श्रुती कदम

सध्या संपूर्ण देशात ट्रॅव्हलिंग म्हणजे पर्यटनाचे वेड मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळते आहे. आपल्या देशात उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यत अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जिथे फक्त भारतातीलच नाही तर परदेशातील पर्यटक भेट देत असतात. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या अनेक प्रसिद्ध शहरांना भेटी देणे हे सर्वसामान्यपणे तरुणाईला अधिक भावते. मात्र सध्या त्यांना ध्यास लागला आहे तो प्रसिद्ध अशा धार्मिक शहरांना वा देवस्थानांना भेटी देण्याचा..

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात पर्यटनासाठी अनेक निसर्गरम्य स्थळे आहेतच, पण याच निसर्गाच्या कुशीत वसलेली अनेक धार्मिक पर्यटन ठिकाणे सध्या त्यांना खुणावत आहेत. अशा अनेक धार्मिक पर्यटन स्थळांना भेट देऊन या भागातील इतिहास आणि आध्यात्मिक कथा जाणून घेण्याचा उत्साह तरुणाईमध्ये दिसून येतो आहे. अशा धार्मिक पर्यटनांमध्ये चार धाम, पंच केदार, बारा ज्योतिर्लिग, एकावन्न शक्तिपीठ, वैष्णवदेवी, गंगा, यमुना, सरस्वती, प्रयाग, कुंभ, महाकुंभ, ब्रज, द्वारका, कुरुक्षेत्र, ब्रजची होळी, अयोध्या, चित्रकूट, रामेश्वरम, पुष्कर, तिरुपती यांसारख्या स्थळांचा समावेश होतो. प्रत्येक धार्मिक स्थळांची वेगळी कथा असते आणि ही कथा प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. सध्या या धार्मिक स्थळांचे आकर्षण तरुण पिढीमध्ये मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या धार्मिक स्थळांचा प्रचार अधिक होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक जण या स्थळांना भेटी देऊन आल्यानंतर आपल्या मित्रपरिवाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची माहिती देतात. फोटो, व्हिडीओ अशा माध्यमातून त्या त्या स्थळाची महती इतरांपर्यंतही पोहोचते आणि मग तिथे जाण्याचे बेत रंगू लागतात. 

केदारनाथ, बनारस (काशी), तिरुपती, अमृतसर ( सुवर्णमंदिर) अशा खास ठिकाणी तरुणाई आवर्जून भेट देते. या पर्यटन स्थळांचे आकर्षण वाढण्यामागे सोशल मीडिया इतकाच हिंदूी चित्रपट व त्यात असलेली या धार्मिक स्थळांची दृश्ये, त्यावर आधारित गाणी त्याचबरोबर पॉडकास्टमध्ये सांगितल्या जाणाऱ्या कथा आणि त्या ठिकाणी आलेले पर्यटकांचे अनुभव अशा विविध माध्यमांचा प्रभाव आहे. अनेक माध्यमांमधून या धार्मिक शहरांचा परिचय होत असल्याने एकदा तरी त्या ठिकाणी जाऊन भेट देण्याची इच्छा पर्यटकांच्या मनात जागते.

या धार्मिक स्थळांमध्ये सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण म्हणजे केदारनाथ. भारतातील उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील हे प्रसिद्ध शिवमंदिर आहे. उत्तराखंडमधील हिमालय पर्वताच्या कुशीतील केदारनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिगांमधील एक आणि चार धाम तसेच पंच केदारपैकी एक महत्त्वाचे स्थान आहे. येथील प्रतिकूल वातावरणामुळे हे मंदिर एप्रिल ते नोव्हेंबरच्या मध्यातच दर्शनासाठी खुले होते. कत्युरी शैलीतील या दगडी मंदिराबद्दल असे म्हटले जाते की ते पांडव वंशाने बांधले होते. येथे असलेले स्वयंभू शिविलग अतिशय प्राचीन आहे. आदि शंकराचार्यानी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. एक दिवस वाराणसीत शिव म्हणजेच शंकर न सापडल्याने पांडव गढवाल येथे हिमालयात गेले. पांडव बंधूंपैकी भीम दोन पर्वतांवर उभे राहून शंकराचा शोध घेऊ लागला. त्याने गुप्त काशीजवळ एक बैल चरताना पाहिला. भीमाने तो बैल शंकर असल्याचे लगेच ओळखले. त्याने बैलाची शेपटी आणि मागचे पाय पकडले. पण बैलाचे रूप असलेला शंकर जमिनीत अदृश्य होऊन नंतर काही भागांमध्ये पुन्हा प्रकट झाला. केदारनाथमध्ये शंकराचे कुबड, तुंगनाथमध्ये हात दिसला, रुद्रनाथमध्ये चेहरा, तर मध्य महेश्वरमध्ये पोटाचा पृष्ठभाग आणि कल्पेश्वरमध्ये केस दिसले. अशा पाच वेगवेगळय़ा रूपात महादेव पुन्हा प्रकट झाल्यामुळे प्रसन्न झालेल्या पांडवांनी शिवाची पूजा करण्यासाठी पाच ठिकाणी मंदिरे बांधली. जी आज पंच केदार म्हणून ओळखली जातात. दरवर्षी अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि पंच केदारमधील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या केदारनाथचे दर्शन घेतात.

केदारनाथला टूर घेऊन जाणारा आणि भटकंतीची आवड असलेला प्रशांत केतकर हा तरुण सांगतो, ‘मी एवढा काही महादेव भक्त नाही, पण मला ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यायला खूप आवडतं. म्हणून मी सतत फिरत असतो. मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलो आहे. दक्षिण भारतातही बऱ्याच वेळा गेलो होतो, पण कधी उत्तर भारतात जाण्याचा योग आला नव्हता. खरंतर उत्तर भारतातून अनेक पर्यटक आपला प्रवास सुरू करतात, असे म्हटले जाते. एकदा मित्राच्या घरच्यांनी केदारनाथ यात्रा करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे पहिल्यांदा मी केदारनाथला माझी पहिली टूर घेऊन गेलो. तिथे गेल्यावर तिसऱ्या रात्री मला स्थानिक लोकांकडून पंच केदारनाथची ही कथा समजली. शिवाय, इन्स्टाग्राम, हिंदूी चित्रपट आणि त्यातील गाण्यांमधून दिसणारी विहंगम दृश्ये यामुळे तरुण पिढी या धार्मिक स्थळांकडे आकर्षित होते आहे हेही पर्यटकांशी आणि स्थानिकांशी बोलल्यावर लक्षात आले. त्यानंतर मी अजून तीन वेळा इथे लोकांची ट्रिप घेऊन आलो, तेव्हा दोन वेळा फक्त महाविद्यालयीन तरुण-तरुणी माझ्याबरोबर होते’.  

केदारनाथप्रमाणेच अमृतसरमधील सुवर्णमंदिरही तरुणाईत लोकप्रिय आहे. महाविद्यालयातून जाणाऱ्या आय.व्ही म्हणजेच इंडस्ट्री व्हिजिटमध्ये अमृतसरमधील सुवर्णमंदिराचा समावेश होतो. यामुळे अनेक तरुण या धार्मिक स्थळी जाऊन भेट देऊन येतात. सुवर्णमंदिराचा इतिहासही विविध घटनांनी भरलेला आहे. महाराजा रणजित सिंग यांनी शीख साम्राज्याची स्थापना केल्यानंतर १८०९ मध्ये संगमरवरी आणि तांब्याने हे सुवर्णमंदिर पुन्हा बांधले आणि १८३० मध्ये गर्भगृह सोन्याच्या पानांनी आच्छादित केल्यामुळे या गुरुद्वाराला सुवर्णमंदिर हे नाव पडले. हे मंदिर १८८३ आणि १९२० च्या दरम्यान सिंग सभा चळवळीचे आणि १९४७ ते १९६६ दरम्यान पंजाबी सुबा चळवळीचे केंद्र बनले होते. त्यानंतर १९८४ साली झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारमुळे तर सुवर्णमंदिर अधिकच चर्चेत आले. हा इतिहासही अनेकांना या मंदिराला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करतो. ‘सुवर्णमंदिर ही अशी जागा आहे जिथे सगळय़ा धर्मातील लोकांनी एकदा तरी नक्की जावे. या गुरुद्वारेतील शिस्त, शांतता, आत्मीयता ,स्वच्छता पाहून कोणतीही व्यक्ती भारावून जाईल’, असं श्वेता कदम ही तरुणी सांगते. फार्मसीचे शिक्षण घेतलेली श्वेता महाविद्यालयातील इंडस्ट्री व्हिजिटच्या निमित्ताने अमृतसरच्या सुवर्णमंदिरात गेली होती. ‘आम्ही विद्यार्थी संध्याकाळी ४ वाजता सुवर्णमंदिरात पोहोचलो होतो, त्यामुळे आम्हाला सूर्यप्रकाशात आणि चंद्रप्रकाशात हे सुवर्णमंदिर पाहायला मिळालं.

आमची ही पहिलीच इंड्स्ट्री व्हिजिट होती. त्यानंतर देखील अनेक माझ्याबरोबरचे विद्यार्थी आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत अमृतसरला या सुवर्णमंदिरात जाऊन आले आहेत’, असेही श्वेताने सांगितले. 

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेले आणि तरुणांसहित सर्वच भाविकांचे आकर्षण असलेले आणखी एक धार्मिक स्थळ म्हणजे तिरुपती. येथील प्रसिद्ध श्री वेंकटेश्वर स्वामी वारी मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला या डोंगराळ शहरामध्ये वसलेले एक मंदिर आहे. हे मंदिर वेंकटेश्वराला समर्पित आहे. हे मंदिर तिरुमला मंदिर, तिरुपती मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिर अशा इतर नावांनीदेखील ओळखले जाते. दरवर्षी अनेक पर्यटक येथे येत असतात. इथे प्रसिद्ध श्री वेंकटेश्वर स्वामी वारी मंदिराबरोबरच अनेक लहान लहान मंदिरे आहेत. मधल्या काळात आलेल्या चित्रपटांमुळे अनेक तरुण पर्यटकांमध्ये तिरुपतीचे आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे इथे अनेक पर्यटक वर्षांचे बाराही महिने येत असतात. व्यवसायाने इंटिरिअर डिझाईनर असलेल्या प्राची रावडेसाठी तिरुपती मंदिरावरील कोरीव काम आणि मंदिराची सजावट हे मुख्य आकर्षण होते. ती म्हणते, ‘मी पहिल्यांदा माझ्या परिवारासोबत तिथे गेले होते. या भागातील खाद्यसंस्कृती मला फार आवडली होती. मंदिराच्या आजूबाजूला सतत सुरू असलेल्या भजनामुळे तिथे खूप प्रसन्न वातावरण असते. मंदिरामध्ये पारंपरिक वेशभूषाच अनिवार्य असल्याने एकूणच तिथले वातावरण सुंदर वाटते. भाविकांची कितीही गर्दी असली तरी स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. तिथे कोणी उपाशी राहणार नाही याचीही काळजी घेतली जाते’. धार्मिक स्थळांना भेटी देताना खर्चही कमी येतो. काटेकोर नियोजन आणि समूहाबरोबर भटकंती केल्यास कमीत कमी पैशात फिरण्याचा आनंद घेता येतो. प्राचीच्या मते, तिरुपतीला जाण्यासाठी जास्त खर्च येत नाही. कमी खर्च आणि उत्तम अनुभव देणारे हे ठिकाण आहे. काही स्थळांचे पावित्र्य, तिथली शांतता याचीही ओढ तरुणाईला लागते. ‘तिरुपती मंदिरातील गाभाऱ्यात देवाजवळ फक्त एक दिवा ठेवलेला असतो आणि त्या दिव्यामुळे संपूर्ण गाभारा प्रकाशमान झालेला असतो. मनाला मोहून टाकणारे ते दृश्य असते’, असे तिने सांगितले. अर्थात, तिचा हा अनुभव मित्रमैत्रिणींना सांगितल्यानंतरही त्यांच्यातील काही जणही तिरुपतीला भेट देऊन आले.

चित्रपटातून एखाद्या स्थळाची झालेली दृश्य ओळख तिथपर्यंत अनेकांना खेचून नेते. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ या चित्रपटाने समस्त तरुण पिढीला केदारनाथची ओढ लावली. या चित्रपटातील केदारनाथ परिसरातील उंच उंच डोंगर, मंदाकिनी नदी या सौंदर्याने सगळय़ांनाच मोहिनी घातली. शिव भक्त आणि पर्यटनवेडी तरुण पिढी केदारनाथ यात्रेच्या दिशेने वळली. या यात्रेच्या काहीशा भौगोलिकदृष्टय़ा आव्हानात्मक आणि काहीशा देखण्या प्रवासात तरुणाई लाखोंच्या संख्येने पाहायला मिळते. असाच काहीसा प्रकार वाराणसीत गंगा आरतीच्या निमित्ताने पाहायला मिळतो. भाषा, धर्म, मंदिरे, नैसर्गिक सौंदर्य या सगळय़ाच बाबतीत विविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशात पर्यटनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांची झुंबड असते. तरुणाईचा यात सहभाग नसेल तर नवलच. आता तर मोबाइलच्या एका क्लिकवर देशभरातील प्रत्येक शहराची छायाचित्रे, व्हिडीओ यासकट सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. एखादे ठिकाण ट्रेण्डिंग झाले की तिथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढते. सध्या अशाच विविध माध्यमांतून धार्मिक स्थळांना भेट देण्याचा ट्रेण्ड तरुण पिढीत वाढताना दिसतो आहे.

viva@expressindia.com