पाऊस आपल्याच सुरात मस्त गात होता, सुरुवातीची रिपरिप त्यानं थांबवली आणि त्यानं रिमरिम तराने गायला सुरुवात केली. सगळीकडे मस्त हिरवकंच दिसत होतं, त्या हिरवळीतही एवढी व्हरायटी होती की, कदाचित रंगाच्या पेटीत किंवा फोटोशॉपमध्येही एवढी नसेल. आफ्टरऑल निसर्गच तो, सर्वाच्याच पल्याडचा. दूरवर डोंगराचं आणि आभाळाचं मस्त मिलन झालेलं होतं आणि इतरांनी ते पाहू नये, याची काळजी धुकं घेत होता. आल्हाददायक, या शब्दाची अनुभूती येत होती. वाफाळता चहा समोर होता, त्यामधून मस्त आल्याचा सुगंध दरवळत होता. पाऊस आणि आल्याचा चहा, काय मस्त कॉम्बिनेशन आहे, प्रत्येकाला आपलंसं, हवंहवंसं वाटणारं. पण तरीदेखील तो अस्वस्थ होता, कारण गेल्या अध्र्या तासात त्याच्या चार कटिंग झाल्या होत्या. त्यामुळे चहाची तलब त्याला नव्हतीच. या मुलीपण ना कधी वेळेवर यायच्या नाहीत, मध्य रेल्वेसारख्या कायम उशिरा. त्यामुळेच हा तिची वाट पाहत टपरीच्या आतमध्ये उभा होता. शेवटी कंटाळून त्यानं सातवा कॉल केला, ‘हा अरे आलेच, रस्त्यावरच आहे, दोन मिनिटांत आले बघ,’ असा रीप्लाय ऐकला आणि फोन लॉक करून हताश हातानं खिशात ठेवला. ही बया कधी येणार, किती वेळ बोलणार आणि कधी निघणार, हे सारं टेन्शन त्याच्या चेहऱ्यांवरच्या रेषांमधून जाणवत होतं. घरून निघताना गाणी ऐकून झालेली, मोबाइलमधला गेम खेळून कंटाळा आलेला, त्यामुळे निर्विकार, करुण चेहऱ्यानं तो तिची वाट पाहत राहिला. पाऊस खरं तर रोमँटिक, त्यामुळेच त्यानं तिला बोलावलेलं, तिच्याबरोबर त्याला भिजायचं होतं, पण तिला झालेला उशीर याच्या थोडा जिव्हारी लागला होता, कारण पावसामुळेच तिला उशीर झाल्याचं काही तरी ती बोलत होती, रेंज नसल्यामुळे स्पष्ट ऐकू आलं नाही. पण कवी, लेखक लोक पावसावर रागावत नाहीत, असं म्हणतात, तसाच तो.
मिस कॉल आला, हिचाच होता, त्याने टपरीचं प्लॅस्टिक बाजूला करून पाहिलं तर ही आली होती, मस्त गुलाबी छत्रीत सुंदर पांढरा जरीची बॉर्डर असलेला शॉर्ट कुर्ता आणि जीन्स. खरं तर त्याला तिला पावसात साडीत बघायचं होतं, पण ते प्रॅक्टिकल नव्हतं, हे त्यालाही कळून चुकलं होतं. पण हे कॉम्बिनेशन त्याच्या आवडीचंच होतं. त्यानं तिला हाक मारली, तशी ती टपरीजवळ गेली, कटिंग मारणार का, असं त्यानं विचारलं, तिनं मानेनंच नाही म्हणून सांगितलं. सावकाश पावलं टाकत तो तिच्या छत्रीत शिरला. ‘नाही माझ्या चार कटिंग झाल्या बसून बसून म्हणून तुला विचारलं,’ हा त्याचा टोला तिला कळला, ती काहीच बोल्ली नाही. थोडा वेळ थांबली आणि अरे पाऊस पडला ना की त्या कुल्र्यात ट्रेन हमखास थांबतात यार, त्यामुळे उशीर झाला, त्यावर तो काहीच बोल्ला नाही, रागावलेला होताच, पण अबोला धरण्याइतका नक्कीच नाही. हळूहळू चालत दोघांनी चिखलानं मळकट झालेला रस्ता धरला.
पावसाची रिमझिम चालूच होती. एकच छत्री असल्यानं दोघे एका बाजूनं भिजत होते. पाऊस पडतोय माहितीए ना, मग छत्री आणायची ना, इथे मी पण भिजतेय आणि तू पण, असं बोल्ल्यावर तो छत्रीतून बाहेर जायला निघाला खरा, पण तिने कॉलर पकडून त्याला छत्रीत खेचला. एवढा काय चिडतोस, मी उशिरा आले मान्य, पण मुद्दामून थोडीच आले आणि पावसात तुझ्याबरोबर एकाच छत्रीत जाण्याचा चान्स कोण सोडेल, असं थोडंसं लाजत, मुरडत म्हटल्यावर या भाईंचा राग विरून गेला. तिचं हास्य याच्या ऱ्हदयावर वार करून जायचं, तेव्हा त्याला काहीचं सुचायचं नाही, तसंच आता झालं. तिच्या खळीत त्याचा सारा राग विसावला, शांत झाला. त्यानं तिच्याकडे पाहिलं, तिच्या ओठांवर अजूनही स्मित कायमच होतं. तो वेडा व्हायचा बाकी होता, पण त्यानं सावरलं स्वत:ला. पार्क समोरच आलेलं, गेटवर एक वॉचमन होता, पिवळा रेनकोट, डोक्यावर गोल प्लॅस्टिकची काळी टोपी आणि हातात दांडा, अशा प्रॉपर्टीसह तो उभा होता. पावसाची रिमझिम थांबलेली, त्यामुळे तिनं छत्री बंद केली, दोनदा झटकली. तो तिची सर्व प्रात्यक्षिकं पाहत होता. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं तेव्हा त्यानं, जायचं ना आत, असं नजरेनेच विचारलं, त्याच भाषेत त्याला लडिवाळपणे उत्तरही आलं. दोघंही गेटमध्ये शिरले. यानं वरच्या खिशातून एक नोट काढली, वॉचमननं आपसूकच हात पुढे केला आणि पैसे घेतल्यावर डाव्या हाताला तीन अशी खूण केली, त्याला ती कळली, पण तिला काहीच कळेना, ती वॉचमनपुढं काहीच बोल्ली नाही. पाच पावलं चालल्यावर, हे काय, त्यावर तो दबक्या स्वरात म्हणाला, अगं इथं याला पैसे टेकवले की हा मस्त जागा सांगतो बसण्यासाठी, तिथे थोडी फार व्यवस्थाही करून ठेवतो, असं बोलत असतानाच ती म्हणाली, ओके, असं काय, पण मला सांग तुला कसं माहिती, तू कोणाबरोबर आला होतास इथं, (मुलींचा आणि बायकांचा टिपिकल संशय) या प्रश्नावर त्याची तिडीक गेली. अगं तू एकच थोडी माझी जीएफ आहेस, बऱ्याच आहेत ना, त्यांच्याबरोबर आलो होतो. असं म्हटल्यावर तिचाही पारा चढला, तो डोळ्यांतून दिसला. काय यार तू पण, अगं तो मक्या आहे ना, तो एकदा इथे आला होता, त्यानं मला ही आयडिया सांगितली. बोलत बोलत हे दोघे तिसऱ्या झाडाजवळ पोहोचले. झाडाच्या मागे खाली मस्त एक बॅनर टाकलेला होता आणि वरही तसाच एक बॅनर लटकवलेला होता. त्यामुळे जागा जास्त ओलसर नव्हती. तिनं खालच्या बॅनरवर खांद्याला अडकवलेली बॅग ठेवली, त्या बाजूला छत्री ठेवली आणि सँडल काढून मस्त पाय मोकळे करून बसली, मस्त सेटिंग आहे यार ही, कोणाची कटकट नाही आणि वॉचमन म्हणजे आपल्यासाठी देव माणूसच, काय व्यवस्था आहे, सही. असं तिचं बोलणं त्यानं ऐकलं, पण तो शूज काढत होता, त्यामुळे फक्त ओठांवरच्या किंचितशा हसण्याने त्यानं रीप्लाय दिला.
अरे त्या कुल्र्याला पावसामुळे ट्रेन लेट आणि घरून निघताना पप्पा आले नेमके, मग त्यांनी विचारलं कुठे चाल्लीस, कधी येणार वगैरे वगैरे, तिला थांबवत ‘तुझा बाप पण ना आई शपथ’, त्याला पुढचं बोलू न देता ती म्हणाली, बाप काय बाप, बाबा म्हण किंवा वडील म्हण, तू लिहितोस चांगलं आणि बोलताना असे काय शब्द वापरतोस, मला हे चालणार नाही हा, आधीच सांगून ठेवते. बरं बाई, ज्यांचे चरण धुऊन तीर्थ प्यावं, अशा तुझ्या पूज्य बाबांना कळत नाही का, जाताना कुणाला विचारू नये कुठे जातोएस म्हणून. त्यावर थोडी ती नरमली, हा तुझं पण बरोबर आहे. पण जाऊ दे झालं ते झालं. त्यानेही चल छोड यार, असं म्हणत प्रेमाच्या मिठीचा हार त्यानं तिच्या गळ्यात टाकला. ती देखील थोडीशी मूडमध्ये आली. कोण काय बोलणार, शब्द नव्हतेच, स्पर्श सारं काही सांगून जात होता. मस्त फ्रेश वातावरणात रोमान्स सुरू झाला होता. सुरुवातीचा डोळ्यांच्या नजरेचा खेळ ओठांवर येऊन थांबला, सारं बेधुंद, अमृताची गोडी अनुभवावी असंच काहीसं.
थोडय़ा वेळाने ती थोडी लांब गेली, गळ्यातला हार थोडा सैल झाला. रिव्हर्स गेअरमधून गाडी पुन्हा नजरेवर आली. काय मस्त वातावरण आहे यार, एकदम फ्रेश, पावसामुळे किती सुंदर बदल घडतो ना पृथ्वीमध्ये, खरं सांगू मला तू पण पावसासारखीच वाटतेस. सुरुवातीला भेटल्यावर वाटतं ही आता बरसेल, पण काही वेळेला वेळेपूर्वी तर काही वेळेला वेळेनंतर बरसतेस, काही अंदाज, थांग लागत नाही तुझा. श्रावणातल्या पावसासारखी कधी अल्लड, हसरी, लाजरी, तर कधी शांतपणे बरसतेस. खरंच तुझ्या मनात काय चाललंय आणि तू कधी बरसशील याचा काही पत्ताच लागत नाही. तुझ्या मनातलं ओळखणं पावसासारखंच अवघड, अनाकलनीय, अद्भुत, तरीही हवंहवंसं वाटणारं. शांत, निर्मळ, एक मादक सुगंध पसरवणारं, धुंद करून सोडणारं, रातराणीच्या सुवासासारखं. वाटतं तुझ्या या बरसण्यात कायम भिजावं, तृप्त व्हावं, पण तू तुझ्या मनाची राणी, एकदम सारं काही उधळून टाकण्याचा तुझा त्या पावसासारखा स्वभाव नाहीच. तो जसा पुरवून पुरवून तृप्त करतो ना, तशीच तू पुरवून पुरवून स्वर्गीय आनंद देणारी. तुझ्या सान्निध्यात आल्यावर सगळ्याचा विसर पडतो, मी माझा असा राहतच नाही, पावसाने पृथ्वी जशी चिरतरुण होते, तसाच मी देखील तुझ्याबरोबर असताना होतो. पाऊस जसा कूस बदलतो, तशी तूही काही वेळेला कूस बदलतेस. तुझ्या कोसळणाऱ्या धारा अंगावर झेलताना येणारा शहारा पावसासारखाच दुसऱ्या विश्वात घेऊन जातो. खरंच पाऊस आहे म्हणून पृथ्वी जगते. पावसामुळे पृथ्वीवर चैतन्य येतं, ती फुलते, बहरते, प्रसन्न वाटते. पावसामुळेच खरं तर पृथ्वीला अर्थ आहे, तसंच तुझ्यामुळे माझ्या असण्याला, जगण्याला अर्थ आहे, मला कधीच सोडून जाऊ नकोस, गेलीस तर मी कायमचा जाईन निघून, असं तो बोलतो न बोलतोच तर तिनं त्याच्या ओठांवर हात ठेवला, त्याला थांबवलं. असं बोलू नकोस, हे तिनं मानेनं सांगितलं. पुन्हा एकदा हार घट्ट झाला काही काळासाठी, पुन्हा शब्द खुंटले गेले. थोडय़ा वेळानं पुन्हा तो हार ढिला पडला.
इकडं-तिकडंच बोलणं झालं काही वेळ आणि पुन्हा पावसानं हजेरी लावली. थेंब थेंब पाऊस ओलाचिंब करणारा नसला तरी ही सुरुवात होती, त्यानंतर जर जोरात आला तर घरी जायला उशीर व्हायचा, त्यामुळे तिनं निघायची तयारी केली, त्यावर थांब ना यार, आता तर कुठे आलीस, हे बोल्ल्यावर तिनं तिच्या डाव्या हातातल्या छोटय़ाशा घडाळ्यात पाहिलं, तेच त्याला दाखवलं, बाजीराव, दीड तास झाला आपल्याला भेटून, तिथे घरी आई-पप्पा वाट बघत असतील आणि चोमडय़ा अम्या आहेच घरी. ताई कुठे गेली असेल, यावर आई-पप्पांच्या मनात काही तरी भरवत असेल. त्याला खरं तर तिला थांबवायचं होतं, पण तिनं सांगितलेली परिस्थितीही नाजूक होती. त्यामुळे बसल्या बसल्या तो शूज घालायला लागला. तिनंही बॅग खांद्याला लटकवली, छत्री हातात घेतली. दोघेही उभे राहिले, निघण्यापूर्वीची शेवटची मिठी त्यांनी मारली. त्यामधला आवेग सारं काही सांगून जात होता. यापुढे कधी भेटणार, किती दिवसांनी काहीच माहिती नव्हतं, त्यामुळे तोपर्यंत जगण्यासाठीची ऊब ते यामधून घेत होते. मिठी थोडय़ा वेळानं सैल झाली, त्यानं तिच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला मला वाटतं आपण दोघांनी मस्त भिजावं पावसात. तुला काय वेड लागलंय, अरे माझ्याकडे छत्री आहे, आईनंच जाताना दिली, त्यामुळे भिजल्यावर घरी काय सांगणार, त्यांना काही तरी संशय येईल न, असं तीच बोलते न बोलतेच त्यावर तू पण ना अरसिक आहेस, जाऊ दे यार, असं जाताना मूड ऑफ काय करतेस, असं म्हणाला. त्यावर ती काही तरी बोलणार होतीच, पण रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागला आणि तिनं छत्री उघडली. पावसाचा वेग थोडासा वाढला तसा तोही छत्रीत शिरला. पार्कच्या गेटवर वॉचमननं जाताना सलाम ठोकला, त्याचाही हात आपसूकच डोक्याकडे गेला. दोघेही गेटच्या बाहेर पडले. काळंकुट्ट आभाळ होतं, पावसानं आता चांगलाच ताल धरलेला होता, मुखडय़ातून तो अंतऱ्यात आला होता. पावसाचा वेग वाढला. दोघे थोडे थोडे भिजायला लागले. दोघांच्या जीन्स ढोपरापर्यंत भिजलेल्या होत्या, एका बाजूनंही दोघे भिजलेले. त्याच्या मनात एक सल अजूनही होती, हिच्याबरोबर भिजता आलं नाही याची. त्याच विचारात तो चालत होता, थोडासा यांत्रिक झाला होता. डोक्यात तोच विचार होता, एवढय़ात पावसाबरोबर जोरदार वारा सुटला, ती जराशी घाबरली, हातातली छत्री सैल झाली, तिनं त्याला पकडायला सांगितली, त्यानं पकडली, काही क्षणात पुन्हा वाऱ्याचा झोत वेगानं त्यांच्या दिशेनं आला आणि त्यानं संधी साधत छत्री सोडून दिली. छत्री वाऱ्यामुळे ७-८ पावलं मागे गेली, त्यानं छत्री घेण्यासाठी धावायचं नाटकं केलं, छत्री घेऊन आला तोपर्यंत ती पूर्ण भिजली होती. अगं वारा एवढा जोरात आला ना की, छत्री कशी उडाली हे कळलंच नाही, हे भोळसटपणे सांगण्याचा तो प्रयत्न करत होता, आता काय होणार, ही रागावणार, एकटीच चालत जाणार, अबोला धरणार, नक्की काय होणार हे त्याला कळेनाच. तो तिच्याकडे निर्विकारपणे पाहत राहिला, थोडासा करुण वाटला. तिनं शांतपणे त्याच्याकडे पाहिलं, त्या शांत नजरेत निखारा तेवत होता, पण तो निखारा काही क्षणांतच विझला, तिनं छत्री बंद केली, त्याला काही कळेनाच, तिनं त्याच्या खांद्यावर हात टाकला, भिजायचंय ना मग भिजू या ना यार, टेन्शन काय त्यात, असं म्हणत ती हसली, त्यानं सुस्कारा सोडला. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकत दोघे चालत राहिले, पावसाचा आनंद लुटत, लुटत. अंगावर, चेहऱ्यावर पावसाचे थेंब झेलत. त्यानं चालता चालता तिच्याकडे कटाक्ष टाकला, त्या वेळी त्याला ती श्रावणातल्या पावसासारखी वाटली.
तो ती आणि पाऊस
पाऊस आपल्याच सुरात मस्त गात होता, सुरुवातीची रिपरिप त्यानं थांबवली आणि त्यानं रिमरिम तराने गायला सुरुवात केली. सगळीकडे मस्त हिरवकंच दिसत होतं, त्या हिरवळीतही एवढी व्हरायटी होती की, कदाचित रंगाच्या पेटीत किंवा फोटोशॉपमध्येही एवढी नसेल.
आणखी वाचा
First published on: 07-09-2012 at 09:24 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain love story romance