पूर्वी, उन्हाळ्याची सुट्टी लागली की, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची धमाल सुरू व्हायची. अभ्यास आणि परीक्षांचा ताण बाजूला सारून, सगळेच, ‘आता दोन महिने कसे मजेत घालवायचे’ याचा विचार करायचे. मित्र-मैत्रिणींबरोबर फिरणं, गावाला जाणं, नातेवाईकांकडे राहणं हे सगळं ठरलेलंच असायचं.
पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदललंय. आता मुलं उन्हाळ्याची सुट्टी लागली की, ‘समर जॉब्स’ कुठे करता येतील याचा विचार करतात. हल्ली स्पर्धा खूप वाढली आहे. प्रत्येक जण, आपण काय केल्याने दुसऱ्यापेक्षा वरचढ ठरू या विचारात असतो. या ‘समर जॉब्स’मुळे हल्ली विद्यार्थिदशेतच मुलं ‘कॉर्पोरेट एक्स्पिरियन्स’ मिळवितात. त्याचा त्यांच्या बायडेटामध्ये खूप उपयोग होतो.
पूर्वी महाविद्यालयीन शिक्षण संपवून मुलं नोकरी करायला लागायची. तेव्हा त्यांच्यासाठी तो एक नवीन अनुभव होता, पण या इंटर्नशिप्समुळे मुलं हल्ली विद्यार्थिदशेतच कामाचा आणि पैसे मिळविण्याचा अनुभव घेत आहेत. यामुळे मुलं स्वावलंबी आणि जबाबदार होत आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढतो आहे.
त्याचप्रमाणे हल्ली एम्प्लॉयर्सही या इंटर्नस्च्या शोधात असतात. कमी पैशात आणि केवळ अनुभव मिळविण्यासाठी कमिटमेंट देऊन काम करणारी मुलं त्यांच्या उद्योगासाठी फायदेशीर ठरतात.
विविध क्षेत्रांतील काही समर जॉब्स्ची माहिती येथे दिली आहे.

अंजना घोणसगी,
रुईया महाविद्यालय
डॉ. अनिता रत्नम यांनी चेन्नईत आयोजित केलेल्या ‘एपिक विमेन इंटरनॅशनल कॉन्फरन्स’ येथे मी स्टेज मॅनेजर आणि गेस्ट रिलेशन्स म्हणून जॉब केला होता. स्वत: एक नर्तिका असल्यामुळे मंचावर नृत्य सादर करताना पडद्यामागचे कलाकार आपल्याला केवढी साथ देतात हे मला ठाऊक होते. तो अनुभव मिळविण्यासाठी मी हा जॉब केला. यश मिळविण्यासाठी कष्टाला पर्याय नाही हे मी शिकले, तसेच परफॉर्मन्स देताना त्याच्या प्रत्येक अंगाशी आपण परिचित असलो पाहिजे हे यामुळे समजले.

अपूर्वा नंजनगुड, रुईया महाविद्यालय
मी बी. एम. एम.ची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे मी प्रसारमाध्यमांमध्ये समर जॉब्स केले. मला या कामामुळे एक समृद्ध अनुभव लाभला. प्रिंट मीडिया व ब्रॉडकास्ट मीडिया यांच्यातील सांस्कृतिक फरक मला जाणवला. त्यामुळे यापैकी आपल्याला कुठच्या माध्यमात करिअर घडवायला आवडेल हे मला समजले आणि ऑर्गनायझेशनल बीहेविअरही शिकायला मिळालं. माझ्या कामाला एक निश्चित दिशा लाभली.

मंदार पार्टे, रुईया महाविद्यालय
फूड सायन्स आणि क्वालिटी कंट्रोलचा अभ्यास करताना मला इंडस्ट्रियल ट्रेनिंगची गरज होती. म्हणून मी ‘सिप्ला’मध्ये समर जॉब केला होता. पुस्तकात शिकलेल्या सगळ्या गोष्टींचा मला प्रत्यक्ष अनुभव मिळाला, तसेच पुण्याला रॉस लाइफ सायन्सेसमध्ये समर जॉब केल्यामुळे मला विविध वैज्ञानिक उपकरणं हाताळायला मिळाली. कंपनीचं मार्केटिंग कसं करावं हे समजलं. या अनुभवातून मी खूप काही शिकलो.

अपूर्वा कुटुंबे, न्यू लॉ कॉलेज
पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मी दादरमधल्या ‘ओव्हनफ्रेश’मध्ये समर जॉब केला. तेथे मी ‘काऊंटर स्टाफ’ म्हणून आठवडय़ातून ६ दिवस रोज ४ तास काम करायचे. ग्राहकांना बेकरी आयटम्सची माहिती देणे व पेस्ट्री निवडण्यासाठी मदत करणे हे माझ्या कामाचे स्वरूप होते. या कामाचे मला चांगले पैसे मिळायचे. तसेच संभाषणकौशल्य विकासासाठी मला फायदा झाला. ‘प्रोफेशनल एथिक्स’ काय असतात व ते कसे पाळावे हे या जॉबमुळे मी शिकले.

पार्थ कळके, रुईया महाविद्यालय
मी पिंगेज टय़ुशन क्लासेसच्या आय. ए. एस. फोरमसाठी फ्रंट डेस्क जॉब केला होता. लोकांशी संपर्क साधून त्यांना क्लासेसची माहिती देणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे, इंटरनेटवर फोरमची प्रसिद्धी करणे हे माझ्या कामाचे स्वरूप होते. या जॉबमुळे माझ्या आत्मविश्वासात वाढ झाली आणि माझ्या संभाषणकौशल्याचा विकास झाला.
तसेच या समर जॉबमुळे यू. के.च्या एक्सीटर युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर जेम्स ऑन्ली यांच्याशी माझा परिचय झाला व त्यांच्या कतार युनिफाइड प्रोजेक्ट ऑन हिस्ट्रीवर रिसर्च असिस्टंट म्हणून त्यांनी मला नेमले.

संजना भंडारी, रुईया महाविद्यालय
मी दहावीनंतर प्रोफेशनल मेक-अप कोर्स केला होता, पण मला लक्षात आले की, काही गोष्टी स्वानुभवाशिवाय शिकता येत नाहीत. म्हणून मी माझ्या गुरू-माव्‍‌र्ही अ‍ॅन बेक यांना सुट्टीत असिस्ट करू लागले. इंटर्नस्च्या चुका चालवून घेतल्या जातात आणि या चुकांमधून बरंच काही शिकता येतं. या जॉबमुळे आता मी एक प्रोफेशनल इमेज कन्सल्टंट आहे.

पूजा भावे, जय हिंद महाविद्यालय
मी एका प्रसिद्ध वृत्तपत्रात समर जॉब केला होता. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात ही म्हण काम केल्यावर मला पटली. आपलं मन मारून दिलेलं काम व्यवस्थित कसं करायचं हे मी शिकले. तसेच, डेडलाइन्स पाळणे व स्ट्रेसखाली असताना मन लावून काम करण्याचा अनुभव मला मिळाला. माझ्या बायोडेटातही या जॉबमुळे भर पडली.

सुमीत रेडेकर
मी एका इव्हेंट मॅनेजमेंट फर्ममध्ये ‘प्रमोटर’ म्हणून समर जॉब केला होता. लोकांशी संपर्क साधून एखादी वस्तू विकत घेण्यासाठी त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं ते मला समजलं. स्वत: काम करून पैसे मिळविण्याचा तो आनंद वेगळाच होता.
त्याचप्रमाणे मी संख्याशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये करिअर करायचे ठरविल्यावर ‘डेटा अनॅलिस्ट’ म्हणूनही समर जॉब केला होता. पुस्तकी ज्ञान व्यवहारात कसं वापरायचं ते मी शिकलो. या दोन्ही कामांमुळे मला खूप फायदा झाला.

Story img Loader