फेसबुकवरचं ‘कन्फेशन पेज’ सध्या तरुणाईमध्ये बरंच लोकप्रिय झालंय. या कन्फेशन पेजकडे मुलं काय नजरेनं पाहतात, त्याकडे कशी वळतात, हे सांगणारी ही पोस्ट. कदाचित आजच्या पिढीसाठी मनात दबून राहिलेल्या भावनांना मोकळं करण्याची ती एक वाट आहे असं वाटतं का?
त्या दिवशी काम करताना मूडच लागत नव्हता आणि सबमिशन र्अजट करायचं होतं. अशा वेळी का कोणास ठाऊक पण कीबोर्डवर फेसबुक हीच अक्षरं दिसत राहतात आणि मग त्या जाहिरातीच्या टॅगलाइनप्रमाणे, ‘जी ललचाये, रहा ना जाये’ अशी अवस्था होते आणि मी फेसबुकचं अकाऊंट उघडते. त्यादिवशी तसंच झालं. ‘फक्त पाच मिनिटं, पाचच मिनिटं,’ अशी मीच माझ्या मनाची समजूत घालत फेसबुक ओपन केलं. फेसबुकच्या वॉलवर प्रत्येकाने स्वत:च्या पराक्रमाचे पोवाडे गायले होते. कोणाच्या बर्थडेचे ‘सीसीडी’तले फोटो, कोणा नटीच्या आयटम साँगवर कोणा आंबटशौकिनाने दिलेले रिव्यूज, भारतीय अर्थव्यवस्था कशी सुधारू शकते यावर एका माननीय बेरोजगार तज्ज्ञाचे विचार आणि या सगळ्यातून वेळ मिळाल्यावर फेसबुकवरच शेती किंवा तत्सम उद्योग करणाऱ्यांची पार्टनरशिपची निमंत्रणं अशा बऱ्याच गोष्टींवर धावती नजर टाकत, लाइक, कमेंट्स करत भराभर पुढे जात होती. (मनातल्या मनात पाच मिनिटांची डेडलाइन सतरा वेळा मोडून झाली होती.)
अचानक एका पोस्टवर माझी नजर खिळली. तसं खास लक्ष जावं असं काही विशेष नव्हतं त्यात, उलट मोठा परिछेद होता. सहसा फोटोज, कॉमिक्स यांनी प्रत्येक जण स्वत:ची पोस्ट सजवण्याचा प्रयत्न फेसबुकवर करत असतो. त्यात इतका मोठा परिच्छेद लिहिण्याची कोणाला का इच्छा व्हावी आणि तो परिच्छेद इतर कोणी वाचेल याची त्याला इतकी खात्री कशी असू शकते याबद्दल माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. पण या सगळ्यापेक्षा जास्त कुतूहल त्या पोस्टच्या नावात होतं. ‘कन्फेशन व्हाया दिल्ली यंगस्टर’. त्या पोस्टमध्ये एका दिल्लीतील तरुणाने त्याच्या बरोबर घडलेला एक प्रसंग लिहिला होता. तो एका रात्री मित्राबरोबर मेट्रोमधून प्रवास करत होता. तेव्हा त्याच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि ती बेशुद्ध पडली. आजूबाजूला कोणीच नव्हतं. त्यांनी लगेच त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरू केले आणि जेव्हा तिचे नातेवाईक आले तेव्हा ते दोघे तिथून गुपचूप निघून गेले. या घटनेला काही दिवस लोटले. कदाचित ते दोघे हा प्रसंग विसरलेदेखील आणि असंच रात्री मेट्रोतून प्रवास करताना ती महिला त्यांना परत भेटली. तिने त्यांचे मनापासून आभार मानले आणि ती निघून गेली.
त्यातल्या एकाने हा प्रसंग जसाच्या तसा या कन्फेशन पेजवर लिहिला होता. त्याला स्वत:चं कौतुक करून घ्यायचं नसावं किंवा मी काही तरी मोठं काम केलंय, असा आवही आणायचा नसावा. कारण ना त्या पोस्टवर त्याचं नाव होतं ना फोटो. फक्त माझ्या आयुष्यात त्या दिवशी अशी घटना घडली होती आणि मला ती सांगावीशी वाटली, इतकाच त्याचा उद्देश असावा. पण माझी उत्सुकता त्या पोस्टने वाढवली आणि मी त्या पेजवरील इतर कन्फेशन्सपण वाचू लागले. त्यात अनेकांनी त्यांच्या आयुष्यातील काही अशा घटनांना वाट मोकळी करून दिली होती, ज्या कदाचित चारचौघांत, घरातल्यांजवळ बोलून दाखवल्या नसतील. छेड काढणाऱ्यांशी एकटय़ाने झगडणाऱ्या अनोळखी मुलात सापडलेला खरा माणूस, ब्रेकअपनंतरही दु:खात प्रेयसीच्या खांद्यासाठी आसुसलेला तरुण, परीक्षेत नापास झाल्यावर आई-वडिलांना सामोर जाताना शरमलेला तरुण, नकळत झालेल्या चुकीची कबुली, वेश्येमध्येदेखील आपल्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहील अशी बायको शोधणारा तरुण हे आणि असे अनेक प्रसंग कित्येकांनी लिहिले होते. कोणाच्याही पोस्टवर नाव नव्हतं.
पण विविध ठिकाणच्या मुलांनी यात त्यांचे अनुभव लिहिले होते. या पेजला ना प्रांताची बंधनं होती ना धर्माची आणि वयाची तर नाहीच नाही. चर्चमध्ये कन्फेशन खोलीत पडद्यामागील पाद्रीकडे आपल्या चुकीची कबुली देण्याच्या प्रथेप्रमाणेच हा काहीसा प्रकार. उलट याच प्रथेचं हे आधुनिक रूप असंही म्हणता येईल.
मग मीही उस्तुकतेपोटी हा प्रयोग आजमावण्याच ठरवलं. पेजवर त्यांनी कन्फेशन कुठे आणि कशी लिहावीत याची िलक दिली होती. त्यावर क्लिक केल्यावर गुगलची एक िवडो ओपन झाली त्यात त्यांनी कन्फेशन लिहिण्यासाठी जागा दिली होती आणि खाली सबमिटचं बटन होतं. त्याप्रमाणे मीदेखील माझा अनुभव सहज म्हणून लिहिला. नंतर खूप दिवस तो अनुभव त्या पेजवर येईल याची वाट पाहत राहिले. पण तो काही आला नाही. कदाचित तितका महत्त्वाचा त्यांना वाटत नसेल किंवा इतर कन्फेशन्समध्ये दबला गेला असेल. कोणास ठाऊक. पण एक मात्र खरं, काही क्षणांसाठी हलकं वाटलं. कदाचित आयुष्यात आपण मनात दडवून ठेवलेली गुपितं एखाद्या विश्वासाने सांगितल्यावर आपल्याला जितकं हलकं वाटतं तितकं.
पण त्याच वेळी मनात एक दुसराच विचार घोळू लागला. आता आपल्याला खरंच या अशा पेजेसची निकड आहे का? आपल्या आजूबाजूला असे अनेक जण असतात ज्यांच्याकडे आपण आपल्या मनातील सगळ्या गोष्टी सांगू शकतो, रडू शकतो तरी आपण नाही बोलत त्यांच्याशी. कदाचित काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवतो. पूर्वी नाही का आपले आई, वडील, काका किंवा मोठी ताई डायरीत गोष्टी लिहून ठेवत. ती डायरी वाचायची परवानगी कोणालाच नसते. हा तोच प्रकार असावा. फक्त आता ती डायरी बोलकी झाली आहे. जेव्हा आपण अशा पेजेसवर आपले अनुभव लिहतो तेव्हा जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून एक अनोळखी आवाज चटकन कमेंट टाकतो, ‘छोड दे ना बॉस होता है ऐसे’, ‘क्या बात है भिडू, पता नाहीं क्यू ये लोग अपने जनरेशन को इमोशनलेस केहते है. तुझ्यासारखी मुलं आहेत अजून जिवंत मित्रा.’ आणि आपण मनातल्या मनात सुखावून जातो. कदाचित आमच्या पिढीसाठी मनात दबून राहिलेल्या भावनांना मोकळं करण्याची ती एक वाट आहे.
५्र५ं.’‘२ं३३ं@ॠें्र’.ूे
आय कन्फेस!
फेसबुकवरचं ‘कन्फेशन पेज’ सध्या तरुणाईमध्ये बरंच लोकप्रिय झालंय. या कन्फेशन पेजकडे मुलं काय नजरेनं पाहतात, त्याकडे कशी वळतात, हे सांगणारी ही पोस्ट.
First published on: 20-12-2013 at 01:10 IST
TOPICSइंटरनेटInternetएक्सTwitterऑनलाइनOnlineफेसबुकFacebookव्हॉट्सअॅपWhatsappसंगणकComputerसोशल मीडियाSocial Media
+ 3 More
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online confession