पाऊस हा रोमँटिक ऋतू खरा. ‘एक अकेली छत्री में..’ अर्धेमुर्धे भिजत पाऊस अनुभवलाय कधी? प्रेमाच्या पावसात चिंब झालेल्या ‘तो आणि ती’ची ही गोष्ट. कितीदा तरी सांगितलेली तरीही नवी भासणारी.. त्या पावसासारखीच!
‘आपण घरी कसं जायचं?’ वेळ आणि बस-ट्रेनच्या एकंदर उपलब्ध सुविधा यांचा अंदाज घेऊन ती म्हणाली. ‘आपण घरी जातोय?’ त्याच्या या प्रतिप्रश्नाला ‘आर यू कििडग’ प्रकारचा कटाक्ष तिने टाकला. म्हणाली, ‘ट्रेन्स लेट आहेत. बंद पडायच्या मार्गावर आहेत आणि पाणी साचलंय.’ घरी कधी पोचणार याची शाश्वती नाही याचा त्याला आनंद! ‘चल, ट्रेननेच जाऊ’, तो म्हणाला. ठरलंच मग.. शेवटी दादर-कल्याण अंतर कापायला दोन तास लागलेच! पण मुसळधार पाऊस, सोसाटय़ाचा वारा, हळूहळू चालणारी ट्रेन, र्अध-र्अध खाल्लेलं डार्क चॉकलेट आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मारलेल्या मनसोक्त गप्पा, हे सगळंच त्यांच्यासोबत होतं. आठवणीत रमायला पुरेसा वेळही होता म्हणा.
हा काही त्यांचा पहिला पाऊस नव्हे! शब्दश: कित्येक पावसाळे पाहिलेलं त्यांचं नातं. मागच्या पावसाळ्यात बॅण्ड स्टॅण्डला ओल्याचिंब अंगाने खाऱ्या हवेतच, िलबू-मीठ-तिखटाचं गोड कणीस अगदी चवीने खाल्लेलं. किल्ल्यावर बसून थोडा वेळ ढगांसोबत सरकत जाणारा पाऊस उघडय़ा डोळ्यांनी त्यांनी पाहिलेला. योग्य त्या दिवशी कॉलेजला बुट्टी मारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तिने त्याचं कौतुकही केलं होतं. त्याचं ठाम मत की, तो याबाबत नशीबवानच!
दोन वर्षांपूर्वी सेन्ट्रल आणि हार्बर रेल्वे पाण्याखाली होती. (बिसलेरीचं दोन लिटर पाणी ओतलं तरी तिथे पाणी साचतं असं तिचं मत) त्यामुळे सुमारे तासभर हात पकडून, एकमेकांना आधार देत ते गुढघाभर पाण्यातून चालले होते. तसं कुल्र्याचं पाणी गटाराचंच! पण तेव्हा तीन तास केलेला प्रवास भलताच रोमॅन्टिक होता. पुढच्या वेळी असं पाणी साचलं तर मस्तपकी व्हेनिससारखं बोटीतून सुखरूप घरी पोहचवण्याची स्वप्नं त्याने पाहिली होती. अर्थात ते फार गमतीशीर होतं. पण हे असं र्अध बुडालेल्या अवस्थेत अशाच गोष्टी त्याला सुचतात.
आषाढी पाऊस वेडा असतो, यावर त्यांची सहमती. तो झंझावणारा वारा घेऊनच कोसळतो. तेव्हा घरच्या खिडकीतून दिसणाऱ्या पावसावर तर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. कारण समोरचा डोंगर तर कधीच अदृश्य झालेला असतो आणि तलाव त्याचं अंग बदलून घेत असतो. या प्रत्येक आषाढी सायंकाळी त्यांचा कवितावाचनाचा बेत ठरलेलाच! कधी बालकवी, ग्रेस तर कधी ती स्वत:च्याच कविता वाचते. तो मात्र तिच्यात आणि पावसात मग्न होतो. फक्त याच काळात दिवे गेल्यावर एम.एस.ई.बी.ला शिव्या घालणं विसरतात. खरं तर वीजकपातीसाठी तो आभारच मानतो. मग कॅण्डल-लाइट कविता-वाचन! ..सगळं शहर दिव्यांनी उजळलं तरी चालू असतं.
असंच दर पावसाळी त्यांचं एकदा डोंगर आणि एकदा समुद्र गाठणं चालूच असतं. पावसाळ्यात सहय़ाद्रीतलं प्रत्येक शिखर ढगांमध्ये लपलेलं असतं. स्वर्गात चालावं असा आभास.. समोर इंद्रवज्र.. स्वर्गसुखच ते! शिखरावर तासन्तास बसून शांतता (निसर्गाचा आवाज) अनुभवण्यासाठी ते सज्जच असतात.
तिच्या मते, पावसाने त्याला रोमान्स शिकवला. म्हणजे शाळा-कॉलेजात तो असा कितीही ग्रेट असला तरी रोमान्समध्ये ‘ढ’ होता. पाऊस भिजण्यासाठी आणि भिजून प्रेमात पडण्यासाठी असतो, हे तो तिच्याकडून शिकला. पण प्रेमात पडल्यावर बरसायचं कसं, हे मात्र तो पावसाकडूनच शिकला. पावसातली मजा फक्त एकत्र भिजण्यातच नसते, तर चिंब अंगावरून निथळणाऱ्या पाण्यातल्या ओलाव्यातसुद्धा असते, हे त्याला तिच्या कवितांतून उमगलं.
असे कित्येक उपक्रम केवळ पावसाळ्यातले.. पाऊस आपोआप त्यांच्याकडून हे करवून घ्यायचा. वर्षभर ती कविता करायची पण कॅण्डल लाइटवाचन (कॉफीसहित) पावसाळ्यातच. हिवाळ्यात प्रवास तर खूप करायचे पण पावसाळ्यात फक्त डोंगर शिखरंच! ठरलेलं नसायचं काहीच! फक्त भरलेलं आभाळ आणि बेभान वारा त्यांना पुरेसा! सरींवर सरी कोसळत असतानाच त्यांना वाटायचं.. हा तर आपल्या प्रेमाचा पाऊस.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा