माणसं मोठी (कर्तृत्वाने) कशी होतात? ही प्रोसेस समजून घेणं समृद्ध करणारं असतं. ‘डी’ कंपनी आणि त्याचे ‘द’ मालक यांचा प्रवास दंतकथा वाटावा असाच. मोठं होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आयता डेमो.
अंबानी, अदानी, बियानी याच उद्यमशील प्रवर्गातलं दमानी हे आडनाव. ‘राधाकिशन दमानी’ ऊर्फ मिस्टर व्हाइट अँड व्हाइट हे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कंपनीने व्हायरलत्वाची लाट नव्हे, त्सुनामीच उडवून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच दमानी यांनी आपल्या कंपनीचा आयपीओ बाजारात आणला. कंपनीला आणखी मोठं करण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या भागभांडवलाची आवश्यकता होती. सोप्या भाषेत सांगायचं तर आतापर्यंत ‘अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स’ कंपनी फायदे-तोटय़ाचा ताळेबंद स्वबळावर हाकत होती. दमानी यांना मोठं क्षितिज खुणावत होतं आणि लोकांनी भांडवल गुंतवावं या उद्देशाने प्रतिशेअर २९९ रुपये किमतीने सलामी केली. शेअरची किंमत उसळून ६४०वर गेली आणि आयपीओला शंभरपटीत असा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कंपनीचे बाजारमूल्य झाले ३९,९८८ कोटी. दमानी आणि कुटुंबीयांकडे ८२.३६ टक्के मालकी आहे, ज्याची किंमत होते साधारण ३२, ९३४ कोटी.
क्रिसिलचं पतमानांकन आणि सेबीच्या निकषातून तावून सुलाखून निघाल्यानंतर दमानी कंपनीने ही गरुडभरारी घेतली आहे. खुद्द दमानी मीडियापासून लांब असतात. वर्तमानपत्रांच्या कचेऱ्या, चॅनेलचे न्यूज रूम कुठेच नसतात. ऊठसूट पल्लेदार मुलाखती, खंडीभर जाहिराती असंही काही होताना दिसत नाही. पेज थ्री वर्तुळातही नसतात. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणारे मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन गृहस्थ भासावेत असं हे व्यक्तिमत्त्व. पण त्यांच्या कंपनीने भल्याभल्यांची झोप उडवली आहे.
बॉलबेअरिंग व्यावसायिक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी भावाच्या बरोबरीने ‘स्टॉक ब्रोकिंग’ व्यवसायात एंट्री घेतली. त्यांचं वय होतं ३२, उमेदीचं वय. स्टॉक, कॅपिटल, निफ्टी, सेन्सेक्स, दलाल स्ट्रीट या कशाचीच त्यांना माहिती नव्हती. हळूहळू त्यांनी माहिती करून घेत जम बसवला. हर्षद मेहता प्रकरणानं झाकोळलेला हा कालखंड होता. क्षेत्रातल्या मातब्बरांना त्यांनी गुरुस्थानी मानलं. बारकावे टिपून घेतले. ‘ट्रेडर’ आणि ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टर’ अशा दोन आघाडय़ांवर मांड ठोकली. आकडय़ांचे जुगाड तेजीत असतानाही दमानी यांना रिटेल कन्झ्युमर बिझनेस खुणावत होता. यातूनच त्यांनी स्टॉक मार्केट सोडण्याचा निर्णय घेतला. क्रॉफर्ड मार्केट ते एपीएमसी मार्केट अशा नानाविध बाजारपेठांचा अभ्यास केला. काय खपतं, कसं विकलं जातं, कसं विकावं, कसं विकू नये हे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांशी बोलून समजून घेतलं. यादरम्यान त्यांनी नेरुळमध्ये अपना बझारची फ्रँचाइजी विकत घेतली. २००३ मध्ये पवईत स्वत:चं सुपरमार्केट सुरू केलं. एका छपराखाली किराणा, घरगुती साहित्य, सौेंदर्यप्रसाधनं, कपडे, पादत्राणं, खेळणी, स्टेशनरी मिळावं अशी व्यवस्था. नाक्यानाक्यांवर, गल्लोगली नांदणाऱ्या किराणा कम जनरल स्टोअर्सना शह देणारं हे मोडय़ुल अपना बझार, रायगड बाजार अशा विविध पॅटर्नमध्ये सुरू झालं होतं.
वेगळेपण असल्याशिवाय रुजता येणार नाही हे जाणून दमानी यांनी रीतसर एक कलमनामाच अंगीकारला. बाजारभावाच्या तुलनेत ६ ते ८ टक्क्य़ांनी किमती खाली आणल्या. शेकडो टन माल एकदम खरेदी केल्यामुळे ग्राहकाला कमी किमतीत माल विकणं शक्य झालं. गरीब ते श्रीमंत या पोकळीतला मध्यमवर्ग टार्गेट ऑडियन्स ठरला. म्हणूनच एसीची हवा खात विंडो शॉपिंग करण्याची जागा असलेल्या मॉलमध्ये सुपरमार्केट सुरू करण्याचं कसोशीनं टाळलं. दर्जा असेल तर ग्राहकराजा संतुष्ट होतो हे तत्त्व बिंबवून स्वच्छ धान्य, काटेकोर पॅकिंग, वस्तूंची नेटकी मांडणी आणि घेतलेल्या वस्तू कॅरी करण्यासाठी पुरेशा ट्रॉलीज आणि बकेट्स यांची व्यवस्था करण्यात आली. टायसूट बुटात वावरणारे, बेगडी सौजन्य मिरवणारे, कॉन्व्ह्ेंटी इंग्रजी बोलणारे सेल्समन युवकयुवती दमानी यांच्या व्यवस्थेचा भागच नाही. स्वावलंबन हा बेसिक फंडा. मदत लागली तर स्टाफ असतो, पण त्याचं दडपण येत नाही. ग्राहकांना आपलंसं करण्यात या क्लृप्तीने मोठी भूमिका बजावली आणि दमानी यांचा बराच पैसाही वाचला. पायपुसण्यापासून गव्हाच्या पोत्यापर्यंत सगळ्याचं बारकोडिंग केलेलं. बीप अशा आवाजाद्वारे वस्तू आणि किंमत कॅश काऊंटरवर व्हॅलिडेट होते. तुमच्या बॅगा-पिशव्या घेऊन आत जाऊ शकत नाही आणि आतलं काहीतरी ढापून बाहेर पडता येत नाही इतकी कडेकोट बंदिस्ती. हे दुकानाच्या आतलं झालं.
सुपरमार्केटची जागा भाडय़ाने घेण्याऐवजी विकत घेण्यावर दमानी यांचा भर असतो. जागेची किंमत वाढतच जाते आणि गाठीशी मालमत्ता राहते. बरं जागा घ्यायची ती शहराच्या मध्यवर्ती भागात जाण्यायेण्याच्या दृष्टीने सोयीची अशी. मोठं पॅकेज देऊन स्मार्ट माणसांना भरती करण्यापेक्षा दहावी पास माणसाला घेऊन त्याला सर्वसमावेशक ट्रेनिंग देण्यावर दमानी यांचा भर. यामुळे सुपरमार्केट शहरात असतं त्याच्या आजूबाजूच्या गावातील मुलामुलींना काम मिळालंय. ज्यांच्याकडून माल विकत घेतोय त्यांचं देणं अवघ्या काही तासांत चुकतं करण्यावर दमानी यांचा प्रयत्न असतो. ऑनलाइन खरेदी ट्रेण्डिंग असतानाही दमानी यांनी प्रत्यक्ष खरेदीविक्रीवरच भर दिला. वायफळ जाहिराती आणि अविचारी एक्स्पान्शन हे दमानी यांच्या तत्त्वात नाही. म्हणूनच १५ वर्षांत सुपरमार्केट्सची संख्या आहे फक्त १२९. पण गेल्या वर्षीचा कंपनीचा निव्वळ नफा आहे ३.२ बिलियन.
फोर्ब्सतर्फे तयार करण्यात आलेल्या लब्ध-प्रतिष्ठितांच्या यादीत दमानींचं नाव आहे. ‘काम इतनी खामोशी से करो की कामयाबी शोर मचा दे’ या उक्तीसह समकालीन सुपरमार्केट्सना पिछाडीवर टाकणाऱ्या दमानींच्या कंपनीचं नाव आहे- ‘डी मार्ट’! viva@expressindia.com