इन्व्हेस्टमेंट बँकरची भरपगारी नोकरी सोडून तिने स्वत:चा व्यवसाय उभारण्याचं स्वप्न पाहिलं. तिला स्वत:ला मेकअपची आवड असल्याने तिने त्या क्षेत्रात उडी घ्यायचं ठरवलं. मात्र ‘फॉक्सटेल’ नावाने उभ्या राहिलेल्या मेकअप प्रॉडक्ट्सच्या या तिच्या कंपनीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला कोण अडचणी आल्या. रोमिता मजुमदार या तरुणीच्या स्वप्नपूर्तीची ही गोष्ट समस्त स्त्रियांच्या आणि पुरुषांच्याही डोळ्यात अंजन घालणारी आहे.
ती इन्व्हेस्टमेंट बँकर होती. व्हेंचर कॅपिटल हा तिचा एक्स्पर्टीजचा विषय! वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करताना आणि पैशांबद्दल सतत डील करताना तिला स्वत:च्या बिझनेसची कल्पना सुचली. २०२१ मध्ये तिने स्वत:चा ब्रॅण्ड सुरू केला. ‘फॉक्सटेल’ हा स्किनकेअर ब्रॅण्ड हे तिने सुरू केलेलं तिचं पहिलं स्टार्टअप. तिच्या घरात सगळे व्यवसायाने वकील असताना ती मात्र वेगळ्याच क्षेत्राकडे वळली आणि स्वत:ची वेगळी वाट तिने निर्माण केली. ती आहे रोमिता मजुमदार. मूळची झारखंडची असलेली रोमिता सुरुवातीला फायनान्स फील्डमध्ये काम करत होती. मात्र ती भरपगारी नोकरी सोडून स्वत:च्या ब्रॅण्डची सुरुवात केल्यावर तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.
रोमिता म्हणते, ‘आमच्या घरात सगळे जण वकील आहेत, मात्र मी वेगळं फील्ड निवडलं म्हणून मला कधी कोणी बोललं नाही. घरच्या कधीच कोणी माझ्यात आणि माझ्या भावामध्ये भेदभाव केला नाही. आतापर्यंत मी ज्या कंपनीत काम करत होते, तिथेही कधी कोणी मला स्त्री म्हणून वेगळी वागणूक दिली नाही. मात्र बिझनेसमध्ये आल्यावर खऱ्या अर्थाने वेगळे अनुभव आले. इथे स्त्री म्हणूनच माझ्याकडे पाहणारे अनेक लोक मला भेटले. ज्यांनी माझ्याकडे एक बिझनेसमन म्हणून नव्हे, तर केवळ स्त्री म्हणून पाहिलं आणि त्या पद्धतीने माझ्याशी डील करण्याचा प्रयत्न केला.’
व्यवसाय उभारण्यासाठी इन्व्हेस्टमेंट महत्त्वाची ठरते. इन्व्हेस्टमेंटसाठी राऊंड घेत असताना रोमिताला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. एका इन्व्हेस्टरने तर चक्क सांगितलं की त्याने आधीच्या राऊंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याची रिस्क घेतली नाही, कारण त्याला वाटलं रोमिताने बिझनेस केवळ छंद किंवा हॉबी म्हणून सुरू केला आहे आणि ती तो सीरियसली करणार नाही. हे सांगताना त्याला आपण काही तरी चुकीचं करतोय असा विचारही मनाला शिवला नाही. मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची संधी त्याने सोडली नाही. अशा अनेक इन्व्हेस्टर्सनी रोमिताला गांभीर्याने घेतलं नाही आणि तिच्या कंपनीत इन्व्हेस्ट करायला नकार दिला. मोठ्या फायनान्स कंपनीतून बाहेर पडून स्टार्टअप सुरू करणारी एक मुलगी जिचं सगळं कुटुंब वेल-सेटल्ड आहे, तिला कशाला सीरियसली बिझनेस करायची गरज आहे, अशा विचारांनी लोकांनी परस्पर ठरवून टाकलं की रोमिता हा बिझनेस गंमत किंवा टाइमपास म्हणून करते आहे.
रोमिताच्या फॅमिली बॅकग्राऊंडकडे बघून अनेकांना वाटलं की ही दोन-तीन वर्षं व्यवसायात तग धरेल, चालत नाही असं वाटलं की कंपनी बंद केली तरी तिला कुठे काय फरक पडतोय! उत्साह आणि हौस आहे तोपर्यंत करेल आणि नंतर सोडून देईल, अशा विचारांनी इन्व्हेस्टर्सनी गंभीरपणे तिच्या कंपनीत रस घेतला नव्हता. ‘तुमचं लग्न झालं आहे का, मुलं असतानाही तुम्ही हे कसं काय करू शकता, तुम्हाला कधी कोणी पुरुष को-फाऊंडर घ्यावासा का नाही वाटला,’ असे अनेक प्रश्न एका इन्व्हेस्टरने तिला विचारले. त्यामुळे वैतागून रोमिताने त्याची इन्व्हेस्टमेंट स्वत:च नाकारली. मात्र तिच्या ‘फॉक्सटेल’ला केवळ अशीच माणसं भेटली असं नाही, तर काही प्रोफेशनल वागणाऱ्या बिझनेसेस आणि इन्व्हेस्टर्सनी तिच्या कंपनीत इन्व्हेस्टमेंटदेखील केली.
सध्या ‘फॉक्सटेल’ची विटॅमिन सी सेरम, फेसवॉश, सनस्क्रीन अशी काही पाच-सहा प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. सुरुवातीला दिवसाला केवळ दहा-बाराचा युनिट सेल असणारी फॉक्सटेल आता दिवसाला दोनशेहून अधिक युनिट्स विकते. २०२१ ते २०२४ या तीन वर्षांत तिची फॉक्सटेल १२५ करोड व्हॅल्यूएशनची झाली आहे. ज्यांनी तिला केवळ स्त्री म्हणून जज केलं अशा सगळ्या लोकांना आपल्या कामातून उत्तर देत आणि कंपनीच्या व्हॉल्यूमधून उत्तर देत तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे, अजूनही करते आहे आणि मोठी स्वप्नं बघते आहे. रोमिताची ‘फॉक्सटेल’ ही केवळ स्वप्नातली फेअरीटेल नसून खरीखुरी सरव्हाईव्ह होणारी आणि सीरियसली घेण्यासारखी कंपनी आहे हे ती वेळोवेळी सिद्ध करते आहे आणि यापुढेही करणार आहे.
viva@expressindia.com