मितेश रतिश जोशी

जगभरात इतर वाहनांच्या तुलनेत सायकलची मागणी कैकपटीने वाढते आहे. चीन, जपान, नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड, नेदरलॅण्ड्स ही जगातील प्रगत राष्ट्रे सायकलचे देश म्हणून ओळखली जातात. हा सर्वार्थाने सायकलचा बहुमान आहे. याच धर्तीवर आपल्या मायभूमीतील तरुण तुर्क आजही काही ना काही वेगळ्या उद्देशाने सायकलवारी करताना दिसतात. सायकल भ्रमंती करत काही तरी रेकॉर्ड करतात, रिसर्च करतात किंवा सामाजिक काम करतात..

वाहतूक ही माणसाची मूलभूत गरज पूर्ण करण्याची जबाबदारी सायकल यशस्वीपणे पार पाडते, हे तर आपण जाणतोच; पण सायकल उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन माणसाला प्रवासमग्न करते. मुळात सायकलला इंधन लागत नाही. चालवणाऱ्याची एनर्जी हेच सायकलचं खरं इंधन. आजच्या स्पोर्ट्स बाइकच्या चलनी नाण्यामध्ये सायकल घेऊन बाहेर निघालेले भटके अनेक आहेत. हे भटके केवळ भटकंती करत नाहीत, तर समाजातल्या काही तरी सामाजिक उणिवा दूर करण्याचं काम करतात. यामध्ये तरुणीसुद्धा मागे नाहीत. पनवेलच्या प्रिसिलिया मदन या तरुणीने पनवेल ते कन्याकुमारी इतका प्रवास चक्क बांबूच्या सायकलने केला आहे.

प्रिसिलियाचे बाबा पनवेलमधले नामांकित सायकलिस्ट. त्यांना ती लहानपणापासून बघत होती. त्यामुळे प्रिसिलिया जेव्हा सायकल चालवायला शिकली तेव्हापासून पनवेलच्या आसपास असलेल्या पन्नासेककिलोमीटरच्या राइड ती सहज करायची. तेव्हापासूनच मोठय़ा राइडची स्वप्नं तिला पडायला लागली होती. मनाली-खारदुंगला आणि पनवेल-ओडिसा या ग्रुप राइड करून तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं. बाबांच्या या आवडीमुळे तिच्या घरी बरेच विदेशी सायकलिस्ट येऊन राहायचे. अशातच एक रुबिना नावाची मुलगी सायकलने जगभ्रमंती करत त्यांच्या घरी आली होती. तिच्याकडे बघूनच सोलो सायकलिंग करायचं प्रिसिलियाने निश्चित केलं आणि त्यातूनच पनवेल ते कन्याकुमारी या तिच्या सायकल प्रवासाला सुरुवात झाली. तिच्यासोबत तिचा मित्र सुमित पारिंगेसुद्धा होता. प्रिसिलिया सांगते, खरं तर हा काही रेकॉर्ड वगैरे नाही. कन्याकुमारी व खारदुंगला ही भारताची दक्षिण व उत्तर टोकाची ठिकाणे आहेत. यातील ४,४०० किमीचा प्रवास आम्ही सायकलवरून केला. या प्रवासाचं वैशिष्टय़ म्हणजे गोदरेज कंपनीने या प्रवासासाठी दिलेली बांबू सायकल. हा प्रवास भारतातील १३ राज्यांतून झाला. सायकल म्हटली की प्रवास हा सामान्य वेगाने होतो. त्यामुळे थोडय़ा थोडय़ा अंतरावर होणारे बदल लगेच जाणवतात. यामध्ये चांगले आणि वाईट असे संमिश्र अनुभव आमच्या गाठीशी आले. ४५ डिग्री तापमानातसुद्धा आम्ही सायकल चालवायचो. गप्पिष्ट स्वभाव असल्याने ताक वगैरे प्यायलो थांबलो की समोरच्या व्यक्तीशी हमखास गप्पा व्हायच्या. आमचा प्रवास ऐकून समोरची व्यक्ती बऱ्याचदा आम्हाला फु कट खाऊ पिऊ  घालायची. ही केवळ एक भटकंती नव्हती, तर ती एक सामाजिक चळवळ होती. ‘बेटी पढाव’ हे कार्य आम्ही या सायकलिंगच्या माध्यमातून हाती घेतलं होतं. आम्ही खूप गावांना-शहरांना भेटी दिल्या, आम्ही थेट शाळेत जाऊ न वर्गातल्या मुलामुलींशी शिक्षणावर बोलायचो. आम्हाला भरपूर प्रतिसाद समोरून मिळायचा, असं ती सांगते.

प्रिसिलियाबरोबरच सायकलवारी केलेला सुमित पारिंगेलाही सायकल चालवायची लहानपणापासून आवड होती. शाळेत सायकलवर जाणं आणि शनिवार- रविवारी मित्रांसोबत गाढेश्वर धरण परिसरात सायकलिंगला जाणं हमखास ठरलेलं असायचं. डिप्लोमाला प्रवेश घेतल्यावर सायकलिंगचा आणि त्याचा काही संबंध राहिला नव्हता.  डिप्लोमा झाला आणि पुढे पदवी शिक्षणासाठी पुण्याला गेल्यावर अप्पा यांच्या श्रीलंका सायकलिंगबद्दल ऐकलं. त्यांचे अनुभव ऐकून त्याने ठरवलं, आपणही अशीच सायकल घ्यायची. त्याने सर्वात पहिला सायकल प्रवास माथेरानचा केला. त्यानंतर पनवेल ते सियाचेन (सोलो), कन्याकुमारी ते खारदुंगला, पनवेल ते कन्याकुमारी, पनवेल ते ओरिसा असा प्रवास सायकलवरून केला. सायकलिंगमधला एक किस्सा सुमित सांगतो, १५ ऑगस्टला मी काश्मीर खोऱ्यात सायकलला मागे तिरंगा लावून एकटा सायकलिंग करत होतो. त्या दिवशी काश्मीरमध्ये कर्फ्यू असल्याने सगळं काही बंद होतं. संध्याकाळी मी अनंतनागला पोहोचलो. आता राहण्याची सोय बघायची होती, परंतु सगळंच बंद असल्याने बराच वेळ मी रस्त्यावर ताटकळत उभा होतो.  रस्त्यावर भारतीय जवान सोडले तर दुसरं कुणीही नव्हतं. मी रस्त्याच्या कडेला सायकलवर उभा असताना बाजूला एक कार येऊन थांबली. आतून आवाज दिला त्यांनी.. क्या चाहिए? मी म्हटलं आज रात रुकने के लिए जगह चाहिये. तो म्हणाला की, जवळच त्याच्या बहिणीचं घर आहे. मी तिला विचारतो आणि तुम्हाला सांगतो. त्यांनी बहिणीला फोन लावला आणि त्यांचं काही तरी बोलणं झालं. तो मला म्हणाला की, मेरे पीछे आईए. थोडंसं अंतर जाऊन आम्ही हमरस्ता सोडून आतल्या बाजूला मातीच्या रस्त्याला लागलो. मनात थोडी धाकधूक होती. अनोळखी मुस्लीम माणूस, आडरस्ता. काश्मीरबद्दलचे पूर्वग्रह या विचारात काही क्षण असेच गेले आणि आम्ही एका घरापाशी येऊ न थांबलो. मी थांबताच त्या घरातलं अख्खं कुटुंब माझ्या स्वागताला दारात उभं होतं. काश्मीर खोऱ्यात माझं स्वागत काश्मिरी मुस्लीम कुटुंबाकडून अशा प्रकारे होईल अशी स्वप्नवत कल्पनासुद्धा मी कधी केली नव्हती, असं तो म्हणतो.

भारत भाषिकदृष्टय़ा श्रीमंत मानला जातो. डोंबिवलीच्या गंधार कुलकर्णीला भारतातील असंख्य भाषांचे जाळे खुणावू लागले. भाषाशास्त्र हाच अभ्यासाचा आणि करिअरचा विषय निवडलेल्या गंधारने देशातील बोलीभाषांचा अभ्यास करायचे ठरवले. देशात भाषा किती आहेत, त्यांची स्थिती काय आहे, भाषेसाठी काम करणाऱ्यांबरोबर स्वत:ला जोडून घेण्यासाठी गंधार सायकलवरून भारतभ्रमण करून आला आहे. ज्येष्ठ संस्कृत नाटककार कालिदास यांच्या ‘मेघदूता’च्या मार्गे गंधारची देशभ्रमंती झाली आहे. गंधारची सायकलशी घट्ट जवळीक अकरावी-बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर झाली. घरी जराशीही कल्पना न देता तो सायकलवर हिंडू लागला. सायकलशी मैत्रीचा नवा अध्याय उज्जन-डोंबिवली मोहिमेने सुरू केला. ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी झालेली ओळख आणि डोंबिवलीत शालेय वयोगटाच्या सायकल सहलीची घेतलेली जबाबदारी यामुळे त्याची सायकलशी मैत्री वृद्धिंगत होत गेली. डोंबिवली ‘सायकल क्लब’च्या स्थापनेने सायकल चालवण्याला एक स्थिर रूप मिळालं होतं. तिथूनच ‘सायकलोपासनेला’ सुरुवात झाली. त्याला अभ्यासाची जोड असेल तरच भारतभ्रमण करायला निघायचं, हे त्याने मनाशी पक्कं केलं. मातृभाषा हे शिक्षणासह व्यवहाराचे सर्वाधिक सक्षम माध्यम असले तरी इंग्रजीसारख्या भाषांच्या वाढत्या प्रभावामुळे प्रदेशातील स्थानिक भाषांचा गोडवा काहीसा कमी होत असल्याच्या समस्येवर अभ्यास करत असल्याने भाषा हाच अभ्यासाचा विषय घेऊ न गंधार सायकलवरून १ जुलै २०१८ ला निघाला. त्याने त्याच्या या मोहिमेला ‘भाषारत सायकलोपासना’ हे नाव दिले. गंधार सांगतो, भारतीय भाषा आणि बोलींच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी चोवीस राज्यांतून वीस हजार किलोमीटरचा प्रवास मी आखला आणि साडेतेरा महिन्यांमध्ये तो एकटय़ाने केला. १ जुलै २०१८ ते १५ ऑगस्ट २०१९ या कालावधीत भारतातील दोनशे शैक्षणिक संस्थांना भेटी देत ही मोहीम पूर्ण केली. इंग्रजी भाषेला महत्त्व असले तरी मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे, त्या भाषेतही असलेल्या करिअरच्या संधी मी त्या त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. माझा दिवस सुरू व्हायचा, मात्र दिवसाच्या शेवटी निवास कुठे करायचा, भोजन कुठे घ्यायचे याचा निश्चित असा विचार नव्हता. एखाद्या गावात मुक्काम करायचा असेल तर तेथील सरपंच, अधिकाऱ्याशी भेटावं लागे. मग माझी निवासव्यवस्था कुणाच्या तरी घरी व्हायची. मी एक ठामपणे ठरवले होते, ते म्हणजे हॉटेलमध्ये थांबायचे नाही. सायकलवारी करताना राजस्थानमध्ये एका बाइकने मला कट मारला. सुदैवाने यात मला दुखापत झाली नसली तरी माझ्याजवळ असलेली वॉटरप्रूफ बॅग मात्र तुटली. अशा प्रसंगांवर मात करत मी २४ राज्यांचा प्रवास पूर्ण केला, असं तो सांगतो.

पुण्याचा महेश क्षीरसागर हा तरुण पुण्यातील ‘मुस्कान’ या एनजीओबरोबर काम करतो आहे. बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल सायकलवरून देशभर हिंडत जनजागृतीचे काम महेशने केले. एप्रिल २०१९ मध्ये त्याने नवीन सायकल घेतली. भारत भ्रमंतीचा आराखडा तयार केला. १७ जून २०१९ ला खिशात ३००० रुपये घेऊन २० राज्ये, २०,०००,०० किमीचा प्रवास त्याने २०० दिवसांत केला. महेश सांगतो, माझ्या या कार्याला मला संपूर्ण भारतातून खूप मदत मिळाली. लेह-लडाखमध्ये प्रवास करत असताना मला सलग चार-पाच दिवस जेवण मिळालं नाही. त्यामुळे खूप तब्येत खराब झाली. पाचव्या दिवशी सकाळी मी इंडियन आर्मीच्या कॅम्पला पोहोचलो. मला काही बोलताही येत नव्हतं. मी खूप थकलो होतो. आणि बर्फाचे वितळलेले पाणी पिऊ न घसा बसला होतो. आर्मीच्या लोकांनी सायकलवरचा भारतीय झेंडा पहिला आणि मला आतमध्ये घेतलं. गरम रूममध्ये ठेवलं. जेवण दिलं आणि मी सलग २० तास झोपलो. सीमेवर राहून ते संरक्षण तर करतातच, पण तितकीच मायेने काळजीसुद्धा घेतात. एकदा तर अतरंगीच किस्सा घडला. दक्षिण भारतात रामेश्वरजवळ रात्री प्रवास करताना अचानक खूप पाऊस आला. रात्र काढण्यासाठी कोणतं गावही लागत नव्हतं. मग मला अंधारात एक पत्र्याची शेड दिसली. खूप अंधार होता. मी त्या शेडखाली टेंट टाकला आणि झोपलो. सकाळी उठून पाहतो आहे तर ती स्मशानभूमी होती.

डोंबिवलीच्या शशांक वैद्यची सायकलवारी आणखी वेगळी आहे. टी.जे.एस.बी. बँकेत काम करणारा शशांक डोंबिवली ते ठाणे हे अंतर रोज सायकलने कापतो. शशांकला सायकल चालवण्याची आवड ही वाचनाच्या आवडीतून निर्माण झाली. भा. रा. भागवत यांचा कथानायक फास्टर फेणे हा त्याचा लहानपणीचा आदर्श! त्यामुळे त्याच्यासारखी सायकल चालवता यावी ही इच्छा निर्माण झाली. पुढे ५ फेब्रुवारी २०१२ रोजी दीपक देशपांडे, डॉ. पुणतांबेकर यांच्यासह ‘डोंबिवली सायकल क्लब’ची स्थापना शशांकने केली. ‘सायकल टू वर्क’ हा उपक्रम तो स्वत: गेली ८ वर्षे राबवतो आहे. तसंच सायकलिंगमध्ये नियमितता यावी यासाठी ‘२१ डेज चॅलेन्ज’ हा उपक्रम गेली ३ वर्षे राबवतो आहे. डोंबिवली ते गोवा, डोंबिवली ते अलिबाग, डोंबिवली ते तळेगाव, माघी गणपतीनिमित्त डोंबिवली ते पाली, अष्टविनायक यात्रा अशा सफारी शशांकने आपल्या पत्नीसोबत सायकलवरून केल्या आहेत.

बारामतीची दीपा शेंबेकर ही तरुणी वेगवेगळ्या सायकल प्रतिष्ठानसोबत काम करते. दीपाने कोलकाता ते कन्याकुमारी, कच्छ ते कोचिन असा सायकल प्रवास केला आहे. युरोपमधील ६ देशांमध्ये एक महिना सायकलवरून भटकंती केली आहे. दीपा सांगते, सायकल चालवण्याची आवड तशी लहानपणापासून होती, पण भीतीसुद्धा होती. आत्मविश्वास कुठे तरी कमी पडत होता जो वेगवेगळ्या ग्रुपबरोबर फिरून भरून निघाला. लहानपणापासूनच छोटीमोठी कितीही कामं असोत, मी सायकलवर जाऊ नच पूर्ण करायचे. या राइडच्या निमित्ताने जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा एक स्त्री सायकल चालवते हे पाहून अनेक पुरुषांच्या भुवया उंचावतात. समवयस्क स्त्रियांना पाहून एक आदर्श निर्माण होतो. स्कूटी चालवताना जेवढा आदर मिळत नाही तेवढा दुप्पट आदर सायकल चालवताना मिळतो आणि तो युरोपमध्येसुद्धा मिळाला, असे तिने सांगितले.

डोंबिवलीच्याच ममता परदेशी या तरुणीने ‘सह्य़ाद्री वाचवा’ या मोहिमेअंतर्गत डिसेंबर २०१६ मध्ये महाराष्ट्रातील पूर्व घाट म्हणजेच सह्याद्री रांगेत सायकलिंग केले. सह्याद्री रांगेच्या सरंक्षणासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ममता या मोहिमेत सहभागी झाली होती. ममता गेल्या पाच वर्षांपासून सायकल टू वर्क करते. ममता सांगते, मी लहानपणापासून निर्भयी, धाडसी, स्वत:ला वाटेल तेच करणारी होते. मुलींसारखे भातुकलीचे खेळ मला कधीच आवडले नाहीत. मैदानी खेळ मला आवडायचे. कालांतराने मी गिर्यारोहणाकडे वळले. सह्याद्रीतील गडकिल्ल्यांवर भटकंती केली. निसर्गाची ओढ अजूनच वाढली. एक दिवस मी नवऱ्याकडे सायकल चालवायची इच्छा व्यक्त केली. त्याने मला यात मदत केली. अनेकदा पडले, खरचटलं, पण जिद्द सोडली नाही. ‘डोंबिवली सायकल क्लब’मध्ये सहभागी झाले. २०१५ मध्ये ‘महापौर चषक’ सायकलोत्रोन स्पर्धेत माझा पहिला नंबर आला. त्या वेळच्या महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते सायकल भेट मिळाली. मग मी डोंबिवली-लडाख, डोंबिवली-कोल्हापूर, डोंबिवली-गोवा असा प्रवास सायकलने करू लागले.

तरुणाईने वेगवेगळ्या कारणांसाठी सुरू केलेली ही सायकलवारी खरंच नवलाईची आहे. भपकेबाज श्रीमंती मिरवणाऱ्या या युगात सायकलवार स्वार होऊन अनेकविध मोहिमा, कधी आपल्याच न्यूनगंडावर मात करत यशाचं, आनंदाचं वेगळं समीकरण साधता येतं, हे या सायकलवीरांनी सिद्ध केलं आहे.

Story img Loader