मदत/ विशेष मुलांच्या संस्थांत जायचो. २०१३ मध्ये मी ‘इन्स्टा पेन्ट सोशल’ या स्वयंसेवी संस्थेचा श्रीगणेशा केला. सगळ्या गोष्टींची घडी नीट बसलेली होती. आता इथूनच स्काईप कॉलवर मी या भेटींना हजर राहते. इथे आल्यावर स्वयंसेवी काम करता येईल का, याची विचारणा केली. मात्र त्यासाठीच्या अटी-तटी खूपच कडक असल्याने तो विचार तितकाच राहिला. माझी शेवटची सेमिस्टर ऑगस्टमध्ये संपेल. त्यानंतर नोकरी करून आणखीन अनुभव घ्यायचा विचार आहे. त्यानंतर भारतात परत यायचा विचार आहे. बघा, माझ्या गोष्टीची तर आत्ताशी कुठे सुरुवात होते आहे..
कानमंत्र
- आपलं ध्येय निश्चित करून इतर गोष्टींनी विचलित न होता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा.
- कितीही भौतिक प्रगती साधली तरी चांगला माणूस होणं, हेही तितकंच गरजेचं आहे.
शब्दांकन – राधिका कुंटे
viva@expressindia.com