प्लॉस्टिकचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहेत हे आता आपल्याला सर्वांनाच कळलं आहे. प्लॉस्टिकचा वापर कमी करण्याचा प्रयत्न आपण सगळेच करत असतो. आपले प्रयत्न आपल्या परीने योग्य असतात, पण अनेकदा ते अपुरे पडतात. त्याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न आपण करत असतो. प्लॉस्टिक आणि युज-अँड-थ्रो नको म्हणून पुन्हा स्टीलच्या ताटल्या, स्टीलचे ग्लास, स्टीलचे चमचे अशा गोष्टी वापरायचा ट्रेण्ड आला आहे. शिवाय, प्लॉस्टिकला पर्याय म्हणून बांबूच्या, उसाच्या चिपाडाच्या, पत्रावळीच्या युज-अँड-थ्रो वस्तू वापरण्याचाही ट्रेण्ड तितकाच जोरदार आहे. प्रत्येक येणारी हुशार पिढी या अशा समस्यांवर काही ना काही नवीन तोड शोधत असते, नवीन उपाय शोधून काढत असते. असाच उपाय शोधून काढला आहे तमिळनाडूच्या टेनिथ आदित्य याने!
शाळेत जात असताना शेतकऱ्यांना केळीच्या पानांचा ढीग जाळताना बघून त्याचं मन कळवळलं. पूर्वीच्या काळी नियमित वापरात असलेल्या आणि हळूहळू कालबाह्य होत चाललेल्या केळीच्या पानांनी त्याचं लक्ष वेधून घेतलं. प्लॉस्टिक आणि तत्सम गोष्टींमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी एक कल्पना त्याच्या डोक्यात आली. वाया जात असलेल्या आणि दक्षिणेला मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या केळीच्या पानांवर संशोधन करून त्याने ती वापरात आणायचं ठरवलं. केळीच्या पानांवर प्रक्रिया करून त्यांचा टिकाऊपणा अर्थात शेल्फ लाईफ ३ वर्षं इतकं वाढवण्यात आदित्य यशस्वी झाला. या प्रक्रियेत कोणत्याही रसायनाचा वापर केलेला नाही. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णत: पर्यावरणस्नेही अर्थात इको-फ्रेंडली आहे.
या संशोधनाबद्दल आदित्य सांगतो, ‘केळीच्या पानावर प्रक्रिया करण्यासाठी एकूण सात ते दहा बायो-टेक्नॉलॉजीकल प्रोसेस कराव्या लागतात. पानाच्या पेशींना अशा पद्धतीने प्रीझर्व्ह करून ठेवले जाते जेणेकरून पानांमधील नैसर्गिक घटक तसेच राहतील.’ या टेक्नॉलॉजीमुळे पानं फ्रेश राहतात. त्यांना जुनाट वास येत नाही, ती सुकत नाहीत, जुनी होत नाहीत. केळीच्या पानापासून ताटल्या, वाट्या, द्रोण, पाणी पिण्याचे ग्लास, पानाचंच झाकण असलेले डब्बे, एन्व्हलप अशा गोष्टी आदित्यने बनवल्या आहेत. त्यांचं शेल्फ लाईफ ३ वर्षं आहे, म्हणजेच तीन वर्षं त्या वस्तू खराब होत नाहीत. पानाच्या जाडीवर अवलंबून अशा चार प्रकारच्या वस्तू आहेत. त्या जाडीवर त्या वस्तूंचा टिकाऊपणा ठरतो. सगळ्या मिळून ३० वेगवेगळ्या वस्तू केळीच्या पानापासून आदित्यने बनवल्या आहेत.
आदित्यने या सगळ्यात केवळ स्वत: गुंतून न राहता, ‘टेनिथ इनोव्हेशन्स’ या त्याच्या कंपनीमार्फत त्याच्यासारख्या इतर तरुण संशोधकांनाही सोबत घेतलं आहे. त्याचं म्हणणं आहे की ज्या ज्या वस्तू आपण कागदापासून बनवू शकतो, त्या सगळ्या वस्तू आपण केळीच्या पानापासूनही बनवू शकतो. सामान्यत: अवघड आणि किचकट वाटणारी ही प्रक्रिया वास्तविक तीन ते चार मिनिटांत पूर्ण होते. हे त्याचं सर्वात मोठं संशोधन असलं तरीही त्याने अजून १९ अशी संशोधनं केली आहेत जी रोजच्या अडचणींवर मात करणारी आहेत. आदित्यच्या संशोधनात इलेक्ट्रिकलपासून ते शेतीपर्यंत सगळ्या क्षेत्रांचा समावेश आहे.
आदित्यला वेगवेगळ्या संशोधनांसाठी सात आंतरराष्ट्रीय आणि दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्या संशोधनांची वाहवा केवळ देशानेच नव्हे तर जगाने केली आहे. त्याने केवळ अशी संशोधनं केली आहेत असं नव्हे तर समाजसेवा अर्थात सोशल सर्व्हिस करता येण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही सुरू केला. ज्यावर वेरिफाइड लोक एकमेकांशी जोडले जाऊ शकतात आणि सोशल सर्व्हिस करू शकतात. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला राष्ट्रपती भवन इथे विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. असा सन्मान मिळणारा तो सर्वात लहान संशोधक आहे.
अशा लहानशाच गोष्टींवर संशोधन करूनही मोठा इम्पॅक्ट करणाऱ्या मोजक्या संशोधकांमध्ये तमिळनाडूचा टेनिथ आदित्य एम आहे. शोधाची व्याप्ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत त्यातून समाजोपयोगी काही निर्माण करण्याची क्षमता असलेले, त्यादृष्टीने कार्य करणारे फार थोडे संशोधक असतात. त्यांचं संशोधन, त्यांचं कार्य हे अनेकांना तसे प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतं. इतक्या लहान वयात केळीच्या पानापासून पर्यावरणपूरक वस्तूनिर्मिती करणारा आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोनदा स्थान मिळवणाऱ्या टेनिथ आदित्य या तरुणाची गोष्ट म्हणूनच प्रेरक ठरते.
viva@expressindia.com