सुटीचे असेही उपयोग!

लोकसत्ताच्या व्हिवा पुरवणी (दिनांक ११ एप्रिल)मधील लेख वाचले. महाविद्यालयीन तरुणांनी सुट्टीत अनेक समाजोपयोगी कामे करायचे ठरवले आहे, हे वाचून खूप समाधान वाटले. त्यांची सामाजिक बांधीलकीही त्यातून दिसून आली. काही तरुणांना या सुट्टीत चारचाकी वाहन चालवायला शिकता येईल. ही आज अत्यावश्यक बाब आहे. उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी दूरदेशी राहावे लागते तेव्हा स्वत:चे वाहन स्वत:च चालवावे लागते. आपल्या पद्धतीच्या स्वयंपाक कृती करता येणे हीसुद्धा अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यामुळे पैसा, वेळ वाचतोच, शिवाय तब्येत चांगली राहून परमुलखात टिकून राहता येते. पुढील चार-पाच वर्षांत आपणास जी प्रमाणपत्रे लागणार आहेत ती एकत्र करून ठेवणेही महत्त्वाचे आहे. जन्माचा दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र ही व यांसारखी प्रमाणपत्रे, पासपोर्ट यांसाठी अर्ज करणे, सरकारी कचेरीत चकरा मारणे यासाठी सुट्टीचा उपयोग करता येईल. ऐन वेळी धावपळ करण्यामुळे दुप्पट त्रास होतो, तो वाचेल. घाई नसल्यामुळे कोणाच्या मेहेरबानीची गरज नाही आणि ‘भ्रष्टाचार’ही करायची गरज नाही. तरुणांनी या दृष्टीने सुट्टीचे नियोजन जरूर करावे.

– रत्नाकर यादव धर्माधिकारी, कल्याण.

 

स्लॅमबुकमध्ये इतर क्षेत्रांतील मंडळीही हवीत

मी व्हिवा पुरवणीची नेहमीची वाचक आहे. तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले लेख चांगलेच असतात. उदाहरणार्थ, घर सोडून एकटय़ा राहणाऱ्या मुली या विषयावरचा लेख छान होता. तसंच वृद्धाश्रमात राहणाऱ्या लोकांबद्दलही लिहायला हवं. सध्या तुम्ही स्लॅमबुकच्या निमित्ताने वेगवेगळ्या अॅक्टर व गायक मंडळींची माहिती देत असता. तुम्हाला एक विनंती अशी की, इतर क्षेत्रांतील लोकांची माहितीसुद्धा तेथे द्यावी. आम्हाला त्यांच्याबद्दलही वाचायला आवडेल.

– स्मिता दाते.

 

@व्हिवा पोस्ट : व्हिवा पुरवणीतील सदरं कशी वाटतात, लेखातील विचार पटतात का, पुरवणी कशी वाटते, ते आम्हाला सांगा. त्याबरोबर या पुरवणीत आणखी काय वाचायला आवडेल तेही शेअर करा. आमच्या या मेल आयडीवर व्हिवा पोस्ट असं सब्जेक्ट लाइनमध्ये लिहून तुमच्या सजेशन्स पाठवा. viva.loksatta@gmail.com

Story img Loader