विशाखा कुलकर्णी

भारतीय मनोरंजन क्षेत्राचे रूप दिवसेंदिवस झपाट्याने बदलत आहे. प्रेक्षकांना मिळालेल्या असंख्य पर्यायांमुळे प्रेक्षकांना सतत नवीन गोष्टी बघण्याची संधीदेखील मिळते. विशेषत: विनोदाच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेल्या संधी फार रंजक आहेत. कथाकथन, एकपात्री नाटक अशा माध्यमातून ‘स्टँड अप कॉमेडी’ आपल्याकडे आधीही होतीच, या स्वरूपाची धाटणी मात्र झपाट्याने बदलत गेली. तरुणाईला परंपरेच्या चौकटीत न बसणारे विनोद अधिक चटकन भावतात, मग ते मीम्स असोत किंवा मर्मावर भाष्य करणारी स्टँड अप कॉमेडी. त्यामुळेच आज कुठल्याही समाजमाध्यमावर गेल्यास डार्क कॉमेडी आणि रोस्टिंग या विनोदाच्या माध्यमांचेच वर्चस्व आहे.

Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
star pravah lagnachi bedi serial will off air
‘आई कुठे काय करते’नंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर केलं अधिराज्य
love lagna locha new marathi movie
‘Love लग्न लोचा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी…

डार्क कॉमेडी अर्थात समाजात शक्यतो ज्यावर विनोद केले जात नाही, अशा विषयांवर केले जाणारे विनोद. भारतीय समाजव्यवस्थेत असंख्य विषय संवेदनशील मानले जातात, ज्यावर उघडपणे चर्चा अगदी हल्लीच्या काळापर्यंत टाळली जात असे. टाळले जाणारे विषय म्हणजे केवळ अश्लीलतेकडे झुकणारे विनोद नसून अगदी भ्रष्टाचार, उघडपणे चालणारा राजकीय नेत्यांचा ढोंगीपणा, धार्मिक, जातीय विषय किंवा अगदी मानसिक स्वास्थ्य ज्यावर सार्वजनिक व्यासपीठांवर फार काळजीपूर्वक बोलले जाते, त्यावर थेट विनोदनिर्मिती केली जाऊ लागली. यामुळे डार्क कॉमेडी आणि तसे विनोद करणारे कलाकार हे कायम वादाच्या भोवऱ्यात येत राहतात, पण सोशल मीडियावर नजर फिरवल्यास हल्ली या प्रकारच्या विनोदांनाच तरुणाईची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसते आहे. खरेतर डार्क कॉमेडी ही संवेदनशील विषयांवर भाष्य करण्याचे केवळ नवीन माध्यम आहे, मात्र कलाकारांनी संवेदनशील सामाजिक विषयांवर भाष्य करण्याची परंपरा आपल्याकडे इतिहासातील शायरांपासून शाहिरांपर्यंत चालत आलेली आहे, आणि प्रत्येक वेळी त्यांना समकालीन समाजाकडून विरोधदेखील होत गेला आहे. तरीही समाजातील आणि अगदी लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातील विषमतेवर प्रकाश टाकणारी ही डार्क कॉमेडी, शिवराळ असली तरीही (किंबहुना शिवराळ आहे म्हणूनच?) तरुणाईला आपलीशी वाटते आहे. याशिवाय, रोस्टिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीला मध्यभागी ठेवून त्याच्या उखाळ्यापाखाळ्या काढत, त्याद्वारे समोरच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कार्यक्रमदेखील लोकप्रिय आहे.

हेही वाचा >>> सफरनामा : साहसी पर्यटन!

याची सुरुवात झाली ती ‘एआयबी’ नामक कार्यक्रमातून. २०१५ साली प्रथम प्रदर्शित झालेल्या या कार्यक्रमाने प्रचलित मनोरंजनाच्या कार्यक्रमांना धक्का देत प्रेक्षकांना दोन ध्रुवांवर विभागले. यानिमित्ताने, विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यावरही वादविवाद झाले, मात्र यातून एक नक्की झाले, चौकटी मोडून व्यक्त होऊ पाहणाऱ्या तरुणाईला एक माध्यम मिळाले. आता हे माध्यम चांगले/वाईट, यावर मर्यादा असाव्यात का आणि असाव्यात तर किती / कशा हा आजही वादाचा विषय आहे.

अॅमेझॉन प्राइमवरील ‘कॉमिकस्तान’ हा कार्यक्रमही प्रचलित स्टँड अप कॉमेडीच्या साच्याबाहेरील असल्याने प्रेक्षकांना भावला. नवीन चेहरे आणि जाणीवपूर्वक केलेली आक्षेपार्ह, अपमानास्पद विधानं यामुळे हा कार्यक्रमही वादाच्या भोवऱ्यात अडकला, परंतु ओटीटी मीडियावर नसलेल्या सेन्सॉरशिपमुळे यातील स्पर्धकांना टीव्हीच्या तुलनेत विनोदनिर्मिती करण्यासाठी आणि विविध प्रयोग करण्यासाठी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे शाब्दिक कोट्या, अंगविक्षेप, प्रासंगिक विनोद अशा प्रेक्षकांना परिचित असलेल्या प्रकारांपेक्षा उपहास, उपमर्द आणि तिखट बोचरी टीका यासोबतच स्पर्धकांचा हजरजबाबीपणा अशा अनेक गोष्टींमुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला.

याशिवाय, अनेक ठिकाणी सुरू झालेल्या ओपन माइक शोज, ज्यात रेस्टॉरंट किंवा एखाद्या कार्यक्रमात, लहान प्रेक्षकांसमोर कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आणि हा विनोदप्रकार अधिकाधिक फोफावत गेला. भारतातील डिजिटल क्रांती, सोशल मीडियाचा वाढलेला वापर, देशाच्या कानाकोपऱ्यातही इंटरनेटची उपलब्धता या गोष्टींनी या विनोदप्रकारांच्या प्रसारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यूट्यूबसारख्या मोफत आणि सेन्सॉरशिप नसलेल्या माध्यमातून या विनोदप्रकाराला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे हे नक्की सिद्ध झाले, की समाजातील अनेक गोष्टींमध्ये असणारा विरोधाभास दाखवणारा आरसा पाहण्यासाठी प्रेक्षक सज्ज आहेत.

हेही वाचा >>> विदेशी ब्रॅण्ड्सचे बॉलिवूड चेहरे

घरातील प्रत्येक जण आपापल्या मोबाइलमध्ये डोके घालून, हेडफोन लावून बसले आहे हे चित्र गावात आणि शहरातही दिसू लागले आहे, त्यामुळे हे डिजिटल ‘कंटेंट क्रिएटर्स’ झपाट्याने प्रसिद्धी मिळवत आहेत.

परदेशात रिकी गर्व्हेस, जॉर्ज कार्लिन, डेव्ह चॅपेल यांसारखे कलाकार आणि कॉमेडी सेंट्रल नावाच्या वाहिनीवरील ‘द रोस्ट ऑफ…’ यासारख्या कार्यक्रमांचा हल्लीच्या भारतातील रोस्ट कल्चर आणि डार्क कॉमेडीवर प्रभाव पडलेला दिसतो, तरीही भारतातील समाजव्यवस्थेला अनुसरून हा विनोदप्रकार इथे स्वत:ची वेगळी प्रतिमा घेऊन विस्तारतो आहे.

खरेतर वादग्रस्त विधाने आणि शिवराळ भाषेचा वापर यामुळे या कार्यक्रमांवर टीका होत असली तरी याच बोचऱ्या आणि काहीशा प्रखर विनोदांमुळे तरुणाई सामाजिक विषयांवर एका अतिशय वेगळ्या चष्म्यातून पाहते आहे या वास्तवाकडे अनेकदा दुर्लक्ष होते. उदाहरणार्थ, एखाद्या विनोदाच्या कार्यक्रमामध्ये सादरीकरण करणारी मुलगी स्वत:च्या आयुष्यातील विनोदी किश्शांचा आधार घेऊन भारतीय समाज, कुटुंबव्यवस्थेत मुलींना अनुभवायला मिळणाऱ्या विषमतेवर हळूच भाष्य करते किंवा भारतीय मूल्यव्यवस्था कितीही आदर्श असली तरी अशा विनोदांचा आधार घेऊन त्यांतील दांभिकता अधोरेखित केली जाते. अर्थात, भारतीय समाजमनात जात, धर्म, मूल्यव्यवस्था, परंपरा यांची पाळंमुळं अतिशय खोलवर रुजल्याने कुणी ना कुणी तरी दुखावलं जातं, किंवा अनेकदा विनोदनिर्मिती करताना अभिव्यक्तिस्वातंत्र्याची रेषा ओलांडली गेल्याने तो किंवा ती विनोदवीर टीकेचा आणि कायदेशीर कारवाईचा धनी झाल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. अनेक कलाकारांवर वादग्रस्त विधानं केल्याने माफी मागण्याचीदेखील वेळ आलेली आहे. परंतु इथे हेदेखील लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की ज्या प्रमाणात अशा प्रकारची ‘डार्क’ कॉमेडी किंवा रोस्टिंग समाजाच्या वेगवेगळ्या घटकांवर परिणाम करते त्यावरून हे माध्यम समाजातील विषमतेवर टीका करण्यासाठी महत्त्वाचे अस्त्र आहे ही बाबही अधोरेखित होते.

नव्याने आणि झपाट्याने उदयाला आलेल्या या विनोदप्रकाराच्या लोकप्रियतेने हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे की विनोद हा केवळ मनोरंजनाच्या पलीकडे भारताच्या सांस्कृतिक घडणीचा भाग आहे.

विशेषत: महाराष्ट्रात कलाकार हे कायमच समाजाच्या घडणीला दिशा देणारे ठरले आहेत. मग ती दादा कोंडकेंची नाटके असोत, ‘घडलंय बिघडलंय’सारखे मार्मिक कार्यक्रम किंवा कीर्तन – भारुडांसारख्या लोककला सादर करणारे कलाकार असोत. डार्क कॉमेडी आणि रोस्टिंग हा प्रकार आपल्याला अजिबात नवा नाही. मात्र विनोदाची ही कला केवळ मनोरंजनाचा भाग नसून आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या भारताला वास्तवाचा आरसा दाखवणारी समीक्षक आहे. लोक जे बोलणं शक्यतो टाळतात, नेमके तेच मुद्दे समोर आणून समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम हे विनोदवीर करू शकतात. त्याचं मर्म लक्षात घेऊन हा ‘तरुण’ मनोरंजनाचा प्रकार अधिकाधिक बहरेल यात शंका नाही.

viva@expressindia.com