ढगळ कपडे हा ट्रेण्ड नुकत्याच झालेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्येही दिसला. उन्हाळ्यात हा ट्रेण्ड आपल्या पथ्यावर पडणारा आहे. तो कसा कॅरी करायचा?
फॅशनचं चक्र सतत फिरत असतं आणि त्यात काही ट्रेण्ड्स विशिष्ट काळासाठी, सीझनपुरते येतात आणि नंतर तितक्याच वेगाने गुडूप होतात. पण काही ट्रेण्ड मात्र या स्पर्धेत आपले पाय घट्ट रोवून टिकून राहतात. त्याचं कारण असतं त्यांच्यातील सहजता, नावीन्य आणि वैविध्य. असाच एक ट्रेण्ड गेले काही सीझन गाजवतो आहे. तो म्हणजे ‘ओव्हरसाइज ड्रेसिंग’. खरं तर कधीही शॉपिंग करताना आपण ड्रेसच्या फिटिंगबद्दल जास्त विचार करतो. ड्रेस मापाचा आहे ना, ढगळ दिसत नाही ना, स्लीव्ह, नेकलाइन बरोबर बसताहेत ना या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. पण ओव्हरसाइज ड्रेसिंग ट्रेण्डने याच परिमाणांना हादरवलंय.
हे कपडे आपल्या नेहमीच्या साइजपेक्षा थोडे लूजच असतात. पण म्हणून त्यांच्या ढगळपणात तुम्ही जाड, अव्यवस्थित, गबाळे दिसाल असं अजिबात नसतं.
ओव्हरसाइज ड्रेसिंगला कोणत्याही ऋतूचं बंधन नाही. हा ट्रेण्ड गाजण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे. हिवाळ्यात एखाद्या गंजी किंवा फिटेड टीशर्टवर घातलेला ओव्हरसाइज स्वेटर भाव खाऊन जातो. तर उन्हाळ्यात शॉर्ट, मलमलचा ढगळ कुर्ता लक्ष वेधून घेतो. ओव्हरसाइज ड्रेस बॉक्स प्रकारात शिवलेले असतात. पुरुषांचे शर्ट, टी-शर्टसाठी या पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये कपडे हवेशीर आणि आरामदायी राहावेत म्हणून जादा जागा सोडण्यात येते. बेसिक बोट नेक, ऑफ शोल्डर नेकलाइन, त्रिकोणी, चौकोनी नेकलाइन या प्रकारच्या ड्रेसवर शोभून दिसतात. स्लीव्हमध्येसुद्धा बॉक्स स्लीव्ह (चौकोनी स्लीव्ह), एक्स्टेंडेड स्लीव्हचा (स्लीव्ह वेगळी न कापता नेकलाइनला एक्स्टेंशन म्हणून कापली जाते) वापर होतो. ड्रेसचा आकारही सरळ चौकोनी असतो आणि त्याला कोणतेही फिटिंग दिले जात नाही.
ओव्हरसाइज ड्रेस लूज फिटिंगमुळे ढगळ दिसायची शक्यता असते. त्यामुळे असे ड्रेस निवडताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे.
- तुमचं वजन जास्त असेल किंवा उंची कमी असेल तर डार्क शेड्स, प्रिंटेड ड्रेस निवडा. तसेच तुमची शरीरयष्टी कृश असेल तर मात्र पेस्टल शेड्स निवडा.
- दोन किंवा अधिक ओव्हरसाईज कपडय़ांची पेअरिंग करताना लुकमध्ये एक फिटेड गारमेंट असेल याची काळजी करा. ज्यामुळे तुमच्या शरीरयष्टीला उठाव मिळेल. उदाहरणार्थ ओव्हरसाईज कोट आणि ट्राउझर वापरणार असाल तर गंजी किंवा टीशर्ट फिटेड असू द्या.
- रफल्स, फ्लेअर, प्लीट्स, लेअरिंग हा ओव्हरसाईज ड्रेसिंगचा आत्मा आहे. ड्रेसला आडव्या रेषेत घेर देऊन किंवा प्लम्प टय़ुनिकसारखा प्रकार ट्राय करायला हरकत नाही.
- भौमितिक प्रिंट्स या ड्रेसिंगमध्ये उठून दिसतात. बारीक डिझाईन्सपेक्षा बोल्ड प्रिंट्स नक्कीच भाव खातात.
- शिफॉन, जॉर्जेट कापडांचा वापरही या ड्रेसिंगमध्ये करता येतो. पण त्यापेक्षा कॉटन, सिल्क, वुलन अशा जाड वजनाच्या कापडांमुळे या ड्रेसिंगला खरी गंमत येते.
- या ड्रेसेसच्या उंचीशी खेळून वेगळेपणा आणता येतो. ड्रेसची उंची लांब ठेवण्याऐवजी गुडघ्यापर्यंत ठेवा किंवा स्कर्ट, पँट अँकल लेन्थ उंचीची असू द्या. त्यामुळे लुकला वेगळेपण सुद्धा मिळतो.
- या लुकमध्ये अॅक्सेसरीजचा वापर शक्यतो कमी असू द्या. मेकअपसुद्धा कमीतकमी आणि साधा असू द्या. त्यामुळे लुकचा फोकस तुमचा ड्रेस असेल.