नाटक-सिनेमाला एकटय़ाने जाणं हे चूक की बरोबर. ह्य़ाच्या पलीकडे आलोय आता आपण. तरीही ते टाळलं मात्र जातं. त्याला सामोरं जायचं ठरवलंय मी. अखेर आईचं न ऐकता मी पुढच्या बसस्टॉपवर उतरले. आपण काहीतरी अद्भुत करतोय ह्य़ाची झिंग आली होती. मला नाटकांनी पूर्ण झपाटून टाकलं होतं त्या काळी. एक-दोन ठिकाणी कला अकादमीचा रस्ता विचारला. दोन मिनिटांत पोचलेसुद्धा. अकादमीत पाऊल ठेवल्यापासून मी एका भारलेल्या मन:स्थितीत होते. नाटकाला तिकीट नव्हतं. सगळ्यांसाठी प्रवेश खुला होता. कुठलं तरी अप्रतिम लोकनाटय़ होतं. स्थानिक कलावंतांचं. खूप कलाकार होते- त्याचबरोबर खूप सारी ऊर्जा आणि आवेश. माझी तहानभूक अक्षरश: हरपली होती. नाटक संपेपर्यंत एकदाही माझ्या मनात आलं नाही, की मी एकटीच आले आहे. पण पडदा पडला आणि परत कसं जायचं ह्य़ा कल्पनेने मी हादरलेच. बंडखोरपणे नाटक बघायला तर मी आले. पण पुढे? प्रश्नातून आणि थिएटरमधून बाहेर पडेपर्यंत आईबाबाच पुढय़ात उभे असलेले दिसले. काळजीने मला आणायला आले होते. आई आणि मी सुट्टीला गोव्यात गेलो होतो. बाबांच्या कंपनीचं तिथे सिबा-गायगीमध्ये प्लांट चालू होतं. ती सुट्टी कायमची माझ्या लक्षात राहिली आहे. कारण आयुष्यात पहिल्यांदा मी एकटीनं नाटक पाहिलं. आणि तेव्हा मी फक्त ज्युनिअर कॉलेजला होते. अनेक जणांसाठी एकटय़ानं नाटक-सिनेमाला जाणं ही एक फार बिकट समस्या असते. बाकी कितीतरी गोष्टी स्वत:च्या स्वत: करता येतात. स्वैंपाक, ड्रायव्हिंग, बागकाम, रियाज.. अशा वेळी कधी कधी दुसरं माणूस नकोसुद्धा वाटतं ना. पण अगदी बघायचंच आहे असं नाटक लागलं आणि सोबत नसेल, तर माणसं भलतीच बापुडवाणी होतात. एकटय़ाने कसं जायचं हा संकोच इतका अंगावर येतो, की तत्क्षणी नाटकाचा प्लॅन रद्द केला जातो. याच्या उलट, सोबत असेल तर न आवडणारी नाटकं-सिनेमासुद्धा फार विचार न करता सहज पाहिले जातात. माझी गंमतच आहे. मी नाटकांना आनंदाने एकटी जाऊ शकते, पण सिनेमाला मात्र अजिबात म्हणजे अजिबात एकटं जाता येत नाही मला. दोन्ही थिएटरमध्येच तर असतात. पण माझ्या मनाला कसं कळत असेल की इथे नाटक बघायचंय आणि इथे सिनेमा? चित्रपट महोत्सवात हा प्रश्न येत नाही. ते सगळ्या एकटय़ांचं असं- सगळ्यांचं संमेलन असतं. काय कोण जाणे, पण मल्टिप्लेक्समध्ये एकटीनं जाणं मला फार चोरटय़ासारखं वाटतं! हल्ली फिल्म-बडीज् खूप असतात. म्हणजे सिनेमाला जाण्यापुरती दोस्ती. एरवी काही खास घट्ट मैत्री वगैरे असेलच असं नाही- पण सिनेमाला जाताना मात्र अपरिहार्य अद्वैत अगदी! असं एकमेकांची सोय पाहणाऱ्या दोन्ही पाटर्य़ा मला गोड वाटतात अगदी. किंवा भला मोठ्ठा ग्रुप बनवून सिनेमाला जाणं तर सॉलिडच. मी काही विनोदी सिनेमे असे गँगबरोबर पाहिले आहेत. उगीचच हसायला येतं माहितीए. म्हणजे दुसऱ्याला हसताना पाहून संसर्ग झाल्यासारखे हसण्याचे अ‍ॅटॅक येतात. अशा वेळी एखाद्या धीरगंभीर मित्र/मैत्रिणीच्या चेहऱ्यावरही न राहवून हसू उमटलेलं दिसतं. मराठी सिनेमांसाठी माझे हक्काचे सोबती म्हणजे माझे आईबाबा- आणि आता माझा नवरा- नचिकेत. कुरकुर न करता मला बघायच्या असलेल्या नाटक-सिनेमांना माझ्याबरोबर येतो. पण माझ्या बाजूने मात्र हिशोब अर्धवट राहतो. कारण त्याला बघायच्या असलेल्या सगळ्या सिनेमांसाठी मी त्याला कंपनी देतेच असं नाही. सॉरी, पण मला भीतीचे किंवा मारामारीचे सिनेमे बघताच येत नाहीत. त्यामुळे अशा सिनेमांचा आस्वाद मी नसताना त्याला डीव्हीडीवर घ्यावा लागतो. कितीदा तरी मी आमच्याकडे काम करणाऱ्या मीनल आणि प्रमिलाबरोबर जाते. एकत्र सिनेमा बघता येतो. मिळून काहीतरी केल्याचा आनंद मिळतो आणि टीम-स्पिरीटही वाढतं. तरीही हे झालं स्वेच्छेनं- मजा म्हणून. पण काही दोस्तलोकांनी आपण तिकीट काढूनही ऐन वेळी न येऊन दगा दिला आहे. अशा वेळी चडफडत बसण्यापलीकडे माझ्या हातात काही नव्हतं. एक-दोनदा तर पीव्हीआर जुहूच्या बाहेर खुसफुसत-‘तिकीट घेता का कुणी तिकीट’ असं फिरताना मला पाहिलं असेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका. एकटीनं जाण्यापेक्षा तिकिटं परत करून घरी परत फिरण्याशिवाय काही सुचलंच नव्हतं मला. पण आता मात्र हा अवघडलेपणा मी काढणार आहे मनातून. तुम्हीही काढा. काऽऽ ही होणार नाही. आपले पैसे, आपला वेळ, आपली मर्जी. कोण काय म्हणणार आहे? आपल्याला उगीच वाटतं- इतरांना काय वाटेल. आख्खं थिएटर आपल्याकडे विचित्र नजरेने पाहील. ‘एकटेच आलोय’ अशा घोषणा होतील पाठीमागे. इतकं काहीतरी ऑकवर्ड वाटत राहतं. ह्य़ा सगळ्या ‘वाटण्यांना’ बाद करू या. आणि एकदा तरी हे दिव्य करून बघू या. आपल्याला पाहायचं चांगलं काहीतरी ‘बरोबर कुणी नाही’ ह्य़ा कारणासाठी हातून निसटणं बरोबर आहे का? नंतर मित्रांना बोल लावत बसायचं की यार, तुमच्यामुळे माझी संधी गेली! माझी एक मैत्रीण तर नातं संपलं असूनही ‘माझ्याबरोबर सिनेमाला कोण येणार मग’- ह्य़ा कारणासाठी घटस्फोट घेत नव्हती. इतकं तिचं सिनेमावेड अजब होतं. नंतर तिला घरच्यांनी समजावून सांगितलं- तुमच्यात न पटणाऱ्या गोष्टींच्या यादीवरसुद्धा एक सिनेमा होऊ शकेल. इतकीच हौस असेल तर आख्खं थिएटर तुझ्याबरोबर आलंय असं समज. पण बये, आता काडीमोड दे त्या बापडय़ाला! चला तर मग. आपणही आपल्या अवघडलेपणाला काडीमोड देऊ या. हे वर्ष संपायच्या आधी आपल्याला बघायचाच असलेला एकतरी नाटक/सिनेमा एकटय़ानं बघायचं धाडस करू या. जमेल. नक्की जमेल. sokool@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा