नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
श्रावणात सुरू होऊन आता आठवडा होतोय. कोळी लोकांच्या आरामाचा हा शेवटचा आठवडा, कारण नारळी पौर्णिमेपासून पुन्हा ते दर्याला साद घालायला तयार होणार. ओघाने कोळी गीते आठवतातच आणि त्यातूनही बाळासाहेबांची.. अर्थात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची. बाळासाहेबांच्या अशाच कोंकणी गीते, कोळी गीते आणि मला आवडणाऱ्या काही इतर लोकगीतांची प्ले लिस्ट.
खरे पाहता लोकगीते ही साध्या चालींची असतात, जेणेकरून ती लोकांना सहज लक्षात राहतील, त्यांना सहज म्हणता येतील. पण बाळासाहेबांनी लोकगीतांना चाली देतानासुद्धा आपल्या काहीशा अवघड चालींची परंपरा कायम ठेवली. तरीसुद्धा ही गाणी तेवढीच प्रसिद्ध झाली; किंबहुना केवळ कोंकणच नाही तर महाराष्ट्रभर सर्वत्र ऐकली, आवडली गेली. शांता शेळक्यांनी लिहिलेली ‘वादळवारं सुटलं गो’, ‘मी डोलकर’, आणि ‘राजा सारंगा’ ही गाणी अशीच भन्नाट चालींची गाणी. त्यातून कुठेही, कसाही जाणारा लतादीदींचा आवाज, साथीला हेमंत कुमार यांचा असा वापर, की हा आवाज अस्सल कोंकणीच वाटतो. मी डोलकर.. ची कडवी तर अफलातूनच आहेत. ‘या गो दरीयाचा दरीयाचा दरीयाचा दरारा मोठा..’ खाली सुरुवात करून टिपेला गेलेली चाल. अथांग समुद्र डोळ्यांसमोर उभा राहतोच राहतो. तीच चाल ‘लाटा लाटा.’ला अजून वर जाऊन येते. तेच पहिल्या कडव्यात मात्र जेव्हा कोळीण स्वत:विषयी बोलत आहे (आई बापाची लाराची लेक..)  किंवा तिसऱ्या कडव्यात नायक दरीयाच्या आणि मासोलीच्या सौंदर्याचे वर्णन करतो,(भल्या सकाल्ला आभाल झुकतं रे खाली) तेव्हा मात्र चाल वरून खाली येते. अंतर्मुख होते.. गोड होते.  शांताबाईंचे शब्द.. ‘रात पुनवेचं चंदन पयाली, कशी चांदीची मासोळी झाली’.. क्या बात! ‘वादळवारं सुटलं गं’मध्ये त्या म्हणतात-  ‘गडगड ढगांत बिजलि करी, फडफड शिडात धडधड उरी, एकली मी आज घरी बाय, संगतीला माझ्या कुणी नाय..सळसळ माडांत, खोपीच्या कुडात, जागणाऱ्या दोल्यात, सपान मिटलं..’ आणि ही तगमग, काळजी दाखवणारी उंच-सखल चाल. आपण थेट कोकणातल्या त्या घरातच जाऊन बसतो. एवढे ते गाणे आपले होऊन जाते. या दोन्ही गाण्यांमध्ये सागराची ऊर्मी, गुर्मी आहे, तर ‘राजा सारंगा..’  या तिसऱ्या गाण्यात मात्र एक करुण भाव भरलेला आहे. काळजी हा मुख्य गाभा आहे. यात सुरुवातीला कोरसचा पाश्चात्य १ सारखा केला गेलेला वापर फारच सुंदर आहे.मंगेश पाडगांवकराचे ‘असा बेभान हा वारा’ हे या त्रिकूटातले नाही, पण मी नेहमीच ही चार गाणी एकत्र ऐकतो. वादळ, वाऱ्याची सळसळ आणि काळजी हे या गाण्यातून सुद्धा तेवढय़ाच रंजक पद्धतीने समोर येते. या गाण्याचे संगीत संयोजन तर फारच कमाल आहे.
िस्ट्रग्सच्या ताना, कॉर्ड्समधले बदल, केवळ भारी.सुरेशजी आणि दीदींचे ‘माजे राणी माजे मोगा’.. पुन्हा एकदा शांता शेळके. ‘तुजे पायान रुतता काटा, माजे काळजात लागता घाव..’ अतिशय गोड चाल. या गाण्यापेक्षा रोमँटिक दुसरे काही असूच शकत नाही. प्रेमाचे हे असे गोड गाणे, आणि याहून एकदम वेगळे, खटय़ाळ असे आशाताई आणि हेमंत कुमार यांचे ‘गोमू संगतीनं..’ गीतकार सुधीर मोघे. दोन्ही गाणी तितकीच लाजवाब.
एकूणच बाळासाहेबांची सगळीच लोकगीते अशीच अजरामर आहेत. सुरांची अनवट गुंफण, स्वरांच्या धक्कादायक, विस्मयकारी उडय़ा, एकदा ऐकून लक्षात न राहणाऱ्या, सहजी न पचणाऱ्या चाली असूनही आज ही गाणी अवघ्या महाराष्ट्राच्या ओठांवर आहेत. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा अभ्यास, लोकांच्या संवेदनांची पूर्ण जाणीव, कवितेच्या खोलात शिरण्याची अफाट क्षमता आणि पारंपारिक चालींकडून प्रेरणा घेऊन त्यात आपल्या प्रतिभेचा मेळ घालण्याची बाळासाहेबांची पद्धत ही यामागची मुख्य कारणे असावीत. ‘जैत रे जैत’मधली सगळीच गाणी याचे उत्तम उदाहरण आहे. ‘नभ उतरू आलं..’ असंच एक सुंदर रोमँटिक लोकगीत. ‘आम्ही ठाकर ठाकर’मध्ये रवींद्रजी साठे यांच्या धीरगंभीर आवाजाचा केलेला वेगळाच वापर, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली..’ आशाताईंचा ठसकेबाज अंदाज.., ‘मी कात टाकली..’ गिटार आणि कोरसचा नावीन्यपूर्ण वापर, ‘डोंगर काठाडि..’, सगळीच गाणी अस्सल मराठी माठीतली. संगीत संयोजनसुद्धा मोजकेच, पण त्या मातीचा वास आणणारे! केवळ लाजवाब !ही सगळी अशी गाणी आहेत, ज्यांनी लोकपरंपरा केवळ जपलीच नाही, तर ती पुढे नेली. या परंपरेचा अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर भारताला अभिमान आहे.
viva.loksatta@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे  ऐकाच..‘डोलकर’चा बंगाली अंदाज
कोकण असो वा बंगाल, अरबी समुद्र असो वा बंगालचा उपसागर. कोळी सगळीकडेच असतात. त्यांच्या संवेदनासुद्धा सारख्याच असतात. भाषेचाच काय तो फरक. म्हणूनच ‘मी डोलकर..’  हे गाणे आपण बंगाली भाषेत ऐकतो, तेव्हा ते अगदी तिकडचेच गाणे भासते. हेमंत कुमार आणि दीदी यांनीच गायलेले आणि चक्क सलील चौधरी यांनी लिहिलेले ‘दे डोल डोल..’ हे गाणे तुम्ही ऐकले नसेल, तर नक्की ऐका. गाण्यातला शब्दाचा भाग तुम्ही विसरून जाल आणि या लोकपरंपरेचा एक भागच होऊन जाल.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Play list of this week