विनय जोशी

मंगळ, रात्रीच्या काळय़ाभोर आकाशात तांबूस रंगाने चटकन लक्ष वेधून घेणारा ग्रह. इतका देखणा ग्रह, पण लाल रंगामुळे याचा रक्तपात, युद्ध, रोगराई यांच्याशी संबंध जोडून पृथ्वीवासीयांनी याला अमंगळ ठरवलेले. ग्रीक रोमन लोकांनी याला युद्धदेवता मानले, तर मेसोपोटेमियन लोकांनी मृत्यूचा तारा. भारतात तर हा लग्नाळू मंडळींच्या पत्रिकेत व्हिलन म्हणून ठाण मांडून बसतो. मानवाच्या  वैज्ञानिक प्रगतीमुळे तरी याचे अमंगलत्व संपेल असं वाटलं होत खरं, पण झालं उलटंच. मंगळाच्या अभ्यासातून त्याचे पृथ्वीशी साम्य बघता तिथे जीवसृष्टी असावी अशी चर्चा सुरू झाली. १८७७  मध्ये इटालियन खगोलविद जिओव्हानी शापरेल्ली याने दुर्बिणीतून मंगळ पाहून नकाशे बनवले. त्याच्या पृष्ठभागावरच्या रेषांना त्यांनी ‘कॅनाली’(इटालियन अर्थ : खोबणी) म्हटले, पण भाषांतरातील त्रुटींमुळे याला कॅनाल असा चुकीचा अर्थ लावला गेला आणि मंगळावर पाण्याचे कालवे वाहत आहेत असा गैरसमज पसरला. भरीस भर म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी हे कालवे नैसर्गिक नसून प्रगत तंत्रज्ञानाने बनवले असणार असे ठासून सांगितले. फ्लॅमेरियन आणि पर्सिव्हल लॉवेल यांची तर मंगळावर प्रगत जीवसृष्टी असून तेथील लोकांनी सिंचनासाठी ही प्रगत यंत्रणा निर्माण केली असल्याची ठाम खात्री होती. अशा प्रगत मंगळवासीयांचा पृथ्वीवर हल्ला या विषयावरची १८९८ मध्ये प्रकाशित एच. जी. वेल्सची कादंबरी ‘द वॉर ऑफ द वल्र्ड्स’ प्रचंड गाजली. ती वाचून अनेक अमेरिकन लोकांच्या मनात खरंच असा हल्ला होणार आहे अशी भीती बसली होती. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेला हा ‘मार्स फीवर’ अनेक दशके टिकला. मंगळाचे सत्य जाणून घेण्यासाठी मोहिमा आखल्या गेल्या. यातून मंगळ हा मानवाने सर्वाधिक मोहिमा आखलेला ग्रह ठरला आहे.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mercury Rise in Scorpio
‘या’ चार राशींचे भाग्य उजळणार, बुध ग्रहाच्या कृपेने मिळणार अपार संपत्ती
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

युद्धाचा देव मानल्या गेलेल्या मंगळावर यान पाठवायची स्पर्धा सुरू व्हायला शीतयुद्ध कारणीभूत ठरले. याची सुरुवात १९६० मध्ये सोव्हिएत रशियाने मार्सनिक १ आणि २ हे यान पाठवून केली. पण या  दोन्ही मोहिमा पृथ्वीच्या कक्षेतसुद्धा  पोहोचू शकल्या नाहीत. १९६२ रोजी रशियाने ‘मार्स-१’ नावाचे एक टन वजनाचे यान मंगळाकडे रवाना केले, पण ही मोहीमदेखील अयशस्वी ठरली. रशियाला उत्तर म्हणून अमेरिकेने मरिनर प्रकल्प हाती घेतला. मरिनर-३ च्या अपयशानंतर मात्र मरिनर-४ मोहीम यशस्वी ठरली. १५ जुलै १९६५ ला मंगळाजवळून जात मरिनर-४ ने त्याच्या पृष्ठभागाची  पहिल्यांदा जवळून छायाचित्रे टिपली. साडेआठ तासांनी ही छायाचित्रे पृथ्वीवर मिळाली आणि अनेक वर्षांचा मार्स फीवरह्ण क्षणात  उतरला. मंगळावर जीवसृष्टी असावी या अपेक्षेत असणाऱ्या मंडळींची घोर निराशा झाली. मरिनर-४ ने  तिथली ओसाड जमीन, विरळ वातावरण दाखवले. मंगळावर पाण्याचे कालवे आणि जीवसृष्टी असण्याची शक्यता मावळली. पुढच्या मरिनर -६ आणि ७ मोहीमदेखील यशस्वी ठरल्या. यावर रशियाने १९७१ मध्ये मार्स २ आणि ३ ही याने मंगळाच्या कक्षेत पाठवून त्याच्या पृष्ठभागावर प्रोब आदळवले. दुर्दैवाने, मार्स ३ च्या लँडरचा लँडिंगनंतर अवघ्या काही सेकंदात पृथ्वीशी संपर्क तुटला. यांनतर १९७३ मध्ये  एका वर्षांत रशियाने मार्स ४, ५, ६, ७ ही याने मंगळावर पाठवली. या नंतर मात्र रशियाने काही काळ मंगळावरच्या मोहिमा थांबवून इतर मोहिमांवर लक्ष केंद्रित केले.

मार्स २ मंगळाजवळ पोहोचायच्या फक्त दोन आठवडे आधी  नासाचे  मरिनर ९ मंगळाच्या कक्षेत पोहोचले आणि एखाद्या ग्रहाच्या कक्षेत फिरणारे पहिले मानवनिर्मित यान ठरले. मरिनर ९ ने मंगळाभोवती वर्षभर प्रदक्षिणा घालून मंगळाच्या ९० टक्के भागाचे चित्रण केले. यातून मंगळावरची अनेक रहस्ये उजेडात आली. मंगळावरील दऱ्या, नद्यांची सुकलेली पात्रे आणि ध्रुवीय प्रदेशातील बर्फाच्या टोप्यांचे चित्रण मरिनरने केले. यातून मंगळावर पूर्वी पाणी आणि पर्यायाने जीवसृष्टी असावी का? हा प्रश्न उभा राहिला. या शोधासाठी  मंगळाच्या जमिनीवर लँडर  उतरवून परीक्षण करण्यासाठी व्हायकिंग मोहीम आखली गेली.

१९७५ मध्ये व्हायकिंग १ आणि २ अशी दोन याने मंगळावर धाडण्यात आली. मंगळाच्या पृष्ठभागाचा, वातावरणाचा आणि हवामानाचा अभ्यास करणे आणि  तिथे जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या खुणा शोधणे हा या मोहिमेचा उद्देश होता.  या दोन्ही यानांनी प्रत्येकी एक ऑर्बिटर मंगळाच्या कक्षेत फिरत ठेवून आपले लँडर मंगळाच्या पृष्ठभागावर दोन वेगवेगळय़ा ठिकाणी उतरवले. वायकिंग लँडर्सनी मंगळाच्या मातीत जीवसृष्टी शोधण्यासाठी जीवशास्त्रीय प्रयोग केले. यात मंगळाच्या मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे निश्चित पुरावे आढळले नाहीत, व्हायकिंग मोहीम सर्वार्थाने सुफळ ठरली. हा  दुसऱ्या ग्रहावर अलगद उतरण्याचा मानवाचा पहिला यशस्वी प्रयत्न होता. या मोहिमेतून मंगळाच्या वातावरण आणि पृष्ठभागाविषयी मिळालेल्या माहितीने भविष्यातील मंगळ मोहिमांची पायाभरणी केली.  व्हायकिंगच्या यशानंतर मंगळ मोहिमा थंडावल्या आणि १५ वर्षांनी  १९९२ मध्ये नासाने ‘मास आर्झव्हर’ यान मंगळाकडे पाठवले. पण प्रवासात  संपर्क तुटून ही मोहीम अयशस्वी ठरली. १९९७ मधली पुढची मार्स पाथफाइंडर मोहीम यशस्वी ठरली.

या मोहिमांनी मंगळाची सखोल माहिती पुरवली तशी मंगळाविषयी नव्या अफवांना जन्म दिला. व्हायकिंग-१  ने पाठवलेल्या  छायाचित्रात मंगळावर एका टेकडीला मानवी चेहऱ्यासारखा आकार दिसला होता. तर काही  छायाचित्रांत शास्त्रज्ञांना मंगळावरच्या टेकडय़ांत पिरॅमिडचा भास झाला. रिचर्ड हॉगलँडसारख्या छद्मवैज्ञानिकांनी तर याला  प्राचीनकाळी  मंगळावर नष्ट झालेल्या संस्कृतीचे पुरावे म्हटले. १९९६ साली प्रक्षेपित केलेल्या मार्स ग्लोबल सर्वेयर यानाने मंगळाभोवती १० वर्षे फिरत हाय रिसोल्युशन चित्रण केले. यातून तथाकथित मानवी चेहऱ्याचा आकार म्हणजे तिथल्या डोंगरांवर प्रकाश पडून होणारा भास असल्याचे स्पष्ट झाले. या यानाला पाणी झिरपण्यामुळे निर्माण झालेल्या घळी, नदीचे कोरडे खोरे, कोरडे तलाव यांसारखी भूवैशिष्टय़े दिसली. यातून मंगळावर पूर्वी पाणी वाहत होते या तर्काला पुष्टी मिळाली. सर्वेयरने मंगळाच्या पृष्ठभागाचे, चुंबकीय क्षेत्राचे आणि पृष्ठभागावरील खनिजांचे अत्यंत तपशीलवार नकाशे तयार केले. हे नकाशे गूगल मार्स, मार्स ट्रेकसारख्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

२००१ साली नासाने मार्स ओडिसी, २००३ मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीने मार्स एक्स्प्रेस ही याने  मंगळावर पाठवली. जी आजदेखील कार्यरत असून मंगळाच्या कक्षेत फिरत आहेत. २००४ मध्ये मार्स एक्स्प्लोरेशन रोव्हर मिशनअंतर्गत स्पिरिट आणि अपॉच्र्युनिटी हे दोन रोबोटिक रोव्हर मंगळावर वेगवेगळय़ा ठिकाणी उतरवले गेले.  तिथल्या माती आणि दगडाचे अन्वेषण करून पाण्याचे अस्तित्व शोधणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते.  मोहिमेत मंगळाच्या मातीत हेमॅटाइट हे लोह आणि ऑक्सिजनपासून बनणारे लोहसंयुग सापडले. मंगळावर पूर्वी पाणी असल्याचा हा सबळ पुरावा मानला गेला.

मंगळाच्या अन्वेक्षणासाठी भारताची मार्स ऑर्बिटर मिशन- मंगळयान मोहीम महत्त्वपूर्ण ठरली. ५ नोव्हेंबर २०१३ ला पीएसएलव्ही सी-२५ रॉकेटच्या साहाय्याने मंगळयान प्रक्षेपित झाले. साधारणत: २५ दिवस पृथ्वीच्या कक्षेत फिरत यानाने कक्षा आणि गती वाढवली. ३० नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाकडे झेपावले. अखेर २४ सप्टेंबर २०१४ ला  यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या दाखल झाले. आणि भारत मंगळावर यशस्वीपणे यान पाठवणारा जगातील चौथा आणि  पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणारा पहिला देश ठरला. तुलनेने कमी पेलोड आणि किफायतशीर डिझाइन असूनही मंगळयानाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. याच्या मिथेन सेंसर फॉर मार्स उपकरणाने  मंगळाच्या वातावरणात मिथेनचे अस्तित्व दाखवून दिले. मार्स कलर कॅमेराने इथला पृष्ठभाग, वातावरण यांचे हाय रेझोल्यूशन इमेज चित्रित केल्या. लिमेन अल्फा फोटोमीटरने वातावरणातील  डय़ुटेरियम आणि हायड्रोजनची विपुलता मोजली. थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर  मंगळाच्या पृष्ठभागाचे तापमान आणि खनिज रचना यांचे विश्लेषण करण्यासाठी डिझाइन केले होते. सहा महिन्यांसाठी  नियोजित  ही मोहीम आठ वर्षे सुरू होती.याचा पुढचा टप्पा म्हणून येत्या काही वर्षांत मंगळयान-२ मंगळावर पाठवले जाईल. 

नासाने मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर(२००६), फिनिक्स(२००६) , मार्स सायन्स लॅबोरेटरी (२०११), मावेन(२०१४) अशा काही मोहिमा यशस्वीपणे राबवल्या. या मोहिमांनी मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाण्याचा  बर्फ आणि हायड्रेटेड खनिजांचे पुरावे शोधले. २०१६ मध्ये युरोपियन स्पेस एजन्सी आणि रशियन स्पेस एजन्सी यांनी एकत्रितपणे एक्सोमार्स-२०१६ मोहीम राबवली. २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिराती चे ‘होप’ यान मंगळाच्या कक्षेत दाखल होऊन प्रदक्षिणा घालू लागले. पाठोपाठ चीनच्या  तिआन्वेन-१ मोहिमेतून मंगळावर लॅन्डर  आणि रोव्हर सुखरूप उतरला. जग कोविडच्या सावटाखाली असताना नासाच्या मार्स २०२० मोहिमेने वैज्ञानिक जगात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या मोहिमेत १८ फेब्रुवारी २०२१ ला पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावरील जेझेरो क्रेटरमध्ये यशस्वीपणे उतरला. १९ एप्रिल २०२१ ला मंगळावर  इंजेन्युइटी हे हेलिकॉप्टर उडाले. इतर ग्रहावर पहिल्यांदाच अशा प्रकारचे हेलिकॉप्टर उड्डाण झाले.  ही घटना भविष्यातील प्रगत  मंगळ मोहिमांसाठी लिटमस टेस्ट ठरली.

मंगळाचे पृथ्वीशी साम्य, खडकाळ पृष्ठभाग, पाण्याचे अस्तित्व, ध्रुवीय प्रदेशातील बर्फाळ टोप्या ही सगळी कारणे आपल्याला त्याचा अधिक शोध घेण्यासाठी सतत प्रेरणा देत असतात. पुढील वर्षी जपानचे मार्शियन मून एक्सप्लोरेशन (टट) प्रक्षेपित होईल. ते मंगळाच्या फोबोस उपग्रहावर उतरून तिथल्या खडकांचे नमुने पृथ्वीवर परत आणेल. असेच रशियाचे मार्सग्रण्ट  थेट मंगळावरून दगडमाती जमा करून घेऊन येईल. मंगळावरील बर्फाच्या टोप्यांचा अभ्यास करण्यासाठी २०२६ मध्ये अनेक देशांच्या सहकार्यातून  इंटरनॅशनल मार्स आइस मॅपर ही आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली जाईल. यासोबतच नेक्स्ट मार्स ऑर्बिटर, मार्स मेटनेट  अशा अनेक मोहिमांची तयारी सुरू आहे. या मोहिमा भविष्यातील मानवी मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करतील. मंगळावर जाण्याचे मानवाचे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल अशी शक्यता आहे. अंधश्रद्धा आणि संशयवादातून अमंगल ठरलेला हा लालग्रह वैज्ञानिक अन्वेक्षणाने मंगलमूर्ती ठरावा!

Story img Loader