कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना सर्वसामान्य माणसांकडून जगण्याची प्रेरणा मिळते. समाजकारण अधिक प्रभावीपणे करण्याचं एक माध्यम म्हणून त्या राजकारणाकडे पाहतात. वडिल केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे  यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचं वलय असतानाही संवादी वृत्तीनं त्या समोरच्याला जिंकून घेतात. तांत्रिक सुविधांच्या वापरानं नि विधायक युवाशक्तीच्या बळावर परिवर्तन नक्कीच घडेल, असा त्यांना विश्वास वाटतो. ’लोकसत्ता’ आयोजित, ’केसरी’ प्रस्तुत ’व्हिवा लाऊंज’मध्ये प्रणिती िशदे यांच्याशी सोलापूर मतदारसंघ, शासनव्यवस्था, सामान्यांचे प्रश्न आणि त्यांची जडणघडण आदी विषयांवर ’लोकसत्ता’च्या संदीप आचार्य याणि रोहन टिल्लू यांनी प्रणिती शिंदे यांच्याशी संवाद साधला. प्रणिती तांत्रिकदृष्ट्या राजकारणात नवीन असल्या तरीही एखाद्या मुरलेल्या राजकारण्याप्रमाणं त्यांनी उत्तरं दिल्यानं प्रेक्षकांच्या सभागृहातला हा ‘प्रश्नोत्तरांचा तास‘ चांगलाच रंगला.  

कारण राजकारण प्रवेशामागचं..  
राजकारणात यायच्या आधीच मी २००४ मध्ये ‘जाई-जुई विचारमंचा’ची संस्था स्थापन केली. मी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि कायद्याचं शिक्षण घेतलंय. मला लोकांसाठी, लोकांमध्ये, लोकांबरोबर आणि आपल्या देशासाठी काहीतरी करावं, असं मनापासून वाटत होतं. ‘जाई-जुई विचारमंचा’च्या माध्यमातून आम्ही बरंच काम करतोय. त्यात महिला बचतगट, युवकांना रोजगारसंधी उपलब्ध करुन देणं, आदी अनेक प्रोजेक्टस् आहेत. विधानसभा निवडणूक होण्याआधी वर्षभर वाटलं होतं की, लोकांच्या मनासारखाच व्यवस्थेबद्दलचा राग आणि फ्रस्ट्रेशन माझ्याही मनात होतं. मला वाटलं की, या परिस्थितीत काहीतरी बदल व्हायला हवा. आपण नेहमीसारखं तिरहाईतपणं मजा बघण्यापेक्षा किंवा वायफळ बडबड करण्यापेक्षा शासनव्यवस्थेचा भाग होणं महत्वाचं आहे. त्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणजे निवडणूक लढवणं आणि आमदार किंवा खासदार होणं. मी समाजकार्य काहीतरी बदल व्हायला पाहिजेत म्हणून करायला सुरुवात केली. त्याची कुठंतरी सुरुवात व्हायला पाहिजे, या अनुषंगानं मी राजकारणात आले.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?

राजकीय पाश्र्वभूमी..  
वडिलांच्या राजकीय पाश्र्वभूमीचा फायदा होतो आणि मी त्याचमुळं निवडणूक जिंकले. या क्षेत्रात २००४पासून काम केल्यानं मी अगदीच नवीन आहे, असंही नाहीये. पण मला वाटतं, याचा एक तोटाही असतो. सुरुवातीला सगळ्यांना वाटतं की, यांना काही कष्ट न करता सगळं आयतं मिळतंय. पण आपण आपल्या हिमकतीवर पुढं जाणार आहोत, हे आपल्याला सिद्ध करावं लागतं. सत्ताकारणासाठी आपण त्यासाठी राजकारणात आलेलो नाही. तर आपल्याला आपलं काम करायचंय नि बदल आणायाचाय, म्हणून राजकारणात आपण आलोय, हे सिद्ध करण्यासाठी इतरांपेक्षा दमदार काम करावं लागतं. मंत्रालयातली कामं असोत किंवा सभागृहातलं कामकाज असेल, समोरच्यांचा एक दृष्टिकोन असतो की, यांना याची गरज आहे? मी याच कारणासाठी राजकारणात आलेय. कारण मला काम करायचंय. मी माझ्या कामासाठी मी कमिटेड नसेल, तर इथं येऊन फायदाच नाही.

मुंबई मेरी जान..
त्यांचा मतदारसंघ सोलापूर असला तरी त्यांचं शिक्षण मुंबईत झालंय. मुंबईबद्दलच्या आठवणीत त्या रमतात. त्यांच्या मुंबईबद्दलच्या आठवणी खूप आहेत. त्या ‘झेव्हिअर्स महाविद्यालया’च्या विद्याíथनी. कुलाबा, मरीन ड्राईव्ह आणि फोर्ट हे त्यांचे मुंबईतले आवडे भाग. ‘सिटिलाईट’चं रगडापॅटिस असेल, ‘बडेमिया’ असेल किंवा मत्रिणींसोबत व्हिक्टोरियातली सर असेल हे सगळं त्या एन्जॉय करत होत्या. आता अधिकांशी सोलापूरला वास्तव्य असल्यानं वेळ मिळला तरी मुंबईत जास्त बाहेर जाणं जमत नाही. तेव्हा त्या घरीच असतात.
हे खाणंपिणं नि भटकणं एन्जॉय करताना समोरच्याला त्या मंत्रीमहोदयांच्या कन्या आहेत, हे कळायला की मार्ग नसायचा नि आताही ते कळत नाही. त्या सांगतात की त्या त्यांच्यासोबत काहीच लवाजमा घेऊन जात नाहीत. आपण मंत्र्यांची मुलगी आहोत, याचं त्यांनी कधीच भांडवल केलं नाही. महाविद्यालयातही याविषयी कुणाला कळू दिलं नाही. त्यांची जडणघडण तशीच झाल्यानं तसं वागावं, असं त्यांना कधी वाटलं नाही. शालेय जीवनात त्या क्रीडास्पर्धात सहभागी होत. पण शिंदेसाहेबांची मुलगी म्हणून त्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आलेली नाही. त्या म्हणतात की, अशी व्हीआयपी ट्रिटमेंट गावातल्या शाळेत दिली जात असेल, पण मुंबईत असं होत नाही. इथं खूप स्वतंत्र नि पारदर्शी व्यवहार असतो. माहीमच्या ‘बॉम्बे स्टॉकिश’ शाळेत कुणालाच कधी हे जाणवलं नाही. आता कदाचित त्यांना मी शिंदेसाहेबांची मुलगी आहे, हे कळलं असेल.

संधीचं करा सोनं
राजकारणात मी आले, कारण काहीच होत नाहीये, याबद्दल मला फ्रस्ट्रेशन वाटत होतं. म्हणून राजकारणात येऊन एक सुरुवात करुन बघावंसं वाटलं. मला माहित्येय की, माझ्या एकीमुळं परिवर्तन येणार नाहीये. राजकारणात आल्यानंतर खूप फ्रस्ट्रेशन येतंय. कारण माझ्याच लक्षवेधी सूचना तीन-चारवेळा सभागृह तहकूब झाल्यानं लागू शकल्या नाहीत. हा शिष्यवृत्तीचा महत्वाचा विषय होता. परीक्षा तोंडावर आल्या होत्या आणि शिष्यवृत्तीचे पसे अजून आलेले नव्हते. विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नव्हते. अशा वेळी एक चिडचिड-राग असतोच. विधानसभेच्या वैधानिक आयुधांचा तुम्ही सकारात्मक उपयोग करून घेतलात, तर खूप फरक पडू शकतो. फ्रस्ट्रेशन जरी आलं तरी आपल्याच हातात असतं की, आपण त्याचा किती उपयोग करून घेऊ शकतो. म्हणजे ती लक्षवेधी लावणं, त्या प्रश्नांचं बरोबर उत्तर आणणं असा त्याच्यानंतरचा फॉलोअप केला तर ते खूप उपयोगी पडू शकतं. आधी आपण काहीच करू शकत नाही असं जे वाटत होतं, आता ते करण्याची संधी मिळते. सगळ्यांना अशी संधी मिळत असेल तर सगळ्या युवकांनी त्याचं सोनं करून घेणं आवश्यक आहे.

व्यवस्थेची अवस्था
सिस्टिम.. अर्थात व्यवस्था.. या व्यवस्थेत प्रत्येक फाईल पुढं सरकायला किंवा ती जी कार्यपद्धती असते, जी प्रशासकीय दिरंगाई होतो, तिला मी दोषी मानते. कधी कधी कसं असतं की, नेमकं कुठून काय काय बदलणार ? कुठून सुरुवात करणार, असं वाटतं. कारण ही प्रशासकीय दिरंगाई आधीपासूनच आपल्या देशात आहे. त्यात बदल करायचा असेल तर कुठून सुरुवात करावी, हेदेखील लोकांनी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. अनेकांना प्रशासकीय व्यवस्थेविषयी खूपच कमी गोष्टी माहिती आहेत. या सगळ्या कार्यपद्धतीमध्येच आपण मार खात असतो. सिंगल विंडो क्लिअरन्स, युआयडी किंवा आगामी वेगवेगळ्या योजनांमुळं व्यवस्थेत खूपच फरक पडू शकेल.

साधेपणाची शिकवण
आमच्या घरात लहानपणापासूनच राजकीय वातावरण होतं. लाल दिव्यांच्या गाडया नि सरकारी अदब या गोष्टीचं आकर्षण नव्हतं. उलट आई-वडिलांनी जाणीवपूर्वक आम्हाला सर्वसामान्यांसारखं राहायला, वागायला शिकवलं. शाळेत किंवा महाविद्यालयातही आम्ही सुशीलकुमार शिंदे यांच्या मुली आहोत, याची कोणाला माहिती देण्यात आली नव्हती. आम्ही नेहमीच शाळा-महाविद्यालयात जाताना सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचाच वापर केलाय. आमचे वडील हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत, म्हणून आम्हा तिघी बहिणींना कधीही खास वागणूक देण्यात आली नाही. त्यामुळं आमचं संगोपन हे पारंपरिक राजकारणी विचारांत झालेलं नाही, असं स्पष्ट करत प्रणिती यांनी त्यासाठी आपल्या वडिलांचे आभारच मानले. त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या या जडणघडणीमुळं आपल्याला आयुष्याकडं पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाल्याचंही त्यांनी कबूल केलं.

आदर्श.. राजकारण व समाजकारणातले
राजकारणात येण्याआधीपासूनच मी समाजकार्यात होते. समाजकारण अधिक प्रभावीपणं करण्याचं एक माध्यम म्हणून मी राजकारणाकडं पाहते. प्रभावी राजकारणी म्हणून वडिलांचा आदर्श समोर असला तरी मला राजकारण्यांपेक्षाही असामान्य कार्य करून दाखवणारया सामान्यांकडूनच अधिक प्रेरणा मिळते. ‘जाई-जुई विचारमंच्या’च्या माध्यमातून अनेक समाजसेवक, विविध स्तरावर काम करणारयांशी माझा संबंध आला आहे. गडचिरोलीत सामाजिक कार्य उभारणारे डॉ. अभय-राणी बंग, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’च्या माध्यमातून संशोधन करणारे युवक अशा प्रत्यक्ष सामाजिक स्तरावर काम करणारया लोकांकडून मला समाजकारणासाठी जास्त प्रेरणा मिळते.  

अधिकार, सत्तारुढ पक्ष, युती वगरे..
काही वेळा काय होतं की, एखादा विषय चच्रेला येतो आणि मग राजकारण, इतर बाबींमुळं तो व्हिटो केला जातो. यामुळं खूपदा विकासकामं रखडतात. म्हणून सत्तेत एकच पक्ष असायला पाहिजे. आघाडी-युती ही निवडणुकांच्या आधीच घोषित करायला पाहिजे. म्हणजे लोकांना मतदान करताना आपण कोणाला मत देतोय नि त्याचं पुढं काय होणारेय, तो अंदाज येऊ शकेल. नाहीतर ज्याच्या विरोधात मतदान केलं त्याच्यासोबतच नंतर सत्ताधारी पक्ष युती करतात, हे बदलायला पाहिजे. मुख्यमंत्री पदासाठीचा उमेदवार निवडणूकीआधीच घोषित झाला पाहिजे, असं प्रणिती यांना वाटतं.

एकीचं बळ   
भ्रष्ट्राचाराचा प्रश्न हा खूपच गहन आणि साक्षेपी प्रश्न आहे. मी एकटीनं कितीही पावलं उचलली तरी भ्रष्ट्राचार संपणार नाही, याची मला जाणीव आहे. पण कुठं तरी फरक पडेल, असं वाटतं. एका शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित गृहितक मी वाचलेलं की, एका फुलपाखरानं अमेरिकेत पंख फडकवले की त्याचा जो दबाव तयार होतो, त्या दबावामुळं भारतात वादळ होऊ शकतं.. म्हणून मला वाटतं की, आपण जे पाऊल उचलत असतो, त्यामुळं लोकांमध्ये आणि प्रशासनामध्ये फरक पडून बघण्याचा दृष्टिकोन बदलून मानसिकतेत बदल होतो. आपली कामं आपण भ्रष्ट्राचार न करता केली, तर आपल्या भोवतालच्यांवर त्याचा प्रभाव पडतो. भ्रष्ट्राचार हा जगभर असून त्याचा एकूणच सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्यांचा त्याकडं बघण्याचा एकच दृष्टिकोन एकच असला तर त्यात बदल होऊ शकतो.  महाराष्ट्र विधानसभेतले आम्ही सगळे युवक आमदार दबाबगट निर्माण करण्यासाठी एकत्र आलोय. कोणताही महत्वाचा प्रश्न असला तर आम्ही सगळे एकत्र होऊन त्या मंत्र्यांना कोंडीत पकडतो. याबाबतचा एक किस्सा आहे.
एसबीसी आणि ओबीसींच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न होता. काही कारणामुळं शासनाकडून आधी सुरू करुन मग ती थांबवण्यात आली होती. त्याविषयीची लक्षवेधी सूचना माझीच होती, पण विरोधीपक्ष जास्त आक्रमक झाला. आम्ही सगळे एक झालो आणि सभागृह तहकूब झालं. त्यानंतर परत भरल्यानंतर झाल्यानंतर मंत्रीमहोदयांनी त्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. सगळे तरुण आमदार एकत्र जमल्यावर त्यात पक्षविरहित गप्पा होतात. विधानसभेच्या बाहेर पक्षची सीमारेषा राहात नाही. तिथं आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातले अनुभव ऐकायला मिळतात. वर्षांताई गायकवाड यांच्या केबिनमध्ये सगळ्या महिलांना जेवणाचं आमंत्रण असतं. या गप्पाचे विषयात त्या त्या मतदार संघातल्या घडामोडी, प्रत्येकाचे ताणतणाव आदी असतात. कामकाजही खूप होतं. सभागृह चालू असताना या चर्चा करायला कुणालाच वेळ नसतो. चच्रेला आलेले विषयच इतके चांगले असतात की, ते ऐकावेसे वाटतात.

टेक्नॉलॉजीची सकारात्मकता
तांत्रिक सुधारणांचा सकारात्मक पद्धतीनं वापर करता येईल असं सांगत प्रणिती म्हणतात की, ‘मी फेसबुकवर अँक्टिव्ह नसले तरी रिक्वेस्ट अँड करते. ट्विटरवर मी नाहीये. मोबाईवरच्या ई- सुविधांमुळं मतदारसंघातल्या किंवा इतर लोकांच्या प्रश्नांच्या ईमेल्सना रिप्लाय करणं मला महत्त्वाचं वाटतं. नाहीतर मग त्या टेक्नॉलॉजीला काहीच अर्थ उरत नाही. हा रिप्लाय ऑटोरिप्लाय किंवा ‘पीए’रिप्लाय नसतो. सध्या तरी मी तसं करत नाही आणि पुढं कधी तसं करणारही नाही.’

दूर देशी गेले बाबा..
विविध दौरे आणि कामाच्या व्यापामुळं बाबा घरी नसण्याची सवय होऊन गेली होती. त्यामुळं ‘बाबा आत्ता असायला हवे होते’, असं कधी वाटलं नाही. आता राजकारणात आल्यावर मतदारसंघात काही अडीअडचणी येतात, तेव्हा असं वाटतं की ‘बाबा आत्ता असायला हवे होते..‘ म्हणजे या समस्येतून मार्ग दिसला असता. त्यांनी मला निर्णयस्वातंत्र्य दिल्येय. मी राजकारणात यायचा निर्णय हा त्यांचा नव्हता. मी त्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली होती. माझ्या कामात ते कधीच ढवळाढवळ करत नाहीत, पण अनुभव ही किती महत्त्वाची गोष्ट असते, हे मला आता राजकारणात आल्यावर कळायला लागलंय. ते असते तर त्यांनी अमूक एका समस्येचं निराकरण कसं केलं असतं, ते हळूहळू उमगायला लागलंय. याबाबतीत त्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा अर्थातच दांडगा आहे. अशा वेळी कधीतरी त्यांच्या अनुभवाचं महत्त्व जाणवतं. त्याचवेळी त्यांच्याशी बोलता आलं तर.. असं वाटतं.
सभागृहात मी काय विचारावं, वगरे गोष्टी ते कधी सांगत नाहीत. सभागृहात मी बसणं किंवा लक्षवेधी मांडल्यावर त्यांना कुठून तरी कळतं की, मी असं काही मांडलंय. त्यांनी मला निर्णयस्वातंत्र्य दिलंय.

राजकीय मतभेद आणि काम  
मी कोरी पाटी आहे. त्यामुळं माझ्यावर त्या मतभेदांचा फारसा परिणाम होऊ देत नाही, तो होऊ देणंही चुकीचं आहे. माझ्या कामावर राजकीय मतभेदांचा परिणाम झाल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं नाहीये. पहिल्यापासून मी गंभीरपणं काम करत्येय. कदाचित सुरुवातीस कुणाच्या मनात असं काही आलं असू शकतं. पण मला असं काही कधी जाणवलं नाही. पण मी शिंदेसाहेबांची मुलगी म्हणून कधीच कोणासमोर काम घेऊन गेलेले नाहीये. एकंदरित आपल्यावर अवलंबून असतं, की आपण वडिलांच्या नावाचा किती वापर करतो ते. त्यांच्या नावाचा वापर मी कधीच करणार नाही. कारण मी खूप स्वतंत्रपणं आणि प्रामाणिकपणं माझं काम करायचा प्रयत्न करते. त्यात राजकारण आणण्याला काहीच अर्थ नाहीये.
इतर राजकारण्यांशी आपल्या वागण्याबोलण्याविषयी प्रणिती सांगतात की, ‘पवारसाहेबांना मी लहानपणापासून ओळखत्येय. कारण त्यांचा-आमचा घरोबा आहे. मी त्यांना आदरपूर्वक ‘पवारसाहेब’, ‘पवारकाका’ असं संबोधते. त्याशिवाय मी खूपच ज्युनिअर असल्यानं अन्य ज्येष्ठ नेतेमंडळींशी आदर नि सौजन्यानं वागते.’

गुण गाईन आवडी..
प्रणिती सांगतात की, ‘माझ्या बाबांचे काही गुण घ्यावेसे वाटतात. ते खूप वाचतात. माझं वाचन त्यांच्याएवढं नाहीये. मला ते वाढवायला आवडेल. त्यांना राग येत नाही आणि मला येतो. मतदारसंघात काम न झाल्यास फ्रस्ट्रेशऩ येतं. पेशन्स नसतात.. अशा वेळी लगेच रिअँक्ट न होणं ही महत्त्वाची गोष्ट असून ती मला त्यांच्याकडून शिकायच्येय. लगेच रिअँक्ट न होण्याची सवय सगळ्यांना नसते. आपण लगेच रिअँक्ट का होतो, याबाबत आम्हां महिला आमदारांमध्येही जास्त चर्चा चालू असते. कारण ज्यांनी आमच्या वडिलांना काम करताना पाहिलेलं असतं, ते म्हणतात साहेब असं करत नव्हते.. माझे बाबा सतत कार्यमग्न असतात. मी त्यांना अजूनपर्यंत कधी सुट्टी घेताना बघितलेलं नाहीये. किंवा १५-२० मिनिटांपेक्षा अधिक टीव्ही बघतानाही पाहिलेलं नाही. बातम्यांचे चॅनल्स किंवा क्वचित जुनी गाणी लागली असतील तर ते ती बघतात. ‘‘मलाही वडिलांसारखं सतत कार्यमग्न राहायला आवडेल. माझ्यासाठी सध्या तरी मी कामालाच प्राधान्य देणार आहे. त्यसाठी मी माझं सोशल लाईफ सॅक्रिफाईस करत्येय, असं मला वाटत नाही. सध्या तरी मी आराम वगरे करावा, असं मला वाटत नाही. विश्रांती नंतरही घेता येऊ शकते. आता सतत काम करणं, जास्तीत जास्त वेळ मतदारसंघात लोकांसाठी द्यावा असं मला वाटतं.’
‘वडिलांकडून मी अनेक चांगले गुण घेतले असले, तरीही सर्वाशी चांगलं वागण्याच्या नादात अनेकदा त्यांची फसवणूक होते. वडिलांचा हा दोष मी माझ्या राजकीय वाटचालीत टाळणार आहे,’ असं त्या म्हणतात.

अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांविषयी..
सोलापूरात कामगारवर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या आधीच्या आमदारांचा कामगारांच्या प्रश्नावर फोकस असायचा. आता मला त्यांचे प्रश्न सोडवायचेत. म्हणजे यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करणं असेल किंवा सोलापूरातल्या पायाभूत सोयीसुविधा विकसित करायच्या आहेत. उजनीच्या धरणाची संकल्पना माझ्या वडिलांनी २० वर्षांपूर्वी मांडल्यानं आज आम्हांला एक दिवसाआड पाणी मिळतंय. पायभूत सोयीसुविधांचा विकास, कामगारांचे प्रश्न, इतर काही सामाजिक प्रश्न आणि पॉलिसी डिसिजन्स या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण सगळ्यांनी मिळून देवाला साकडं घालूया की, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त कर. अजूनही आपण शक्य तेवढं पाणी वाचवू शकतोय. महाराष्ट्राची एक आमदार म्हणून पाणी प्रश्नासंदर्भात आपण काय करू शकतो, यावर मुख्यत विचार करायचाय. तसंच युवकांना रोजगारसंधी उपलब्ध करून देणं, क्रीडासुविधा उपलब्ध करू देण्यावरही भर देणार आहे.

महिलांवरील अत्याचार..
मला असं वाटतं की, कायदे कितीही कठोर झाले आणि सजा कितीही सुनावली गेली तरी तरी जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत महिलांवर होणारे अत्याचार हे कधीच थांबणार नाहीत. कारण लहानपणापासून घरात, भोवताली महिलांना दिल्या जाणारया वागणूकीतून ते शिकायला मिळतं. मग मोठेपणी त्यातून महिलांप्रती असणारी आदर-सन्मानाची भावना प्रतििबबित होते किंवा त्यांची छेडछाड केली जाते. शासनानं कितीही काहीही केलं तरी जोपर्यंत मानसिकतेत बदल होत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. अर्थात कायदे कठोर होतात आणि मग त्याच्यावर अंमलबजावणी चालू होते आणि मग एक भीती बसते नि त्या भीतीमुळं तसं करायला लोक धजावणार नाहीत.
महिलांवर होणारया अत्याचाराच्या केसेस रिपोर्ट होत नाहीत. त्या रिपोर्ट व्हायला लागल्या तर लोकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल. लोकांचा विश्वास नाहीच आहे यंत्रणेवर. मी स्वत आर. आर. पाटीलसाहेबांकडं मागणी मांडलेली आहे की पेट्रोलिंग व्हँन्समध्ये महिला पोलिस असाव्यात, प्रत्येक कॉलेज किंवा महिला हॉस्टेलच्याबाहेर पोलिसांच्या गाड्या असल्या पाहिजेत. या व्यवस्थेमुळं एक भीती बसेल. अजूनही या मागणीवर काम चालू आहे. जोपर्यंत एखादी घटना घडत नाही, तोपर्यंत यंत्रणेचे डोळे उघडत नाहीत, हे बरोबर नाही. शासनाकडून प्रयत्न झालाच पाहिजे नि मग लोकांच्या मानसिकतेत हळूहळू बदल होईल.
स्त्रियांच्या संदर्भातील होणारया स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कारादी दुर्देवी घटनांमध्ये अपराध्यांना शिक्षा व्हायलाच हवी. त्यासंदर्भात ठोस कायदे व्हायलाच हवेत. जलदगती न्यायालयातर्फे ही शिक्षा सुनावली जायला पाहिजे. एक आमदार म्हणून या संदर्भात मी विधानसभेत आवाज उठवू शकते. शिक्षेची अंमलबजावणी करणं हे मंत्रीमहोदय, न्यायालय व शासननाचं काम आहे. हे लोकांच्या मानसिकतेशी निगडीत आहे. कायदे कठोर होण्यासाठी आम्ही वेळोवेळी आवाज उठवतो. या संदर्भात  शासन लवकरात लवकर पाऊल उचलेल, अशी अपेक्षा बाळगते. यासाठी आम्ही तुमच्यावतीनं शासनाशी भांडू. आंदोलनं करु. वेळ आलीच तर सभागृहातही लढा देऊ. महाराष्ट्र आणि देशातील प्रत्येक महिलेसाठी आम्ही हा लढा देऊ.

आधी नि नंतर..
प्रणिती यांना प्रेक्षकांनी त्यांच्या स्वप्नातल्या राजकुमाराबद्दल विचारलं. त्यांनी सध्या तरी त्यांचं कामालाच प्राधान्य असल्याचं सांगितलं. प्रत्येक मुलीला जसा समजून घेणारा जोडीदार हवा असतो, तसंच प्रणिती यांनाही वाटतं. लग्न करताना समोरचा माणूस कोण आहे, तो काय करतो, हे बघूनच त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला जातो. तेव्हाच समोरच्याची मानसिकता, विचारसरणी आपल्याला कळलेली असते. त्यामुळं दोन राजकीय पक्षांमधील व्यक्तींच्याच नव्हे तर सामान्यांच्याही आयुष्यावर त्या विचारसरणीचा परिणाम होईल की नाही, याचा विचार आधीच केला जावा. लग्नानंतर आडनाव बदलण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, लग्नानंतर नांव बदलणं, हा वैयक्तिक निर्णय असेल. अलिकडं बरेचजण नाव बदलत नाहीत, राजकारण आणि काँर्पोरेट क्षेत्रातही अनेकजणी माहेरचंच नाव लावताना दिसतात. त्या नावाचा आम्हाला अभिमान आहे.

सामान्यांचा राजकारण प्रवेश …
आपल्या लोकशाहीचा खूप मोठा फायदा म्हणजे कुणीही सत्तेत-राजकारणात येऊ शकतं. त्या म्हणतात की, ‘माझ्या वडिलांचंच उदाहरण घ्या, बुढ्ढीचा बाल विकणारा देशाचा गृहमंत्री होतो. आपण या क्षेत्रात पुढं जाऊ शकतो, याविषयी आपल्याला आत्मविश्वास हवा. संधी असते, तिचं सोनं कसं करायचं ते आपल्या हातात असतं. वेगवेगळ्या पक्षांच्या युवाशाखा सुरू झाल्यात, त्या माध्यमातून कामाला सुरुवात करता येईल. मध्यंतरी पालिका निवडणूकांसाठी उभ्या राहिलेल्या ५१ महिला राजकारणात नवीन होत्या. विविध क्षेत्रातल्या या महिलांना संधी मिळाली. त्यांना कोणताही राजकीय पािठबा नव्हता. राजकारणावर आपला किती विश्वास आहे, यावर ते अवलंबून असतं.’ या व्यासपीठाच्या माध्यमातून मी सगळ्या युवकांना आव्हान करते की, ‘कृपा करून तुम्ही राजकारणात या. तुम्ही आलात तरच परिवर्तन होऊ शकतं आणि आता राजकारणात अनेक संधी उपलब्ध आहेत..’

नाही मी होणार मंत्री…
मंत्री होण्याचं स्वप्नं मी सध्या तरी बघत नाहीये. कारण मला काम करायचंय आणि मला इतक्यात मंत्रीपद मिळणं योग्यही नाही. कारण मी खूपच नवीन आहे. सगळे म्हणतात की तुम्ही मंत्री व्हा. पण खरंच माझी इच्छा नाहीये. काम केल्यावर आपोआप ते पद मिळतं, असं सांगत The universe conspires in helping you to achieve it, हे ‘अल्केमिस्ट’मधलं पाउलो कोएलोच्या वाक्याचा त्यांनी खास उल्लेख केला. मंत्रीपद हा माझा फोकस नाहीये. पण ते मिळालंच तर शिष्यवृत्तीचा प्रश्न, मागासवर्गीय महिलांसाठी हॉस्टेल-घरकुल योजना, शिक्षण, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, वेगवेगळी आíथक कल्याणमंडळांच्या माध्यमातून त्यांना आíथकदृष्ट्या सक्षम करण्याला माझं प्राधान्य असेल, असं त्य़ा म्हणाल्या.   

राजकारणातली ‘गुरुकिल्ली’
राजकारणाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललला पाहिजे. सगळ्यांच्या मनात जो राग आहे, तोच माझ्याही मनात आहे, म्हणून मी राजकारणात आल्येय. आता बरेच युवक राजकारणात येताहेत आणि ते कुठंतरी बदलू लागलंय. जे राजकारणात आहेत, त्यांच्यावर राजकारण्यांकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची जबाबदारी आहे. एखाद्यानं वेगळं विधायक काम केलं तरी ते लोकांच्या ध्यानात येतं. असं विधायक काम सगळ्यांनी केल्यानं लोकांचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. शिवाय अँक्सेसिबँलिटी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. तुम्ही तुमचे मतदार, लोकांशी किती संपर्कात आहात आणि लोक तुमच्याशी कसा संपर्क साधतील, हे महत्त्वाचं असतं. विनाअडथळा लोकांनी संपर्क साधणं ही मला वाटतं की राजकारणातली एक ‘गुरुकिल्ली’ आहे. सगळ्या नेतेमंडळींनी तसं केलं तर नक्कीच राजकारणाकडं बघायचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल.

नक्षलवाद आणि आपण…
नक्षलवादी ही आपल्या देशाला लागलेली एक मोठी कीड आहे. पण त्याचबरोबर ते आपले देशबांधव आहेत. ते वेगळे नाहीयेत नि शासनानं त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. ते दहशतवादी नाहीत. ते आपलेच लोक आहेत. त्यांच्याशी चर्चा करून, तिथं पायाभूत सुविधा निर्माण करून तिथला विकास करायला हवा. कारण ते रोजगार आणि विकासापासून वंचित असल्यामुळंच नक्षलवादी होताहेत. जेव्हा आम्ही तरुण आमदार नागपूरात असतो, तेव्हा     यासंदर्भात बरयाचदा चर्चा होत असते नि आम्ही तिथं दौरे करणार आहोत. आमच्या कॉंग्रेसच्या आमदारांनी आम्हांला तिथं यायचं निमंत्रणही दिलंय. यावर एक सोशो-इकॉनॉमिक दृष्टिकोन असायला पाहिजे. फक्त राजकीय दृष्टिकोन ठेवल्यास काही मार्ग निघणार नाही. त्यासाठी आम्ही आमदार नवीन कल्पना शासनापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कामही मेरी पहचान…
‘माझ्या कामकाजाव्यतिरिक्त माझी कोणती गोष्ट लक्षात राहिल, ते लोकांनाच विचारा,’ असं त्या म्हणाल्या. राजकारणात येऊन मला ३-४च वर्ष झाल्येत. अजून मी अनुभव घेत्येय. खूप निरीक्षण करत्येय. खूप शिकायचा प्रयत्न करत्येय. आपल्यानंतर आपण काय मागं राहतं, हे महत्त्वाचं असलं तरीही त्यासाठी म्हणून मी काम करत नाहीये. मी काम करत्येय कारण मला त्यातून आनंद मिळतोय. उर्जा मिळत्येय. त्यातून पुढं जाऊन असं काही घडेल की त्यातून मी लक्षात राहीन.. माझा ठसा उमटेल..    

राजकारण्यांची मुलं राजकारणी…
डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो तर राजकारण्यांच्या मुलांनी का नाही राजकारणात यावं ? असा प्रश्न प्रणिती विचारतात. ती पाश्र्वभूमी आमच्यासाठी तयार असते. गाठीशी अनुभव असतो. तिथल्या लोकांसोबत आम्ही लहानपणापासून वडिलांना बघत असतो. त्यामुळं राजकारण्यांच्या मुलांनी राजकारणात येण्यात काही गर नाहीये. माझ्या वडिलांच्या मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ असून मी जिथून उभी राहिले होते, तो सगळ्यात अवघड मतदारसंघ होता. माझ्या विरोधात आडाम मास्तरांसारखे दिग्गज नेते होते. पण मला मोहोळसारख्या सोप्या नव्हे तर हाच सोलापूर मध्यवर्ती विभागातून लढायचं होतं. कारण इथल्या तत्त्वप्रणालीला माझा विरोध होता. मी त्यांच्याविरोधात कधीच नव्हते. निवडून आल्यानंतर मी त्यांचा आशिर्वाद घेतला होता. मला तिथली विकासकामं करायची होती आणि विकासकामं करण्यात राजकारण येऊ नये, हा माझा हेतू होता.
गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात काम करायला मला आवडेल. पण प्रत्येक मतदारसंघ हा कुणाना कुणाचा तरी असतो. तिथं आपण अतिक्रमण करणं योग्य नाही. काहीजणांना ते खटकतं. मी सोलापूरची लोकप्रतिनिधी असले तरीही मी महाराष्ट्रासाठी काम करत्येय नि मी देशासाठी काम करत्येय. माझा दृष्टिकोन कधीच केवळ माझ्या मतदारसंघापुरता संकुचित-मर्यादित असणार नाही.

विकासाच्या सीमारेषेवरून..
विविध क्षेत्रातील लोकांच्या गाठीभेटी घेणं हे खूप मह्त्वाचं असतं. कारण अनुभव हा सर्वोत्तम गुरू असतो. मी ‘जाई-जुई विचारमंच्या‘च्या स्थापनेपासून समाजकारणाला सुरुवात केली. ‘जाई-जुई‘ आणि माझं राजकारण ही दोन्ही विभिन्न क्षेत्रं आहेत. त्यात कधीच सरमिसळ होणार नाही. या संस्थेची स्थापना मी राजकारणासाठी केलेली नाहीये. समाजकारण आणि राजकारणातली ही अदृश्य सीमारेषा वेळीच ओळखायला हवी. सत्तेची हवा डोक्यात जाऊ न देता आपण राजकारणात कशासाठी आलोय, हे विसरता कामा नाही. ‘जाई-जुई‘च्या माध्यमातून लोकांना विकासाकडं आणण्यापेक्षा विकासाला लोकांकडं घेऊन जाणं महत्त्वाचं आहे. गावागावात आयटीआय कोस्रेस, रोजगाराच्या विविध संधी, मोठ्या फँक्टरीज-इंडस्ट्रीज निर्माण करू शकलो तर या देशातली ६०-७० टक्के गावं स्वयंपूर्ण होऊ शकतील.  

महासत्तेचं स्वप्नं
भविष्यात भारत महासत्ता होईल, असं शंभर टक्के  मला वाटतं. भ्रष्ट्राचार निपटून काढायचा असेल, तर सगळ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण कुठं ना कुठं तरी आपणही भ्रष्ट्राचाराला बळी पडत असतो. हे दुष्टचक्र भेदायला हवं. ज्या पध्दतीनं आपला विकास होतेय, आíथक विकास होतोय, त्यावरून भारत महासत्ता बनेल नि त्यात राजकारण्यांचं नाही तर सामान्य लोकांचं जास्त योगदान असेल.

महिलांसाठीचे कायदे
महिलांसाठी जे काही कायदे आहेत, ज्या कायद्याच्या माध्यमातून त्यांना फायदा होऊ शकतो. संरक्षण मिळू शकतं,  त्या संबधित मी विधानसभेत प्रयत्न करत आहे. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी नाही पण इतरत्र महिलांवर अत्याचार होत आहेत. अजूनही महिलांचं पद हे नावापुरतं आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मी माझ्याकडून प्रयत्न करेन. असा प्रयत्न करेन की, आता आम्हाला 33टक्के, ५०टक्के आरक्षण द्यायला लागतंय. पण ते आरक्षण द्यायची वेळच येणार नाही.

सोलापूर मतदारसंघ..
आडम मास्तरांच्या विशिष्ठ तत्त्वप्रणालीच्या विरोधातली ही निवडणूक होती. ती तत्त्वप्रणाली विकासाच्या विरोधात होती. एखादा नवीन उद्योगधंदा उभा राहत असेल, तर तर त्याच्या विरोधात ट्रेड युनियन्स, कामगारांचे मोच्रे वगरे यायचे. त्यामुळं सोलापूरात इंडस्ट्रीज यायला घाबरायच्या. आताच्या काळात तत्त्वप्रणाली कितपत अंमलात आणू शकतो, याविषयी माझ्या मनात शंका आहे. आता विकासात्मकतेवर सगळ्यांनी लक्ष्य केंद्रित करणं महत्वाचं आहे.
लोकांना विकासाकडं आणण्यापेक्षा लोकांकडं विकास नेणं महत्वाचं आहे. त्या अनुषंगानं मी सोलापूरात ‘इंडिया स्केल‘ या नावानं उपक्रम चालू केलाय. त्या माध्यमातून मुलांना ट्रेिनग दिलं जातं आणि तीच कंपनी मुलांना वेगवेगळ्या कंपन्यामध्ये नोकरी देते. ही एक ऑलराऊंडेड प्रोसिजर आहे. एके काळी सोलापूरात यायल्या इंडस्ट्रीज घाबरायच्या. पण आता ‘एमपीपीसी‘, ‘थरमँक्स‘, ‘भारत फोर्ज‘सारखे मोठे प्रकल्प सोलापूरात आले आहेत. काही प्रमाणात सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील युवक तिथं नोकरीला लागलेत. काही मुलं बाहेरगावी शिकली तरी त्यांनी सोलापूरांत येऊन स्वत:चा उद्योग सुरु केलाय. स्टॉक एक्सेंजचं ट्रेनिंग आम्ही सुरु करणार आहोत.
सोलापूरी चादरी अजूनही खूप प्रसिद्ध आहेत. हा उद्योग मोठ्या प्रमाणात असून त्यातील यंत्रमाग-हातमाग कामगारांसाठी शासनाकडून वेगवेगळी पॅकेज आणणं ही आमची जबाबदारी आहे. तसे काही पॅकेजेस गेल्या काही वर्षांत आम्ही आणू शकलोय. हा उद्योग जिवंत राहिला पाहिजे. तो टिकला पाहिजे, यासाठी आम्ही काम करत आहोत. कामगारांच्या मुलांना त्यात रस वाटण्यासाठी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

निवृत्ती नि प्रवृत्ती.. राजकारणातली..
निवृत्ती ही प्रत्येक क्षेत्रात असायलाच पाहिजे. पण मला वाटतं की ते आपल्यावर असतं की, आपण कितपत होल्ड करू शकतो आणि जेव्हा आपण होल्ड करू शकत नाही, असं वाटतं तेव्हा निवृत्ती घ्यायलाच हवी, असं माझं मत आहे. पक्षात बंडखोरी करणं ही चुकीची गोष्ट आहे. हे थांबवण्यासाठी कठोर कायदे करणं महत्त्वाचं आहे. बंडखोरी करणारयावर पक्षानं कठोर कारवाई केलीच पाहिजे. मला तिकिट मिळालं नाही, तर मी कधीच बंडखोरी करणार नाही. कारण कॉंग्रेस पक्ष हा आमचा पक्ष आहे. लहानपणापासून आमच्या मनात तो रुजलाय. पक्षाशी गद्दारी म्हणजे देशाशी गद्दारी, असं मला वाटतं, नि मी ते कधीच करणार नाही.
राजकारण साधारण दर पाच वर्षांनी बदलत असतात. पण नोकरशहा २५-२५ वर्षांत बदलत नाहीत. त्यात काही चांगल्या लोकांची चांगली उद्दिष्ट्यं असतात. पण मला वाटतं या नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण राजकारण्यांना नोकरशहांएवढा कामाचा अनुभव नसतो. राजकारणी हे लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले असतात नि नोकरशहा हे व्यस्थेशी तांत्रिकदृष्ट्या जोडलेले असतात. कोणताही लोकशाहीवादी देश चालवण्यात राजकारणी नि नोकरशहांचा सहभाग महत्त्वाचा असतो.

मं सोलापूर से आयी हूँ…
आम्ही पक्के सोलापूरकर आहोत. तिथल्या चटण्या, चादरी वगरे वगरे.. आम्ही सगळ्या वस्तू सोलापूरच्याच वापरतो. तिथं आणि इतरत्र होणारया बँनरबाजीला माझा विरोध आहे. त्या अनुषंगानं मी बरयाचदा माझं मत मांडलंय. बँनरवर खर्च केल्या जाणारया पशांनी दुष्काळग्रस्तांना मदत करा. बँनरबाजीचं प्रमाण गावोगावी जास्त असून मानसिकता बदलेस्तोवर ते बदलणार नाही. जेष्ठ नेत्यांची जयंती साजरी करण्यापेक्षा गोरगरीबांपर्यंत विकास पोहचवण्याचं त्यांचं स्वप्न आपण अस्तित्वात आणू शकतो. पण दुर्देवानं तसं होताना दिसत नाही. माझ्या परीनं मी खूप प्रयत्न करत्येय. शिवाय सोशल साईटससच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत पोहचणं खूप महत्त्वाचं आहे.
सोलापूरमधली बँनरबाजी मी बंद केल्येय. तिथल्या आयुक्तांसोबत एक मिटिंगही झाल्येय. पण बँनरबाजीच्या बाजूनं असणारयांची संख्या जास्त असून मी यात राजकारण करत्येय, असं त्यांना वाटतंय. माझे बँनर मी काढायला लावते. न्यायालयाचा निर्णय मानायला हे लोक तयार नाहीत, याबद्दल आता काय करावं ?
सोलापूरात मराठी, तेलगू, कन्नड, अल्पसंख्याक आदी मंडळी राहत असल्याचा आम्हांला अभिमान आहे. सोलापूर हा एक कल्चरल मेिल्टग पॉट म्हणतात, तसा तयार झालाय. पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, स्वामी समर्थाचा मठ ही ठिकाणं आमच्या सोलापूरात असल्यानं आम्ही तिथं पर्यटनक्षेत्र विकसित करतोय. केंद्र सरकारकडून पँकेज आणायचा प्रयत्न करतोय. सोलापूराला सांस्कृतिक चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. तिथल्या मोठाल्या सभागृहांत बरेच कार्यक्रम होतात. तिथल्या किल्ल्यात एखादी ऑíकआँलाँजिकल टूर आयोजित करण्याचा विचार चालू आहे. पण निधीअभावी आम्ही काही ठोस योजना आखू शकत नाही.

आशीर्वाद, शुभेच्छा नि आभार
८० वर्षांच्या एका आजोबांनी प्रणिती यांना, युवकांच्या माध्यमातून परिवर्तन घडवून ज्येष्ठांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यावर प्रणिती यांनी त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्या म्हणाल्या की, ‘व्हिवा लाऊंज‘मध्ये यायचं खूप दडपण होतं. कारण मी खूप लहान आहे अजून. माझा अनुभवही खूप कमी आहे. या व्यासपीठावर आतापर्यंत आलेल्या आलेल्या सगळ्या महिला माझ्यापेक्षा खूप दिग्गज आणि अनुभवी आहेत. म्हणून खूप लवकर मला ही संधी दिल्याबद्दल ‘लोकसत्ता‘ नि ‘व्हिवा लाऊंज‘च्या टीमची मी मनपूर्वक आभारी आहे. जनता सोलापूरची असो किंवा अन्य ठिकाणची, जनतेच्या आशीर्वादाचं मोल खूप आहे.

उपस्थितांच्या प्रतिक्रिया

प्रणितीताईंचे बोलणे खूपच प्रेरणादायी होते. त्यांनी बीसी-ओबीसीबद्दलच्या स्कॉलरशिप मिळण्याकरता विधानसभेत मांडलेल्या मुद्दय़ाला सफलता मिळाली हे ऐकून छान वाटले. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट कळली की, सर्वसामान्य लोकंदेखील खूप काही अचीव करू शकतात. त्या सोलापूर जिल्ह्याच्या आमदार आहेत व तेथील पाण्याच्या प्रश्नावर त्यांचे काम चालू आहे. तसेच त्यांचे समाजकार्य पण खूप वेगाने चालू आहे हे समजल्यावर बरे वाटले.
माधवी सुरंजे

प्रणितीताईंचा आवडलेला इलेक्शनबद्दलचा मुद्दा म्हणजे एक पक्ष दुसऱ्याच्या विरोधात असेल व आपण एकाला मत दिले व नंतर त्यांची युती झाली तर ही आपली फसवणूक झाली नाही का? कार्यक्रम मस्त झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मॅडमशी संवाद साधता आला. ठरावीक प्रश्न न विचारता मोकळेपणाने प्रश्न विचारण्याची मुभा यात असल्यामुळे प्रेक्षकांना मनमोकळा संवाद साधता आला.
ओंकार

मॅडमच्या बोलण्यातून त्या खूप प्रॉमिसिंग वाटतात. स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल व भ्रष्टाचाराबद्दल त्या जे बोलल्या ते पटले. यावर नुसते कायदे करून उपयोगी नाही तर ते स्वत:ला कळले पाहिजे की काय चूक काय बरोबर. कोणालाही कायद्याची सक्ती करून उपयोगी नाही ते मनापासूनच वाटले पाहिजे.
शांभवी मोकल

तरुण राजकारणी म्हणून प्रणितीताईंना ऐकायची मला इच्छा होती. त्यांचे भ्रष्टाचाराबद्दलचे विचार जाणून घ्यायचे होते, म्हणून कार्यक्रम बघायला आले. समाजातील घडामोडींवर माझ्या मनातील शंकांचे निरसन मॅडमनी केले म्हणून खूपच बरे वाटले. त्या फक्त राजकारणी नसून समाजकार्यात पण त्यांचे अक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे.
प्रचीता जोशी

वाढत्या गुन्हेगारीवर आळा घातला पाहिजे त्यासाठी कायदे हवेत असे आपण म्हणतो, पण ताई म्हणाल्या ते पटले की, बदल हा स्वत:कडूनच व्हायला हवा. कुठलाही गुन्हा करणे चुकीचे आहे हे फक्त एक-दोघांना वाटून उपयोगी नाही, तर सगळ्यांना वाटले पाहिजे. पाण्याच्या प्रश्नाबद्दल पण मला असेच वाटते की, प्रत्येकाने पाणी वाचवणे आपल्या घरापासूनच सुरू केले पाहिजे. एकत्रित प्रयत्न महत्त्वाचा.
अथर्व करंदीकर

पाण्याच्या प्रश्नाबद्दल प्रणितीताईंचे काम चालू आहे, पण मला स्वत:ला असे वाटते की, आपण प्रत्येक वेळी व्यवस्थेलाच दोष देण्यात अर्थ नाही. ती बदलायची असेल तर आपल्याला त्याचा एक भाग बनणे गरजेचे असते, तरच आपण काही सुधारणा करू शकतो. कार्यक्रम खूपच छान झाला. अशा कार्यक्रमातून मोठय़ा लोकांबरोबर संवाद साधता येतो.
समर्था पवार
संकलन : ग्रीष्मा जोग-बेहेरें