गेल्या शुक्रवारचा (दि. ११ जुलै)व्हिवा वाचला. ‘ड्रेसकोडच्या नावानं..’ या लेखातील चर्चेत मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे. कॉलेजलादेखील युनफॉर्म बंधनकारक असावा असं माझं मत आहे. त्यामुळे शिस्त तर लागतेच. पण समाजातील काही विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता कमी होते. गरीब- श्रीमंत, शहरी- गावंढळ असा भेदभाव यामुळे होणार नाही. विद्यार्थी ज्या प्रकारचे कपडे घालतात, त्यावरून त्यांचा दृष्टिकोन दिसतो. कॉलेज लाईफ सुंदर असावं असं सगळ्यांनाच वाटतं. दररोज नवीन कपडे, नव्या फॅशन करून यावंसं वाटणं समजू शकतो. पण त्यामुळे होतं काय.. गरीब घरातून शिकण्यासाठी आलेल्या मुलांच्या मनात मात्र अकारण न्यूनगंड निर्माण होतो. त्यामुळे ड्रेसकोडच नाही तर प्रत्येक कॉलेजमध्ये युनिफॉर्म असावा असं वाटतं.
दिनेश करंडे
कपडय़ांवरून टिंगल-टवाळी नको
ड्रेस कोड हवा की नको यावर गेल्या आठवडय़ातील व्हिवामधून चर्चा झाली. शाळेत असताना केवळ वाढदिवसाच्या दिवशी नवीन कपडे घालायला मिळायचे. तेव्हा वाटायचं, कॉलेजला कधी जातोय.. कारण कॉलेजला गेल्यावर रोज वेगवेगळे कपडे घालता येतील. पण काही मुलांना दररोज नवीन कपडे घालून कॉलेजला येणं परवडत नाही. पण अशी मुलं बाकीच्यांसाठी टिंगल- टवाळीचा विषय होतात. तेव्हा वाटतं, ड्रेस कोड काय युनिफॉर्म असलेलाच बरा. पण हे एक कारण सोडलं तर आमच्या आवडीचे कपडे घालण्यासाठी ड्रेस कोड नकोच असंही वाटतं.
प्रणाली म्हस्के
गोल्डन डेज आवडले
दिनांक ६ जूनच्या व्हिवा पुरवणीत कॉलेज विश्वाविषयी आलेले लेख छानच होते. ‘गोल्डन डेज’ लेख खरोखरच आवडला. कॉलेजविश्वाचं छान चित्र त्यात उभं केलं होतं. व्हिवा पुरवणी मी नियमित वाचतो आणि त्यात येणारे विषय तरुणाईच्या जिव्हाळ्याचे वाटतात. ते दिल्याबद्दल धन्यवाद!
भार्गवकुमार रजपूत
मुलांनाही अडचणी, शंका आणि भावना असतात
लोकसत्ताच्या व्हिवा पुरवणीमधील सदरांमधून मुलांचे प्रश्न समजून त्याची दखल घेत आहात त्याबद्दल धन्यवाद. ‘फॅशन पॅशन’ या सदरातून मुलांच्या फॅशनविषयक शंकांनाही उत्तरं दिली जातात हे बघून फार छान वाटलं. कारण इतर अनेक वृत्तपत्रांतून फॅशनविषयक सदरं आणि माहिती येत असते पण ती केवळ मुलींच्या फॅशनविषयक असते. मुलांची फॅशन त्यांच्या गावीही नसते. मुलांच्या फॅशन संदर्भातली माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.
‘ओपन अप’ या सदरातूनदेखील मुलांच्या शंकांची दखल घेतली गेली हीदेखील स्तुत्य गोष्ट. मुलांनाही शंका, अडचणी आणि भावना असतात हे समजून घेतल्याबद्दल लोकसत्ता व्हिवाला धन्यवाद!
स्वप्नील प्रभुलकर
व्हिवा पोस्ट : गणवेशच हवा
गेल्या शुक्रवारचा (दि. ११ जुलै)व्हिवा वाचला. ‘ड्रेसकोडच्या नावानं..’ या लेखातील चर्चेत मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे. कॉलेजलादेखील युनफॉर्म बंधनकारक असावा असं माझं मत आहे.
First published on: 18-07-2014 at 02:19 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers reaction on viva articles