नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली.
‘पावसाळा’ नावाचा काव्यमय ऋतू आता मागे पडत चाललाय. आता ‘सीझन’ बदलतो आणि ‘मॉन्सून’ येतो. तो यंदासारखा कधी कधी ‘सून’ येतो तर कधी ‘लेट’. पण मॉन्सून हा शब्द प्रचलित व्हायला लागल्यापासून माझं पावसाशी असलेलं नातं भांबावल्यासारखं झालंय. मुंबईत राहून आता पहिला पाऊस आला की फक्त खरेदीच सुचते. छत्री, रेनकोट, पावसाळी चपला. दरवर्षी हय़ा वस्तूंमध्ये येणारी नवनवीन फॅशन. लगेच ऑफर आणि सेल सुरू करणारी लहानमोठी दुकानं. स्वत: चिंब भिजून, सिग्नलला छत्र्या विकायला येणारे- आपल्याला कानकोंडं करणारे विक्रेते. डॉक्टरांच्या क्लिनिकमधली गर्दी. नव्या सीझनमुळे उगवणारे हजार नवे आजार आणि ताप. विटून जायला होतं. आपल्या बदलत्या व्यक्तिमत्त्वाला पाहूनही! बरेच पावसाळे पाहिल्यावर आणि पुलाखालून बरंच पाणी गेल्यावर, आपला बालपणीचा निर्भेळ आनंद – स्थितप्रज्ञ आणि प्रॅक्टिकल होतो का?
आमचं शेत आहे कर्नाटकात. जनामामा हाडाचा शेतकरी आहे. फोनवर बोलताना कधी आपल्या तोंडून निघालं – की काय म्हणतंय पीक-पाणी.? त्यावर मामा जे शेताबद्दल हृदयद्रावक सत्यकथन करतो त्यानी दिवसभरात एक घास गोड लागत नाही. दुसरा मामेभाऊ- मुरारीदादा सुज्ञपणे विषयच बदलतो. शहरातून पाच मिनिटं फोनवर बोलणारे आपणही त्याला विषय बदलू देतो. त्यानी बरं वाटेल असंच बोलावं- अशी अपेक्षा असते का माझी? दुष्काळ किंवा अतिवृष्टीबद्दल वाईट वाटून घ्यायला कुठे वेळ असतो आपल्याला? असला तरी बातम्या बघताना टीव्हीसमोर किंवा ट्विटर/फेसबुक उघडल्यावर कॉम्प्युटर/मोबाइलसमोर. पण एसी ऑफिस/कारच्या कम्फर्ट झोनमधून बाहेरचा ‘रेन’ बघताना आपल्याला रवींद्र साठेंच्या आवाजातलं, महानोरांचं – ‘पीक करपलं. पक्षी दूर देशी गेलं’ हे हृदयनाथ मंगेशकरांचं गाणं आठवून व्याकूळ व्हायला होतं. सगळं समजत असतं. लिफ्टचं बटण दाबताना विहिरीच्या पोहऱ्यावरून पाण्याच्या शोधात सुसाट खाली सुटलेली घागर आठवते. लॅपटॉप उघडला की शेतांना उदंड पाणी मिळू दे म्हणून आईनी वाचायसाठी उघडलेली गजानन महाराजांची पोथी आठवते.
काही वर्षांपूर्वी आम्ही देहरी-मुरबाडला चाललो होतो. जानेवारी/फेब्रुवारी महिना होता. अचानक मुसळधार पाऊस आला. गाणी, गप्पांना अजूनच ऊत आला. लगेच भज्यांच्या गाडय़ांचा शोध सुरू झाला. काहीजणं चिंब भिजून निथळत गाडीत थांबलेल्यांसाठी चहाचा कप घेऊन आले. खिडकीत बसलेल्यांचा चेहरा ओला होत होता, काही जण हात बाहेर काढून धारा झेलत होते. मला नक्की आठवत नाही की मी काय करत होते. पण चुकून आपण आनंदी होऊ ह्य़ा भीतीनं गप्प झाले होते. अचानक तोंडातनं आलं. ‘किती अवेळी आलाय पाऊस. आंब्याचा मोहोर मार खाईल ना.’ २००६ मधे तर काय. मुंबईची वाताहत करून सोडणारा तो २६ जुलैचा पाऊस आला आणि मी कोषातच गेले. जाणीव फक्त ट्रॅफिक जाम, चिकचिकाट, अडकणं आणि भीतीची- सगळे सुरक्षित आहेत ना- ह्य़ाची.
आपल्याकडे असं तर यंदा त्यांनी उत्तराखंडला झोडपून काढलंय. गेल्या वर्षी ह्य़ाच तारखांना माझे बाबा आपत्तीच्या तडाख्यात अडकलेल्या परिसरात होते. केदारनाथवर होते. मन चरकतं ना असं जाणवलं की. ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’च्या ट्रेकला आम्हीसुद्धा अलकनंदा नदीचं बोट पकडूनच फिरलो होतो पाच वर्षांपूर्वी. ती यंदा का अशी बांध सोडते आहे. रुद्रप्रयागनी इतकी रौद्रता का मांडली आहे? काही जणांची आयुष्यं विस्थापित होतायत, कुटुंबीय बेपत्ता आहेत, आर्मीचे जवान ह्य़ा नैसर्गिक संकटात नागरिकांना वाचवण्यासाठी लढतायत, शहीद होतायत. अशा वेळी ‘चलो भुट्टा खाते है. गरम भजी करू या.’ अशी वाक्यं कानावर आली तरी आतल्या आत उन्मळून जायला होतंय.
हे सावरायला पाहिजे. स्वत:च्या वाटण्याला दिलासा शोधला पाहिजे. एकूणच ऋतूंकडे दुखवटय़ाच्या भावनेनं कशाला पाहायचं? निसर्गाचं स्वत:चं असं चक्र आहे. चढउतार चालूच राहणार. कुठे उत्पात, कुठे शांतता, कुठे त्सुनामी, कुठे भरघोस पीक येतच राहणार. आपल्या देशात/राज्यात/गावात काही घडलं की आपलं नातं वाटतं. परदेशी जिथे आप्त आहेत, तिथे काही झालं तर आपण हलून जातो.
मला तर वाटतं कविता! कविता वाचायला पाहिजेत, आठवायला पाहिजेत. धीर गोळा करायला पाहिजे. स्वत:ला किती मिटून घ्यायचं? सृजनाला आवाहन करणारा ऋतू आला आहे. पाऊस आला आहे. तो कोसळत असताना आपण कोरडं राहण्याचा प्रयत्न कशाला करायचा? निसर्ग फक्त झाडांना, डोंगरांना, घरांना आंघोळ घालत नाहीए. आपल्यालाही ताजं करतोय. तो पाऊस. मनाला, इंद्रियांना जाणवू दे. एकदम एक फार छान गाणं आठवलं. माझ्या बाबांचं आवडतं. ‘बाई ह्य़ा पावसानं. लावियली रिमझिम.’ काय सुंदर चाल आहे माहितीए? पुलं देशपांडेंचं संगीत आहे. आभाळ गच्च भरून आलंय. कुठल्याही क्षणी कोसळायला लागेल पाऊस. मळभ गेलं सगळं. फार बरं वाटलं मला तुमच्याशी बोलून.
उत्तराखंडातला सगळा हाहाकार बघून दिङ्मूढ व्हायला झालं होतं. डोळ्यांतलं पाणी जागीच गोठलं होतं. ते आता वाहू दे. यांत्रिकपणे मदत केली जात होती. आता मला काही तरी कळतंय. किमान प्रार्थनेचं बळ तरी आलंय. घाव घातल्यासारखा कोसळणार असशील तर ‘रेन रेन गो अवे’ अशी धमकी द्यावीशी वाटतेय पावसाला. संहारातूनच नवनिर्मिती होत असली तरी आता हे दुष्टचक्र थांबव. आमच्या बुद्धीचा, प्रगतीचा, तंत्रज्ञानाचा, कशाचाही टिकाव लागत नाहीये तुझ्या या महापुरात. नको नको रे पावसा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा