फटाके, आकाशकंदील, आतषबाजी, फराळ, मिठाई आणि कुटुंब- मित्रमैत्रिणींसोबत धमाल.. अशी दिवाळी तर आपण सगळेच साजरी करतो. पण सह्य़ाद्रीतील डोंगरबांधवांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या दिवशी हास्य फुलवण्यासाठी काही शहरी तरुण मित्रमैत्रिणी दरवर्षी मुद्दाम प्रयत्न करतात. त्यांच्या या ऑफबीट दिवाळी अनुभवाविषयी त्यांच्यात शब्दात..
तब्बल पंधरा गोण्या भरल्या होत्या, आयत्या वेळी आलेले सामान मिळून आणखीन आठ- दहा भल्या मोठय़ा पिशव्या. आम्ही केवळ दहाच जण आणि हे इतके सामान. शेवटची कसारा लोकल मुलुंडला गाठायची होती. सर्वाचीच धावपळ उडाली होती. लोकलच्या गार्डला एखाद मिनीट जास्त थांबण्याची विनंती करेपर्यंत सर्वानी सामान चढवलेदेखील. आता पुढे कसरत होती ती कसाऱ्याला दोन नंबर प्लटफॉर्मवरून तीन नंबर प्लटफॉर्मवर जीपपर्यंत नेण्याची. पण गार्डने ट्रेन साइिडगला गेल्यावर सामान उतरविण्याची परवानगी दिली आणि आणि दोन जिने पार करायचे वाचले. आता थेट कुमशेतपर्यंतचा सारा प्रवास जीपने. राजूर सोडले की मात्र केवळ गाडी जाते म्हणून रस्ता आहे.
ही सारी धडपड सुरू होती ती आमच्या डोंगरबांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे काही क्षण फुलविण्यासाठी, त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्यासाठी. आमच्यासारख्याच अनेक डोंगरमित्रांना ‘देण्यातला आनंद’ मिळवून देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. ‘ऑफबीट सह्य़ाद्री’ या आमच्या छोटय़ाशा संस्थेच्या जॉय ऑफ गििव्हगचे हे चौथे वर्ष. यंदा आमची दिवाळी होती कुमशेत आणि परिसरातील वाडय़ावस्त्यांमध्ये.
सह्य़ाद्रीच्या डोंगररांगात वसलेले घाटमाथ्यावरचे हे एक छोटेसे गाव. एकीकडे सह्य़ाद्रीतील सर्वोच्च शिखर कळसूबाईच्या भोवतालची डोंगररांग, तर दुसरीकडे थेट तीनचार हजार फूट खोल दरी. खाली जायचे तर घाट (पायवाटेने) उतरायचा आणि पुन्हा सामानसुमान घेऊन वर यायचे. गावाची वस्तीदेखील अगदीच आटोपशीर. जगण्याचे मुख्य साधन शेती आणि काहीबाही जंगली उत्पादने विकून मिळणारे चार पसे. दिवसातून केवळ एकच एसटी. तीदेखील रात्री मुक्कामाला येणार आणि सकाळी परत जाणारी. इतकाच काय तो गावाचा जगाशी संपर्क.
डोंगरात भटकायला लागल्यापासून सह्य़ाद्रीच्या अंतर्गत भागातील अशा दुर्गम परिस्थितीतील वाडय़ा-पाडय़ांचे, गावांचे हे वास्तव जाणवत होते. दोन वेळच्या जेवणाची मारमार असणारे हे गावकरी मात्र आम्हा डोंगरभटक्यांसाठी मात्र देवदूत असायचे. वाट चुकली, पाणी संपले, अशा एक ना दोन अनेक कामांत यांची हमखास मदत ठरलेली. दमूनभागून डोंगर ओलांडून यांच्या ओसरीवर दोन क्षण विसावले की हमखास न मागता थंडगार पाण्याचे तांबे मिळणार. भले त्यांना ते पाणी लांबवरच्या विहिरी, ओढय़ावरून आणावे लागत असो. कधी कधी तर जेवायचादेखील आग्रह व्हायचा. डोंगरात वाट दाखविणाऱ्या गावकऱ्याच्या पायातल्या तुटक्या चपला पाहिल्या की मात्र आमच्या पायातल्या खास ट्रेकिंग शूजची लाज वाटायची.
मनात यायचे कशी साजरी होत असेल यांची दिवाळी. शहरात पाण्यासारखा पसा वाहत असताना येथे मात्र सणासुदीलादेखील काहीच दिसत नाही. डोंगर भटकणाऱ्या आम्हा ऑफबीटर्सच्या मनात आले की यांची दिवाळी आपण साजरी करावी. गिरिजनांच्या डोळ्यांत किमान दिवाळीच्या दिवसात तरी आनंदाचे चार क्षण फुलवायाचे ठरले. आमच्यातील काही जण नुकतेच नोकरी करू लागले होते, तर काही अजूनही कॉलेजात जाणारे. गावकऱ्यांना दिवाळीचा आनंद द्यायचा तर काहीतरी ठोस मदत करणे अपेक्षित होते. मग ठरले, सगळ्या डोंगरमित्रांना आवाहन करायचे. प्रत्येकाची बांधीलकी होतीच, त्याला फक्त वाट दाखवून द्यायची होती.
यंदाचे हे आमचे चौथे वर्ष. पहिल्या वर्षी पनवेलजवळील प्रबळगड माचीवरील गावात केवळ फराळ वाटपाने सुरुवात झाली. नंतर सिद्धगड माचीवरील गावात लक्षात आले होते की या लोकांना थेट पसे खर्च करणे शक्य नाही. म्हणून कपडे, वह्य़ा, खेळणी अशा गोष्टींची वानवा आहे. मग मागील वर्षी या सर्व गोष्टी घेऊन माथेरानच्या डोंगरदऱ्यांत वसलेल्या उंबरणेवाडी येथे दिवाळी साजरी केली, तर या वर्षी कुमशेतमध्ये.
सकाळी ७.१५ ला आमच्या जीप गावात येऊन थडकल्या. पण येथे मात्र ना कोणत्या घरासमोर रांगोळी होती, ना आकाश कंदील लावला होता. गावातील मोठे तर सोडाच, लहानांच्या अंगावरदेखील चार नवी धडूतं नव्हती. खरेतर ही दिवाळीची सुरवात. शहरात तर आठ दिवस आधीपासूनच खरेदीची आणि सजावटीची धामधूम. आम्ही येणार असे बाळूदादाला आधी कळवूनदेखील कर्तीधर्ती माणसे गावात दिसत नव्हती. बाळूदादानेच सांगितले, ‘‘कसली दिवाळी, कसला दसरा. सण साजरे करायला पसे लागतात. इथे शेतात पिकते त्यावरच पोट चालते. वरकड पसा येणार कोठून. रोजगारासाठी घोटी, कसारा नाशिकला जावे तर त्याचेच ७० रुपये होतात. दोनशे रोजगार मिळणार, कसा सण साजरा करणार?’’
गावातील एकमेव छोटय़ाशा शाळेत आमचा मोर्चा हलविला. सारे सामान मांडून ठेवले. साधारण २०० फराळाची पाकिटे होती, तेवढय़ाच वह्य़ा आणि पेन-पेन्सिल. एक गोणी भरून लहान मुलांसाठी खेळणी. लोकांनी दिलेल्या जुन्या, पण चांगल्या स्थितीतील कपडय़ांनी तब्बल १२ गोण्या भरलेल्या. वयोगटाप्रमाणे सारे साहित्य मांडून ठेवले. गावकरी जमा होऊ लागले. आधी लहान मुलांना फराळ आणि कपडे वाटप केले. नंतर पुरुष आणि महिला. वयोवृद्धांसाठी खास वेगळा लॉट ठेवला होता. किमान दीडशे कुटुंबांना तरी पुरेल इतके सामान होते. सर्व वाटून झाल्यावर उरलेले सारे प्रत्येकाला हवे ते घेण्याची मुभा होती. सारे होईपर्यंत दुपार झाली. सूर्य आग ओकत होता. गेला आठवडाभर दमणूक प्रचंड झाली होती. ठाणे, मुंबई, पुणे अशा अनेक ठिकाणांहून साहित्य जमा केले होते. कोणी कपडे देत होते, तर कोणी रोख रक्कम. आज सारे वाटून झाल्यावर थकवा जाणवत होता. पण डोंगर वस्तीतील आमच्या सहोदरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मात्र सारा शीण कोठल्या कोठे पळाला होता. त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाने सारे श्रम विसरून गेले. एखादा डोंगर सर केल्याच्या आनंदाइतकाच किंबहुना काकणभर जास्त आनंद आज झाला होता.
ऑफबीट दिवाळी
फटाके, आकाशकंदील, आतषबाजी, फराळ, मिठाई आणि कुटुंब- मित्रमैत्रिणींसोबत धमाल.. अशी दिवाळी तर आपण सगळेच साजरी करतो. पण सह्य़ाद्रीतील डोंगरबांधवांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या दिवशी हास्य...
First published on: 08-11-2013 at 01:10 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Offbeat diwali