आला आला उन्हाळा..
संगे घामाच्या या धारा..
उन्हाळ्याचे चार महिने आपल्या सर्वाची हीच गत होते. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सारखे हाश हुश करीत घाम पुसत राहतो. घराबाहेर पडल्यावर तर काही बघायलाच नको. उन्हाळ्यात नुसताच घाम येतो असे नाही तर संपूर्ण अंग झाकले नाही तर सनबर्न, स्किन टॅनही होऊ शकते. त्वचा कोरडी पडून हात-पाय फुटणे, स्कॅल्प कोरडे झाल्याने कोंडा होऊ शकतो. ओठ जास्त फुटले तर रक्तही येऊ शकते. हे सर्व टाळण्यासाठी बाजारात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची क्रीमस् उपलब्ध आहेत. पण गो ग्रीनचा जमाना असल्यामुळे त्याव्यतिरिक्त ज्यांना कोणाला नैसर्गिक काही उपाय करायचे असतील तर घरच्या घरी काही उपाय करता येतात. त्यांच्यासाठी साधे-सोपे घरातल्या घरात तयार करून लावता येतील अशा क्रीमस्, स्क्रबर, फेसपॅक इत्यादीविषयी जाणून घेऊ या.
*    सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवढय़ा वेळा शक्य असेल तेवढय़ा वेळा तोंड साध्या पाण्याने धुतले पाहिजे.
*    बेसन पीठ, चंदनाची पावडर, मुलतानी माती व गुलाब पाणी याचे मिश्रण चेहऱ्याला लावले तर स्क्रबसारखा याचा उपयोग होतो. यामुळे त्वचा मऊ व स्वच्छ होण्यास मदत होते.
*    स्क्रबनंतर क्रीमसारखे आपण फळांचे गर चेहऱ्याला लावू शकतो.
*    द्राक्षे व लिचीचा गर चेहऱ्याकरिता मॉईश्चरायझिंगचे काम करतो, सुरकुत्यांवरही याचा उपयोग होतो.
*    ब्लॅकहेडस् कमी करण्याकरिता पपईचा गर लावतात.
*    कलिंगडाचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचा ताजी टवटवीत होते.
*    उन्हाळ्यात डोळ्यांना थंडगार वाटण्याकरिता काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवाव्यात.
*    कापसावर गुलाब पाणी घालून ते डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांना शांत वाटते.
*    उन्हाळ्यात रापलेल्या त्वचेला दही लाऊन दहा मिनिटे ठेवून साध्या पाण्याने धुतल्यास टॅनिंग कमी होण्यास मदत होते, नुसते बर्फाचे तुकडेदेखील चोळू शकता.
*    ओठ फाटल्यास झोपायच्या आधी साजूक तूप, लोणी किंवा साय लावली तर ओठ मऊ होतात.
*    फुटलेल्या टाचांवर पिकलेले केळे कुस्करून लावून दहा ते पंधरा मिनिटे ठेवले तर टाचा मऊ व गुळगुळीत होतात.  
*    उन्हाळ्यात हात-पाय फुटतात तेव्हा अंघोळीच्या आधी दहा मिनिटे तेल लावून मग अंघोळ केली तर त्वचा कोरडी न होता त्वचेला आवश्यक स्निग्ध पदार्थ मिळतात व ती मऊसर राहते.
*    घामाने केस खराब होतात म्हणून आठवडय़ातून दोन ते तीन वेळा केस धुवावेत.
*    ड्राय स्काल्प टाळण्याकरिता खोबऱ्याचे तेल लावले तर ते कंडिशनिंगचे काम करते.
तर मैत्रिणींनो, हे सगळे उपाय करून राहणार ना तुम्ही एकदम फ्रेश!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा