प्रोफाइलवर रिलेशनशिप स्टेटस ‘इन रिलेशनशिप’चं सिंगल झालं किंवा ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ असं झालं की, लाइक करणारेही असतात आणि शंभर प्रश्न विचारणारे, हजार कमेंट्स करणारेही. कधी कधी तर या ब्रेक-अपला सोशल साइट्वरचं प्रदर्शनही कारणीभूत असतं.
: मोकळा आहेस?
: नाही गं! गेले दोन तास अभ्यासच करतो आहे. का? तू काय करते आहेस?
: गेले तीन तास तुला ऑनलाइन बघते आहे आणि आता तुझा नंबर ब्लॉक करावा की डीलीट, असा विचार करत बसले आहे!
: रागवू नकोस ना! माझा डी.पी. बघितलास? आपला फोटो आहे बघ! छान आहे ना? आता तरी हस!
अशा पद्धतीच्या गप्पा महाविद्यालयीन मुला-मुलींच्यात आजकाल खूप वेळा आढळतात. तरुणाई म्हटलं की, प्रेमात पडणं, ‘डेट’ वर जाणं, फोटो काढणं, फुलं, भेटवस्तू हा सगळा आयुष्याचा अविभाज्य भाग बनत जातो. हे चित्र पूर्वापार चालत आहे, असं म्हणायला हरकत नाही. मात्र सध्याच्या इंटरनेटच्या युगात प्रेमकथाही ‘सोशल नेटवìकग’शिवाय पुढे सरकत नाहीत. किंबहुना कितीतरी वेळा प्रेमकथा ‘व्हॉट्सअप’, ‘फेसबुक’ इत्यादीमुळे घडतात; आणि बिघडतातदेखील!
सोशल नेटवìकगमुळे एकमेकांच्या संपर्कात राहणं खरंतर अगदी सोपं झालं आहे. मनाला पटकन खूश करून जाणारी एखादी वस्तू दिसली की तिचा फोटो काढून पाठवणं; एखादा गमतीदार प्रसंग घडला तर त्याची छोटीशी ध्वनिफीत पाठवणं; आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी किंवा मनातली चलबिचल याचं एखाद-दोन वाक्यांत वर्णन करणारं ‘स्टेटस’ लिहिणं; किंवा आपले विविध पोशाखात, विविध ठिकाणी, विविध व्यक्तींबरोबर काढून घेतलेले फोटो ‘प्रोफाइल पिक्चर’ म्हणून अपलोड करणं – सगळंच मत्री आणि प्रेम यांच्या आराखडय़ाचा भाग होऊन गेलंय.
पण एक प्रश्न पडतोच – सोशल साइट्सवरून आपण आपल्या रिलेशनशिपचं मार्केटिंग तर नाही ना करत? उदाहरणार्थ, आपल्या जोडीदारावर आपलं मनापासून प्रेम आहे हे मनातून वाटतं म्हणून नव्हे, तर दिखावा करण्याकरता स्टेटस म्हणून लिहिलं जाऊ शकतं! एका मुलीला किंवा मुलाला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्याबरोबरचा फोटो प्रोफाइलवर अपलोड करणं; किंवा एखाद्याशी भांडण झाल्यावर त्याला पटकन ब्लॉक करणं; यामुळे नाती हा वैयक्तिक सुख-दु:खाचा प्रश्न न राहता त्यांचं जगासमोर प्रदर्शन होऊ लागलं आहे. समोरचा ऑनलाइन आहे का? फेसबुकवर त्याने याआधी कधी कमेंट लिहिली आहे? नेमकं काय लिहिलं आहे? अशा बाबींची नोंद ठेवताना नकळत इतरांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ झाल्यासारखी वाटते. हे नतिकदृष्टय़ा कितपत योग्य आहे, याचा विचार बहुतांशी केला जात नाही.
तरुणांशी या विषयावर बोलताना त्यांचे विविध दृष्टिकोन समोर आले. सेंट झेवियर्स कॉलेजची अपूर्वा दाबके म्हणते, ‘खरंतर एखादं नातं भक्कम असेल तर अशा क्षुल्लक गोष्टींनी ते ढासळता कामा नये. मात्र हे खरं आहे की व्हॉट्सअपसारख्या नेटवर्कचा परिणाम नातेसंबंधांवर होत असतो.’ याउलट, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, मुंबईमधली अक्षता लिमये सांगते, ‘सोशल नेटवर्क आणि मत्री किंवा नाती यांचा असा संबंध असल्याचं मला पटत नाही. जे नातं विश्वासावर आधारलेलं असतं, त्यावर अशा गोष्टींचा परिणाम व्हायला लागला तर ते मुळातच कुठेतरी कमकुवत होतं, असं म्हणावं लागेल!’
शाळेत निबंध लिहायचो ना.. टेलिव्हिजन शाप की वरदान, इंटरनेट शाप की वरदान, तसं आता पुन्हा एकदा सोशल नेटवìकग ‘शाप की वरदान?’ हा प्रश्नही विचार करायला लावतोय. त्याचं ठोस उत्तर मात्र अजूनदेखील मिळत नाहीय!
चित्र : समृद्धी देसाई
छाया : ऋषिकेश पवार / फोटो प्रातिनिधिक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा