कॉलेजला असेपर्यंत ट्रिप्स, ट्रेकिंगसाठी हक्काचा ग्रूप असतो. पण जॉबला लागल्यापासून हे सगळं बंदच होतं. मुलं एकटय़ा-दुकटय़ानं जातातही फिरायला, पण मुलींचं काय? पण आता हे चित्र पालटू लागलंय. नोकरीनिमित्त तर कित्येक जणी परदेशवाऱ्या करतातच आणि त्यानिमित्तानं तिकडे एकटय़ा पर्यटनालाही जातात. फ्रान्समध्ये ‘लँग्वेज असिस्टंट शिफ्ट प्रोग्रॅम’ला गेलेली मुंबईची रीमा हीसुद्धा त्यातलीच एक. आपल्या या ट्रिपची कथा तिने ‘व्हिवा’बरोबर शेअर केली.

फ्रेंच भाषेत एम. ए. केल्यामुळे मला ‘लँग्वेज असिस्टंट शिफ्ट प्रोग्राम’निमित्त ऑक्टोबर २०१३मध्ये फ्रान्सला जायची संधी मिळाली आहे. सध्या आम्ही ज्या शाळेत शिकवायला जातो, तिथे दर सहा महिन्यांनी एक ते दोन आठवडय़ाची सुट्टी मिळते. मग अशा वेळी घरात बसून करायचं तरी काय? मग मी युरोप पालथा घालायचं ठरवलं आणि लागले कामाला. एका आठवडय़ात तीन शहरं असा साधारण हिशेब मी ठरवला होता. मी आत्तापर्यंत रोम, इटली, पॅरिस यांसारख्या अनेक शहरांना भेट दिली आहे. इथली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तुम्हाला हॉटेलपासून ते ट्रेनपर्यंत सर्व बुकिंग इंटरनेटवरून करता येतं. त्यामुळे कसलीच चिंता नसते. कुठेही जायचं तर पहिला प्रश्न येतो तो राहण्याचा. फ्रान्समध्ये हॉटेल्समध्ये राहायचं म्हणजे सर्व सेव्हिंग्जवर पाणी सोडण्यासारखं असतं. म्हणूनच या खर्चापासून वाचण्यासाठी मी इंटरनॅशनल युथ हॉस्टेलचा पर्याय निवडला होता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ५० युरोचं युथ कार्ड घ्यावं लागतं. एकदा युथ कार्ड घेतलं की, तुम्ही जगभरातील सर्व युथ हॉस्टेल्सचे मेंबर होता. फ्रान्समध्ये युथ हॉस्टेलचं भाडे ३०-४० युरोइतकंच आहे. त्यात ‘ऑफ सीझन’ असेल तर २० युरोपण पुरेसे होतात. फ्रान्समध्ये २३ वर्षांपर्यंतच्या मुलांना ‘युथ डिस्काउंट’ सुद्धा मिळतं.
vv36 युथ हॉस्टेलमध्ये तुम्हाला बेसिक सुविधा मिळतात. एक तर इथे ६ ते १० जणांसाठी डॉर्मेटरी रूम असतात. तिथे प्रत्येकाला एक बेड दिला जातो. सामान ठेवायला जागा दिली जाते. इथे कधी प्रत्येक खोलीत बाथरूम असतं तर, कधी सर्वासाठी कॉमन बाथरूम्स असतात. सकाळचा नाश्ता करायचा, तयार व्हायचं आणि बाहेर पडायचं ते थेट रात्री झोपायला परतायचं. काही हॉस्टेल्स ब्रेकफास्टचे पैसे आगाऊ घेतात, तर काही ठिकाणी त्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतात. इथे तुम्हाला प्रायव्हसीवर पाणी सोडावं लागेल पण तुमचे बरेच पैसे वाचतात. या हॉस्टेल्सचा अजून एक फायदा म्हणजे कॉमन हॉल असल्यामुळे इतर मुलांशी बोलायला मिळतं.
नवीन मित्र बनतात. नवीन गोष्टी जाणून घ्यायला मिळतात. तुम्ही फॅमिली ट्रीप काढता तेव्हा प्रायव्हसीचा प्रश्न येतो, पण एकटय़ाने प्रवास करताना स्वस्त आणि मस्त हॉस्टेलचा पर्याय जास्त सोयीचा असतो.
vv37आता मुद्दा आहे प्रवासाचा. येथील प्रत्येक प्रसिद्ध ठिकाणांची संपूर्ण माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. आणि तरीही गरज लागलीच तर, फ्रान्समध्ये प्रत्येक लहानात लहान गावापासून ते मोठय़ा शहरात एखादा टुरिस्ट स्पॉट असेल तर लगेच टुरिस्ट ऑफिस असतंच. या ऑफिसमध्ये तुम्हाला त्या जागेची सर्व माहिती मिळते. तेथील नकाशेसुद्धा दिले जातात. अर्थात हे सरकारी ऑफिस असल्याने ही सर्व माहिती विनामूल्य मिळते. त्यामुळे प्रत्यक्ष गावात जाऊनसुद्धा ‘आता पुढे काय,’ असा प्रश्न पडत नाही. फ्रान्स, इटलीसारख्या देशात जर कसला सर्वात जास्त विचार करावा लागत असेल तर तो तुमच्या पाकिटांचा. पॅरिससारख्या नावाजलेल्या शहरांमध्ये चोरांचा सुळसुळाट आहे. फिरताना तुम्हाला तुमचा कॅमेरा, पैशांचं पाकीट यांची खूप काळजी घ्यावी लागते. दागिन्यांचं नावंच काढू नका. यावर उपाय म्हणून ‘बनाना पॉकेट’ किंवा छुप्या पाकिटांचा वापर करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर पैसे हाताशी बाळगण्यापेक्षा टुरिस्ट कार्ड किंवा डेबिट कार्ड जवळ बाळगणे कधीही उत्तम.
माझ्या या एकटीच्या भ्रमंतीत मी चायनीज, अमेरिकन, युरोपियन तरुण-तरुणींना भेटले. भारतातील एक मुलगी इंग्लिश शिकवायला vv38फ्रान्समध्ये येते, या गोष्टीचं त्यांना खूप अप्रुप आहे. मुळात भारतीय इतकं छान इंग्लिश बोलतात, याचं त्यांना आश्चर्य वाटतं. पण जेव्हा मी त्यांना सांगते की, आम्हाला इंग्लिशसोबतच अजून दोन-तीन भाषा येतात, तेव्हा तर ते थक्क होतात. येथील लोकांवर आणि पर्यटकांवरदेखील  ‘स्लमडॉग मिलेनिअर’चा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या मनात भारत म्हणजे गरीब, असंस्कृत लोकांचा देश अशी प्रतिमा आहे. पण आज त्यांच्यात जाऊन ही प्रतिमा बदलण्याची संधी मला मिळाली. त्याचाच एक परिणाम म्हणजे येथील माझ्या एका फ्रेंच मैत्रिणीनं भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 थोडक्यात, थोडं बिनधास्त व्हा आणि बॅग खांद्याला मारून, निकल पडो!
(शब्दांकन – मृणाल भगत)
viva.loksatta@gmail.com

Story img Loader