पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या ‘भारतीय छात्र संसदे’ला तरुणाईने चांगला प्रतिसाद दिला. समाजकारण-राजकारण-अर्थव्यवस्था असे अनेक  विषय ‘एमआयटी’च्या मंचावर हाताळले गेले आणि दिग्गजांना प्रश्न विचारण्याची संधी मिळताच अनेकांनी वैचारिक हल्लेही चढवले. नरेंद्र दाभोळकरांचा उल्लेख संसदेत न केल्याबद्दलची नाराजी असो किंवा मग भ्रष्टाचारविरोधी असलेल्या भाजपने येडीयुरप्पांना परत का घेतलं असे तरुणांनी विचारलेले प्रश्न कसलेल्या राजकीय नेत्यांनाही विचार करायला लावणारे होते. या सगळ्यातून प्रकर्षांने जाणवलेली गोष्ट म्हणजे मिडीयाद्वारे मिळालेल्या माहितीवर न थांबता अधिक खोलात जाऊन माहिती मिळवण्याची तरुणाईची इच्छा दिसली. सतत चच्रेत असणाऱ्या किंवा मग प्रामाणिक व शांतपणे काम करणाऱ्या नावांबद्दल जाणून घेण्याकडे बऱ्याच जणांचा कल आहे.
बीजेपीचा वाढता प्रभाव, काँग्रेसची पडझड, ‘आप’चा उदय आणि येणाऱ्या निवडणुका या सगळ्यांचा तरुणाई नेमका कसा वेध घेत्येय हे यातून दिसलं. पण यापलीकडे जाऊन या सगळ्यांत त्यांची स्वत:ची भूमिका काय आहे? हे समजून घेण्यासाठी ‘व्हिवा’नं इथल्या तरुणांना काही प्रश्न विचारले. पॉलिटिक्स म्हटलं की काय डोळ्यासमोर उभं राहतं ते एका शब्दात सांगा, असं विचारल्यावर वेगवेगळे दृष्टिकोन समोर आले. सध्या सगळीकडे पसरलेली ‘आप’ची लाट तरुणाईवरही स्वार झालीये हे जाणवलं. विशेष म्हणजे बाहेरच्या देशातून शिक्षणासाठी आलेले तरुणसुद्धा भारतीय राजकारणाबद्दल कमालीचे उत्सुक असल्याचं जाणवलं. एरवी कट्टय़ावर या विषयांवर चर्चा झोडल्या जातात आणि त्या कितीही ‘उथळ’ वाटत असल्या तरी या सगळ्यांचा गांभीर्याने विचारही होतोय, हे या चर्चेतून स्पष्ट झालं. बहुतेकांनी पॉलिटिक्स म्हणजे बदल घडवण्याची सुवर्णसंधी असल्याचं मत नोंदवलं. त्यातल्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया झ्र्

मुग्धा जोशी
बी.वाय.के.कॉलेज ऑफ कॉमर्स, नाशिक.
मला राजकारणातील चालू घडामोडींचा अभ्यास करायला आवडतो. कारण राजकारण हा तसा देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. मी देशातली एक मतदार आहे आणि मला माझ्या मताचा उचित आदर आहे. माझं मत पूर्ण विचारांती दिलं जावं यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचा अभ्यास अपरिहार्य ठरतो. आता इंटरनेटसारखा सेवातत्पर मित्र असल्यावर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बातम्यासुद्धा आपल्याला सहज उपलब्ध होतात. वाणिज्य शाखेची विद्याíथनी असल्याने हा माझ्या अभ्यासाचा नाही, पण आवडीचा विषय आहे. माझ्यासाठी, ‘पॉलिटिक्स = टू लॅडर टू डेव्हलपमेंट’.

फरझाना निशा
फिजीआयलंड (पॅसिफिक रिजन) विद्याíथनी-पुणे युनिव्हर्सटिी
माझ्या मते भारतासारख्या स्वायत्त देशाला आता खरोखर एका राजकीय बदलाची गरज आहे. काँग्रेसला स्वत:ची मूल्य पुन्हा पडताळून पाहायची गरज आहे. कँाग्रेसव्यतिरिक्त इतरांना चान्स देऊन पाहायला हरकत नाही. देशाच्या राजकारणाची सूत्रं कोणाच्या हातात द्यायला हवीत याचा ठाम निर्णय उद्यावर ढकलण्यापेक्षा न कंटाळता आज ठाम धोरण ठरवायला हवं आणि अधिकाधिक तरुणांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हायला हवं. मला संधी मिळाली तर भारताच्या राजकारणात यायला नक्की आवडेल. माझ्या मते, पॉलिटिक्स = बदल घडवण्याची संधी

अनिष तोरे
राज्यशास्त्र विद्यार्थी, पुणे</strong>
आम आदमी पक्षाने भारताच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. त्यामुळे देशातला तरुणवर्ग-मध्यमवर्ग-उच्च मध्यमवर्ग यांना राजकारणाबद्दल सकारात्मक विचार करायला भाग पाडलंय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना त्यांच्या भ्रष्ट कार्यपद्धती बदलणं गरजेच झालंय. वादग्रस्त मोदी आणि युवराज राहुल या दोघांव्यतिरिक्त लोक आता वेगळ्या पर्यायांचाही विचार करताहेत. तोंडावर आलेल्या निवडणुका पाहता मी सर्व पक्षांची आíथक-सामाजिक-परराष्ट्रीय धोरण पाहूनच माझं मत ठरवेन.
माझ्या मते माणसाची प्रत्येक क्रिया ही राजकीय स्वरूपाचीच असते. म्हणून पॉलिटिक्स = पर्सनल

सुकन्या मुळ्ये
जर्मन भाषा विभाग-आकुर्डी, पुणे.
माझ्यासाठी कोण सत्तेवर आहे, कोण येईल ही गणितं फारशी महत्त्वाची नाहीयेत. जे कोणी येईल त्यांनी काम करणं गरजेचं आहे. केजरीवालांना तरुणाईने भरपूर सपोर्ट केला. आता ते काय काय बदल आणतायेत किंवा काम करतायेत हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. मी स्वत: नावापेक्षाही त्या व्यक्तीच्या कामांना पािठबा देते. आपण करप्शन-घराणेशाही अशी कारणे देऊन राजकारणापासून लांब राहायचा प्रयत्न करतो, पण खूप पॉझिटीव्ह गोष्टीही आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि खूप काही करणं अपेक्षित नाहीए.  प्रामाणिकपणे आणि योग्य व्यक्तीला मतदान केलं तरी बास आहे. माझ्यासाठी, पॉलिटिक्स = गरज

आरती सुबंध
यूपीएससी अ‍ॅस्पायरंट, पुणे.
भारतीय राजकारणात कँाग्रेस असो, बीजेपी असो किंवा मग नव्यानेच जन्मलेला आप असो. कितीही राजकीय उलाढाली झाल्या तरी जोवर तरुणांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची भावना जागृत होत नाही तोवर रचनात्मक बदल अशक्य आहे. एखादी पॉलिसी जर देशाच्या दृष्टीने आवश्यक असेल तर तिचा सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सहमताने – विरोध न दर्शविता स्वीकार केला पाहिजे. आजची जनरेशन या सगळ्या गोष्टींशी चांगल्या प्रकारे परिचित आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी इथे काय काय होतं हे आम्हाला माहितीये. शेवटी बदल सर्वानाच हवा आहे. मतदान-प्रशासकीय सेवा-राजकारणात सक्रिय सहभाग अशा अनेक मार्गानी आपण तो घडवून आणू. माझ्यासाठी पॉलिटिक्स = भविष्य घडवण्याची सुवर्णसंधी.

चिन्मय शेटे
कला शाखा, लातूर.  
ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात घराच्या हितासाठी परिणामकारक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे देशपातळीवर देशहिताच्या बदलांसाठी आपण प्रशासकीय-राजकीय नेत्यांची नेमणूक करतो, पण त्याच वेळेला ही पूर्ण व्यवस्था त्यांच्या खांद्यावर टाकून आपल्या जबाबदारीतून काढता पाय घेतो. आपल्या दैनंदिन कामातून किंवा शिक्षणातून आपण जे काही कमावतो त्याचा देशाला उपयोग झाला पाहिजे हा विचार करायलादेखील आपल्याला वेळ नाहीये, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. ‘मला काय त्याचे’ ही प्रवृत्ती सोडून, आपल्या स्वत:च्या गोंधळातून थोडंसं बाहेर पडून शक्य होईल तितका देशाच्या विकासाला हातभार लावला पाहिजे. माझ्या मते, पॉलिटिक्स = एक संधी बदल घडवण्याची.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.

Story img Loader