विनय जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

३० जून १९०८. सैबेरियातल्या अगदी दुर्गम भागात नेहमीप्रमाणे सकाळ उजाडली. तुंगुस्का नदीजवळच्या जंगलावर अचानक आभाळ फाडत एक स्फोट झाला. हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा १८५ पट ऊर्जा या स्फोटात होती. मनुष्यवस्ती नसल्याने जीवित हानी झाली नाही, पण जंगलातील अंदाजे ८ कोटी झाडे नष्ट झाली. याचे कारण होता पाच मजली उंच इमारतीएवढा एक लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात आला होता. जमिनीपासून १० किमी उंचीवर वातावरणातच त्याचा स्फोट झाला.. या घटनेच्या स्मरणार्थ आणि अशा धोकादायक लघुग्रहां विषयी जागरूकता वाढविण्यासाठी ३० जून हा दिवस आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन म्हणून घोषित केला गेला आहे.

आपल्या सौरमालेत ग्रहांप्रमाणे पण अनियमित आकाराच्या आणि कमी वस्तुमानाच्या अनेक छोटय़ा खगोलीय वस्तू सूर्याभोवती फिरत आहेत. यांना लघुग्रह (Asteroid) असे म्हटले जाते. बहुतेक लघुग्रह हे खडकाळ असून त्यांच्या कक्षा मंगळ व गुरू ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान आहेत. लघुग्रह आकाराने लहान असल्याने डोळय़ांना दिसत नाहीत.अगदी दुर्बिणीचा शोध लागून २०० वर्ष उलटून गेल्यावर सुद्धा आपल्याला त्यांची माहिती नव्हती. टिटियस-बोडे यांच्या समीकरणानुसार मंगळ आणि गुरू यांच्यामध्ये २.८ खगोलीय एकक अंतरावर एखादा ग्रह असायला हवा होता. याचा शोध घेताना १ जानेवारी १८०१ मध्ये ग्युसेप्पी पियाझ्झी यांना सेरेस या लघुग्रहाचा शोध लागला (याला पुढे बटुग्रह मानले जाऊ लागले). आणि मग पुढे पल्लास, जुनो, व्हेस्टा असे लघुग्रह सापडले. ग्रहांच्या मानाने यांचा आकार फारच चिमुकला असल्याने यांना लघुग्रह असे नाव  विल्यम हर्षल यांनी दिले. १८९० पर्यंत ३०० लघुग्रह शोधले गेले. १८९१ मध्ये जर्मन खगोल निरीक्षक माक्स वोल्फने फोटोग्राफीचा वापर  करून २४८ लघुग्रह शोधले. २०व्या शतकात पृथ्वीवरील वेधशाळा आणि अंतराळातील दुर्बिणींमुळे लाखो लघुग्रह शोधले गेले. सध्या १२,९७,७०५ हून अधिक ज्ञात लघुग्रह आहेत.

लघुग्रहांची संख्या लाखोंच्या घरात असली तरी सगळय़ा लघुग्रहांचे एकत्रित वस्तुमान चंद्रापेक्षाही कमी भरेल. सर्वात मोठा लघुग्रह व्हेस्टा ५३० किमी व्यासाचा आहे तर काही लघुग्रह १० मीटर व्यासाचे आहेत. बहुतेक लघुग्रह हे ओबडधोबड आणि अनियमित आकाराचे आहेत. अगदी थोडे गोलाकार आहेत. १५० हून अधिक लघुग्रहांना तर चंद्रासारखा लघु-उपग्रहसुद्धा आहे. काही लघुग्रहांचे गुणधर्म, कक्षा काही प्रमाणात सारख्या आहेत. अशा गटांना लघुग्रहाचे कुटुंब म्हटले जाते. निसा ,व्हेस्टा, फ्लोरा, इओस, कोरोनीस, युनोमिया, थेमीस, हायजिया, हंगेरीया ही प्रमुख कुटुंबे आहेत. बहुतेक लघुग्रह मंगळ  आणि गुरूदरम्यान लघुग्रहांच्या पट्टय़ात आढळतात. काही लघुग्रह गुरूच्या कक्षेत  गुरूच्या मागेपुढे राहून सूर्यप्रदक्षिणा करतात. हे गुरूचे ट्रोजन लघुग्रह. नेपच्यूनहून लांब असणारे लघुग्रह नेपच्यून कक्षेतर (Trans-Neptunian Object) गटात मोडतात. काही लघुग्रहांची कक्षा पृथ्वीच्या कक्षेजवळ आहे. असे पृथ्वीसमीप लघुग्रह (Near- Earth Asteroid) आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

तुंगुस्का  घटनेनंतर असे पृथ्वीसमीप लघुग्रह चर्चेत आले. अल्वारेझ सिद्धांतानुसार साडेसहा कोटी वर्षांपूर्वी असाच एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळून डायनॉसॉर्स नष्ट झाले होते. १९९४ला शुमेकर लेव्ही धूमकेतू गुरूवर आदळला आणि लघुग्रहांपासून असणाऱ्या धोक्याची जाणीव अधिक तीव्र झाली. यातून लघुग्रहांच्या अभ्यासासाठी मोहिमांना गती  मिळाली. शास्त्रज्ञांच्या मते लघुग्रह हे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी आपली सौरमाला तयार होताना उरलेले अवशेष असावेत. त्यामुळे त्यांच्या अभ्यासातून सौरमालेच्या उत्पत्तीची काही रहस्ये उलगडू शकतात. बहुतांश लघुग्रह खनिजांनी समृद्ध आहेत. ‘अ‍ॅस्टेरॉइड मायिनग’द्वारे अशी खनिजे पृथ्वीवर आणता आली तर आपली खनिजांची गरज भागू शकेल.

इतर उद्देशाने आखलेल्या काही मोहिमांनी जाता जाता त्यांच्या मार्गात असणाऱ्या काही लघुग्रहांचे चित्रण केले. १९८९ मध्ये प्रक्षेपित केलेल्या गॅलिलिओ प्रोबने गुरूकडे जाताना ९५१ गास्प्रा, आणि २४३ आयडा या लघुग्रहांचे जवळून फोटो काढून पाठवले. खास लघुग्रहांसाठी आखलेली पहिली मोहीम म्हणजे नासाची निअर शूमेकर होय. ४३३ इरॉस या पृथ्वीसमीप लघुग्रहाच्या अभ्यासासाठी १९९६ ला निअर यान झेपावले. याने १९९७ मध्ये  मॅथिल्डे या लघुग्रहांजवळून जात असंख्य निरीक्षणे केली. २००० मध्ये निअर इरॉसच्या कक्षेत दाखल झाले आणि त्याने इरॉसच्या पृष्ठभागाचे सविस्तर चित्रण केले. त्याला पृष्ठभागावर अनेक विवरे आणि घळय़ा आढळल्या. त्याच्याभोवती वातावरण नसून  क्षीण चुंबकीय क्षेत्र असल्याचे आढळले.आणि अखेर १४ फेब्रुवारी २००१ मध्ये हे यान इरॉसवर सुखरूपपणे उतरले. ग्रीकपुराणातील प्रेमाची देवता इरॉसचे नाव दिलेल्या लघुग्रहावर व्हॅलेण्टाइन डेच्या दिवशी पहिल्या मानवी यानाचे उतरणे हा एक सुखद योगायोग !

‘४ व्हेस्टा’ आणि ‘१ सेरेस’ या लघुग्रह पट्टय़ातील प्रमुख दोन लघुग्रहांच्या निरीक्षणासाठी नासाने ‘डॉन’ ही मोहीम हाती घेतली. २००७ मध्ये प्रक्षेपित केलेले यान ४ वर्षांच्या प्रवासानंतर १६ जुलै २०११ ला व्हेस्टाजवळ पोहोचले.१४ महिने निरीक्षणे करून या यानाने व्हेस्टाचा पृष्ठभाग, संरचना, भौगोलिक वैशिष्टय़े यांच्याबाबत सविस्तर माहिती दिली. या मोहिमेने व्हेस्टाचा गाभा लोह-निकेल यांनी बनलेला तर  वरचे आवरण पृथ्वीच्या ज्वालामुखीच्या प्रदेशांसारखे बेसल्टिक खडकांनी बनल्याचे दाखवले. यावरून व्हेस्टा इतर लघुग्रहांप्रमाणे फक्त एक  महाकाय खडक नसून सौरमालेच्या  निर्मितीदरम्यान खडकाळ ग्रह निर्माण होतानाची प्राथमिक अवस्था आदिग्रह (प्रोटोप्लॅनेट) प्रमाणे आहे असे म्हणता येईल. सौरमालेच्या निर्मितीविषयी अभ्यासासाठी ही माहिती मोलाची आहे.

लघुग्रह मोहिमेतील प्रगत टप्पा म्हणे जपान स्पेस एजन्सीची हयाबुसा ही मोहीम. २००५ मध्ये  हयाबुसा या यानाने २५१४३ इटोकावा या छोटय़ा लघुग्रहाची माती गोळा करून आणली. १६२१७३ ऱ्युगू हा पृथ्वीसमीप गटातील संभाव्य धोकादायक लघुग्रह आहे. तिथले नमुने आणण्यासाठी हयाबुसा-२ आखली गेली. २०१४ साली सोडलेले हयाबुसा-२ यान २०१८ मध्ये लघुग्रहाजवळ पोहचले. यानातून रोव्हर लघुग्रहावर उतरवले गेले. एप्रिल २०१९ मध्ये लघुग्रहावर  इम्पॅक्टर आपटून त्याने सुमारे १० मीटर व्यासाचे एक विवर तयार केले. यामुळे त्या उघडय़ा झालेल्या भागामधून नमुने गोळा करून ते २०२० मध्ये पृथ्वीवर सुखरूप आणले गेले. २००० डीपी १०७ या लघुग्रहाच्या निरीक्षणासाठी हयाबुसा-२ सोबत प्रोसियॉन हे यान देखील होते, पण तांत्रिक बिघाडाने ही मोहीम अयशस्वी ठरली. २०१६ला ओसिरिस-रेक्स हे यान १०१९५५ बेन्नू या पृथ्वीसमीप लघुग्रहाच्या दिशेने झेपावले. ऑक्टोबर २०२० मध्ये लघुग्रहावर उतरून तिथले नमुने गोळा करून ते पृथ्वीच्या दिशेने परतले आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये ते पृथ्वीवर पोहोचेल. आणि  या मोहिमेच्या पुढील टप्यात ९९९३४ अपोफीस या लघुग्रहावर २०२९ मध्ये यान उतरवण्यात येईल.

पृथ्वी समीप लघुग्रहांपैकी १४० मीटरपेक्षा अधिक आकार असणारे लघुग्रह  आपल्यासाठी धोकादायक मानले जातात. अशा संभाव्य धोकादायक लघुग्रहांची (potentially hazardous asteroid ( PHA)) संख्या तब्ब्ल २३०० हून अधिक आहे. यातील बहुतांश  लघुग्रहांपासून येत्या शंभर वर्षांत पृथ्वीला धोका नसला तरी असा लघुग्रह पृथ्वी जवळ आला तर होणाऱ्या धोक्याचे गांभीर्य वैज्ञानिकांनी ओळखले आहे. एखादा लघुग्रह आपल्या जवळ येत असेल तर पृथ्वीच्या रक्षणासाठी त्यावर एखादे क्षेपणास्त्र सोडून तो अंतराळातच नष्ट करता येईल किंवा  त्याची दिशा बदलता येईल. या प्रयोगाची रंगीत तालीम म्हणजे नासाची ‘डार्ट’ (डबल अ‍ॅस्टेरॉइड रिडायरेक्शन टेस्ट) मोहीम. या परीक्षणासाठी  डीडीमॉस आणि दिमोफरेस हे जुळे लघुग्रह निवडले गेले. या जोडीतील डीडीमॉस  मोठा असून दिमोफरेस त्याच्याभोवती फिरतो. २६ सप्टेंबर २०२२ ला डार्ट यान ६.६ किमी प्रति सेकंद वेगाने दिमोफरेसवर धडकले. आणि त्याची कक्षा बदलण्यात यश मिळाले.

एकाच प्रवासात विविध लघुग्रहांना भेट देण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर २०२१ ला ल्यूसी हे यान प्रक्षेपित झाले. १२ वर्षांच्या प्रवासात ल्यूसी लघुग्रह पट्टय़ातील २ आणि ६ गुरूच्या ट्रोजन लघुग्रहांजवळून जात त्यांची निरीक्षणे नोंदवेल. यावर्षी ऑक्टोबरमध्ये सायके हे यान १६ सायके या लघुग्रहाच्या दिशेने रवाना होईल. पुढील वर्षी प्रक्षेपित होणारे युरोपियन स्पेस एजन्सीचे  हेरा यान २०२६ मध्ये डीडीमॉस  लघुग्रहाजवळ पोहोचेल आणि ‘डार्ट’ मोहिमेमुळे घडलेल्या  बदलांचा अधिक सविस्तर अभ्यास करेल. मिथुन राशीतील उल्कावर्षांवासाठी कारणीभूत असणाऱ्या ३२०० फेथन या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी डेस्टिनी ही मोहीम आखली गेली आहे.

सुमारे ५२००० वर्षांपूर्वी असाच एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावला. वातावरणाचे कवच भेदून महाराष्टात लोणार इथे आदळला. या आघाताची खूण असणारे लोणार सरोवर म्हणजे जणू दख्खनच्या दगडी छातीवरचे श्रीवत्सलांछन! आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिनाच्या निमित्ताने लोणार सरोवराला भेट देण्याचा निश्चय करायला हरकत नाही. आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिनाच्या शुभेच्छा !!