प्रेरणादायी विषय
इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी कलाकार युवकाच्या प्रयत्नासंदर्भातील लेख (व्हिवा दि. २९ ऑगस्ट) प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. ‘थर्माकोल वापरताय, मग हे वाचा’ या लेखात थर्माकोलचं विघटन आणि पुनर्वापर होऊ शकतो, हे कळलं. असे प्रेरणादायी आणि चांगले विषय पुरवणीतून यावेत अशी इच्छा. सेट डिझायनर सुमीत पाटील याचे विशेष अभिनंदन. त्याने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
– एक निसर्गप्रेमी
‘बीइंग सिंगल’ तसं अवघडच!
‘रिलेशनशिप स्टेटस’संदर्भातला ‘व्हिवा’चा अंक खरंच मनातले विचार मांडणारा वाटला. ‘बीइंग सिंगल’ या लेखात लेखिकेनं म्हटलंय त्याप्रमाणे तुम्ही सिंगल आहात म्हणजे एक सुंदर रिलेशनशिप तुमची वाट पाहतेय हे खरं. पण वय र्वष २५ आणि तरीही ‘सिंगल’च का, अशा विचारणाऱ्या नजराही असतात. कुणाचा तुमच्यावर विश्वासच नसतो, तुम्ही ‘सिंगल’ आहात म्हटल्यावर. एक तर त्यांना हा जोक वाटतो किंवा सरळ ‘सिंगल’ आहे म्हणजे काही तरी गडबड आहे, असा विचार हल्ली सर्रास केला जातो. एकदा वय निघून गेल्यावर रिलेशनशिपमध्ये पडणं तितकंसं सोपंही नाही.
– विक्रम मोरे
थर्माकोलच्या विघटनाविषयी..
शुक्रवार, २९ ऑगस्टच्या लोकसत्ताच्या ‘व्हिवा’ पुरवणीत मृणाल भगत यांचा सुमित पाटील यांच्या कलेविषयी लेख प्रसिद्ध झाला. त्यात थर्माकोलच्या अॅसिटोनमध्ये विरघळण्याबद्दल दिले आहे. या संदर्भात काही गोष्टींचा खुलासा होणे आवश्यक आहे. अनेक ऑरगॅनिक द्रावणांत थर्माकोल विरघळते ही माहिती जुनी आहे. ‘यू टय़ूब’वरही यासंदर्भातली क्लिपही जुनी आहे. ठाण्याच्या जिज्ञासा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यावर केलेले प्रोजेक्ट लोकसत्तामध्ये छापूनदेखील आले आहे.
पण एक लक्षात ठेवावे की, अॅसिटोन हे अतिशय ज्वालाग्रही आहे. ते घरात साठवल्यानं आगीचा धोका असतो. दुसरे म्हणजे त्यात शरीराच्या त्वचेतील नसíगक तेल घालवण्याची क्षमता आहे. त्यामुळे हाताला इजा पोहोचते. ते फुटतात. म्हणून कारखान्यांमध्ये याचा वापर करताना विशिष्ट हातमोजे वापरावे लागतात. हे एक औद्योगिक वापरासाठी तयार केलेले द्रावण आहे. नेलपॉलिशसाठी छोटय़ा ब्रशने ते नखांना लावणे आणि ते पाण्यासारखे हाताळणे यात फरक आहे. ते विषारीही आहे. थर्माकोल विरघळण्यास वापरलेले आसिटोन हवेत सुकवावे लागते म्हणजे पुन्हा त्याचा वापर होत नाही.
हल्ली थर्माकोलचा वापर खाण्याची ताटे, डिश, पाणी पिण्याचे पेले यासाठी बेसुमार वाढला आहे. आता खरकटी थर्माकोलची ताटे या प्रयोगासाठी कशी वापरणार? मखराला चिकटवलेले कागद आणि फेविकॉलसारखे पदार्थ आणि रंगाचे अवशेष हे काढता येणार नाहीत. त्यामुळे फक्त सफेद थर्माकोलचाच वापर करता येईल.
थर्माकोल हे एक औद्योगिक वापरासाठी बनवलेले रसायन आहे. त्याचे विघटन होण्यास ५०० ते ७०० वष्रे लागतात, ते पाण्यावर तरंगते ,ते कधीही रिसायकल (पुनर्वापर) होत नाही. त्यामुळे नदी, नाले, गटारे तुंबण्यास ते कारणीभूत ठरते. खरकटय़ा डिश गुरे चाटतात त्या वेळी हे त्यांच्या पोटात जाते व अडकून बसून गुरे मरतात. त्यामुळे त्याचा वापर प्लास्टिकपेक्षाही जास्त उपद्रवी आहे.
या लेखात सुमितने घरी येऊन ही ‘कला’ शिकवण्याचे लिहिले आहे. त्यामुळे याचा वापर केला तरी चालेल असा चुकीचा संदेश मिळेल. त्यापेक्षा शाडूच्या मातीचा आणि इतर पर्यावरणप्रेमी साहित्याचा वापर करून आपली कला जोपासावी आणि थर्माकोलचा वापर पूर्णपणे बंदच करावा.
– जयंत जोशी